विवेक मद्याच्या नशेत घरी आलेला होता ! दाराची बेल वाजली म्हणून अर्धवट झोपेत असलेली स्नेहा दार उघडण्यासाठी उठली. विवेकच असणार ह्याची खात्री होती, कारण संध्याकाळीच ‘बाहेर जेवणार‘ असल्याचा त्याचा फोन येऊन गेलेला होता. सेफ्टी डोअर मधून खात्री करीत तीने दरवाजा उघडला. अचानक आलेल्या एका विचित्र वासाने डोळ्यावरची तीची झोप उडाली. तीला तो वास नेमका कसला ते कळले नाही. तशीच अर्धवट झोपेत चालत ती बेड वर जाऊन पडली. विवेक कपडे बदलून व बाथरुमला जाऊन आला व बेडवर लवंडला. परत तोच दर्प तीच्या नाकांत शिरला. पडल्या पडल्या तो दुर्गंध कसला असावा ते आठवण्याचा प्रयत्न ती करींत होती. आणी खाडकन तीचे डोळे उघडले….. हा नक्कीच मद्याचा दर्प होता; कारण कधी विवेक बरोबर हॉटेल मध्ये जेवायला गेली की, तेथे आजूबाजूच्या टेबलांवरून तसला दुर्गंध यायचा…. रात्रभर तीला झोप लागली नाही. ती स्वत:ची समजूत घालिंत होती की कदाचित हा तो दुर्गंध नसावा, परंतू वातानुकूलित खोलीत आता तो चांगलाच जाणवत होता.
सकाळी उठल्यावर काहींच झाले नसावे इतक्या खेळकरपणे विवेक वावरत होता म्हणून तीला स्वत:वरच शंका येऊ लागली. सकाळची घाई–गडबडीची वेळ असल्याने तो विषय तीने काढलाच नाही. परंतू त्यामुळे पूर्ण दिवसभर तीचे कुठल्याच गोष्टीत लक्ष लागले नाही.
सायंकाळी उशीराने विवेक घरी आल्यावर पुजाशी खेळत असताना तीने विचारले, ‘काल बराच उशीर झाला, तो ?’ ‘हो, अगं एक सरकारी निवीदा भरायची होती त्यात मदत करायला सरकारी अधिकारी आला होता,मग त्याला घेऊन जेवायला बाहेर जावेच लागले‘ पुजाशी खेळत खेळतच तो बोलत होता त्यामुळे त्याच्या डोळ्यातले भाव स्नेहाला कळू शकले नाहीत. ‘हे सरकारी अधिकारी मद्य खूप पितात म्हणे‘ स्नेहाने खडा टाकायचा प्रयत्न केला ‘हो, त्यांना काय आमच्या सारख्यांकडून फुकट मिळते ना !’ ‘पण आपण द्यावे कशाला ?’ स्नेहा विषय दामटवत म्हणाली ‘अगं, मी नाही दिली तरी तो प्यायचा थांबणार थोडीच तो दुसऱ्यांकडून वसूल करील व मग निविदा आपल्याला कुठून मिळणार ?’ ‘पण तू कशाला प्यायलास?’ अचानक हातातल्या खेळणे पुजाकडे सरकवत विवेकने स्नेहाकडे रोखून पाहिले ‘तुला काय माहित मी प्यायलो होतो की नाही ?’ ‘वास किती येत होता‘ ‘मी….’ विवेक काही बोलणार इतक्यात फोन वाजला. ‘…जरा फोन घे न‘ स्नेहाने फोन घेतला. ‘हाय स्नेहा‘ पलीकडे उमंग ! ‘ अरे आज बऱ्यांच दिवसांनी फोन केलास ?’ मग फोनवर गप्पा सुरू झाल्या, विवेकशीही तो बराच वेळ बोलत होता. उमंगची पत्नी, मिना पण स्नेहाशी बोलली. त्यातच अर्धा तास गेला. उमंग बर्याच वर्षांनी भारतात येणार म्हणून स्नेहा एकदम खूश झाली. किती बोलू आणी किती नको असे तीला झालेले. तो आल्यावर त्याला काय काय आवडते ते सर्व बनवायचे प्लॅन तीचे सुरू झाले. विवेकच्या निविदांचा विषय बाजूला पडला ! उमंग त्याच्या पत्नी व दोन वर्षाच्या हितेश सह महिन्याभरासाठी भारतात येणार होता. नानांचे पारपत्र व परदेशात राहण्याचा परवाना तयार करायला त्याने स्नेहा व विवेकला बजावून बजावून सांगितले होते. काही दिवसांसाठी तो नानांना परदेशात स्वत:च्या घरी न्यायचे म्हणत होता. दोन तीन दिवस रोजच्या सारखे गेल्यावर फिरून विवेक उशीरा घरी आला. आज स्नेहा त्याच्यासाठी जागी होती…. “काय चालवले आहेस हे ?” बेडरूम मध्ये आल्याआल्या तीने विचारले “कुठे काय..काही नाही !”
