पिवळा दिवा-

नुकतीच घडलेली घटना-
नेहमीच्या घाई गडबडीत दुचाकीवरून कामे साधत भटकंती सुरू होती….
दादरला सेना भवनचा वाहतूक नियंत्रक दिवा ओलांडून पोर्तुगीज चर्च कडे आगेकुच करीत होतो…. जुन्या कंपनीत नोकरी करताना हा रोजचा रस्ता असायचा… ह्या आठवणी मनात आणत पुढे सरकत होतो इतक्यात सुश्रुषा हॉस्पिटलच्या चौका जवळचा दिवा हिरव्याचा पिवळा होताना बघीतला….
पटकन पुढे निघून जावू ह्या मनात आलेल्या चोरट्या भावनेने विचारांना जिंकले व मी तो दिवा पिवळ्याचा लाल होण्या आधीच चौक पार केला….
तसे बघायला गेल्यास हे असे मी कधी कधी केलेही असेन – व ही काही पहिलीच वेळ नव्हती….
झाडाखाली फटफटीवर ठाण मांडून बसलेल्या साहेबांनी आपल्या सहकाऱ्यामार्फत थांबण्याचा इशारा केला….. मनोमन साहेबांच्या सात पिढ्यांचा उद्धार करीत मी दुचाकी बाजूला घेतली… नशीब डोक्यावर शिरस्त्राण (लोखंडी टक्कल) होतेच.
सविनय पणाचा आव आणत दुचाकी बरोबर एका कोपऱ्यात साईड स्टॅंडला लावली व चालत साहेबांकडे येत असतानाच परवाना काढण्यासाठी मागच्या खिशातले पाकीट काढले…
रस्त्यात ५०० रुपयाची नोट सापडल्यासारखे हसू चेहऱ्यावर आणत साहेबांना खास आवाजात व एक हात उंचावून मराठमोळा नमस्कार केला.
साहेब चांगलेच खत्रुट वाटत होते – नमस्काराचे प्रत्युत्तर तर सोडाच साधे लक्षही देण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. जेव्हा खात्याचे सौजन्य सप्ताह कसा पाळावा ह्यावरचे प्रशिक्षण दिले जात होते तेव्हा बहूदा ते त्या वर्गाला गैरहजर राहिले असावेत अशी शंका डोक्यात आली.

भारीतला रे~बॅन चा सोनेरी दांड्यांचा काळा चष्मा, फटफटीवर विसावलेल्या हाताच्या बोटांतल्या चमकत्या अंगठ्या साहेबांच्या सुखवास्तू पणाची साक्ष देत होत्या.
“नंबर प्लेट बदलून घ्यावा – मऱ्हाटीत न्हाय चालायची” साहेब लोकं सगळं बदलतील पण आपली गावरान भाषा नाही बदलायचे !
“बरं साहेब” इतकेच बोलून मी हातातले परवाना पत्र न मागता त्यांच्या समोर धरले.
“ह्या वेळी वॉर्नींगवर सोडा साहेब, लगेच बदलून घेईन नंबर” मी काकूळतीला येऊन बोललो…
“त्यासाठी न्हाई थांबवले, तुमी सिग्नल जम्प केलाय” साहेब गुरगुरले.
मी अवाक झाल्याचा आविर्भाव चेहऱ्यावर आणला व म्हणालो ” पण तो तर पिवळा होता तेव्हा”
“मग काय झालं ? पिवळा होता म्हंजी स्पीड कमी करायचा हा रुल हाय हे माहित हाय का तुमाला ?” साहेबाने आता कायद्यावर बोट ठेवले.

मी गप्प बसून १०० रुपयांची पावती फाडून परवाना बटव्यात टाकून निघायला वळलो…
“ह्या पुढे लाइफ मध्ये लक्षात ठेवा- पिवळा दिवा दिसला की स्पीडवर कन्ट्रोल करायचा” सल्ला देण्याच्या आवाजात साहेब गुरगुरला.
“हो आठवण करून दिल्याबद्दल व सरकारी तिजोरीत १०० रुपये जमा करवून घेतल्याबद्दल आभारी आहे” असा तिरकस टोमणा साहेबाला मारून मी कामावर जायला परत निघालो.
**************************************

ह्या घटनेला चांगला महिना उलटला असेल…
एका क्लायंट कडे ब्रेकडाउन दुरूस्ती करताना एका रुग्णाशी चाललेले त्यांचे संभाषण कानावर पडले.
विषय होता तेलकट तिखट खाण्याचा व आतड्यांवर त्याच्या झालेल्या परिणामांचा.
हे साहेब हिंदीत सांगत होते – ” याद रखीये इसके आगे आप जितना तिखा, तला हुआ खाएंगे वो आपके लिये जहर के समान होगा. यह समजीये की सिग्नल की लाल बत्ती आपको दिखी है और आपकी गाडी अभी उधरही खडी करनी है आपको”
रुग्ण गेल्यावर मला म्हणतात “अरे हा रिक्षावाला होता. जेवणाच्या वेळा पाळत नाहीत, बाहेरचे अरबट चरबट खातात, मग बहूतेकदा पोटाच्या तक्रारी घेऊन येतात”

पण तोवर मला माझ्याकडून सिग्नलला १०० रुपये वसूल करणारे रे~बॅन वाले साहेब आठवले होते.

खरचं जिवनांतल्या एखाद्या क्षणी पिवळा दिवा बघून;  योग्य तो इशारा आपण त्यापासून घेतल्यास लाल दिव्याची भिती कधी आपणांस वाटणारच नाही…..

टिप्पणी करे

वन फॉर द………

ह्या कथेतील सर्व प्रसंग, पात्रे व स्थळे पूर्णता काल्पनिक आहेत.
विवेक हा एक अतिशय गरीब घरचा मुलगा होता.अगदी लहानपणीच वडिलांचे पितृछत्र हरवले. वडिलांच्या पश्चात घरोघरी जाऊन स्वयंपाक करणाऱ्या आपल्या स्वाभिमानी आईला संसार चालवण्यास मदत व्हावी म्हणून विवेक लहानपणीच घरोघरी देवपूजेची कामें करायला लागला.
सकाळी ७ च्या सुमारास जिवाची कामे आटपून तो ३/४ घरी जाऊन देवपूजा करायचा. वेळ वाया जाऊ नये म्हणून मधल्या वेळेत अभ्यास करी.
हे करीत असतानाच हळू हळू त्याचे शालेय शिक्षण सुरू होते. स्वत:च्या शाळेची फी, वह्या पुस्तकांचा व गणवेशाचा वगैरे खर्च ह्यातून भागायचा व आईला संसाराचा गाडा हाकायला तेव्हढीच मदत व्हायची. त्याच्या ह्या प्रयत्नांचे सर्वांनाच कौतुक वाटायचे.
शाळेतला एक होतकरू विद्यार्थी तसेच आज्ञाधारक म्हणून शिक्षकांचा त्याच्यावर लोभ होता त्यातच वडील हयात नसल्या कारणाने शाळेतल्या शिपाया पासून मुख्याध्यापकांपर्यंत सर्वांनाच त्याच्याबद्दल ममत्व होते. परंतू कधीही विवेकने ह्या भावनांचा सवलती म्हणून फायदा उचलला नव्हता.
आपल्या आई प्रमाणेच स्वाभिमानी असणारा विवेक कधी शिक्षकांच्या घरी अडचणी विचारायला गेला तरी तेथे देऊ केलेला चहा किंवा फराळ विनम्रपणे काहीतरी कारणे सांगून टाळायचा.
प्रामाणिक असल्या कारणाने विवेकच्या आईला- सिंधूताईंना- कुबलांकडे चांगला मान मिळायचा. त्या तेथे पोळ्यांची कामे करींत. कुबल शहरांतले एक नावाजलेले उद्योगपती होते. एका मोठ्या इंजिनियरींग फर्म चे मालक असूनही अत्यंत देवभोळा, पापभीरू व साधा माणूस म्हणून कुबलांची ख्याती होती.
सौ. कुबल पण एक मध्यमवर्गीय कुटुंबातून ह्या घरी आल्या होत्या त्यामुळे गरीब घरच्या परिस्थितीची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांनी नेहमीच सिंधुताईंना घरच्या सदस्या प्रमाणेच वागवले. कुबलसाहेबांच्या आईच्या आजारपणात केलेली सिंधुताईंची मदत त्या कधीही विसरू शकत नव्हत्या.

कुबलांचा कामाचा व्याप जसं जसा वाढु लागला तसं तसा त्यांचे सकाळच्या देवपूजेकडे नियमित दुर्लक्ष होवू लागले. त्यावर तोडगा व थोडी स्वाभिमानी सिंधुताईंना मदत म्हणून सौ. कुबलांनी विवेकला देवपूजेला येण्यास सांगीतले. विवेकचे सकाळचे देवपूजेचे एक काम सुटल्याने त्यालाही आवश्यकत: होतीच. विवेकचा कुबलांच्या बंगल्यातला प्रवेश अश्या रितीने झाला.
कुबलांना एक मुलगा व एक मुलगी होती. मुलगा- उमंग- विवेकच्या वयाचाच म्हणजे ६वीत होता तर मुलगी -स्नेहा- ३री त होती. उमंग अत्यंत चाणाक्ष व हुशार विद्यार्थी होता व शाळेत नेहमीच वरच्या वर्गांत उत्तीर्ण व्हायचा. स्नेहा अभ्यासात यथा-तथाच होती. विवेक व उमंगची समवयस्क असल्याने चांगली गट्टी जमली.
विवेकचा नांवाप्रमाणेच विवेकी स्वभाव कुबल दाम्पत्याला अतिशय आवडायचा. लहान वयातही त्याला आलेला समज व स्वाभिमानाचे दोघांनाही कौतुक वाटायचे. एकदा सौ. कुबल उमंगचे काही जुने कपडे विवेकला द्यायला निघणार एव्हढ्यात कुबलांनी त्यांना रोखले….
“तो मुलगा व त्याची आई स्वाभिमानी आहेत, आपण त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा” साहेबांचे म्हणणे पटल्याने सौ. कुबलांनीही नंतर तसा प्रयत्न केला नाही. कुबल साहेबांनी विवेकच्या स्वाभिमानाचाच नव्हे तर प्रामाणिक पणाचाही प्रत्यय अनेकदा घेतला होता.

दिवसांमागून दिवस जात होते. कुबलांकडील विवेकचा वावर सहाजिकच वाढला होता. त्यातच दहावीच्या अभ्यासासाठी सौ. कुबलांनी विवेक व उमंगने एकत्र अभ्यास करावा असे सुचवले. शांतपणे अभ्यास करायला मिळेल म्हणून विवेकने लगेच होकार दिला.
विवेक व उमंगचा दहावीचा अभ्यास उमंगच्या खोलीत सुरू झाला. दहावीत दोघेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर दोघांचे रस्ते वेगळे झाले. उमंगला जीवशास्त्रात जास्त गोडी होती तर विवेकला अभियांत्रिकी विषयांत रस होता.
उमंग डॉक्टर व्हायची स्वप्ने बघायचा. विवेकला डॉक्टर होणे परवडणारे नव्हते. उमंगने बारावी नंतर वैद्यक शास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले होते तर प्रथम पदविका व नोकरी करून पदवी करायचा निर्णय विवेकला घेणे भाग पडले. दोघा मित्रांच्या वाटा वेगवेगळ्या असल्या तरी उद्दीष्ठ्य एकच – उच्च शिक्षणाचे !
इतकी वर्षे काटकसरीने जमा केलेला पैसा सिंधुताईंनी मुलाच्या कामी आणण्याचे ठरवले होते. नादारी साठी अर्ज विनंत्या करून सिंधुताईंनी सरकार कडून विवेकच्या अभियांत्रिकी पदविके च्या अभ्यासक्रमाचा खर्च कमी तर करवून घेतला होता परंतू कॉलेजचा इतर खर्च व पुस्तकांचा खर्च त्यांना व विवेकलाच उचलावा लागणार होता.
स्वत:च्या मुलाला शिक्षणात काहीही कमी पडू नये म्हणून दोन तीन घरची जास्तीची कामे करायला त्यांनी सुरुवात केली. येथे विवेकनेही कुबल साहेबांना विनंती करून त्यांच्या फॅक्टरीत अर्धवेळ काम मागून घेतले.
सकाळी कॉलेज, दुपारी अभ्यास व सायं ६ ते १० काम असा दिनक्रम झाल्याने त्याची पूजेची कामे सहाजिकच बंद पडली. परंतू कुबल साहेबांच्या कृपेने त्याला त्याचा स्वत:चा हातखर्च वगैरे काढता आला.

विवेक व उमंग ह्यांच्यातली मैत्री जरी टिकून होती, तरी बालसुलभ भावनांतला निखळपणा हळूहळू कमी होत होता. अभ्यासांचे विषय वेगळे, कॉलेजचे वातावरण वेगळे व महत्वाची गोष्ट म्हणजे कॉलेज मधील मित्र मंडळी वेगळी !
दोघांनाही दिवसभराच्या रगाड्यातून फक्त रविवार मिळायचा – उमंग कधी कॉलेज च्या टिमकडून क्रिकेट तर कधी मित्रांबरोबर सहल, सिनेमा वगैरे मध्ये व्यस्त झाला. तर अर्धवेळ कामात रगडला गेलेला विवेक घरी आराम, वाचन किंवा राहिलेला अभ्यास भरून काढण्यात सुट्टी घालवायचा.
दोन वर्ष भराभर निघून गेली. बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या उमंगला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला…. आणी उरली सुरलेली दोघांची मैत्री जवळपास तुटली. भांडण वगैरे नाही झाले पण दोघे एकत्र आले की त्यांच्या जवळ आपापसात बोलायला विषयच नसायचा !
दहावीत असलेली स्नेहा “पास झाली तर शाळेचे नशीब !” असं गमतीने सौ. कुबल म्हणायच्या – उमंग तर बहिणीच्या अभ्यासाकडे सरळ दुर्लक्ष करायचा. कुबल साहेबांना सकाळी फक्त नाश्त्याला तर रात्री फक्त जेवायला घरी वेळ मिळायचा.

