नकळत सारे घडले-

रेवा बसची वाट पाहत उभी होती- तसा फार उशीर झालेला नसला तरीही रहदारी तुरळक होत होती. बस लवकर यावी असा मनोमन विचार करीत असतानाच आजूबाजूला हातात हात घालून रेंगाळणारी युगुले तीच्या विचारांत खंड आणीत होती. त्यातले एक तर स्टॉपच्या लोखंडी पाइपांवर बसून प्रणयांत रंगले होते.
रेवाला हे नवीन नव्हते. आठ वाजत आले की, ओव्हरटाइमच्या बहाण्याने नोकरी करणारी तरूण मंडळी जोडीने फिरणे हे काही गुपित राहिलेले नव्हते. ऑफिस मधल्या काही मुली त्याच मार्गाने जात पण आपण त्या गावचेच नाहीत असे दाखवीत तेंव्हा रेवाला त्यांची मजा वाटे.
कित्येकदा वासंतीला वाचवण्यासाठी तीच्या घरी रेवाने खोटे निरोप दिले होते. तिला व्यक्तीश्या: हे पसंत नव्हते परंतू आईची तब्येत ढासळली की, वासंती खेरीज तिला कोणी सहकार्य करीत नसे व म्हणूनच तिचा नाईलाज होई.
वासंतीचा विचार डोक्यात आल्याबरोबर तिला आजचा प्रसंग आठवला, कामे तुंबून राहिली आहेत म्हणून वासंतीला आज ऑफिसमध्ये चांगलाच ओरडा बसला होता व काम झाल्याखेरीज घरी जायचे नाही अशी तंबीही मिळालेली होती. बिच्चारी वासंती ऑफिसात बसून स्वत:ची तुंबलेली कामे करीत होती.

                                                                                      31.jpg

रेवाही तशी दिसायला बरी होती. नाकी डोळी सुंदर, गहूवर्ण रंग – उंची, बांधा सहज नजरेत भरण्याइतपत आकर्षक…. कार्यालयात येणारा प्रत्येक नवांगत “ही कोण हो ?” म्हणत तिच्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करी. वासंती तर गमतीने तिला चिडवे,”तू राजच्या समोर येऊच नकोस बाई, नाहीतर तो मलाच विसरायचा !” पण श्यामळू व अलिप्त स्वभावामुळे तिच्याशी सर्वजण अंतर ठेवूनच वागीत व बोलीत. कार्यालयातील आगाऊ मुलेच नव्हेत तर माणसे देखील अघळपघळ बोलायचा प्रयत्न करायला लागली तर त्यांना ही सरळ “मी जरा कामांत आहे, आपण नंतर बोलू !” असे सांगून कटवी.