“आज परत तू प्यायला आहेस ?” “अगं घ्यावे लागले त्या अधिकाऱ्यांच्या बरोबर“
“विवेक हे मला अजिबात पसंत नाही” “पण माझाही नाईलाज आहे ना स्नेहा…” .
रात्री बयाच उशीरापर्यंत दोघांचा त्या विषयावर वाद सुरू होता. मध्येच सिंधूताईंनी दरवाजा ठोकला….”स्नेहा, झोपला नाहीत ते अजून, सकाळी लवकर उठायचे आहे तुला“. रात्रभर बिछान्यांत तळमळत असलेल्या स्नेहाला विवेकच्या मंद घोरण्याबरोबर तो वास सहन करावा लागला होता. सकाळी उठल्यावर ह्या गोष्टीचा साक्षमोक्ष लावायचे तीने ठरवले ! सकाळी पुजाला शाळेच्या बसवर सोडून तीने आल्या आल्या बेडरूम मध्ये विवेकला ह्या प्रश्नावर परत छेडले… परत वाद विवाद सुरू झाले….. त्या दिवशी विवेक नाश्ता न करताच फॅक्टरीत गेला…..
हे हळूहळू वाढत गेले…. एका रात्री दोघांचे आवाज इतके वाढले की, सिंधूताई जाग्या झाल्या…. मग त्यांनाही माहित होणे क्रमप्राप्त होते. त्या मातेला इतका मोठा धक्का पती गेल्यावर प्रथमच मिळाला होता…
विवेकचे काही ना काही निमित्ताने उशीरा येणे सुरू होते. आल्यावर दोघांचे भांडण, पुजाचे रडणे हा नित्य कार्यक्रम झाला होता. एकदा तर रागाच्या भरात विवेकने स्नेहाला धक्का देऊन ढकललेही होते. मारहाणच काय ती बाकी होती……सिंधूताईंनी विवेकशी बोलणे बंद केले होते… स्नेहाही फक्त कामापुरती त्याच्याशी बोलायची…. फक्त पुजाशीच काय तो धड बोलत असायचा…. हे असें सुरू असतांना उमंग व त्याची पत्नी मुलाला घेऊन भारतात आले. नानांकडे उतरलेला उमंग रोज सायंकाळी विवेकच्या ब्लॉक वर ‘कंपनी‘ द्यायला येवू लागला. बाहेर सुरू असलेले प्रताप आता घरापर्यंत येऊन पोहचले होते. उमंग आला की, सिंधूताई पुजाला घेऊन नानांकडे जात. घरात सुरू असलेला धिंगाणा पहाण्याची ताकत त्यांच्यात नव्हती. स्नेहाला अजून धक्का अजून ह्या काळात लागला. उमंगला हवे म्हणून मांसहारी पदार्थ विवेकने हॉटेलला फोन करून घरी मागवले. उमंग नानांना घेऊन परदेशात जायचा दिवस जवळ येत होता म्हणून स्नेहा गप्प होती. काही दिवसांचाच फक्त प्रश्न होता…. नाना बंगला पूर्ण बंद करून; सर्व व्यवस्था चोख झाली आहे हे पाहून एका मध्यरात्री उमंग बरोबर परदेशी रवाना झाले….. आणी होती नव्हती ती चाड विवेकने वेशीवर टांगली.