आणी एक दिवस स्नेहाच्या शाळेतून पालकांपैकी एकाला बोलावणे आले – मनाशी अस्वस्थ होत कुबल साहेब शाळेत पोहचले. वर्ग शिक्षकांना भेटल्यावर ते कुबलांना प्राचार्यांकडे घेऊन गेले. तेथे कुबलांसारखी काही पालक मंडळी बसलेली होती.
प्राचार्यांच्या बोलण्यावरून कळले की जी मुले अभ्यासात यथा तथा आहेत त्यांना आवश्यकता पडल्यास दहावीच्या परीक्षेला बसू दिले जाणार नाही. अत्यंत उद्विग्न अवस्थेत कुबल फॅक्टरी ऐवजी घरी जायला निघाले…….

टिप्पणी करे

वन फॉर द….(२)

अत्यंत उद्विग्न अवस्थेत कुबल फॅक्टरी ऐवजी घरी जायला निघाले……. त्यांना घरी आलेले पाहून सौ.कुबल आश्चर्यचकित झाल्याकाय झालं शाळेत ?”
कन्येने दिवे लावलेतकुबल स्वत:वरच चिडलेले होतेतीला परीक्षेला बसू दिले जाणार नाही, म्हणत होते मुख्याध्यापक !”
पुढे त्यांनी सौ. कुबलांना पूर्ण वृत्तांत एका दमात सांगितला. सौ. कुबलांचा रक्तदाब अचानक वाढला. डॉक्टर बोलावण्या इतपत वेळ येऊन ठेपली.

त्या दिवशी सर्व काही स्थिरस्थावर झाल्यावर अचानक साहेबांना विवेकची आठवण झाली. “सिंधूताई, विवेकला सांगा, फॅक्टरीत जाता येथे भेटायला, महत्वाचे काम आहे.”
विवेकच आता ह्या परिस्थितीत तोडगा काढू शकेल असा विश्वास त्यांना होता.

विवेक, स्नेहाच्या दहावीचे काही खरे नाही !” विवेक सायंकाळी त्यांना भेटायला येताच त्यांनी सरळ विषयालाच हात घातला
काय झाले ?” विवेकने प्रश्न करताच त्यांनी भडभडा शाळेत झालेला प्रकार सांगितला.
विवेकला शाळेचे नियम चांगलेच माहित होते.
पण ती तर क्लासेस ना जाते ना ?”
तेथे काय शिकवतात देव जाणे, ह्या परिस्थितीत स्नेहावर रागावूनही फायदा होणार नाही

आपण काय करायचं ठरवलंय ?” विवेकनेच त्यांना विचारले.
स्पष्टच विचारतो, तुला तीचा अभ्यास घ्यायला जमेल ?” कुबलांकडे प्रस्तावना प्रकार कधीच नसायचा.”तू संध्याकाळी फॅक्टरीत येता ही जबाबदारी डोक्यावर घे !”
परीक्षेला फक्त महिने उरलेत, मी माझ्याकडून प्रयत्न करीन, नानासाहेबविवेकने त्यांना आश्वासन दिले.

अनेक अडीअडचणींच्या वेळी कुबल एखाद्या पहाडासारखे सिंधूताईंच्या पाठीशी उभे राहिलेले होते.
विवेकला त्यांच्या उपकारांची जाण नेहमीच होती. त्यातच अभ्यासाची गोडी असलेल्या विवेकसाठी हे काम फारसे अवघड नव्हतेच.
आज पासूनच सुरुवात करतोविवेकने त्यांना सांगताच,
मलाही तुझ्याकडून हीच अपेक्षा होती, विवेकइतकेच ते बोलू शकले.
त्या दिवशी पासून विवेक स्नेहाचा अभ्यास घेऊ लागला.विवेकने तीन महिने स्नेहावर घेतलेली मेहनत फुकट गेली नाही.
जेमतेम काठावर पास होणारी स्नेहा चक्क प्रथम वर्गात दहावीची परीक्षा पास झाली.
नानासाहेब कुबलांना सौ. कुबलांना विवेकबद्दलचा आदर अजून दुणावला.
इतके करून विवेकचे स्वत:च्या अभ्यासाकडे जराही दुर्लक्ष झालेले नव्हते. ते वर्ष त्याचेही महत्वाचे असे पदवीकेचे शेवटचे वर्ष होते. ह्या वर्षी मेरीट मध्ये आल्यासच पदवी अभ्यासक्रमाला थेट दुसऱ्या वर्गात त्याला प्रवेश मिळणार होता…..

अपेक्षापूर्तीचा आनंद काय असतो ते विवेकला परीक्षेचा निकाल लागल्यावर कळले ! आता महत्वाचा प्रश्न नोकरी करून पदवी घेणे कितपत जमेल ?
ह्याचे उत्तर नानासाहेबांनी दिलेजसा विवेक प्रवेश मिळाल्याची बातमी घेऊन नानासाहेबांच्या समोर उभा राहिला, नानांनी त्याला सरळ सांगितले,” ह्या वर्षी पासून तुझी नोकरी बंद, फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे“.
नानांच्या हुकुमनाम्याने विवेक साफ गोंधळला.
सिंधूताई, जसा मला उमंग तसा विवेक, तुम्ही त्याला फक्त खर्चाला चिरीमिरी देत जा, बाकी मी सांभाळेन“. विवेक उमंग दोघांचेही अभ्यास जोरदार चालू होते. दोघांच्या स्वभावात बराच फरक पडलेला होता. उमंग बराचसा खेळकर होत गेला तर विवेक जबाबदार. उमंग ने काहीही झाले तरी अभ्यासाला महत्त्व दिलेच होते. अभ्यासाच्या बाबतीत एकाला झाकावा दुसऱ्याला काढावा अशी परिस्थिती होती.
बारावीला स्नेहानेयेरे माझ्या मागल्याउक्ती प्रमाणे नानासाहेबांचे रक्त आटवले. परीक्षेच्या आधी दोन महिने वेळात वेळ काढून जसे जमेल तसे विवेकने तीला अभ्यासात मदत केली. गाडी जेमतेम वरच्या वर्गात ढकलली गेल्याचे समाधान नानांना लाभले.
ह्या वेळी स्नेहा मध्ये झालेला छोटा बदल विवेकला अस्वस्थ करून गेला होता. शिकताना स्नेहाचे लक्ष अभ्यासात नसून आपल्यावर जास्त आहे असे त्याला वाटले होते म्हणून ह्यावेळी त्याच्याकडून हवी तेव्हढी मेहनत घेतली गेली नव्हती (किंवा स्नेहाने हवी तेव्हढी मेहनत घेतली नव्हती) पण विशेष विचार करण्या इतपत तो विषय त्याला महत्वाचा वाटला नाही.

बारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर स्नेहासाठी नानासाहेबांनी दुचाकी घेतली. बसच्या अनियमित वेळा, बसची गर्दी लांबचे अंतर ही कारणे नानांना पटण्याजोगी होती.विवेकच्या अभियांत्रिकी महाविद्यालयावरून पुढे गेल्यावर स्नेहाचे महाविद्यालय यायचे. विवेक सायकलवर ये जा करीत असे.
कित्येकदाचल मी पटकन सोडते तुला कॉलेजलाअशी लिफ्ट स्नेहा विवेकला द्यायची.
मला मित्रांनी पाहिले तर चिडवतील, मुलीच्या मागे दुचाकीवर बसून आला म्हणून
त्यात काय विशेष ? सांगायचे, मी तीला शिकवत होतोस्नेहा पटकन म्हणाली.
पण विवेकने काही उत्तर दिले नाही. नंतर दोघांची भेट विवेक स्वत:हून टाळायला लागला. स्नेहाचा आपल्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे हे कळण्याइतका विवेक वयात आलेला होता.

 विवेकची सारासार विचार बुद्धी त्याला सावध करत होती. एका बाजूला नानांचे अनंत उपकार त्याला आठवत होते तर दुसरीकडे स्नेहाचा विचार डोक्यातून जाता जात नव्हता. शेवटीविवेकने विचारांवर मात केली…. त्याने स्नेहाला पूर्णपणे टाळायचे ठरवले. विवेक दर खेपेला स्नेहाची भेट टाळायच्या प्रयत्नात होता तर दैव अजून वेगळ्याच प्रयत्नात होते. कुठल्या कुठल्या निमित्ताने दोघांची गाठ पडायचीच. जी गोष्ट विवेक टाळू पाहत होता तीच घडली…..
विवेक स्नेहा एकमेकांच्या प्रेमात पडले !बरेच महिने हे प्रकरण दोघांनी सर्वांपासून दडवण्यात यश मिळवले. स्नेहाच्या अती उत्साहा मुळे कित्येकदा भांडे फुटता फुटता राहिलेले होते.
ज्या गोष्टीची भीती सतत विवेकला छळायची ती गोष्ट एकदा घडली. उमंगच्या वर्ग मैत्रिणीने त्यांना एकत्र बघितले.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे…… बातमी मिळूनही उमंग बर्फासारखा थंड होता.
मला कल्पना होतीच, असे काहीतरी घडेल ह्याचीइतकीच प्रतिक्रिया त्याने तिच्याजवळ व्यक्त केली.
पण घरी गेल्यावर मात्र आई वडिलांना त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन त्याने सर्व कहाणी कथन केली.

सौ.कुबलांचा त्रागा मुलीची आईच समजू शकेल असा होता.
स्नेहाला घराबाहेर जायचे नाही, दुचाकी बंद, कॉलेजला सोडायला आणायला कंपनीची गाडी चालक, बाजारात जाताना आई बरोबरच जायचे अन्य अनेक बंधने घालण्यात आली.
त्यातच त्यांचा रक्तदाबाचा विकार परत उफाळून वर आला. सिंधूताईंचे घरातले येणे आता त्यांना नकोसे झाले होते.
प्रत्येक गोष्टीत त्या सिंधूताईंवर उखडायला लागल्या होत्या. कुबलांची परिस्थिती निराळी होती. ते विवेकवर संतापले नसले तरी त्यांना वाईट नक्कीच वाटले होते.
त्यांनी विवेककडे फॅक्टरीत ह्या विषयी विचारणा केली.
नानासाहेब, मी कुठल्या तोंडाने आपणांस ही गोष्ट सांगणार ? मी स्वत:ला आवरण्याचा खूप प्रयत्न केला पण मला जमले नाही.कुबलांना त्याच्या डोळ्यात पाणी तरळल्याचे स्पष्ट दिसत होते.
त्याच्या प्रामाणिक पणाचा अनुभव त्यांनी ह्यापूर्वी घेतलेला होता त्यामुळे विवेक खोटं कधीच बोलणार नाही हे ते जाणून होते.
ह्या परिस्थितीला कसे हाताळावे ह्याचा गहन प्रश्न त्यांना पडला होता. उमंगला तर ह्या गोष्टीचे काहीच नवल वाटले नव्हते किंबहुना आपले बिंग फुटायच्या आत स्नेहाचे बिंग फुटले हे बरेच झाले असा स्वार्थी विचार त्याच्या मनात येऊन गेला.

टिप्पणी करे

वन फॉर द….(३)

उमंगला तर ह्या गोष्टीचे काहीच नवल वाटले नव्हते किंबहूना आपले बिंग फुटायच्या आत स्नेहाचे बिंग फुटले हे बरेच झाले असा स्वार्थी विचार त्याच्या मनात येऊन गेला. सिंधूताईंना समजेनासे झाले होते की कुबल वहिनींना नेमके काय झाले तेआजार म्हणावा, तर रक्तदाबाचा विकार जुनाच होतात्यांनी स्नेहाला विचारायचा प्रयत्न केला पण जेंव्हा जेंव्हा त्या स्नेहा जवळ बोलायला जात, तेंव्हा सौ. कुबल काही ना काही निमित्ताने जवळ येऊन उभ्या राहत. शेवटी त्यांनी विवेकला विचारले…. आईची नजर चुकवीत विवेककाहीच माहित नसल्याचेआईशी प्रथमच खोट बोलला…..!