बस येत असलेली पाहून खांबाला टेकून उभी असलेली रेवा पुढे सरकली अन… अचानक मागल्या अंधारातून एका टपोरी टाइपच्या युवकाने तिला जोरात धक्का दिला – बेसावध रेवाने जेमतेम बस जवळ येण्याच्या आत स्वत:ला सावरले व रागाने मागे वळून पाहते, तर तो पोरगा धावत असलेला तिला दिसला…”मरो; बस चुकवायची नाही” हा विचार रेवा करीत थांबलेल्या बसचा दांडा धरून पायरी चढणार तितक्यात तीच्या लक्षात आले की खांद्यावरची आपली पर्स त्या पोराने पळवली…. काय करावे ह्या विचारांनी गोंधळलेली रेवा एक पाय पायरीवर तर दुसरा रस्त्यावर अश्या परिस्थितीत उभी होती….
“अहो ताई येताय का?” वाहकाची हाक ऐकून काय करावे ह्या विचारांत असतानाच त्याने घंटी बडवली व बस सुरू झाली.
रेवा रस्त्यावर तो पोरगा पळाला त्या दिशेने पाहू लागली. भानावर आल्यावर तिने सर्वप्रथम स्टॉपवर बसलेल्या त्या युगुलाकडे मोर्चा वळवला-
“माफ करा, आपल्यापैकी कुणी त्या पोराला पाहिले का?”
“क्या हुआ ? किसको देखा क्या पूछ रही हो मॅडम ?” युगुलातल्या पोराला जरा कणव उत्पन्न झाली… तेव्हढ्यात “जाने दो डार्लिंग, लफडेमें कायकू पडनेका ?” त्याची मैत्रीण पचकली !
तो टपोरी पळाला त्या दिशेला तोंड करून रेवा कोणी दिसते का ह्याचा अंदाज घ्यायला लागली. अंधारात फारसे लांबचे दिसणे तिला शक्यच नव्हते… हताश होवून परत ती खांबाला चिकटली… पर्स गेली म्हणजे आता रिक्शाने जाणे भाग आहे…
रिक्शा खाली उभी करून पैसे द्यावे लागतील… पर्स मधील सामान फारसे महत्त्वाचे नव्हते पण, आईच्या औषधांचे वेगळे काढलेले पैसे होते; पिंटूची फी होती; अडी-अडचणीला लागणारे तिचे पैसे, चाव्या व फुटकळ सामान होते……
कितीही नगण्य सामान असले तरी पोलिसांत तक्रार केलीच पाहिजे असे तिला वाटले म्हणून आजूबाजूला कोणी दिसते का ते बघत असतानाच एक माणूस दुसऱ्याला बखोटीला धरून घेऊन येत असताना तिने पाहिले…. बघते तर काय, तो टपोरी, ज्याने तिला धक्का दिलेला होता त्याचे बखोटं पकडून एक युवक तीच्याच दिशेने येत होता ! त्या युवकाकडे व त्या चोराकडे बघत ती मख्खपणे उभी होती.
“दान धर्म करायची इतकी इच्छा असेल ना, तर तो गरीबाला करावा.” ह्या वाक्याने ती भानावर आली.
“देवाने तोंड दिले आहे आपल्याला, तर ‘चोर चोर’ तरी ओरडता येते ना ?”
“मला सुचेना काय करावे ते ! त्याने नेमका अश्या वेळेला धक्का दिला की, मी बसखाली येता येता वाचले…. जेंव्हा माझ्या लक्षात आले की, माझी पर्स चोरली गेली तोवर तो लांब गेलेला होता…..”
रेवाला स्वत:चीच लाज वाटत होती…. काय घडले ते मागे बसलेल्या युगुलालाही कळले नव्हते इतक्या वेंधळ्यासारखी ती वागलेली होती.
“माझ्या मैत्रिणीची पर्सही अशीच व इथूनच गेली होती – नशीब मी फोन करायला पलीकडे थांबलो होतो म्हणून तुमची पर्स मिळाली.”
” आपण माझ्यावर खरोखर मेहरबानी केलीत, मी विचारच करीत होते पोलिसांत तक्रार देण्याचा”
“ह्याचे काय करायचे ? ह्याला असा सोडला तर हा चोरी करीत राहणार; पोलिसांत द्यायला निघालो तर माझा प्रॉब्लेम नाही तुम्हाला घरी जायला उशीर होईल.” भेटल्यापासून एक वाक्य हा गृहस्थ रेवाशी सरळपणे बोललेला नव्हता म्हणून रेवाला संताप आलेला होता
परंतू तिला घरची सगळी कामे एका क्षणांत आठवली- शनिवारी कार्यालयातून लवकर घरी आल्यावर आईला घेऊन हॉस्पिटलाला न्यायचे होते; पिंटूची परीक्षा जवळ येत होती; त्याचा थोडा तरी अभ्यास घेणे भाग होते, “ताई, तू माझा अभ्यास घेतच नाही” ही त्याची नेहमीची भुणभूण तीच्या मागे होती. ऑफिसचे कामही बरेच होते…
ह्या सगळ्या गोंधळात नवीन उपद्व्याप मागे लावून घेण्याची तिची तयारी नव्हती.
तिला जास्त बोलण्यात् अर्थ नाही हे लक्षात येताच “राहू द्या; मी बघतो ह्याचे काय करायचे ते !- आता तरी आपण रिक्शाने घरी जाण्याची तसदी घ्यावी…” त्याचा हा अनाहूत सल्ला ऐकताच इतका वेळ धरून ठेवलेला तिचा संयम सुटला. नकळत तीच्या डोळ्यात टचकन पाणी आले- हा प्रकार त्याच्या गांवीही नव्हता, त्याने सरळ रिक्शाला हात करून बोलावले, तिला अक्षरशः: रिक्शांत ढकलून रिक्शांचे मिटर स्वत:च्या हाताने खाली पाडले !
“मॅडमको घरपर बराबर छोडना !” असे रिक्शावाल्याला बजावले. रेवाने त्याच्या आभारप्रदर्शनाचा कार्यक्रम करण्याआधीच रिक्शा सुरू झाली…..
रिक्शांत बसल्यावर रेवाचे विचारचक्र चाकांसारखे फिरू लागले….
हा गृहस्थ वेळेवर मदतीला आला नसता तर पिंटूच्या सरांना काहीतरी निमित्ताने ह्या वेळी टाळावे लागले असते. आईच्या औषधांची निकड ठेवणीतल्या पैशांतून भागवावी लागली असती. महिन्याचे गणित चुकले तर असतेच, वरून पर्स नवीन घ्यावी लागली असती….
“मॅडम, साहब पुलिसवाला है क्या?” रिक्शावाल्याच्या ह्या प्रश्नाने ती भानावर आली. संभाषण टाळण्यासाठी तिने फक्त हुंकार भरला.
“मुझे लगा ही, जीस तरिकेसे उन्होने दो झापड दिये उस चोर को, यह पुलिसवालेका ही काम हो सकता था ।”
“तू का नाही पकडले त्याला?”… ह्या प्रश्नावर मात्र संभाषण टाळून तो गप्प बसला.