रोज पिऊन येणे, आल्यावर स्नेहाशी भांडणे, कधी कधी मारहाण हे प्रकार सुरू झाले…. सिंधूताई बऱ्याचदा मध्ये पडायच्या तेंव्हा त्यांच्यावर हात उचलायला विवेकने कमी ठेवले नाही.
आजकाल सिंधूताई व स्नेहा फार गप्प गप्प राहायला लागलेल्या होत्या… दोघींचे आधीचे गप्पांचे विषय साफ आटलेले होते…. सिंधूताई फक्त पुजा च्या बरोबर जरा काय त्या बोलायच्या…. बराच वेळ पुजाच्या केसांमधून हात फिरवत दु:खाचे कढं आतल्या आत सहन करायच्या….. स्नेहाच्या चेहऱ्याची तर न बघवण्यासारखी अवस्था होती…. एकदा कपाळावरचे टेंगूळ स्पष्ट दिसत होते…. तर एकदा सुजलेला डोळा…… विवेक चिडचिड्यासारखा घरात वागत असे…. एकदा रात्री झोपेत बरळतांना स्नेहाने त्याला ऐकले…. स्नेहाला फक्त इतकेच कळू शकले होते की सरकारी अधिकाऱ्यांकडून त्या निविदा विवेक ऐवजी दुसऱ्याच कुणाला देण्यात आलेल्या होत्या….. !***पुजा सकाळची लवकर उठून बसे आजीची व तीची खोली एक होती. मग आजी बरोबर दूध पिणे, अंघोळ वगैरे कार्यक्रम आटपायचे. तोवर स्नेहा जागी झालेली असे. एका सकाळी “आजी, आजी, ए आजी ऊठ ना…” अश्या पुजाच्या हाकांनी स्नेहा जागी झाली. “पुजा काय गोंधळ घालतेस सकाळ्ळी सकाळी ?”
“आई, बघ ना आजी उठतच नाही” ह्या पुजाच्या वाक्याने स्नेहाच्या काळजाचा ठोका चुकला ” आत्या, आत्या….” असा आवाज देत ती सिंधूताईंना हालवू लागली….. चौथ्या मजल्यावरील डॉक्टर जोशींना तातडीने बोलावणे गेले… ते आल्यावर त्यांनी सिंधूताईंचे झोपेतच प्राणोत्क्रमण झाल्याचे सांगितले…… पुजा व स्नेहाचा उरलासूरला आधार कोसळून पडला होता…. विवेकच्या चेहऱ्यावर अपराधाची छटा स्पष्ट दिसत होती. …. ***
सिंधूताईंच्या निधना नंतर विवेकमध्ये लक्षणीय बदल झाला होता… सायंकाळी तो लवकर येत असे, दारूला शिवणेही त्याने बंद केले… सिंधूताई गेल्यानंतरचे १०/१२ दिवस त्याने अजिबात स्नेहाला त्रास दिला नाही. त्याला ह्या सर्व गोष्टींचा पश्चात्ताप झाल्याची स्पष्ट जाणीव दिसत होती…. सिंधूताईंच्या अस्थी विसर्जन व इतर क्रिया कर्मांतरासाठी विवेकने नाशिकला जावे असे ठरले होते… विवेक नाशिकला जाण्याच्या एक सायंकाळ आधी स्नेहाने हळूच त्याला विचारले ” मी बरोबर येऊ ?.. आत्यांना शेवटचा निरोप देण्याचे माझ्या मनांत आहे.”
“हो, चालेल” एव्हढेच त्रोटक उत्तर देऊन तो शून्यांत हरवला….***सकाळी लवकर उठून पुजाची व स्वत:ची तयारी आटोपून स्नेहा तयार होती….
विवेक तयार होवून आला व ते तीघे सिंधूताईंचा अस्थिकलश घेऊन निघाले….
विवेक ने गाडी बाहेर काढली
” ड्रायव्हर ?” स्नेहाच्या चेहर्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते…
“तो नेमका आजारी पडलाय !”
“तू चालवशील गाडी, इतक्या लांब ?”
“हो त्यात काय ?”
नाशिकला अस्थी विसर्जन झाल्यानंतर थोडा वेळ फेर फटका मारून सायंकाळी विवेक व स्नेहाचा परतीचा प्रवास सुरू झाला….
