उमंगला तर ह्या गोष्टीचे काहीच नवल वाटले नव्हते किंबहूना आपले बिंग फुटायच्या आत स्नेहाचे बिंग फुटले हे बरेच झाले असा स्वार्थी विचार त्याच्या मनात येऊन गेला. सिंधूताईंना समजेनासे झाले होते की कुबल वहिनींना नेमके काय झाले ते… आजार म्हणावा, तर रक्तदाबाचा विकार जुनाच होता… त्यांनी स्नेहाला विचारायचा प्रयत्न केला पण जेंव्हा जेंव्हा त्या स्नेहा जवळ बोलायला जात, तेंव्हा सौ. कुबल काही ना काही निमित्ताने जवळ येऊन उभ्या राहत. शेवटी त्यांनी विवेकला विचारले…. आईची नजर चुकवीत विवेक ‘काहीच माहित नसल्याचे‘ आईशी प्रथमच खोट बोलला…..!
एका रात्री सौ. कुबलांना इस्पितळात दाखल करावे लागले. रक्तदाबाची व्याधी फार दिवस अंगावर काढल्याने शेवटी शरीराने साथ देण्यास नकार दिला होता. चाचण्यांत मधुमेहाचा विकारही समोर आला होता. कुबल साहेबांच्या घर, फॅक्टरी व इस्पितळ ह्या चकरा सुरू झाल्या. स्नेहाला आई डोळ्यासमोरून हलू देत नव्हती. घर सांभाळण्याची जबाबदारी सिंधूताईंच्या डोक्यावर येऊन पडली. विवेक शेवटच्या वर्षाचा अभ्यास जोरात करीत होता. उमंगच्या दिवसभराच्या कार्यक्रमांत फारसा फरक पडलेला नव्हता. ***
दैवाने सौ. कुबलांची फार काळ परीक्षा घेतली नाही…. एका रात्री स्नेहाला त्यांनी झोपेतून जागे केले…..
“मी खूप थकली आहे ग स्नेहा… मला नाही वाटत आता मी परत हिंडू फिरू शकेन….” आईचा स्वर खुप खोलातून आल्याचा भास स्नेहाला होत होता. त्यांना मात्र त्यांचे बोलणे पूर्ण करायची घाई होती…
“मी हरले, तुला विवेक आवडत असेल तर तू त्याच्याशीच लग्न कर…”
स्नेहाला कळेनासे झाले काय करावे– “आई तू शांतपणे झोपून राहा, मी आता नर्स ला बोलावते” करीत स्नेहाने खाटे जवळील बेलचे बटण दाबले.
“मी, मला….खूप…त्रास…सिं..ह…” आई ग्लानीत काहीतरी सांगायचा प्रयत्न करीत असल्याचे स्नेहाला जाणवत होते. खाटेजवळील बेलचे बटण दाबून ठेवीत स्नेहा “आई, आई…” म्हणत त्यांना शुद्धीवर ठेवायचा प्रयत्न करीत होती. स्नेहाचेच नाही तर ड्युटी वरील डॉक्टरांचे प्रयत्नही कमी पडले…..
नानासाहेब व उमंग येई पर्यंत जेमतेम त्यांनी दम धरला….. नानासाहेबांचा हात हातात असताना प्राण गेल्याचे भाग्य मात्र दैवाने त्यांना अर्पण केले…. सर्व क्रिया कर्मांतर झाल्यानंतर एक दिवस कुबलांनी उमंगला विश्वासात घेतले, “विवेक बद्दल तुझे मत काय?”
“आपल्या उपकारांखाली दबलेला आहे, तुमच्या साठी ह्या सारखा जावई शोधून सापडणार नाही.” नानासाहेबांनी इतक्या कठोरपणे प्रेमाबद्दल कधीच विचार केला नव्हता पण आजची पिढी व्यवहाराला महत्त्व जास्त देते ह्याची जाणीव त्यांच्या मनाला नकळत शिषारी आणून गेली.
सिंधूताईंना त्यांनीच ह्या विषयावर बोलते केले….