घराच्या वळणावर तिने रिक्शा सोडून ती पायी निघाली; रोज बसने येणारी मुलगी आज रिक्शाने कशी हा चाळीत चर्चेचा विषय झाला असता……
*********************************************************
रेवा घरी पोहचली तेंव्हा घडला प्रकार आईला सांगावा की नाही ह्याबाबत ती गोंधळात होती- सांगावे तर ती रोज काळजी करीत राहील -न सांगावे तर स्वतःचे मन खात राहील. शेवटी न सांगण्याचा निर्णय तिने घेतला – आईची तब्येत सांभाळणे मनाच्या भावनांपेक्षा महत्त्वाचे होते…

वासंती दुसऱ्या दिवशी ऑफिसला आली नव्हती- काल काय घडले ते कोणाला तरी सांगण्यासाठी रेवा उतावीळ झाली होती. बाजूच्या टेबलावर बसणाऱ्या मोकाशींचा स्वभाव जरा बरा होता. मध्यमवयीन हा गृहस्थ रेवाला कधी मधी आपल्या वाटणीचे काम करायला मदत मागी. मोकाशींना काय घडले ते तिने मोघम सांगितले तेंव्हा मोकाशी रेवाच्या तोंडाकडेच पाहतं राहिले.
‘रेवती, काळजी घ्या, त्या माणसाने मार खाल्लेला आहे तो तिसऱ्याच्या हातून – डूख तुमच्यावर नको ठेवायला!’
रेवाने मनातल्या मनात कपाळावर हात मारला- दुपारी जेवणाच्या सुटीत वासंतीला घरी फोन करून सांगायचे रेवाच्या मनांत आले पण वासंतीच्या वाटणीचे काम तीच्या डोक्यावर येऊन पडल्याने जेवण कसेबसे आटपून ती कामाला लागली ते घरी जाण्यासाठी जिना उतरताना ती गोष्ट तीच्या लक्षात आली…. परत तोच स्टॉप समोर बघून रेवाच्या मनात धस्स झाले. मोकाशींचे बोलणे अचानक तिला आठवले व एका वेगळ्याच भावनेने तिचे शरीर शहारून गेले…. पण काल पेक्षा गर्दी अधिक होती व बसही लवकर आल्याने रेवाला जास्त काळजी करावी लागली नाही.

वासंती दुसऱ्या दिवशीही न आलेली बघून रेवाला आश्चर्यापेक्षा काळजी वाटू लागली. मग तिने वासंतीला घरी फोन केला. वासंतीच्या बाबांनी फोन उचलताच रेवाला नवल वाटले त्यांनी रेवाला वासंती आठ दिवसासाठी गावाला काही कामानिमित्त गेल्याचे सांगितले. मोकाशींना ती त्याबद्दल बोलली-
‘पण तिने फोन तर करायचा होता ऑफिस मध्ये !’ त्यांनी स्वतःची नाराजी दर्शवली.
दुपार झाली व रेवा कामांत असतानाच कुरियर वाल्याने रेवाच्या टेबलावर एक पाकीट आणून ठेवले – ऑफिसच्या पत्त्यावर पत्र आलेले पाहून रेवाला नवल वाटले… जेमतेम पोहचपावतीवर सही करून तिने अक्षर बघितले तर वासंती सारखे भासले… घाईघाईत तिने पाकीट उघडले – बघते तर वासंतीचेच ! सोबत एका कागदावर तिचे राजीनामापत्र.
वासंतीच्या वडिलांनी तिला राजच्या भानगडीमुळे काही दिवस गावी पाठवून देण्याचा निर्णय घेतलेला होता म्हणून वासंती कावलेली होती. परत चांगली नोकरी मिळेल की नाही व आता वडील सरळ लग्नच लावतील अशी भिती तिला वाटत होती.
मोकाशींना तिने फक्त राजीनामा दाखवला- मोकाशी माणूस बरा होता त्याने जरा विचार केला मग वासंतीची रजा किती शिल्लक आहे ते पाहून ‘तिला आपण आठवड्याची रजा देऊया कदाचित तोवर तिचा नोकरी सोडायचा विचार बदलला तर बिचारीचे नुकसान व्हायला नको’.