इगतपुरी जवळ महामार्गावरील हॉटेल दिसताच विवेकने गाडी वळवली…
स्नेहाच्या प्रश्नार्थक मुद्रेकडे दुर्लक्ष करीत “चला, काहीतरी खाऊन घेऊ“
मध्ये गेल्यावर त्याने पुजा व स्नेहासाठी खाण्याची ऑर्डर तर स्वत:साठी पिण्याची ऑर्डर दिली
” अच्छा, ह्या साठी गाडी थांबवलीस, आत्याच्या अर्थी गोदावरीत अजून पूर्ण बुडल्या नसतील तेव्हढ्यात तू आपला ग्लासांत बुडायला लागलास !” स्नेहा पोटतिडकीने बोलत होती,….
“दहा दिवसांत मला वाटले होते की आता तरी तू सुधारशील, सख्या आईचा जीव घेणाऱ्या ह्या विषाला तू स्पर्श करणार नाहीस, आता अजून काय बाकी राहिले आहे ? एक दिवस पुजाला व मलाही ह्याच ग्लासात बुडवून गिळून जा !”
तिच्याच्याने पुढे बोलवेना…. खाण्याचे पदार्थ टेबलावर आलेले असूनही, पुजाचा हात धरून तीला जवळजवळ फरफटत नेत ती गाडी जवळ आली… एका वेटरकडून गाडीची चावी मागवून घेत सरळ गाडीतच जाऊन बसली….
विवेक तासाभरा नंतर आरामात स्वत:चा कार्यक्रम आटपून डुलत डुलत गाडीत येऊन बसला. येतांना छोटी कोकची बाटली तीला त्याच्या हातात दिसली…
”स्नेहा, मला तुला काही सांगायचे आहे.”…
“काय बाकी आहे ?”..
“आई गेल्यापासून मी मद्याला शिवलोही नाही, अर्थी विसर्जना नंतर मी शेवटचे मद्य घेऊन मग कायमचे हे विष सोडेन असे ठरवलेलेच होते”…
“सुरू करायला मुहूर्त शोधला नाही; बंद करायला निमित्त का हवे… असेच असेल तर पुढे परत सुरू करायला वेळ थोडी लागणार ?” स्नेहाचा विवेकवर आता कवडीचाही विश्वास नव्हता….
” हे काय आहे हातात तुझ्या ?”
“नथिंग यार, इटस् द लास्ट वन….. वन फॉर द रोड.”
“हे तरी शेवटचे का ?”
“पुजाची शपत्थ…” करीत त्याने गळ्याला हात लावला….
“बाबा हळू चालव ना….” ह्या पुजाच्या वाक्याने स्नेहा ग्लानीतून जागी झाली… सकाळी लवकर उठल्याने तीचा मागच्या सिटवर बसल्या बसल्या डोळा लागला होता. तीला सर्व प्रथम जाणीव झाली ती, गाडी अतिशय वेगात घाट उतरत आहे ह्याची….
“विवेक, आर यु इन युवर सेन्सेस”
“ऑफकोर्स डियर” म्हणत त्याने अजून एका ट्रकला मागे टाकले…
वळणांवर तो थोडाही वेग कमी करीत नसल्याचे स्नेहाला जाणवत होते…
“विवेक प्लिज, जरा हळू चालव पाहू….”
“काही होत नाही…”ह्या वाक्या बरोबरच अजून एक ट्रक मागे टाकला…. आणी अचानक समोरच गायींचा मोठा कळप पाहून स्नेहाला ब्रह्मांड आठवले….
जोरांत ओरडत व डोळे बंद करीत ती खाली वाकली त्यामुळे तीला पुढे काय झाले ते कळलेच नाही…
पुजा कळण्याच्या मानाने लहान होती….
विवेक कळण्याच्या पलीकडे गेलेला होता….
काही क्षण आपण हवेत गटांगळ्या खातोय असेच तीला वाटत होते…. व नंतर ती सर्व भावनांच्या पार गेलेली होती.
***
सकाळी पेपरमध्ये बातमी होती… ” शहरातले नावाजलेले उद्योजक श्री. कुबल ह्यांचे जावई विवेक, मुलगी पुजा व पत्नी स्नेहाचा भिषण मोटार अपघातात मृत्यू !”