एका रात्री सौ. कुबलांना इस्पितळात दाखल करावे लागले. रक्तदाबाची व्याधी फार दिवस अंगावर काढल्याने शेवटी शरीराने साथ देण्यास नकार दिला होता. चाचण्यांत मधुमेहाचा विकारही समोर आला होता. कुबल साहेबांच्या घर, फॅक्टरी इस्पितळ ह्या चकरा सुरू झाल्या. स्नेहाला आई डोळ्यासमोरून हलू देत नव्हती. घर सांभाळण्याची जबाबदारी सिंधूताईंच्या डोक्यावर येऊन पडली. विवेक शेवटच्या वर्षाचा अभ्यास जोरात करीत होता. उमंगच्या दिवसभराच्या कार्यक्रमांत फारसा फरक पडलेला नव्हता. ***

दैवाने सौ. कुबलांची फार काळ परीक्षा घेतली नाही…. एका रात्री स्नेहाला त्यांनी झोपेतून जागे केले…..
मी खू थकली आहे स्नेहामला नाही वाटत आता मी परत हिंडू फिरू शकेन….” आईचा स्वर खुप खोलातून आल्याचा भास स्नेहाला होत होता. त्यांना मात्र त्यांचे बोलणे पूर्ण करायची घाई होती
मी हरले, तुला विवेक आवडत असेल तर तू त्याच्याशीच लग्न कर…”
स्नेहाला कळेनासे झाले काय करावे– “आई तू शांतपणे झोपून राहा, मी आता नर्स ला बोलावतेकरीत स्नेहाने खाटे जवळील बेलचे बटण दाबले.
मी, मला….खूपत्राससिं..…” आई ग्लानीत काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत असल्याचे स्नेहाला जाणवत होते. खाटेजवळील बेलचे बटण दाबून ठेवीत स्नेहाआई, आई…” म्हणत त्यांना शुद्धीवर ठेवायचा प्रयत्न करीत होती. स्नेहाचेच नाही तर ड्युटी वरील डॉक्टरांचे प्रयत्नही कमी पडले…..
नानासाहेब उमंग येई पर्यंत जेमतेम त्यांनी दम धरला….. नानासाहेबांचा हात हातात असताना प्राण गेल्याचे भाग्य मात्र दैवाने त्यांना अर्पण केले…. सर्व क्रिया कर्मांतर झाल्यानंतर एक दिवस कुबलांनी उमंगला विश्वासात घेतले, “विवेक बद्दल तुझे मत काय?”
आपल्या उपकारांखाली दबलेला आहे, तुमच्या साठी ह्या सारखा जावई शोधून सापडणार नाही.” नानासाहेबांनी इतक्या कठोरपणे प्रेमाबद्दल कधीच विचार केला नव्हता पण आजची पिढी व्यवहाराला महत्त्व जास्त देते ह्याची जाणीव त्यांच्या मनाला नकळत शिषारी आणून गेली.
सिंधूताईंना त्यांनीच ह्या विषयावर बोलते केले….
त्या गरीब पोळ्या लाटणाऱ्या बाईला ह्या प्रकारांची कल्पनाच नव्हती. नानासाहेबांनीही झाकली मू ठेवून फक्तस्नेहा विवेक एकमेकांना पसंत करतात, तर आपणच त्यांचे लग्न लावून देऊएव्हढेच सांगितले तेंव्हा त्यांना कळले की आपला मुलगा आता वयात आला आहे
तरीही त्याचे स्नेहाशी लग्न लावायची कल्पना त्यांनी स्वप्नातही केलेली नव्हती. त्या गरीब माउलीची स्वप्ने तिच्या आवाक्यात मावतील एव्हढीच होती.विवेकचे लग्न स्नेहाशी एका घरगुती समारंभात पार पडले. अगदी जवळच्या नातलग शेजाऱ्यां खेरीज कुणाला फारशी आमंत्रणे नव्हती
सिंधूताई नानांच्या अजून एका उपकाराखाली आल्या.
स्नेहाचा चेहऱ्यावर बऱ्याच काळा नंतर प्रथमच टवटवी आली.
विवेकला तर स्वप्नांत असल्यागत झालेले.
नानासाहेबांच्या चेहऱ्यावर एक जबाबदारी पार पडल्याची भावना स्पष्ट दिसत होती.

लग्नानंतर विवेकला घरजावई करायची घाई नानांनी केली नाही ते केवळ विवेकच्या स्वाभिमाना पोटीचमेकॅनिकल इंजिनियर असलेल्या विवेकसाठी फॅक्टरीत मात्र वरच्या हुद्द्याची जागा त्यांनी तयार केली बहुतांश जबाबदारी त्याच्यावरच टाकली. कंपनी मार्फतच त्याच्या राहण्यासाठी एक ब्लॉक दिला गेला तेही सरव्यवस्थापकाचा हक्क आहे असे भासवूनच दिला. बाकी कित्येक गोष्टी सरव्यवस्थापकाचे हक्क आहेत असे भासवून त्याला दिल्या गेल्या. ***

उमंगचे लग्न त्याच्या वर्ग मैत्रिणीशी धुम धडाक्यात झालेत्याच्या सासरची बहुतांश मंडळी परदेशात मोटेलचा व्यवसाय करणारी होती. पर जातीतली मुलगी केली म्हणून नानांना त्याच्यावर रागावण्याचेही धैर्य राहिलेले नव्हते. संशोधनाचा ध्यास घेतलेल्या उमंगला परदेशी जाण्याचे वेध लागलेले होते. पारपत्र परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा परवाना हे सोपस्कार पार पडल्यावर लगेचच उमंगसंशोधनकरायला पत्नीसह परदेशी रवाना झालात्याच्या राहण्याची सोय करण्याची नानांवर जबाबदारी नव्हतीती सोय लग्ना आधीच केली गेलेली होती…. ***

दिवसांमागून दिवस वर्षांमागून वर्ष जात होती….
नानांनी फॅक्टरीत जाणे बंद केले होते. वयोवृद्ध नानांचा सिंधूताईंचा आधार विवेक स्नेहाला एक कन्या रत्न झालेले होते.
विवेक सकाळी नाश्ता करून फॅक्टरीत गेला की, सिंधूताईंना लहानग्या पुजाला घेऊन स्नेहा रोज नानांकडे यायची.
नाना, सिंधूताई, स्नेहा पुजा एकत्र दुपारचे जेवण करीत नानांचे रात्रीचे जेवण बनवले की मग त्या घरी परतत तोवर विवेक घरी यायची वेळ झालेली असे. रोजचा हा दिनक्रम सर्वांसाठीच सुकर होता….

आसपास बरीच प्रगती झालेली होती…. मोबाईल, कॉम्प्युटर्स ह्यात गती अधिक आल्याने तसेच फॅक्टरीचा ताप रोज वाढत असल्याने विवेकला हल्ली यायला उशीर होवू लागला होता
मात्र उशीर होणार असल्याचे तो दर वेळी फोन करून स्नेहाला कळवीत असे….

अन….. त्या दिवशी.. ते घडले….!
स्नेहाच्या स्वप्नातही नसलेली, सिंधूताईंनी नावही ऐकलेली…..
उमंगच्या कित्येक आग्रहांना फेटाळलेली, तर नानांच्या अभिमानाला ठेच पोहचणारीघटना घडली होती….

विवेक मद्याच्या नशेत घरी आलेला होता !

टिप्पणी करे

वन फॉर द रोड … शेवट !

विवेक मद्याच्या नशेत घरी आलेला होता ! दाराची बेल वाजली म्हणून अर्धवट झोपेत असलेली स्नेहा दार उघडण्यासाठी उठली. विवेकच असणार ह्याची खात्री होती, कारण संध्याकाळीचबाहेर जेवणारअसल्याचा त्याचा फोन येऊन गेलेला होता. सेफ्टी डोअर मधून खात्री करीत तीने दरवाजा उघडला. अचानक आलेल्या एका विचित्र वासाने डोळ्यावरची तीची झोप उडाली. तीला तो वास नेमका कसला ते कळले नाही. तशीच अर्धवट झोपेत चालत ती बेड वर जाऊन पडली. विवेक कपडे बदलून बाथरुमला जाऊन आला बेडवर लवंडला. परत तोच दर्प तीच्या नाकांत शिरला. पडल्या पडल्या तो दुर्गंध कसला असावा ते आठवण्याचा प्रयत्न ती करींत होती. आणी खाडकन तीचे डोळे उघडले….. हा नक्कीच मद्याचा दर्प होता; कारण कधी विवेक बरोबर हॉटेल मध्ये जेवायला गेली की, तेथे आजूबाजूच्या टेबलांवरून तसला दुर्गंध यायचा…. रात्रभर तीला झोप लागली नाही. ती स्वत:ची समजूत घालिंत होती की कदाचित हा तो दुर्गंध नसावा, परंतू वातानुकूलित खोलीत आता तो चांगलाच जाणवत होता.

सकाळी उठल्यावर काहींच झाले नसावे इतक्या खेळकरपणे विवेक वावरत होता म्हणून तीला स्वत:वरच शंका येऊ लागली. सकाळची घाईगडबडीची वेळ असल्याने तो विषय तीने काढलाच नाही. परंतू त्यामुळे पूर्ण दिवसभर तीचे कुठल्याच गोष्टीत लक्ष लागले नाही.

सायंकाळी उशीराने विवेक घरी आल्यावर पुजाशी खेळत असताना तीने विचारले, ‘काल बराच उशीर झाला, तो ?’ ‘हो, अगं एक सरकारी निवीदा भरायची होती त्यात मदत करायला सरकारी अधिकारी आला होता,मग त्याला घेऊन जेवायला बाहेर जावेच लागलेपुजाशी खेळत खेळतच तो बोलत होता त्यामुळे त्याच्या डोळ्यातले भाव स्नेहाला कळू शकले नाहीत. ‘हे सरकारी अधिकारी मद्य खू पितात म्हणेस्नेहाने खडा टाकायचा प्रयत्न केलाहो, त्यांना काय आमच्या सारख्यांकडून फुकट मिळते ना !’ ‘पण आपण द्यावे कशाला ?’ स्नेहा विषय दामटवत म्हणालीअगं, मी नाही दिली तरी तो प्यायचा थांबणार थोडीच तो दुसऱ्यांकडून वसूल करील मग निविदा आपल्याला कुठून मिळणार ?’ ‘पण तू कशाला प्यायलास?’ अचानक हातातल्या खेळणे पुजाकडे सरकवत विवेकने स्नेहाकडे रोखून पाहिलेतुला काय माहित मी प्यायलो होतो की नाही ?’ ‘वास किती येत होता‘ ‘मी….’ विवेक काही बोलणार इतक्यात फोन वाजला. ‘…जरा फोन घे स्नेहाने फोन घेतला. हाय स्नेहापलीकडे उमंग ! ‘ अरे आज बऱ्यांच दिवसांनी फोन केलास ?’ मग फोनवर गप्पा सुरू झाल्या, विवेकशीही तो बराच वेळ बोलत होता. उमंगची पत्नी, मिना पण स्नेहाशी बोलली. त्यातच अर्धा तास गेला. उमंग बर्याच वर्षांनी भारतात येणार म्हणून स्नेहा एकदम खूश झाली. किती बोलू आणी किती नको असे तीला झालेले. तो आल्यावर त्याला काय काय आवडते ते सर्व बनवायचे प्लॅन तीचे सुरू झाले. विवेकच्या निविदांचा विषय बाजूला पडला ! उमंग त्याच्या पत्नी दोन वर्षाच्या हितेश सह महिन्याभरासाठी भारतात येणार होता. नानांचे पारपत्र परदेशात राहण्याचा परवाना तयार करायला त्याने स्नेहा विवेकला बजावून बजावून सांगितले होते. काही दिवसांसाठी तो नानांना परदेशात स्वत:च्या घरी न्यायचे म्हणत होता. दोन तीन दिवस रोजच्या सारखे गेल्यावर फिरून विवेक उशीरा घरी आला. आज स्नेहा त्याच्यासाठी जागी होती…. “काय चालवले आहेस हे ?” बेडरूम मध्ये आल्याआल्या तीने विचारलेकुठे काय..काही नाही !”
आज परत तू प्यायला आहेस ?” “अगं घ्यावे लागले त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर
विवेक हे मला अजिबात पसंत नाही” “पण माझाही नाईलाज आहे ना स्नेहा…” .
रात्री बयाच उशीरापर्यंत दोघांचा त्या विषयावर वाद सुरू होता. मध्येच सिंधूताईंनी दरवाजा ठोकला….”स्नेहा, झोपला नाहीत ते अजून, सकाळी लवकर उठायचे आहे तुला“. रात्रभर बिछान्यांत तळमळत असलेल्या स्नेहाला विवेकच्या मंद घोरण्याबरोबर तो वास सहन करावा लागला होता. सकाळी उठल्यावर ह्या गोष्टीचा साक्षमोक्ष लावायचे तीने ठरवले ! सकाळी पुजाला शाळेच्या बसवर सोडून तीने आल्या आल्या बेडरूम मध्ये विवेकला ह्या प्रश्नावर परत छेडलेपरत वाद विवाद सुरू झाले….. त्या दिवशी विवेक नाश्ता करताच फॅक्टरीत गेला…..

हे हळूहळू वाढत गेले…. एका रात्री दोघांचे आवाज इतके वाढले की, सिंधूताई जाग्या झाल्या…. मग त्यांनाही माहित होणे क्रमप्राप्त होते. त्या मातेला इतका मोठा धक्का पती गेल्यावर प्रथमच मिळाला होता

विवेकचे काही ना काही निमित्ताने उशीरा येणे सुरू होते. आल्यावर दोघांचे भांडण, पुजाचे रडणे हा नित्य कार्यक्रम झाला होता. एकदा तर रागाच्या भरात विवेकने स्नेहाला धक्का देऊन ढकललेही होते. मारहाणच काय ती बाकी होती……सिंधूताईंनी विवेकशी बोलणे बंद केले होतेस्नेहाही फक्त कामापुरती त्याच्याशी बोलायची…. फक्त पुजाशीच काय तो धड बोलत असायचा…. हे असें सुरू असतांना उमंग त्याची पत्नी मुलाला घेऊन भारतात आले. नानांकडे उतरलेला उमंग रोज सायंकाळी विवेकच्या ब्लॉक वरकंपनीद्यायला येवू लागला. बाहेर सुरू असलेले प्रताप आता घरापर्यंत येऊन पोहचले होते. उमंग आला की, सिंधूताई पुजाला घेऊन नानांकडे जात. घरात सुरू असलेला धिंगाणा पहाण्याची ताकत त्यांच्यात नव्हती. स्नेहाला अजून धक्का अजून ह्या काळात लागला. उमंगला हवे म्हणून मांसहारी पदार्थ विवेकने हॉटेलला फोन करून घरी मागवले. उमंग नानांना घेऊन परदेशात जायचा दिवस जवळ येत होता म्हणून स्नेहा गप्प होती. काही दिवसांचाच फक्त प्रश्न होता…. नाना बंगला पूर्ण बंद करून; सर्व व्यवस्था चोख झाली आहे हे पाहून एका मध्यरात्री उमंग बरोबर परदेशी रवाना झाले….. आणी होती नव्हती ती चाड विवेकने वेशीवर टांगली.