दोन दिवसांनी रेवाने परत वासंतीच्या घरी फोन केला, तीच्या आईने पूर्ण रामकहाणी सांगितली , वासंतीचे वडील राज प्रकरणावरून जाम उखडलेले होते. त्यांनी दोघांना एकत्र पाहिले व तत्काळ वासंतीची रवानगी गांवी केलेली होती. तीच्या आईला धक्काच बसला होता – वासंतीचा फोन आल्यास ऑफीसला फोन करण्याची विनंती रेवाने त्यांना केली….
दुपारी वासंतीच्या वडिलांचा फोन आलाच !
वासंती नोकरी सोडत आहे व कारण हे वैयक्तिक असल्याचे त्यांनी सरळ डायरेक्टर साहेबांनाच सांगितल्याने पुढचा प्रश्नच मिटला होता…

ह्या सर्व घटना इतक्या वेगवान व नाट्यमय रितीने झाल्या होत्या की, रेवा बसस्टॉप प्रसंगाबद्दल साफच विसरून गेली होती…..
एका सायंकाळी ऑफिसमध्ये खास काम नाही म्हणून तिची वेळेवर सुटी झाली. इतर पोरींबरोबर गप्पा मारत ती स्टॉपवर पोहचली, तितक्यात मोटर सायकलवर बाजूलाच उभ्या असलेल्या त्या युवकाकडे तिचे लक्ष गेले.
 aamir_khan141.jpg
आभारप्रदर्शनाचा अर्धवट राहिलेला कार्यक्रम पूर्ण करायचा विचार करून ‘एक मिनिटात आले ग !’ म्हणत ती त्याच्याकडे चालू लागली. तिला येताना पाहून मंद स्मित त्याच्या चेहऱ्यावर आले.
‘आपण त्या दिवशी मला खरोखर खूप मदत केलीत व मी आपले आभार मानायचा कृतज्ञपणा दाखवू शकले नाही.’
‘मग आजचा मुहूर्त छान आहे त्यासाठी ! लवकर धन्यवाद दे म्हणजे तुझ्या मैत्रीणी ज्या डोळे विस्फारून इकडे बघत आहेत त्यांची सुटका होईल’
अनावधाने रेवाने मागे वळून पाहिले…. खरोखरच तिघीच्या तिघी टक लावून तिकडेच पाहतं होत्या. त्याही परिस्थितीत रेवाला हसू आवरेना….
तिला हसताना पाहून तो लगेच बोलला ‘तुझे धन्यवाद तू घरी पोहचलीस तेंव्हाचं माझ्यापर्यंत पोहचले’
‘आपले नांव नाही कळले’
‘तू कुठे तुझे नाव सांगितलेस ?’
….लांबून बस येताना पाहून सुटका झाल्याची भावना तीच्या चेहऱ्यावर उमटली…..
आता मागे वळून पाहण्याची पाळी त्याची होती…..
‘तुझी बस येतेय – पुढची बस अर्ध्या तासाने आहे’
‘बापरे, मी पळते…. बाय द वे, मी रेवा, रेवती मराठे !’
त्याने पुढचे काही बोललेले ऐकू येण्याच्या नेमक्या वेळेलाच बाजूने जात असलेल्या कारने कर्कश्य हॉर्न वाजवला….
‘कोण ग तो ?’
“अग सोमवारी माझी…… ” अन रेवाने पूर्ण कहाणी तीच्या बाजूला बसलेल्या मुलीला सांगितली.
‘दिसायला चांगला आहे, मी आपल्या ह्या स्टॉपच्या आजूबाजूला त्याला बऱ्याचं वेळा पाहिलेय !’
‘असेल, मला कुठे त्याच्याशी मैत्री ठेवायचीय; त्याने मदत केली म्हणून माझे राहिलेले कर्तव्य मी आज पार पाडले’ रेवा थोड्याश्या फणकाऱ्यानेच बोलली.
‘बघ हो बाई, प्रेमा बीमात पडशील त्याच्या’
‘असले धंदे करायला मी मोकळी नाही ग !’ रेवा बोलली पण आपल्या त्या बोलण्याचा नेमका अर्थ काय हेच तिला कळेना…