त्या गरीब पोळ्या लाटणाऱ्या बाईला ह्या प्रकारांची कल्पनाच नव्हती. नानासाहेबांनीही झाकली मूठ ठेवून फक्त ‘स्नेहा व विवेक एकमेकांना पसंत करतात, तर आपणच त्यांचे लग्न लावून देऊ‘ एव्हढेच सांगितले तेंव्हा त्यांना कळले की आपला मुलगा आता वयात आला आहे…
तरीही त्याचे स्नेहाशी लग्न लावायची कल्पना त्यांनी स्वप्नातही केलेली नव्हती. त्या गरीब माउलीची स्वप्ने तिच्या आवाक्यात मावतील एव्हढीच होती.विवेकचे लग्न स्नेहाशी एका घरगुती समारंभात पार पडले. अगदी जवळच्या नातलग व शेजाऱ्यां खेरीज कुणाला फारशी आमंत्रणे नव्हती…
सिंधूताई नानांच्या अजून एका उपकाराखाली आल्या.
स्नेहाचा चेहऱ्यावर बऱ्याच काळा नंतर प्रथमच टवटवी आली.
विवेकला तर स्वप्नांत असल्यागत झालेले.
नानासाहेबांच्या चेहऱ्यावर एक जबाबदारी पार पडल्याची भावना स्पष्ट दिसत होती.
लग्नानंतर विवेकला घरजावई करायची घाई नानांनी केली नाही ते केवळ विवेकच्या स्वाभिमाना पोटीच… मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या विवेकसाठी फॅक्टरीत मात्र वरच्या हुद्द्याची जागा त्यांनी तयार केली व बहुतांश जबाबदारी त्याच्यावरच टाकली. कंपनी मार्फतच त्याच्या राहण्यासाठी एक ब्लॉक दिला गेला व तेही सर–व्यवस्थापकाचा हक्क आहे असे भासवूनच दिला. बाकी कित्येक गोष्टी सर –व्यवस्थापकाचे हक्क आहेत असे भासवून त्याला दिल्या गेल्या. ***
उमंगचे लग्न त्याच्या वर्ग मैत्रिणीशी धुम धडाक्यात झाले… त्याच्या सासरची बहुतांश मंडळी परदेशात मोटेलचा व्यवसाय करणारी होती. पर जातीतली मुलगी केली म्हणून नानांना त्याच्यावर रागावण्याचेही धैर्य राहिलेले नव्हते. संशोधनाचा ध्यास घेतलेल्या उमंगला परदेशी जाण्याचे वेध लागलेले होते. पारपत्र व परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा परवाना हे सोपस्कार पार पडल्यावर लगेचच उमंग ‘संशोधन‘ करायला पत्नीसह परदेशी रवाना झाला – त्याच्या राहण्याची सोय करण्याची नानांवर जबाबदारी नव्हती…ती सोय लग्ना आधीच केली गेलेली होती…. ***
दिवसांमागून दिवस व वर्षांमागून वर्ष जात होती….
नानांनी फॅक्टरीत जाणे बंद केले होते. वयोवृद्ध नानांचा व सिंधूताईंचा आधार विवेक व स्नेहाला एक कन्या रत्न झालेले होते.
विवेक सकाळी नाश्ता करून फॅक्टरीत गेला की, सिंधूताईंना व लहानग्या पुजाला घेऊन स्नेहा रोज नानांकडे यायची.
नाना, सिंधूताई, स्नेहा व पुजा एकत्र दुपारचे जेवण करीत व नानांचे रात्रीचे जेवण बनवले की मग त्या घरी परतत तोवर विवेक घरी यायची वेळ झालेली असे. रोजचा हा दिनक्रम सर्वांसाठीच सुकर होता….
आसपास बरीच प्रगती झालेली होती…. मोबाईल, कॉम्प्युटर्स ह्यात गती अधिक आल्याने तसेच फॅक्टरीचा ताप रोज वाढत असल्याने विवेकला हल्ली यायला उशीर होवू लागला होता…
मात्र उशीर होणार असल्याचे तो दर वेळी फोन करून स्नेहाला कळवीत असे….
अन….. त्या दिवशी.. ते घडले….!
स्नेहाच्या स्वप्नातही नसलेली, सिंधूताईंनी नावही न ऐकलेली…..
उमंगच्या कित्येक आग्रहांना फेटाळलेली, तर नानांच्या अभिमानाला ठेच पोहचणारी… घटना घडली होती….
विवेक मद्याच्या नशेत घरी आलेला होता !
एक उत्तर दें