रोज पिऊन येणे, आल्यावर स्नेहाशी भांडणे, कधी कधी मारहाण हे प्रकार सुरू झाले…. सिंधूताई बऱ्याचदा मध्ये पडायच्या तेंव्हा त्यांच्यावर हात उचलायला विवेकने कमी ठेवले नाही.

आजकाल सिंधूताई स्नेहा फार गप्प गप्प राहायला लागलेल्या होत्यादोघींचे आधीचे गप्पांचे विषय साफ आटलेले होते…. सिंधूताई फक्त पुजा च्या बरोबर जरा काय त्या बोलायच्या…. बराच वेळ पुजाच्या केसांमधून हात फिरवत दु:खाचे कढं आतल्या आत सहन करायच्या….. स्नेहाच्या चेहऱ्याची तर बघवण्यासारखी अवस्था होती…. एकदा कपाळावरचे टेंगूळ स्पष्ट दिसत होते…. तर एकदा सुजलेला डोळा…… विवेक चिडचिड्यासारखा घरात वागत असे…. एकदा रात्री झोपेत बरळतांना स्नेहाने त्याला ऐकले…. स्नेहाला फक्त इतकेच कळू शकले होते की सरकारी अधिकाऱ्यांकडून त्या निविदा विवेक ऐवजी दुसऱ्याच कुणाला देण्यात आलेल्या होत्या….. !***पुजा सकाळची लवकर उठून बसे आजीची तीची खोली एक होती. मग आजी बरोबर दू पिणे, अंघोळ वगैरे कार्यक्रम आटपायचे. तोवर स्नेहा जागी झालेली असे. एका सकाळीआजी, आजी, आजी ऊठ ना…” अश्या पुजाच्या हाकांनी स्नेहा जागी झाली. “पुजा काय गोंधळ घालतेस सकाळ्ळी सकाळी ?”
आई, बघ ना आजी उठतच नाहीह्या पुजाच्या वाक्याने स्नेहाच्या काळजाचा ठोका चुकलाआत्या, आत्या….” असा आवाज देत ती सिंधूताईंना हालवू लागली….. चौथ्या मजल्यावरील डॉक्टर जोशींना तातडीने बोलावणे गेलेते आल्यावर त्यांनी सिंधूताईंचे झोपेतच प्राणोत्क्रमण झाल्याचे सांगितले…… पुजा स्नेहाचा उरलासूरला आधार कोसळून पडला होता…. विवेकच्या चेहऱ्यावर अपराधाची छटा स्पष्ट दिसत होती. …. ***

सिंधूताईंच्या निधना नंतर विवेकमध्ये लक्षणीय बदल झाला होतासायंकाळी तो लवकर येत असे, दारूला शिवणेही त्याने बंद केलेसिंधूताई गेल्यानंतरचे १०/१२ दिवस त्याने अजिबात स्नेहाला त्रास दिला नाही. त्याला ह्या सर्व गोष्टींचा पश्चात्ताप झाल्याची स्पष्ट जाणीव दिसत होती…. सिंधूताईंच्या अस्थी विसर्जन इतर क्रिया कर्मांतरासाठी विवेकने नाशिकला जावे असे ठरले होतेविवेक नाशिकला जाण्याच्या एक सायंकाळ आधी स्नेहाने हळूच त्याला विचारलेमी बरोबर येऊ ?.. आत्यांना शेवटचा निरोप देण्याचे माझ्या मनांत आहे.”
हो, चालेलएव्हढेच त्रोटक उत्तर देऊन तो शून्यांत हरवला….***सकाळी लवकर उठून पुजाची स्वत:ची तयारी आटोपून स्नेहा तयार होती….
विवेक तयार होवून आला ते तीघे सिंधूताईंचा अस्थिकलश घेऊन निघाले….
विवेक ने गाडी बाहेर काढली
ड्रायव्हर ?” स्नेहाच्या चेहर्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते
तो नेमका आजारी पडलाय !”
तू चालवशील गाडी, इतक्या लांब ?”
हो त्यात काय ?”

नाशिकला अस्थी विसर्जन झाल्यानंतर थोडा वेळ फेर फटका मारून सायंकाळी विवेक स्नेहाचा परतीचा प्रवास सुरू झाला….
इगतपुरी जवळ महामार्गावरील हॉटेल दिसताच विवेकने गाडी वळवली
स्नेहाच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे दुर्लक्ष करीतचला, काहीतरी खाऊन घेऊ
मध्ये गेल्यावर त्याने पुजा स्नेहासाठी खाण्याची ऑर्डर तर स्वत:साठी पिण्याची ऑर्डर दिली
अच्छा, ह्या साठी गाडी थांबवलीस, आत्याच्या अर्थी गोदावरीत अजून पूर्ण बुडल्या नसतील तेव्हढ्यात तू आपला ग्लासांत बुडायला लागलास !” स्नेहा पोटतिडकीने बोलत होती,….
दहा दिवसांत मला वाटले होते की आता तरी तू सुधारशील, सख्या आईचा जी घेणाऱ्या ह्या विषाला तू स्पर्श करणार नाहीस, आता अजून काय बाकी राहिले आहे ? एक दिवस पुजाला मलाही ह्याच ग्लासात बुडवून गिळून जा !”
तिच्याच्याने पुढे बोलवेना…. खाण्याचे पदार्थ टेबलावर आलेले असूनही, पुजाचा हात धरून तीला जवळजवळ फरफटत नेत ती गाडी जवळ आलीएका वेटरकडून गाडीची चावी मागवून घेत सरळ गाडीतच जाऊन बसली….
विवेक तासाभरा नंतर आरामात स्वत:चा कार्यक्रम आटपून डुलत डुलत गाडीत येऊन बसला. येतांना छोटी कोकची बाटली तीला त्याच्या हातात दिसली

 ”स्नेहा, मला तुला काही सांगायचे आहे.”…
“काय बाकी आहे ?”..
“आई गेल्यापासून मी मद्याला शिवलोही नाही, अर्थी विसर्जना नंतर मी शेवटचे मद्य घेऊन मग कायमचे हे विष सोडेन असे ठरवलेलेच होते”…
“सुरू करायला मुहूर्त शोधला नाही; बंद करायला निमित्त का हवे… असेच असेल तर पुढे परत सुरू करायला वेळ थोडी लागणार ?” स्नेहाचा विवेकवर आता कवडीचाही विश्वास नव्हता….
” हे काय आहे हातात तुझ्या ?”
“नथिंग यार, इटस् द लास्ट वन….. वन फॉर द रोड.” 
“हे तरी शेवटचे का ?”
“पुजाची शपत्थ…” करीत त्याने गळ्याला हात लावला….

“बाबा हळू चालव ना….” ह्या पुजाच्या वाक्याने स्नेहा ग्लानीतून जागी झाली… सकाळी लवकर उठल्याने तीचा मागच्या सिटवर बसल्या बसल्या डोळा लागला होता. तीला सर्व प्रथम जाणीव झाली ती, गाडी अतिशय वेगात घाट उतरत आहे ह्याची….
“विवेक, आर यु इन युवर सेन्सेस”
“ऑफकोर्स डियर” म्हणत त्याने अजून एका  ट्रकला मागे टाकले…
वळणांवर तो थोडाही वेग कमी करीत नसल्याचे स्नेहाला जाणवत होते…
“विवेक प्लिज, जरा हळू चालव पाहू….”
“काही होत नाही…”ह्या वाक्या बरोबरच अजून एक ट्रक मागे टाकला…. आणी अचानक समोरच गायींचा मोठा कळप पाहून स्नेहाला ब्रह्मांड आठवले….
जोरांत ओरडत व डोळे बंद करीत ती खाली वाकली त्यामुळे तीला पुढे काय झाले ते कळलेच नाही…
पुजा कळण्याच्या मानाने लहान होती….
विवेक कळण्याच्या पलीकडे गेलेला होता….
काही क्षण आपण हवेत गटांगळ्या खातोय असेच तीला वाटत होते…. व नंतर ती सर्व भावनांच्या पार गेलेली होती.

***

सकाळी पेपरमध्ये बातमी होती… ” शहरातले नावाजलेले उद्योजक श्री. कुबल ह्यांचे जावई विवेक, मुलगी पुजा व पत्नी स्नेहाचा भिषण मोटार अपघातात मृत्यू !”

***   

फोन वाजल्यावर उमंग ने फोन घेतला, “येस ?…..” बऱ्याच वेळ तो निःशब्द होता… मग हळूच त्याने फोन ठेवला. आधी अपघात, मग दाखल केले आहे व मग मृत्यू अश्या रितीने नानांना ही बातमी द्यावी लागणार हे तो जाणून होता.
नानांच्या खोलीकडे तो वळला… आणी आत जाताच नाना छातीवर एक हात ठेवून एका हातात फोन ह्या अवस्थेत खाली कोसळलेले त्याला दिसले ….

***

“वन फॉर द रोड” चा हा दुनियेतला कितवा बळी होता देव जाणे !!! 

संपूर्ण !

ही कथा माझ्या आयुष्यात लिहीलेली पहिली कथा आहे. मनोगतावर जुलै २००५ च्या सुमारास ही प्रकाशीत केली होती. सुरूवातीच्या ३ भागांना मिळालेले प्रतिसाद व वाचकांनी  अचानक चौथ्या व शेवटच्या भागाला प्रतिसाद का दिले नाहीत हे शोधून काढाण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळले की हा दु:खद शेवट वाचकांना फारसा आवडला नव्हता. ज्यांनी प्रतिसाद दिले त्यांनीही त्यात स्पष्टपणे तसे नमुद केले होते…….
मग हा खालील खुलासा करणे मला भाग पडले – तो येथे देत आहे कारण ब्लॉगवर त्वरित प्रतिसाद देऊन स्पष्टीकरण देणे शक्यच होणार नाही….

 नकोसा शेवट !

माझ्या भावना आपल्या सर्वांहून वेगळ्या नाहीत ! शेवटचा भाग लिहिताना हा असा शेवट करायला नको असे राहून राहून वाटत होते पण त्यामुळे कथेशी प्रामाणिक राहिल्याचे समाधान मिळाले नसते.

विवेक हे एक कथेतले पात्र आहे, तर ‘वन फॉर द रोड’ ही एक प्रवृत्ती ! सुखी शेवटच द्यायचा असता तर अस्थिविसर्जना नंतर परतून येताना विवेकला हॉटेल मध्ये बसून दारू ढोसताना दाखवलेच नसते व त्या ऐवजी शेवट एक गुलाबी करता आला असता…..

कोणत्याही लेखकाला स्वतःच्या कथेचा दुःखद शेवट हा क्लेशकारकच असतो व नेहमीच सुखांत कथा मन जिंकून जातात पण मग वाचकांना प्रवृत्ती कश्या अनुभवायला मिळतील ?  

माझेही मन ह्या शेवटाला ‘नकोसा शेवटच’ म्हणत राहील परंतू माझा नाईलाज होता-

धन्यवाद !

Comments (3)

नकळत सारे घडले-

रेवा बसची वाट पाहत उभी होती- तसा फार उशीर झालेला नसला तरीही रहदारी तुरळक होत होती. बस लवकर यावी असा मनोमन विचार करीत असतानाच आजूबाजूला हातात हात घालून रेंगाळणारी युगुले तीच्या विचारांत खंड आणीत होती. त्यातले एक तर स्टॉपच्या लोखंडी पाइपांवर बसून प्रणयांत रंगले होते.
रेवाला हे नवीन नव्हते. आठ वाजत आले की, ओव्हरटाइमच्या बहाण्याने नोकरी करणारी तरूण मंडळी जोडीने फिरणे हे काही गुपित राहिलेले नव्हते. ऑफिस मधल्या काही मुली त्याच मार्गाने जात पण आपण त्या गावचेच नाहीत असे दाखवीत तेंव्हा रेवाला त्यांची मजा वाटे.
कित्येकदा वासंतीला वाचवण्यासाठी तीच्या घरी रेवाने खोटे निरोप दिले होते. तिला व्यक्तीश्या: हे पसंत नव्हते परंतू आईची तब्येत ढासळली की, वासंती खेरीज तिला कोणी सहकार्य करीत नसे व म्हणूनच तिचा नाईलाज होई.
वासंतीचा विचार डोक्यात आल्याबरोबर तिला आजचा प्रसंग आठवला, कामे तुंबून राहिली आहेत म्हणून वासंतीला आज ऑफिसमध्ये चांगलाच ओरडा बसला होता व काम झाल्याखेरीज घरी जायचे नाही अशी तंबीही मिळालेली होती. बिच्चारी वासंती ऑफिसात बसून स्वत:ची तुंबलेली कामे करीत होती.