रात्री कामे आटपून ती बाल्कनीत येऊन समोर ठेवलेल्या खुर्चीवर जरा विसावली… आकाशाकडे नजर लावून ती येणाऱ्या समस्यांच्या विचारात गुंतली असतानाच मनाच्या एका कोपऱ्यात एक घंटी किणकिणल्याचा आवाज आला….
अचानक तो युवक तीच्या नजरेसमोर आला. अरे तुरे करायचा हक्क न देताही त्याने सरळ रेवाला एकेरी संबोधले होते. त्यातच सरळपणे बोलणे त्याला माहीतही नसावे. अचानक तिने घातलेला गोंधळ तिला आठवला. त्याने डोळे विस्फारून पाहतं असलेल्या त्या मुलींबद्दल बोलतांच आपण कसे पटकन वळून पाहिले हे आठवताच तिला खुदकन हसू आले….
“का हसतेस गं पोरी ?” आईच्या आवाजाने ती भानावर आली. “काही नाही गं, असेच !”
“….काय हे नशीब घेऊन आलीस रेवा, ज्या वयांत संसाराची स्वप्ने रंगवायची, त्या वयांत तुला असे मरेतोवर काम करताना पाहून माझे काळीज तुटते गं”
“बघ परत सुरू केलेस तू तेच पालूपद , अगं आई मी काय उपकार करतेय का तुझ्यावर व पिंटूवर?”
आईचा अगतिक चेहरा तिच्याने बघवत नव्हता. कशीबशी आईची समजूत घालून ती बिछान्यात पडली….
परत त्याच घंटीचा सुर तिला ऐकू आला –
कूस बदलली तेंव्हा खाली झोपलेल्या आई व पिंटूचा चेहरा तिला चंद्र प्रकाशात दिसला व त्या घंटीचे सुर आपोआपच विरळ झाले.

*********************************************************************
‘आज तो परत दिसावा त्याचे नांव तरी विचारू-‘ हा विचार मनांत आल्यावर तिला स्वत:चीच लाज वाटली. पण तो त्या दिवशी दिसलाच नाही. शनिवार म्हणून जरा लवकर घरी जात असलेली रेवा बसमध्ये चढल्या वरही मागच्या काचेतून वळून पाहत होती. दोन दिवसात घरगुती कामाच्या रगाड्यात तिला कसलीच आठवण आली नाही. सोमवारी तिघींतल्या एकीने जेवताना तिला विचारले,
‘रेवा, लग्न करणार तू त्याच्याबरोबर ?’ ही पोरगी कुणाबद्दल बोलतेय ते कळायला दोन मिनिटे लागली तिला, तोवर बाकीच्यांचे फिदीफिदी सुरू होते……

रोज सायंकाळी बसस्टॉप वर उभे राहायचे, एकाच वाटेकडे सारखे सारखे वळून पाहायचे…. अगदी बसमध्ये चढल्यावरही मागच्या काचेतून वळून पाहायचे हा छंद आपल्याला कसा जडला तेच तिला कळले नाही. वासंतीची आठवण आपल्याला का येतेय हेही तिला कळेना….