***
फोन वाजल्यावर उमंग ने फोन घेतला, “येस ?…..” बऱ्याच वेळ तो निःशब्द होता… मग हळूच त्याने फोन ठेवला. आधी अपघात, मग दाखल केले आहे व मग मृत्यू अश्या रितीने नानांना ही बातमी द्यावी लागणार हे तो जाणून होता.
नानांच्या खोलीकडे तो वळला… आणी आत जाताच नाना छातीवर एक हात ठेवून एका हातात फोन ह्या अवस्थेत खाली कोसळलेले त्याला दिसले ….
***
“वन फॉर द रोड” चा हा दुनियेतला कितवा बळी होता देव जाणे !!!
संपूर्ण !
ही कथा माझ्या आयुष्यात लिहीलेली पहिली कथा आहे. मनोगतावर जुलै २००५ च्या सुमारास ही प्रकाशीत केली होती. सुरूवातीच्या ३ भागांना मिळालेले प्रतिसाद व वाचकांनी अचानक चौथ्या व शेवटच्या भागाला प्रतिसाद का दिले नाहीत हे शोधून काढाण्याचा प्रयत्न केला तेव्हा कळले की हा दु:खद शेवट वाचकांना फारसा आवडला नव्हता. ज्यांनी प्रतिसाद दिले त्यांनीही त्यात स्पष्टपणे तसे नमुद केले होते…….
मग हा खालील खुलासा करणे मला भाग पडले – तो येथे देत आहे कारण ब्लॉगवर त्वरित प्रतिसाद देऊन स्पष्टीकरण देणे शक्यच होणार नाही….
नकोसा शेवट !
माझ्या भावना आपल्या सर्वांहून वेगळ्या नाहीत ! शेवटचा भाग लिहिताना हा असा शेवट करायला नको असे राहून राहून वाटत होते पण त्यामुळे कथेशी प्रामाणिक राहिल्याचे समाधान मिळाले नसते.
विवेक हे एक कथेतले पात्र आहे, तर ‘वन फॉर द रोड’ ही एक प्रवृत्ती ! सुखी शेवटच द्यायचा असता तर अस्थिविसर्जना नंतर परतून येताना विवेकला हॉटेल मध्ये बसून दारू ढोसताना दाखवलेच नसते व त्या ऐवजी शेवट एक गुलाबी करता आला असता…..
कोणत्याही लेखकाला स्वतःच्या कथेचा दुःखद शेवट हा क्लेशकारकच असतो व नेहमीच सुखांत कथा मन जिंकून जातात पण मग वाचकांना प्रवृत्ती कश्या अनुभवायला मिळतील ?
माझेही मन ह्या शेवटाला ‘नकोसा शेवटच’ म्हणत राहील परंतू माझा नाईलाज होता-
धन्यवाद !
सौ.पाटेकर चित्ररेखा [आई] said
श्री.माधव कुळ्कर्णी, वन फ़ॊर द रोड ही शब्दांकुरे मधली कथा मी वाचली.वाचकाला पुढे काय पुढे काय अशी उत्कंठा लावणारी कथा आहे. कथेचा शेवट दु:खद असला तरी मनोवेध घेणारा आहे.विचार करायला लावणारा आहे.कथेत वास्तवाचे चित्रण आले आहे.प्रत्यक्ष घटना समोर घड्ते आहे असा प्रत्यय येतो आहे.कथालेखन दर्जेदार आहे.
वाचकाला खिळवून ठेवणारी कथा.
Abhijit said
कथा एकदम कसदार आहे. प्रत्येक कथेला केवळ सुखान्त असावा असे मला वाटत नाही. म्हणून प्रस्तुत कथेचा शेवट मला आवडला. खरा वाटतो. कथेतील पात्र आणि घटना अगदी रोजच्या जीवनातल्या आहेत, त्यामुळे कथा मनावर पकड घेते. नकळत कुठल्यातरी पात्रामध्ये स्वत:ला शोधू लागतो.
ही कथा दिवाळी अंकात वगैरे दे ना! मस्त प्रतिसाद मिळेल.:-)
Vijay said
तसे नसावे. गुलजारच्या चित्रपटाप्रमाणे कथेचा शेवट मॄत्यूत होतो. कथा इतर दिशेने गेली असती तर बरे झाले असते.