                                                                                      31.jpg

रेवाही तशी दिसायला बरी होती. नाकी डोळी सुंदर, गहूवर्ण रंग – उंची, बांधा सहज नजरेत भरण्याइतपत आकर्षक…. कार्यालयात येणारा प्रत्येक नवांगत “ही कोण हो ?” म्हणत तिच्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करी. वासंती तर गमतीने तिला चिडवे,”तू राजच्या समोर येऊच नकोस बाई, नाहीतर तो मलाच विसरायचा !” पण श्यामळू व अलिप्त स्वभावामुळे तिच्याशी सर्वजण अंतर ठेवूनच वागीत व बोलीत. कार्यालयातील आगाऊ मुलेच नव्हेत तर माणसे देखील अघळपघळ बोलायचा प्रयत्न करायला लागली तर त्यांना ही सरळ “मी जरा कामांत आहे, आपण नंतर बोलू !” असे सांगून कटवी.

बस येत असलेली पाहून खांबाला टेकून उभी असलेली रेवा पुढे सरकली अन… अचानक मागल्या अंधारातून एका टपोरी टाइपच्या युवकाने तिला जोरात धक्का दिला – बेसावध रेवाने जेमतेम बस जवळ येण्याच्या आत स्वत:ला सावरले व रागाने मागे वळून पाहते, तर तो पोरगा धावत असलेला तिला दिसला…”मरो; बस चुकवायची नाही” हा विचार रेवा करीत थांबलेल्या बसचा दांडा धरून पायरी चढणार तितक्यात तीच्या लक्षात आले की खांद्यावरची आपली पर्स त्या पोराने पळवली…. काय करावे ह्या विचारांनी गोंधळलेली रेवा एक पाय पायरीवर तर दुसरा रस्त्यावर अश्या परिस्थितीत उभी होती….
“अहो ताई येताय का?” वाहकाची हाक ऐकून काय करावे ह्या विचारांत असतानाच त्याने घंटी बडवली व बस सुरू झाली.
रेवा रस्त्यावर तो पोरगा पळाला त्या दिशेने पाहू लागली. भानावर आल्यावर तिने सर्वप्रथम स्टॉपवर बसलेल्या त्या युगुलाकडे मोर्चा वळवला-
“माफ करा, आपल्यापैकी कुणी त्या पोराला पाहिले का?”
“क्या हुआ ? किसको देखा क्या पूछ रही हो मॅडम ?” युगुलातल्या पोराला जरा कणव उत्पन्न झाली… तेव्हढ्यात “जाने दो डार्लिंग, लफडेमें कायकू पडनेका ?” त्याची मैत्रीण पचकली !
तो टपोरी पळाला त्या दिशेला तोंड करून रेवा कोणी दिसते का ह्याचा अंदाज घ्यायला लागली. अंधारात फारसे लांबचे दिसणे तिला शक्यच नव्हते… हताश होवून परत ती खांबाला चिकटली… पर्स गेली म्हणजे आता रिक्शाने जाणे भाग आहे…
रिक्शा खाली उभी करून पैसे द्यावे लागतील… पर्स मधील सामान फारसे महत्त्वाचे नव्हते पण, आईच्या औषधांचे वेगळे काढलेले पैसे होते; पिंटूची फी होती; अडी-अडचणीला लागणारे तिचे पैसे, चाव्या व फुटकळ सामान होते……
कितीही नगण्य सामान असले तरी पोलिसांत तक्रार केलीच पाहिजे असे तिला वाटले म्हणून आजूबाजूला कोणी दिसते का ते बघत असतानाच एक माणूस दुसऱ्याला बखोटीला धरून घेऊन येत असताना तिने पाहिले…. बघते तर काय, तो टपोरी, ज्याने तिला धक्का दिलेला होता त्याचे बखोटं पकडून एक युवक तीच्याच दिशेने येत होता ! त्या युवकाकडे व त्या चोराकडे बघत ती मख्खपणे उभी होती.
“दान धर्म करायची इतकी इच्छा असेल ना, तर तो गरीबाला करावा.” ह्या वाक्याने ती भानावर आली.
“देवाने तोंड दिले आहे आपल्याला, तर ‘चोर चोर’ तरी ओरडता येते ना ?”
“मला सुचेना काय करावे ते ! त्याने नेमका अश्या वेळेला धक्का दिला की, मी बसखाली येता येता वाचले…. जेंव्हा माझ्या लक्षात आले की, माझी पर्स चोरली गेली तोवर तो लांब गेलेला होता…..”
रेवाला स्वत:चीच लाज वाटत होती…. काय घडले ते मागे बसलेल्या युगुलालाही कळले नव्हते इतक्या वेंधळ्यासारखी ती वागलेली होती.
“माझ्या मैत्रिणीची पर्सही अशीच व इथूनच गेली होती – नशीब मी फोन करायला पलीकडे थांबलो होतो म्हणून तुमची पर्स मिळाली.”
” आपण माझ्यावर खरोखर मेहरबानी केलीत, मी विचारच करीत होते पोलिसांत तक्रार देण्याचा”
“ह्याचे काय करायचे ? ह्याला असा सोडला तर हा चोरी करीत राहणार; पोलिसांत द्यायला निघालो तर माझा प्रॉब्लेम नाही तुम्हाला घरी जायला उशीर होईल.” भेटल्यापासून एक वाक्य हा गृहस्थ रेवाशी सरळपणे बोललेला नव्हता म्हणून रेवाला संताप आलेला होता
परंतू तिला घरची सगळी कामे एका क्षणांत आठवली- शनिवारी कार्यालयातून लवकर घरी आल्यावर आईला घेऊन हॉस्पिटलाला न्यायचे होते; पिंटूची परीक्षा जवळ येत होती; त्याचा थोडा तरी अभ्यास घेणे भाग होते, “ताई, तू माझा अभ्यास घेतच नाही” ही त्याची नेहमीची भुणभूण तीच्या मागे होती. ऑफिसचे कामही बरेच होते…
ह्या सगळ्या गोंधळात नवीन उपद्व्याप मागे लावून घेण्याची तिची तयारी नव्हती.
तिला जास्त बोलण्यात् अर्थ नाही हे लक्षात येताच “राहू द्या; मी बघतो ह्याचे काय करायचे ते !- आता तरी आपण रिक्शाने घरी जाण्याची तसदी घ्यावी…” त्याचा हा अनाहूत सल्ला ऐकताच इतका वेळ धरून ठेवलेला तिचा संयम सुटला. नकळत तीच्या डोळ्यात टचकन पाणी आले- हा प्रकार त्याच्या गांवीही नव्हता, त्याने सरळ रिक्शाला हात करून बोलावले, तिला अक्षरशः: रिक्शांत ढकलून रिक्शांचे मिटर स्वत:च्या हाताने खाली पाडले !
“मॅडमको घरपर बराबर छोडना !” असे रिक्शावाल्याला बजावले. रेवाने त्याच्या आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम करण्याआधीच रिक्शा सुरू झाली…..
रिक्शांत बसल्यावर रेवाचे विचारचक्र चाकांसारखे फिरू लागले….
हा गृहस्थ वेळेवर मदतीला आला नसता तर पिंटूच्या सरांना काहीतरी निमित्ताने ह्या वेळी टाळावे लागले असते. आईच्या औषधांची निकड ठेवणीतल्या पैशांतून भागवावी लागली असती. महिन्याचे गणित चुकले तर असतेच, वरून पर्स नवीन घ्यावी लागली असती….
“मॅडम, साहब पुलिसवाला है क्या?” रिक्शावाल्याच्या ह्या प्रश्नाने ती भानावर आली. संभाषण टाळण्यासाठी तिने फक्त हुंकार भरला.
“मुझे लगा ही, जीस तरिकेसे उन्होने दो झापड दिये उस चोर को, यह पुलिसवालेका ही काम हो सकता था ।”
“तू का नाही पकडले त्याला?”… ह्या प्रश्नावर मात्र संभाषण टाळून तो गप्प बसला.

घराच्या वळणावर तिने रिक्शा सोडून ती पायी निघाली; रोज बसने येणारी मुलगी आज रिक्शाने कशी हा चाळीत चर्चेचा विषय झाला असता……
*********************************************************
रेवा घरी पोहचली तेंव्हा घडला प्रकार आईला सांगावा की नाही ह्याबाबत ती गोंधळात होती- सांगावे तर ती रोज काळजी करीत राहील -न सांगावे तर स्वतःचे मन खात राहील. शेवटी न सांगण्याचा निर्णय तिने घेतला – आईची तब्येत सांभाळणे मनाच्या भावनांपेक्षा महत्त्वाचे होते…

वासंती दुसऱ्या दिवशी ऑफिसला आली नव्हती- काल काय घडले ते कोणाला तरी सांगण्यासाठी रेवा उतावीळ झाली होती. बाजूच्या टेबलावर बसणाऱ्या मोकाशींचा स्वभाव जरा बरा होता. मध्यमवयीन हा गृहस्थ रेवाला कधी मधी आपल्या वाटणीचे काम करायला मदत मागी. मोकाशींना काय घडले ते तिने मोघम सांगितले तेंव्हा मोकाशी रेवाच्या तोंडाकडेच पाहतं राहिले.
‘रेवती, काळजी घ्या, त्या माणसाने मार खाल्लेला आहे तो तिसऱ्याच्या हातून – डूख तुमच्यावर नको ठेवायला!’
रेवाने मनातल्या मनात कपाळावर हात मारला- दुपारी जेवणाच्या सुटीत वासंतीला घरी फोन करून सांगायचे रेवाच्या मनांत आले पण वासंतीच्या वाटणीचे काम तीच्या डोक्यावर येऊन पडल्याने जेवण कसेबसे आटपून ती कामाला लागली ते घरी जाण्यासाठी जिना उतरताना ती गोष्ट तीच्या लक्षात आली…. परत तोच स्टॉप समोर बघून रेवाच्या मनात धस्स झाले. मोकाशींचे बोलणे अचानक तिला आठवले व एका वेगळ्याच भावनेने तिचे शरीर शहारून गेले…. पण काल पेक्षा गर्दी अधिक होती व बसही लवकर आल्याने रेवाला जास्त काळजी करावी लागली नाही.

वासंती दुसऱ्या दिवशीही न आलेली बघून रेवाला आश्चर्यापेक्षा काळजी वाटू लागली. मग तिने वासंतीला घरी फोन केला. वासंतीच्या बाबांनी फोन उचलताच रेवाला नवल वाटले त्यांनी रेवाला वासंती आठ दिवसासाठी गावाला काही कामानिमित्त गेल्याचे सांगितले. मोकाशींना ती त्याबद्दल बोलली-
‘पण तिने फोन तर करायचा होता ऑफिस मध्ये !’ त्यांनी स्वतःची नाराजी दर्शवली.
दुपार झाली व रेवा कामांत असतानाच कुरियर वाल्याने रेवाच्या टेबलावर एक पाकीट आणून ठेवले – ऑफिसच्या पत्त्यावर पत्र आलेले पाहून रेवाला नवल वाटले… जेमतेम पोहचपावतीवर सही करून तिने अक्षर बघितले तर वासंती सारखे भासले… घाईघाईत तिने पाकीट उघडले – बघते तर वासंतीचेच ! सोबत एका कागदावर तिचे राजीनामापत्र.
वासंतीच्या वडिलांनी तिला राजच्या भानगडीमुळे काही दिवस गावी पाठवून देण्याचा निर्णय घेतलेला होता म्हणून वासंती कावलेली होती. परत चांगली नोकरी मिळेल की नाही व आता वडील सरळ लग्नच लावतील अशी भिती तिला वाटत होती.
मोकाशींना तिने फक्त राजीनामा दाखवला- मोकाशी माणूस बरा होता त्याने जरा विचार केला मग वासंतीची रजा किती शिल्लक आहे ते पाहून ‘तिला आपण आठवड्याची रजा देऊया कदाचित तोवर तिचा नोकरी सोडायचा विचार बदलला तर बिचारीचे नुकसान व्हायला नको’.