रोजच्या सवयीनुसार तिने ऑफिसच्या इमारतीतून बाहेर पडल्या पडल्या त्या वाटेवर नजर फिरवली व अचानक तिची नजर त्या मोटर सायकलवर खिळली. बसस्टॉप कडे चालत असताना तिरक्या डोळ्यांनी ती त्याचा वेध घेऊ लागली व तो दिसला….
‘आज सरळ त्यालाच त्याचे नांव विचारायचे का ?’ ‘
नको, बरे नाही दिसत !’
असे विचार मनांत घोळवत असताना तो सरळ तिच्याकडे चालत येत असलेला पाहून तिच्या हृदयांत धडधडायला लागले….
एका मधुर घंटेच्या किणकिणल्याचा तोच स्वर कुठून तरी तिला ऐकू आला…
“जरा बोलशील का माझ्याशी ?”
“हो..पण…..ह्या इथे ?” चाचरतच तिने विचारले.
“नाही समोर ‘स्वागत’ मध्ये बसू, मी जरा बाईक लावून येतो, तू वरच्या माळ्यावर एखादे रिकामे टेबल पकड” अधिकार वाणीने तो बोलत होता…..
522851.jpg
स्वागत कडे चालत असताना आपण आपल्या नकळत त्याचे का ऐकतोय तेच तिला कळेना…. विचारांच्या घालमेलीत ती स्वागत हॉटेलच्या वरच्या भागात आली. जेमतेम येऊन टेकते न टेकते तोच तो आला.
“माफ कर, मला तुला फार त्रास द्यायचा नाही पण माझे एक छोटे काम होते”
“माफ करा; मी त्या दिवशी आपले नांवही नीट ऐकले नाही”
“मी ते सांगितले कुठे ?”
“ओह, कारण नेमका तेंव्हाच कसलातरी मोठा आवाज झाला व माझे लक्ष विचलित झाले होते ”
” फिरोज़ खंबाटा !” फक्त दोनच शब्दांत त्याने स्वत:ची ओळख करून दिली.
“आपण केलेल्या मदती….”
” बस करशील का आता ते ?” नाराजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. “तू चांगल्या घरची मुलगी दिसतेस म्हणून तुला विचारावे की नाही ह्याचा विचार मी करीत होतो. पण मी जे काम तुला सांगणार आहे ते अजून कोणी करू शकेल असे मला वाटत नाही.”
“बोला.., मला जमले तर मी नक्की करीन पण ते सरळ मार्गी असेल तरच करीन हेही सांगते !”
परत तेच स्मित त्याच्या नजरेत दिसले. “काळजी करू नकोस, घरंदाज मुलीला करता येण्यालायक कामच मी सांगेन” इतक्यात वेटर येऊन उभा राहीला- काय खाणार-पिणार ह्या औपचारिक विचारणेच्या भानगडीत न पडता दोन कप कॉफीची मागणी त्याने वेटरला केली.
“माझा एक मित्र आहे, त्याची मैत्रीण वासंती इथेच कुठेतरी कामाला आहे. तीच्या बद्दल जरा माहिती काढायची आहे.”
क्षणभर काय बोलावे ते तिला कळलेच नाही. पण लगेच स्वत:ला सावरून तिने चेहऱ्यावर स्थितप्रज्ञाचे भाव आणण्याचा प्रयत्न केला.
“आपण अजून काही माहिती द्या, मी बघते तिला कोणी ओळखते का ते !” कॉफी केंव्हा येते व संपवून आपण केंव्हा सटकतो असे रेवाला झाले.
“ती *** ह्या कंपनीत अकाउंट्सचे काम बघते” माहीत आहे हा शब्द रेवाने घशांत आवंढ्याबरोबर गिळला.
“तिची व माझ्या मित्राची मैत्री नुकतीच झाली होती. एकमेकांना ते पूर्णपणे ओळखण्याच्या आतच ती काही दिवसांपासून गायब आहे.”
” तिला नसेल भेटायचे त्याला ” अगदी सहजतेने तिने वासंतीची बाजू मांडायचा प्रयत्न केला पण तो आपल्याकडे रोखून पाहतोय हे लक्षात आल्यावर ती गडबडीत म्हणाली, “म्हणजे एका मुलीला कदाचित नंतर असे वाटले असेल, की त्या मुलाची मैत्री नको ”
“नाही, तसे नसावे कारण घरून ऑफिसला निघण्यासाठी ते बरोबर निघाले होते व रस्त्यातच त्या मुलीच्या म्हाताऱ्याने, आय मीन, वडिलांनी पाहिले होते… मुलीला बरोबर घेऊन तिचा बाप सरळ घरी गेला असे माझा मित्र सांगतो ”
रेवा गप्प होती. वासंतीच्या वडिलांनी दोघांना एकत्र पाहिल्याचे तिची आई म्हणाली होती म्हणून ह्या समोरच्या युवकावर, फिरोज वर विश्वास ठेवणे तिला भाग होते. जेमतेम त्या वेळेपुरते संभाषण संपवून रेवा घरी जायला निघाली तेंव्हा वासंती, राज व फिरोज़चा विचार तीच्या डोक्यातून जात नव्हता.

झोपायचा प्रयत्न करूनही ती जागीच होती. फिरोज़ भेटल्यापासून ती सतत विचारच करीत होती. ह्याला जर दोन दिवसांत वासंती बद्दल कळले नाही तर ऑफिसमध्ये येऊन थडकायचा.
ऑफिसमधल्या पोरींनी ह्याला आपल्या बरोबर बोलताना पाहिलेले आहे. त्यात हा वासंतीची चौकशी का करतोय हे नंतर त्या मुलींना कसे पटवायचे ?
परत त्याला आपण त्याच ऑफिसमध्ये दिसणार म्हणजे तो विचारेलच की, तू मला आधीच का नाही सांगितलेस ?
छ्या, साफच गोंधळ झाला होता !
अचानक तिला आठवले फिरोज़ने स्वत:चे व्हिजिटिंग कार्ड तीच्या कडे जाता जाता दिले होते. नशीब तिने ते पर्समध्ये ठेवले – उद्या ऑफिसातून काही तरी खरेदी करायच्या बहाण्याने बाहेर पडून त्याला फोन करावा लागणार होता….. त्याला काय सांगायचे ह्या विचारांत असतानाच तिला झोपेने घेरले….