दोन दिवसांनी रेवाने परत वासंतीच्या घरी फोन केला, तीच्या आईने पूर्ण रामकहाणी सांगितली , वासंतीचे वडील राज प्रकरणावरून जाम उखडलेले होते. त्यांनी दोघांना एकत्र पाहिले व तत्काळ वासंतीची रवानगी गांवी केलेली होती. तीच्या आईला धक्काच बसला होता – वासंतीचा फोन आल्यास ऑफीसला फोन करण्याची विनंती रेवाने त्यांना केली….
दुपारी वासंतीच्या वडिलांचा फोन आलाच !
वासंती नोकरी सोडत आहे व कारण हे वैयक्तिक असल्याचे त्यांनी सरळ डायरेक्टर साहेबांनाच सांगितल्याने पुढचा प्रश्नच मिटला होता…

ह्या सर्व घटना इतक्या वेगवान व नाट्यमय रितीने झाल्या होत्या की, रेवा बसस्टॉप प्रसंगाबद्दल साफच विसरून गेली होती…..
एका सायंकाळी ऑफिसमध्ये खास काम नाही म्हणून तिची वेळेवर सुटी झाली. इतर पोरींबरोबर गप्पा मारत ती स्टॉपवर पोहचली, तितक्यात मोटर सायकलवर बाजूलाच उभ्या असलेल्या त्या युवकाकडे तिचे लक्ष गेले.
 aamir_khan141.jpg
आभारप्रदर्शनाचा अर्धवट राहिलेला कार्यक्रम पूर्ण करायचा विचार करून ‘एक मिनिटात आले ग !’ म्हणत ती त्याच्याकडे चालू लागली. तिला येताना पाहून मंद स्मित त्याच्या चेहऱ्यावर आले.
‘आपण त्या दिवशी मला खरोखर खूप मदत केलीत व मी आपले आभार मानायचा कृतज्ञपणा दाखवू शकले नाही.’
‘मग आजचा मुहूर्त छान आहे त्यासाठी ! लवकर धन्यवाद दे म्हणजे तुझ्या मैत्रीणी ज्या डोळे विस्फारून इकडे बघत आहेत त्यांची सुटका होईल’
अनावधाने रेवाने मागे वळून पाहिले…. खरोखरच तिघीच्या तिघी टक लावून तिकडेच पाहतं होत्या. त्याही परिस्थितीत रेवाला हसू आवरेना….
तिला हसताना पाहून तो लगेच बोलला ‘तुझे धन्यवाद तू घरी पोहचलीस तेंव्हाचं माझ्यापर्यंत पोहचले’
‘आपले नांव नाही कळले’
‘तू कुठे तुझे नाव सांगितलेस ?’
….लांबून बस येताना पाहून सुटका झाल्याची भावना तीच्या चेहऱ्यावर उमटली…..
आता मागे वळून पाहण्याची पाळी त्याची होती…..
‘तुझी बस येतेय – पुढची बस अर्ध्या तासाने आहे’
‘बापरे, मी पळते…. बाय द वे, मी रेवा, रेवती मराठे !’
त्याने पुढचे काही बोललेले ऐकू येण्याच्या नेमक्या वेळेलाच बाजूने जात असलेल्या कारने कर्कश्य हॉर्न वाजवला….
‘कोण ग तो ?’
“अग सोमवारी माझी…… ” अन रेवाने पूर्ण कहाणी तीच्या बाजूला बसलेल्या मुलीला सांगितली.
‘दिसायला चांगला आहे, मी आपल्या ह्या स्टॉपच्या आजूबाजूला त्याला बऱ्याचं वेळा पाहिलेय !’
‘असेल, मला कुठे त्याच्याशी मैत्री ठेवायचीय; त्याने मदत केली म्हणून माझे राहिलेले कर्तव्य मी आज पार पाडले’ रेवा थोड्याश्या फणकाऱ्यानेच बोलली.
‘बघ हो बाई, प्रेमा बीमात पडशील त्याच्या’
‘असले धंदे करायला मी मोकळी नाही ग !’ रेवा बोलली पण आपल्या त्या बोलण्याचा नेमका अर्थ काय हेच तिला कळेना…

रात्री कामे आटपून ती बाल्कनीत येऊन समोर ठेवलेल्या खुर्चीवर जरा विसावली… आकाशाकडे नजर लावून ती येणाऱ्या समस्यांच्या विचारात गुंतली असतानाच मनाच्या एका कोपऱ्यात एक घंटी किणकिणल्याचा आवाज आला….
अचानक तो युवक तीच्या नजरेसमोर आला. अरे तुरे करायचा हक्क न देताही त्याने सरळ रेवाला एकेरी संबोधले होते. त्यातच सरळपणे बोलणे त्याला माहीतही नसावे. अचानक तिने घातलेला गोंधळ तिला आठवला. त्याने डोळे विस्फारून पाहतं असलेल्या त्या मुलींबद्दल बोलतांच आपण कसे पटकन वळून पाहिले हे आठवताच तिला खुदकन हसू आले….
“का हसतेस गं पोरी ?” आईच्या आवाजाने ती भानावर आली. “काही नाही गं, असेच !”
“….काय हे नशीब घेऊन आलीस रेवा, ज्या वयांत संसाराची स्वप्ने रंगवायची, त्या वयांत तुला असे मरेतोवर काम करताना पाहून माझे काळीज तुटते गं”
“बघ परत सुरू केलेस तू तेच पालूपद , अगं आई मी काय उपकार करतेय का तुझ्यावर व पिंटूवर?”
आईचा अगतिक चेहरा तिच्याने बघवत नव्हता. कशीबशी आईची समजूत घालून ती बिछान्यात पडली….
परत त्याच घंटीचा सुर तिला ऐकू आला –
कूस बदलली तेंव्हा खाली झोपलेल्या आई व पिंटूचा चेहरा तिला चंद्र प्रकाशात दिसला व त्या घंटीचे सुर आपोआपच विरळ झाले.

*********************************************************************
‘आज तो परत दिसावा त्याचे नांव तरी विचारू-‘ हा विचार मनांत आल्यावर तिला स्वत:चीच लाज वाटली. पण तो त्या दिवशी दिसलाच नाही. शनिवार म्हणून जरा लवकर घरी जात असलेली रेवा बसमध्ये चढल्या वरही मागच्या काचेतून वळून पाहत होती. दोन दिवसात घरगुती कामाच्या रगाड्यात तिला कसलीच आठवण आली नाही. सोमवारी तिघींतल्या एकीने जेवताना तिला विचारले,
‘रेवा, लग्न करणार तू त्याच्याबरोबर ?’ ही पोरगी कुणाबद्दल बोलतेय ते कळायला दोन मिनिटे लागली तिला, तोवर बाकीच्यांचे फिदीफिदी सुरू होते……

रोज सायंकाळी बसस्टॉप वर उभे राहायचे, एकाच वाटेकडे सारखे सारखे वळून पाहायचे…. अगदी बसमध्ये चढल्यावरही मागच्या काचेतून वळून पाहायचे हा छंद आपल्याला कसा जडला तेच तिला कळले नाही. वासंतीची आठवण आपल्याला का येतेय हेही तिला कळेना….

रोजच्या सवयीनुसार तिने ऑफिसच्या इमारतीतून बाहेर पडल्या पडल्या त्या वाटेवर नजर फिरवली व अचानक तिची नजर त्या मोटर सायकलवर खिळली. बसस्टॉप कडे चालत असताना तिरक्या डोळ्यांनी ती त्याचा वेध घेऊ लागली व तो दिसला….
‘आज सरळ त्यालाच त्याचे नांव विचारायचे का ?’ ‘
नको, बरे नाही दिसत !’
असे विचार मनांत घोळवत असताना तो सरळ तिच्याकडे चालत येत असलेला पाहून तिच्या हृदयांत धडधडायला लागले….
एका मधुर घंटेच्या किणकिणल्याचा तोच स्वर कुठून तरी तिला ऐकू आला…
“जरा बोलशील का माझ्याशी ?”
“हो..पण…..ह्या इथे ?” चाचरतच तिने विचारले.
“नाही समोर ‘स्वागत’ मध्ये बसू, मी जरा बाईक लावून येतो, तू वरच्या माळ्यावर एखादे रिकामे टेबल पकड” अधिकार वाणीने तो बोलत होता…..
522851.jpg
स्वागत कडे चालत असताना आपण आपल्या नकळत त्याचे का ऐकतोय तेच तिला कळेना…. विचारांच्या घालमेलीत ती स्वागत हॉटेलच्या वरच्या भागात आली. जेमतेम येऊन टेकते न टेकते तोच तो आला.
“माफ कर, मला तुला फार त्रास द्यायचा नाही पण माझे एक छोटे काम होते”
“माफ करा; मी त्या दिवशी आपले नांवही नीट ऐकले नाही”
“मी ते सांगितले कुठे ?”
“ओह, कारण नेमका तेंव्हाच कसलातरी मोठा आवाज झाला व माझे लक्ष विचलित झाले होते ”
” फिरोज़ खंबाटा !” फक्त दोनच शब्दांत त्याने स्वत:ची ओळख करून दिली.
“आपण केलेल्या मदती….”
” बस करशील का आता ते ?” नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. “तू चांगल्या घरची मुलगी दिसतेस म्हणून तुला विचारावे की नाही ह्याचा विचार मी करीत होतो. पण मी जे काम तुला सांगणार आहे ते अजून कोणी करू शकेल असे मला वाटत नाही.”
“बोला.., मला जमले तर मी नक्की करीन पण ते सरळ मार्गी असेल तरच करीन हेही सांगते !”
परत तेच स्मित त्याच्या नजरेत दिसले. “काळजी करू नकोस, घरंदाज मुलीला करता येण्यालायक कामच मी सांगेन” इतक्यात वेटर येऊन उभा राहीला- काय खाणार-पिणार ह्या औपचारिक विचारणेच्या भानगडीत न पडता दोन कप कॉफीची मागणी त्याने वेटरला केली.
“माझा एक मित्र आहे, त्याची मैत्रीण वासंती इथेच कुठेतरी कामाला आहे. तीच्या बद्दल जरा माहिती काढायची आहे.”
क्षणभर काय बोलावे ते तिला कळलेच नाही. पण लगेच स्वत:ला सावरून तिने चेहऱ्यावर स्थितप्रज्ञाचे भाव आणण्याचा प्रयत्न केला.
“आपण अजून काही माहिती द्या, मी बघते तिला कोणी ओळखते का ते !” कॉफी केंव्हा येते व संपवून आपण केंव्हा सटकतो असे रेवाला झाले.
“ती *** ह्या कंपनीत अकाउंट्सचे काम बघते” माहीत आहे हा शब्द रेवाने घशांत आवंढ्याबरोबर गिळला.
“तिची व माझ्या मित्राची मैत्री नुकतीच झाली होती. एकमेकांना ते पूर्णपणे ओळखण्याच्या आतच ती काही दिवसांपासून गायब आहे.”
” तिला नसेल भेटायचे त्याला ” अगदी सहजतेने तिने वासंतीची बाजू मांडायचा प्रयत्न केला पण तो आपल्याकडे रोखून पाहतोय हे लक्षात आल्यावर ती गडबडीत म्हणाली, “म्हणजे एका मुलीला कदाचित नंतर असे वाटले असेल, की त्या मुलाची मैत्री नको ”
“नाही, तसे नसावे कारण घरून ऑफिसला निघण्यासाठी ते बरोबर निघाले होते व रस्त्यातच त्या मुलीच्या म्हाताऱ्याने, आय मीन, वडिलांनी पाहिले होते… मुलीला बरोबर घेऊन तिचा बाप सरळ घरी गेला असे माझा मित्र सांगतो ”
रेवा गप्प होती. वासंतीच्या वडिलांनी दोघांना एकत्र पाहिल्याचे तिची आई म्हणाली होती म्हणून ह्या समोरच्या युवकावर, फिरोज वर विश्वास ठेवणे तिला भाग होते. जेमतेम त्या वेळेपुरते संभाषण संपवून रेवा घरी जायला निघाली तेंव्हा वासंती, राज व फिरोज़चा विचार तीच्या डोक्यातून जात नव्हता.

झोपायचा प्रयत्न करूनही ती जागीच होती. फिरोज़ भेटल्यापासून ती सतत विचारच करीत होती. ह्याला जर दोन दिवसांत वासंती बद्दल कळले नाही तर ऑफिसमध्ये येऊन थडकायचा.
ऑफिसमधल्या पोरींनी ह्याला आपल्या बरोबर बोलताना पाहिलेले आहे. त्यात हा वासंतीची चौकशी का करतोय हे नंतर त्या मुलींना कसे पटवायचे ?
परत त्याला आपण त्याच ऑफिसमध्ये दिसणार म्हणजे तो विचारेलच की, तू मला आधीच का नाही सांगितलेस ?
छ्या, साफच गोंधळ झाला होता !
अचानक तिला आठवले फिरोज़ने स्वत:चे व्हिजिटिंग कार्ड तीच्या कडे जाता जाता दिले होते. नशीब तिने ते पर्समध्ये ठेवले – उद्या ऑफिसातून काही तरी खरेदी करायच्या बहाण्याने बाहेर पडून त्याला फोन करावा लागणार होता….. त्याला काय सांगायचे ह्या विचारांत असतानाच तिला झोपेने घेरले….

दुपारी लंच नंतर ‘जरा खाली जाऊन येते’ असे मोकाशींना सांगून ती सटकली. ऑफिसच्या इमारतीला मोठा वळसा घालून एका सार्वजनिक फोन वरून तिने त्याला फोन लावला.
सुरुवातीला एका मुलीने, नंतर माणसाने फोन घेतला दर वेळी काय काम आहे विचारपूस करूनच फोन शेवटी फिरोज़ला दिला गेला “बोल रेवा,” परत तोच घंटीचा मधुर स्वर तिला जाणवला
                                                                          christmas-bells-b1.jpg
“वासंती माझ्याच ऑफिसमध्ये काम करते….”
“मला माहीत आहे, पुढे बोल…”
आता चकीत व्हायची वेळ रेवाची होती. “तिने गेल्याच आठवड्यात राजीनामा दिलाय”
“ते ही मला माहीत आहे.”….
रेवा उखडली, “मग काय माहीत नाही ते सांगा म्हणजे मी तेव्हढेच बोलेन”
“सध्या ती कोठे आहे”
“ते मलाही माहीत नाही !”
“साफ खोटे ! कारण तुझ्याकडे तिचे पत्र व राजीनामा दोन्ही पोहचले आहेत”
रेवा निःशब्द उभी होती… फोन वाढवण्याचा संदेश बीप करायला लागल्यावर ती भानावर आली.
“मी संध्याकाळी येतो, स्वागतमध्येच बसूया ” अधिकारवाणीने फिरोज़ने तिला कळवले.
तिने डोलवलेली मान त्याला फोनवर दिसली असती तर त्याला हसू आवरले नसते !
**********************************************************************
संध्याकाळी रेवाला बराच वेळ तिष्ठत ठेवून तो आला….
भडकलेली रेवा काही बोलण्याच्या आतच त्याने अक्षरशः दोन्ही हात जोडून तिची माफी मागितली, “बाई गं, येथे रस्त्यात काही नको बोलूस, माझ्यावर तेव्हढी मेहरबानी कर !”
त्याचा तो अवतार पाहून हसावे की रडावे हे न कळलेल्या रेवाचा राग मात्र कुठल्या कुठे पळाला.
“मला हे सांगा, आपणांस ह्या सगळ्या गोष्टी माहीत कुठून झाल्या ?” खुर्चीत बसल्या बसल्याच तिने विचारले.
“स्त्रियांना धीर नाही धरवत का ?” मिश्किलपणे त्याने संभाषण तोडत तिला विचारले “मला एकाच व्यक्तीवर अवलंबून राहायचे नव्हते, तू जर ‘मदत करीत नाही…ज्जा’ असे सांगितले असतेस तर ?”
“अजून कोणाला पकडले आपण ?”
“काळजी करू नकोस, तो तुला ओळखतही नाही व वासंतीशी संबंधीतही नाही”….
हळूहळू रेवाने त्याला सगळी हकीकत सांगितली. मध्येच रेवाला एखादं दुसरा प्रश्न करीत तो ऐकत होता. तिचे बोलणे त्याने शांतपणे ऐकून घेतले होते….
शेवटी उठण्याच्या आधी रेवाचे टेबलवर आधारासाठी ठेवलेले दोन्ही हात त्याने अचानक हातात घेतले, “तू खरोखर आज मला जी मदत केली आहेस, मी जन्मभर विसरणार नाही.”
एक सेकंदासाठी तो क्षण तसाच तेथेच थांबावा असे रेवाला वाटले.
“चल, तुला घरी सोडू ?”
“नको, मी जाईन बसने” रेवाला हो म्हणावेसे वाटत होते पण तिने स्वतःला सावरले.
बसस्टॉप वर बस येई पर्यंत दोघे गप्पा मारीत होते. बस आल्यावर तिला बसमध्ये चढवून तो निघाला तेंव्हा रेवा मागच्या काचेतून तो गेला त्याच दिशेकडे बघत होती……
कुठूनतरी घंटीचा तो मधुर किणकिणाट आपणांस का ऐकू येतो ते मात्र तिला कळत नव्हते.

“रेवा आज मनू आत्या आली होती तुझी !” आईने उत्साहित स्वरांत आल्या आल्या सांगितले.
“अच्छा ? काय म्हणते ?” स्टूलवर बसून सॅंडल्स काढता काढता रेवाने लक्ष असल्यासारखे भासवले !
“त्या स्थळाकडून होकार आलेला आहे” …. रेवा एक क्षण स्तब्ध झाली पण आईच्या उत्साहावर विरजण टाकायची तिची इच्छा नव्हती.
“अग, आई इतकी घाई कशाला करतेस उगीचच, मी अजून नीटपणे विचारही केलेला नाही लग्नाबद्दल”
“अग मुली, आपण साधी माणसं, तुझ्या आत्याने तुझ्यासाठी विचार करूनच स्थळ आणले असेल ना !”
“अगं, पण पिंटू व तुझे कोण बघणार मी गेल्यावर ?” – रेवाने स्वतः:चे घोडे दामटवायचा प्रयत्न सोडला नव्हता.
“तुला काय जन्मभर बांधून ठेवू मी ह्या बंधनात; रेवा?” आई आता हळवी होणार हे पाहून रेवाने माघार घेतली.
“बरं ! मी उद्या आत्याला फोन करून बोलेन तिच्याशी !” इतके बोलून तिने स्वतः:ची सुटका करून घेतली.

रात्री बराच वेळ ती बिछान्यात नुसती पडून होती…. मध्येच आपल्या हातांकडे तिचे लक्ष वळले की, ती गोरीमोरी व्हायची…..मध्येच तिला कुठून तरी घंटी किणकिणल्याचा भास व्हायचा. रात्री झोप केंव्हा आली ते तिला कळलेच नाही.

दोन दिवस तिचे ऑफिसमध्ये कामांत लक्ष लागलेले नव्हते. घरीही आई एक विचारायची तर ती उत्तर दुसरेच द्यायची. ‘आत्याला फोन केलास का’ ची भुणभूण आईने मागे लावली होती. बस स्टॉपवर रेंगाळून शेवटी दोन तीन बस गेल्यानंतर कंटाळून पुढची बस पकडायची….. हळूहळू तिच्या लक्षांत आले की, आपण फिरोज़ची आतुरतेने वाट पाहत आहोत.

अचानक एक दिवस ‘रेवती, तुमचा फोन…..’ मोकाशींनी सांगितले.
आईचा तर नसेल ना ह्याची काळजी करीत ती फोनकडे वळली… “हॅलो…..” पलीकडे स्तब्धता….”हॅलो….” ह्यावेळी जरा तिचा स्वर वाढला….
“अग रेवा, मी वासंती बोलतेय ”
“अय्या…वसू ? कुठून बोलतेस तू ?”
“फोन मधून गं !”
“ए मस्करी सोड, कुठे आहेस ते बोल आणी आज अचानक फोन केलास !”
“अगं, संध्याकाळी काय करते आहेस ? भेटायचे का ? ऑफिसच्या खालीच भेटू, मला खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी”
“चालेल,पण वेळेवर ये बाई…. मला घरी जायची घाई असते !”
“अगं राजशी ओळख करून द्यायची आहे तुझी”
“काय ? म्हणजे तू अजून…..” पुढचे बोलणे तिला थांबवावेच लागले कारण आसपासच्या बहुतेक सर्वांचीच उत्सुकता वाढलेली होती….
जेमतेम बोलणं संपवून तिने फोन ठेवला तेंव्हा मोकाशींसह सगळे जण उत्सुकतेने आपल्याकडे बघत असल्याचे तिला जाणवले….

रेवा खाली उतरली तेंव्हा वासंती वाट बघत उभीच होती. ‘स्वागत’ च्याच वरच्या माळ्यावर वासंती तिला घेऊन गेली
“अगं राजला सांगितलेय यायला…. कधी वेळेवर आला तर शप्पथ ! तोवर आपण काहीतरी खाता खाता गप्पा मारू ”
“अगं तुझ्या बाबांना माहीत पडले तर ?” रेवाचा स्वर काळजीचा होता.
“नाही गं, त्यांनी शेवटी परवानगी दिली आमच्या लग्नाला…. राज घरी आला होता, त्याने स्पष्ट सांगितले की, ‘तुम्ही वासंतीला कुठे डांबून ठेवले आहे ते मला माहीत आहे; पळून जाऊन लग्न करायची आमची तयारी आहे पण जर तुम्ही आशीर्वाद दिलात तर सगळेच सुखी होतील !’ ”
“बापरे… बराच धीट दिसतोय तुझा राज !”
“मग काय, मी उगीच भाळली का त्याच्यावर ? तो ना एकदमच डॅशींग आहे”
नंतर खाताखाता वासंतीची टकळी सुरूच होती…. राजचे कौतुक अगदी भरभरून चालले होते.

अचानक रेवाला फिरोज़ची आठवण झाली.
“अग वसू, तुझ्या राजचा मित्र मला येऊन भेटला… तुझ्या गांवचा पत्ता मीच त्याला दिला होता…..”
“राजचा मित्र ? कोण ? मला नाही बाई ठाऊक राजचा कोणी मित्र…..” हे बोलत असतानाच फिरोज़ स्वागतचा माळा चढून वर येताना रेवतीला दिसला.
ती काही बोलणार इतक्यांत वासंती आनंदाने चित्कारली….”किती रे वेळ लावलास यायला….आज तरी लवकर यायचे नाही का ?
ओह रेवा; मीट माय लव्ह…राज !….
राज, धिस इज रेवा, माय बेस्ट फ़्रेंड ”

राज….फिरोज़…..फिरोज़….राज ……रेवाला ‘स्वागत’ गोल फिरल्याचे भास होत होते.

“वासंती मला राज म्हणते; माझे नांव तेच आहे – फिरोज़ खंबाटा !”

कुठूनतरी घंटीच्या किणकिणत्या स्वरांऐवजी एक कळ उठली….. तेंव्हा रेवाला कळले तो घंटीचा स्वर आपल्या हृदयांतून येत होता…..

                                                                     

                                                                           ~समाप्त~

टिप्पणी करे

गगन भरारी- (१)

                                  
                                                         iafcrest-2001.gif
नांव- स्क्वाड्रन लिडर अमर गुप्ते. 
अविवाहित : वय २७- उंची ५’११”- वजन ६८ किग्रॅ
डोळ्यांचा रंग तपकिरी- केसांचा रंग काळा
शरीर ऍथलेटिक पीळदार; चष्मा-नाही, व्हिजन-क्लियर.
शिक्षण- एमटेक.-इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम, (दिल्ली आय.आय.टी.)
जॉइन्ड ऑन : ०९/११/२००१:
ऍकॅडेमीक ट्रेनिंग रेकॉर्ड- जि‌आर१.
इंटर कॉलेज बॉक्सिंग चॅंम्पीयन.~ स्क्वॅश प्लेअर्.
स्पेशल कमांडो ट्रेनिंग क्लास टू कम्प्लिटेड
परिवार : आई-वडील-लहान बहीण.
वडील- पोस्ट मास्तर, आई-गृहिणी, बहीण-शिक्षण.
मूळगांव /वास्तव्य – खालापूर (जि.रायगड) – महाराष्ट्र

*********************

एअर व्हा‌इस मार्शल भोसलेंनी फाइल मधील “कॉन्फिडेंशि‌अल” चा भाग उघडला –
स्क्वा.लि.अमर गुप्ते ची शाळा सोडल्या पासूनची इत्यंभूत माहिती त्यात स्पष्ट पणे नोंदवलेली होती. आंधळ्याने जरी ती फाइल वाचली असती तरी अमर गुप्ते काय चीज आहे ते तो डोळ्यांपुढे आणू शकला असता इतकी चोख माहिती ऍनेलिसीस विंगने त्यात दिलेली होती. एव्हि‌एम भोसलेंचे काम होते फक्त आलेल्या फा‌इल्स मधील तीन जणांना निवडून त्यांच्यावर जबाबदारी व ब्रिफिंग देण्याची.
त्यांनी डोळ्यांवरला चष्मा बाजूला काढून ठेवला. दोन बोटांच्या चिमटीत डोळ्यांच्या कडा नाका जवळ चोळत ते त्यांच्या अवाढव्य खुर्चीत मागे रेलून बसले. जे काम सीक्रेट सर्व्हिसेसचे होते ते त्यांच्या डोंबलावर येऊन पडले होते. एअर रेड को‌अर कामाला बैलासारखे जुंपलेले असताना हे थोडे आडवळणाचे काम अंगावर येऊन पडल्याने ते वैतागलेले होते. पण संरक्षण खात्यात तक्रार चालत नाही हे त्यांना पुरेपूर माहीत होते.

त्यांच्या खात्याचे खरे काम फारच थोडक्या मंडळींना ठाऊक होते. खात्याला दिलेल्या इतर कर्मचारी वर्गालापण आपले साहेब लोक नेमके काय काम करतात तेच माहीत नसायचे. त्यांची एक ऍम्बॅसेडर सोडली तर खात्याने वाहने इतर कोणालाच दिलेली नव्हती. अधिकारी वर्गाला सर्व चारचाकी वाहने सक्तीने स्वत:ची घ्यायला लावलेली होती. चालक ठेवायचा नाही अशी सक्त ताकिद होती. प्रत्येक अधिकाऱ्याला आपण काय काम करतो ते नीट ठाऊक असल्याने कधी कुणालाच प्रश्न पडलेलाच नव्हता.
‘गगन’ नावाचे लाइट कम्बाट ए‌अरकाफ्ट खास हवा‌ईदलासाठी डि‌आरडी‌ओ ने संशोधीत केले होते त्यांच्या विविध उड्डाण चाचण्यांसाठी १२ वैमानिकांचा ताफा त्यांनी तयार केलेला होता. प्रत्येक अधिकारी तावून सुलाखून वेगवेगळ्या बेस वरून निवडून घेतलेला होता. ज्यांची लग्ने झालेली होती त्यांना दिल्लीला कुटुंबे ठेवण्याची अट घालण्यात आली. अधिकाऱ्यांच्या कुटुंबांनाही ह्या बाबींचा थांगपत्ता लागू देता कामा नये अशी सक्त ताकीद अधिकारी वर्गाला होती व त्याचाच एक भाग म्हणून राजस्थान व पंजाबच्या सीमेवरच्या भटिंड्या जवळच्या बेस वर ह्या चाचण्या घेण्यात येणार होत्या. सर्व उड्डाणे सा‌ऊथ वेस्ट ५० डिग्री लो‌अरकेस वर- खालच्या, म्हणजे गुजरातच्या भागात केली जाणार होती. शत्रूची कुठलीही राडार यंत्रणा ह्या विमानांना आपल्या कक्षेत पकडू शकणार नाही असे आवरण व यंत्रणा ह्या विमानांत बसवण्यात आलेली होती.

सध्याचे राष्ट्रपती व माजी संशोधक अब्दुल कलामांचे हे स्वप्न डि‌आरडी‌ओने मेहनतीने पूर्ण करीत आणले होते. एका अक्षम्य चुकीने त्यावर पाणी फिरायला नको व शत्रू किंवा बलाढ्य मित्रपक्षालाही त्याचा अजिबात सुगावा लागायला नको म्हणून ही काळजी घेतली जात होती. एका रात्रीत संशोधनावर ‘पेटंट पेंडींग’चा शिक्का मारून, भारताला विमाने आपल्याकडूनच खरेदी करायला भाग पाडण्या इतकी ताकद काही देशांकडे होती. ह्या पार्श्वभूमीवरील ‘गगन’ ला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपणारे हे अधिकारी एका विशिष्ट देशप्रेम भावनेने भारावलेले असल्याने धोका झाला नसता परंतू त्या भरवशावर बेसावध राहणे एअर रेड खात्याला भारी पडले असते.