दुपारी लंच नंतर ‘जरा खाली जाऊन येते’ असे मोकाशींना सांगून ती सटकली. ऑफिसच्या इमारतीला मोठा वळसा घालून एका सार्वजनिक फोन वरून तिने त्याला फोन लावला.
सुरुवातीला एका मुलीने, नंतर माणसाने फोन घेतला दर वेळी काय काम आहे विचारपूस करूनच फोन शेवटी फिरोज़ला दिला गेला “बोल रेवा,” परत तोच घंटीचा मधुर स्वर तिला जाणवला
                                                                          christmas-bells-b1.jpg
“वासंती माझ्याच ऑफिसमध्ये काम करते….”
“मला माहीत आहे, पुढे बोल…”
आता चकीत व्हायची वेळ रेवाची होती. “तिने गेल्याच आठवड्यात राजीनामा दिलाय”
“ते ही मला माहीत आहे.”….
रेवा उखडली, “मग काय माहीत नाही ते सांगा म्हणजे मी तेव्हढेच बोलेन”
“सध्या ती कोठे आहे”
“ते मलाही माहीत नाही !”
“साफ खोटे ! कारण तुझ्याकडे तिचे पत्र व राजीनामा दोन्ही पोहचले आहेत”
रेवा निःशब्द उभी होती… फोन वाढवण्याचा संदेश बीप करायला लागल्यावर ती भानावर आली.
“मी संध्याकाळी येतो, स्वागतमध्येच बसूया ” अधिकारवाणीने फिरोज़ने तिला कळवले.
तिने डोलवलेली मान त्याला फोनवर दिसली असती तर त्याला हसू आवरले नसते !
**********************************************************************
संध्याकाळी रेवाला बराच वेळ तिष्ठत ठेवून तो आला….
भडकलेली रेवा काही बोलण्याच्या आतच त्याने अक्षरशः दोन्ही हात जोडून तिची माफी मागितली, “बाई गं, येथे रस्त्यात काही नको बोलूस, माझ्यावर तेव्हढी मेहरबानी कर !”
त्याचा तो अवतार पाहून हसावे की रडावे हे न कळलेल्या रेवाचा राग मात्र कुठल्या कुठे पळाला.
“मला हे सांगा, आपणांस ह्या सगळ्या गोष्टी माहीत कुठून झाल्या ?” खुर्चीत बसल्या बसल्याच तिने विचारले.
“स्त्रियांना धीर नाही धरवत का ?” मिश्किलपणे त्याने संभाषण तोडत तिला विचारले “मला एकाच व्यक्तीवर अवलंबून राहायचे नव्हते, तू जर ‘मदत करीत नाही…ज्जा’ असे सांगितले असतेस तर ?”
“अजून कोणाला पकडले आपण ?”
“काळजी करू नकोस, तो तुला ओळखतही नाही व वासंतीशी संबंधीतही नाही”….
हळूहळू रेवाने त्याला सगळी हकीकत सांगितली. मध्येच रेवाला एखादं दुसरा प्रश्न करीत तो ऐकत होता. तिचे बोलणे त्याने शांतपणे ऐकून घेतले होते….
शेवटी उठण्याच्या आधी रेवाचे टेबलवर आधारासाठी ठेवलेले दोन्ही हात त्याने अचानक हातात घेतले, “तू खरोखर आज मला जी मदत केली आहेस, मी जन्मभर विसरणार नाही.”
एक सेकंदासाठी तो क्षण तसाच तेथेच थांबावा असे रेवाला वाटले.
“चल, तुला घरी सोडू ?”
“नको, मी जाईन बसने” रेवाला हो म्हणावेसे वाटत होते पण तिने स्वतःला सावरले.
बसस्टॉप वर बस येई पर्यंत दोघे गप्पा मारीत होते. बस आल्यावर तिला बसमध्ये चढवून तो निघाला तेंव्हा रेवा मागच्या काचेतून तो गेला त्याच दिशेकडे बघत होती……
कुठूनतरी घंटीचा तो मधुर किणकिणाट आपणांस का ऐकू येतो ते मात्र तिला कळत नव्हते.

“रेवा आज मनू आत्या आली होती तुझी !” आईने उत्साहित स्वरांत आल्या आल्या सांगितले.
“अच्छा ? काय म्हणते ?” स्टूलवर बसून सॅंडल्स काढता काढता रेवाने लक्ष असल्यासारखे भासवले !
“त्या स्थळाकडून होकार आलेला आहे” …. रेवा एक क्षण स्तब्ध झाली पण आईच्या उत्साहावर विरजण टाकायची तिची इच्छा नव्हती.
“अग, आई इतकी घाई कशाला करतेस उगीचच, मी अजून नीटपणे विचारही केलेला नाही लग्नाबद्दल”
“अग मुली, आपण साधी माणसं, तुझ्या आत्याने तुझ्यासाठी विचार करूनच स्थळ आणले असेल ना !”
“अगं, पण पिंटू व तुझे कोण बघणार मी गेल्यावर ?” – रेवाने स्वतः:चे घोडे दामटवायचा प्रयत्न सोडला नव्हता.
“तुला काय जन्मभर बांधून ठेवू मी ह्या बंधनात; रेवा?” आई आता हळवी होणार हे पाहून रेवाने माघार घेतली.
“बरं ! मी उद्या आत्याला फोन करून बोलेन तिच्याशी !” इतके बोलून तिने स्वतः:ची सुटका करून घेतली.