फक्त एक दिवसांत भोसलेंना निर्णय घ्यायचा होता. ३ आधिकाऱ्यांना द्यायची त्यांची अजिबात तयारी नव्हती. त्यांना शक्य झाले असते तर ‘माझे अधिकारी खूप व्यस्त आहेत’ अशी पांच शब्दांची एक ओळ पाठवून आलेल्या संदेशाची त्यांनी पार बोळवण करून टाकली असती. पण संदेशाच्या खालच्या परिच्छेदाने त्यांचे कुतूहल जागे झाले. आपला एकतरी अधिकारी ह्या मोहिमेवर जायला हवा ह्याची त्यांना मनोमन खात्री झाली होती. जामनगरच्या उत्तरेला व कच्छचे आखात संपते त्यापूर्वी सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकाला एक वॉकी टॉकी पद्धतीची यंत्रणा कच्छच्या रणांत सापडली होती. जेमतेम अर्धा किग्रॅ वजनाची ही डब्बी करड्या रंगाची असून वर दोन लाल दिवे सतत उघडझाप करीत आहेत असा छोटा पण परिणामकारक संदेश होता. तो वाचून भोसले सतर्क झाले होते. ‘गगन’च्या राडार ब्लॉकींग यंत्रणेचे हृदय समजले जाणाऱ्या राडार जॅमरचे वर्णन ह्या डब्बीशी मिळते जुळते आहे हे जर कोणाला समजले असते तर बंगळूर पासून तपास पथके वास घेत फिरली असती. तपास पथकांच्या हातात हे काम गेले की, त्यांचे अधिकारी त्यांच्या पद्धतीने ते हाताळतील व चुकूनही ‘गगन’ बद्दल माहिती सीक्रेट सर्व्हिसेसना मिळाली असती तर काम कठीण झाले असते.

                                                                  18-1-m1.jpg

भोसलेंनी पुढ्यातल्या संगणकावर संदेश तयार करून पाठवला. सध्या एका अधिकाऱ्याला तयार करतो व तो तेथे पोहचल्यावर त्याच्या अहवालानुसार दुसरे अधिकारी जातील असे कळवले होते. त्याच संदेशात जर ती डब्बी येथे पाठवता आल्यास सर्वांनाच त्याबद्दल माहिती मिळू शकेल अशी पुस्तीही जोडली.

संदेश गेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी समोरचा पाण्याचा ग्लास उचलून तोंडाला लावणार इतक्यात ‘फट्ट’ करीत आवाज करून ग्लास वर काहीतरी आदळले. एका सेकंदात त्यांनी खुर्चीवरून जमीनीवर लोळणं घेतली. गोळ्या झाडण्याची सवय गेली असली तरी भोसले गोळ्यांचा परिणाम विसरलेले नव्हते. ह्या वयांतही त्यांची चपळाई वाखाणण्याजोगी होती. हात लांब करून त्यांनी सर्वप्रथम डेस्कच्या खालचे घंटीचे बटण जोरात दाबले…. व दाबूनच ठेवले. कमीत कमी गोळी झाडणाऱ्याचा गोंधळ उडावा व तो काहीतरी चूक करून सुरक्षा रक्षकांच्या हाती सापडावा अशीच ते मनोमन प्रार्थना करीत होते. स्वत:च्या जीवापेक्षा मारेकरी त्यांना हवा होता.

बाहेर काही गोंधळ उडतोय का ह्याचा कानोसा घेत ते जागेवरच पडून होते. पण बाहेरच्या शांततेत घंटीचा कर्कश आवाज घुमत असूनही काहीच हालचाल ऐकू येत नव्हती. इतक्यात कोणीतरी कॅबीनकडे धावत येण्याचा आवाज त्यांनी ऐकला. “क्या हु‌आ साहब?” ए‌अरमन मिश्रा आश्चर्याने भरलेल्या नजरेने खाली पडलेल्या साहेबांकडे पाहतं होता.

“जल्दीसे अलर्ट आलार्म ऑन करो” एवढे ऐकून त्याने मागच्या मागे धूम ठोकली. धोक्याच्या घंटीचा खणखणाट रात्रीच्या शांततेत घुमत असतानाच चारी बाजूंनी सेंट्री धावत येताना पाहून भोसले जागेवरचे उठले. सर्वदूर पटापट सर्च लाइट लावले गेले… ग्रुप कॅप्टन पुरी तेथे पोहचेपर्यंत भोसले बरेच स्थिर स्थावर झालेले होते.

*****************

फार थोडक्या आधिकाऱ्यांना तातडीने पाचारण करण्यात आले. पुरी व स्वत भोसले वगळता अजून तिघे अधिकारी भोसलेंच्या कॅबिनमध्ये आले. भोसलेंनी सर्वांना ब्रीफ करून झाल्यावर, तासाभरापूर्वी आलेला संदेशाची प्रत फिरवली गेली. एकमताने दुसऱ्याच दिवशी सर्व अधिकारी वर्गाला ह्या बाबत कल्पना देण्याचे ठरले. संदेशात उल्लेख केलेली डब्बी ‘राडार जॅमर’ आहे ह्या बद्दल कोणाच्याही मनात शंका राहिलेली नव्हती.
भोसले साहेबांवर हल्ला व तोही को‌अरच्या बेस वर झालेला पाहून सर्व अधिकारी वर्ग नुसता हादरलाच नव्हता; तर चवताळून उठला होता. काहीही झाले तरी ह्या हल्ल्यामागचे हात तोडल्याखेरीज त्यांना समाधान मिळाले नसते. भोसले साहेबांच्या ब्रिफिंगसाठी प्रेसेंटेशन हॉल मध्ये जमा झालेल्या प्रत्येक आधिकाऱ्याच्या चर्येवर संतापाची छटा स्पष्टपणे जाणवत होती. सर्वांत महत्त्वाची काळजी होती ती ‘राडार जॅमर’ ची. कोणाच्याच मनात संदेह राहिलेला नव्हता की, राडार जॅमर चे बिंग फुटलेले होते….. ते कुठल्या पायरीवर होते व शत्रुपक्ष कुठल्या पायरीवर तोच अंदाज घेण्यासाठी सर्वांना एकत्र बोलावण्यात आलेले होते.
सर्व आधिकाऱ्यांची नांवे नोंदवली गेली…… फक्त स्क्वाड्रन लिडर अमर गुप्ते गैरहजर होता !

एव्हिएम् भोसले साहेबांवर गोळ्या झाडणाऱ्याचा तपास कसा करायचा ह्याचा विचार करण्यासाठी तसेच कच्छ मध्ये सापडलेली यंत्रणा राडार जॅमर आहे ह्याची खात्री कशी पटवावी ह्याच्या विचारांसाठी बोलावण्यात आलेल्या भल्या सकाळच्या बैठकीत स्क्वा.लि.अमर गुप्ते गैरहजर असल्याचे पाहून बहुतांश आधिकाऱ्यांना नवल वाटले होते.

बैठक सुरू करताच ग्रुप लिडर पुरी साहेबांनी ब्रिफिंगला सुरुवात केली.

“बॉइज्, इट्स सीरियस टू नोट दॅट, वन ऑफ द ऑफिसर इज अब्सेंट फॉर धिस मीटिंग…..”

बैठकीत सर्व गोष्टींचा उहापोह झाल्यावर सीक्रेट सर्व्हिसेसला एअर फोर्स एच.क्यू. मार्फत ह्या प्रकाराची कल्पना देण्याचे ठरले. भोसले साहेबांनी स्वतःवर झालेल्या हल्ल्याचे रिपोर्ट्स मुख्यालयाकडे पाठवल्यानंतर बैठकीचा समारोप झाला.

अमर का आला नाही ह्याचे भोसलेंनाही नवल वाटलेले होतेच. प्रत्येक आधिकाऱ्याला स्वतंत्र क्वार्टर दिली असूनही बरेच अधिकारी वेळ घालवण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात हे माहीत असल्याने त्यांनी गुप्तेच्या जवळच्या मित्रांकडे चौकशी केली. त्यांच्यातला स्क्वा.लि.कुमार हा गुप्तेला जास्त जवळचा होता.

“गुप्ते रात्री आठ वाजेच्या आसपास माझ्या कडून गेला सर; माहीत नाही पुढे तो कुठे गेला- हि वॉज सेइंग हि माईट गो टू क्लब फॉर अ गेम ऑफ स्क्वॅश…. बहुदा त्याला मीटिंग बद्दल माहीतच नसेल.”

“बट हि मस्ट बी अवेअर दॅट आय वॉज अटॅक्ड – जस्ट चेक व्हेदर ही इज अराउंड ” इतके बोलून भोसले साहेब त्यांच्या कामांकडे वळले. रविवार असल्याने फारशी कामे नव्हती परंतू नाश्ता झाल्यावर तिघा आधिकाऱ्यांची काल अर्धवट राहिलेली फाइल त्यांना तपासायची होती.
स्क्वा.लि.कुमाराने अमरच्या मोबाईलवर फोन लावण्याचा प्रयत्न केला पण तो फक्त वाजतंच होता.शेवटी स्वतःच्या ऑर्डर्लीला अमरच्या क्वार्टरवर पाठवले व तो अमरच्या मोबाईलवर फोन करींत राहिला. फोन फक्त वाजतंच होता….. कुमाराने अजून एक दोघांना प्रयत्न करायला सांगितले – त्यांनाही उत्तर मिळत नव्हते. इतक्यात कुमाराचा ऑर्डर्ली सायकलवर परत येताना दिसला. “साहब, गुप्ते साब तो घरपर नही है। उनके भैय्याने मुझे बताया की वो रातभर घरपर ही नही आये और कुछ बताकर भी नही गये है ।” कुमाराने इतके ऐकले व तो जवळ जवळ धावतंच पुरी साहेबांच्या घरी जाण्यास निघाला.

“त्याचा मोबाईल कुठे आहे ते जरा ऑपरेटिंग सिग्नल्स वाल्यांना ट्रेस करायला सांग मी ऑफिसला पोहचतो.”

fb06_21.jpg

ऑपरेटिंग सिग्नल्स वाल्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसच्या त्या भ्रमणध्वनी कंपनीत फोन करून गुप्तेचा फोन ट्रेस करायला सुरुवात केली. फोन चालू होता म्हणजे तो बेसस्टेशनला स्वत:चे ठिकाण कळवत राहणारच हा पुरी साहेबांचा होरा बरोबर ठरला. एका फोन ऑपरेटरला फोन सतत वाजत राहिला पाहिजे अशा सूचना देऊन पुरी साहेब कॅबीन कडे वळले. जे घडतंय त्याची काळजी स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सापडलेले राडार जॅमर, एअर मार्शल भोसलेंवरचा हल्ला व त्यापाठोपाठ गायब झालेला गुप्ते एकाच साखळीच्या कड्या असल्याचा तीळमात्र संशय त्यांच्या मनांत नव्हता.

कुमार हा गुप्तेचा फ्लाइंग मेट होता. गुप्ते थोडा अवखळ आहे पण बेजबाबदार नाही हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याचा गोंधळ उडाला होता. समवयीन व त्यातही एकाच बॅचचे असल्याने दोघांचे संबंध घनिष्ठ होते. गुप्ते न सांगता फार फार तर पिक्चर टाकायला जाईल पण रात्री घरी परतणारंच ! कुमारच्या घरी पार्टीला कितीही रात्र झाली तरी तो थांबत नसे – सकाळ स्वतःच्याच बिछान्यात व्हावी ह्याबद्दल तो नेहमीच आग्रही होता म्हणून कुमारची काळजी वाढतंच होती. इतक्यात सिग्नल्स वाल्यांनी गुप्तेचा फोन कॅम्पस मध्ये असल्याचे कळवले. नक्की जागा कळवण्यास सिव्हिल सर्व्हिसेसने असमर्थता दाखवली होती. स्वत कुमार इतरांबरोबर गुप्तेचा फोन शोधण्यास मदत करू लागला. इतक्यात झटका आल्यागत पुरी साहेब आपल्या खुर्चीतून ताडकन उठले व कुमारला घेऊन तडक भोसले साहेबांच्या कॅबीन बाहेरील हिरवळीवर तपास घेऊ लागले.

शोध सुरू असताना काही क्षणांतच कुठून तरी मोबाईल च्या किणकिणल्याचा स्वर ऐकू आला. ओरडूनच सर्वांना बोलावून घेत कुमाराने नक्की जागेचा तपास केला…. कॅबीनच्या ‘त्या’ खिडकीपासून थोड्याच अंतरावर झाडीत गुप्तेचा फोन वाजत होता.

“कोई उसे हाथ नही लगायेगा !” कुमाराने सोडलेले फर्मान ऐकून पुरी साहेबांनी मान डोलवली.

सीक्रेट सर्व्हिसेस साठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरला असता ह्याची जाणीव कुमारला होती. एका काडीला फ्लॅग बांधून ती मोबाईलच्या जागेवर खोचण्यात आली व हस्तसंचाच्या परीक्षणासाठी तो सिग्नल्सच्या ताब्यात देण्यात आला. मेस मध्ये दुपारच्या जेवणात सर्वांच्या तोंडी अमर गुप्ते च्या गायब होण्याचा विषय होता.

क्रमशः
ह्या कथेत वातावरण निर्मीतीसाठी अपरिहार्याने इंग्रजीचा वापर मुक्त हस्ताने करावा लागला आहे- वाचकांची त्याबद्दल माफी मागतो !

टिप्पणी करे

Older Posts »