रात्री बराच वेळ ती बिछान्यात नुसती पडून होती…. मध्येच आपल्या हातांकडे तिचे लक्ष वळले की, ती गोरीमोरी व्हायची…..मध्येच तिला कुठून तरी घंटी किणकिणल्याचा भास व्हायचा. रात्री झोप केंव्हा आली ते तिला कळलेच नाही.

दोन दिवस तिचे ऑफिसमध्ये कामांत लक्ष लागलेले नव्हते. घरीही आई एक विचारायची तर ती उत्तर दुसरेच द्यायची. ‘आत्याला फोन केलास का’ ची भुणभूण आईने मागे लावली होती. बस स्टॉपवर रेंगाळून शेवटी दोन तीन बस गेल्यानंतर कंटाळून पुढची बस पकडायची….. हळूहळू तिच्या लक्षांत आले की, आपण फिरोज़ची आतुरतेने वाट पाहत आहोत.

अचानक एक दिवस ‘रेवती, तुमचा फोन…..’ मोकाशींनी सांगितले.
आईचा तर नसेल ना ह्याची काळजी करीत ती फोनकडे वळली… “हॅलो…..” पलीकडे स्तब्धता….”हॅलो….” ह्यावेळी जरा तिचा स्वर वाढला….
“अग रेवा, मी वासंती बोलतेय ”
“अय्या…वसू ? कुठून बोलतेस तू ?”
“फोन मधून गं !”
“ए मस्करी सोड, कुठे आहेस ते बोल आणी आज अचानक फोन केलास !”
“अगं, संध्याकाळी काय करते आहेस ? भेटायचे का ? ऑफिसच्या खालीच भेटू, मला खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी”
“चालेल,पण वेळेवर ये बाई…. मला घरी जायची घाई असते !”
“अगं राजशी ओळख करून द्यायची आहे तुझी”
“काय ? म्हणजे तू अजून…..” पुढचे बोलणे तिला थांबवावेच लागले कारण आसपासच्या बहुतेक सर्वांचीच उत्सुकता वाढलेली होती….
जेमतेम बोलणं संपवून तिने फोन ठेवला तेंव्हा मोकाशींसह सगळे जण उत्सुकतेने आपल्याकडे बघत असल्याचे तिला जाणवले….

रेवा खाली उतरली तेंव्हा वासंती वाट बघत उभीच होती. ‘स्वागत’ च्याच वरच्या माळ्यावर वासंती तिला घेऊन गेली
“अगं राजला सांगितलेय यायला…. कधी वेळेवर आला तर शप्पथ ! तोवर आपण काहीतरी खाता खाता गप्पा मारू ”
“अगं तुझ्या बाबांना माहीत पडले तर ?” रेवाचा स्वर काळजीचा होता.
“नाही गं, त्यांनी शेवटी परवानगी दिली आमच्या लग्नाला…. राज घरी आला होता, त्याने स्पष्ट सांगितले की, ‘तुम्ही वासंतीला कुठे डांबून ठेवले आहे ते मला माहीत आहे; पळून जाऊन लग्न करायची आमची तयारी आहे पण जर तुम्ही आशीर्वाद दिलात तर सगळेच सुखी होतील !’ ”
“बापरे… बराच धीट दिसतोय तुझा राज !”
“मग काय, मी उगीच भाळली का त्याच्यावर ? तो ना एकदमच डॅशींग आहे”
नंतर खाताखाता वासंतीची टकळी सुरूच होती…. राजचे कौतुक अगदी भरभरून चालले होते.

अचानक रेवाला फिरोज़ची आठवण झाली.
“अग वसू, तुझ्या राजचा मित्र मला येऊन भेटला… तुझ्या गांवचा पत्ता मीच त्याला दिला होता…..”
“राजचा मित्र ? कोण ? मला नाही बाई ठाऊक राजचा कोणी मित्र…..” हे बोलत असतानाच फिरोज़ स्वागतचा माळा चढून वर येताना रेवतीला दिसला.
ती काही बोलणार इतक्यांत वासंती आनंदाने चित्कारली….”किती रे वेळ लावलास यायला….आज तरी लवकर यायचे नाही का ?
ओह रेवा; मीट माय लव्ह…राज !….
राज, धिस इज रेवा, माय बेस्ट फ़्रेंड ”

राज….फिरोज़…..फिरोज़….राज ……रेवाला ‘स्वागत’ गोल फिरल्याचे भास होत होते.

“वासंती मला राज म्हणते; माझे नांव तेच आहे – फिरोज़ खंबाटा !”

कुठूनतरी घंटीच्या किणकिणत्या स्वरांऐवजी एक कळ उठली….. तेंव्हा रेवाला कळले तो घंटीचा स्वर आपल्या हृदयांतून येत होता…..

                                                                     

                                                                           ~समाप्त~

एक उत्तर दें

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s

%d bloggers like this: