वन फॉर द………

ह्या कथेतील सर्व प्रसंग, पात्रे व स्थळे पूर्णता काल्पनिक आहेत.
विवेक हा एक अतिशय गरीब घरचा मुलगा होता.अगदी लहानपणीच वडिलांचे पितृछत्र हरवले. वडिलांच्या पश्चात घरोघरी जाऊन स्वयंपाक करणाऱ्या आपल्या स्वाभिमानी आईला संसार चालवण्यास मदत व्हावी म्हणून विवेक लहानपणीच घरोघरी देवपूजेची कामें करायला लागला.
सकाळी ७ च्या सुमारास जिवाची कामे आटपून तो ३/४ घरी जाऊन देवपूजा करायचा. वेळ वाया जाऊ नये म्हणून मधल्या वेळेत अभ्यास करी.
हे करीत असतानाच हळू हळू त्याचे शालेय शिक्षण सुरू होते. स्वत:च्या शाळेची फी, वह्या पुस्तकांचा व गणवेशाचा वगैरे खर्च ह्यातून भागायचा व आईला संसाराचा गाडा हाकायला तेव्हढीच मदत व्हायची. त्याच्या ह्या प्रयत्नांचे सर्वांनाच कौतुक वाटायचे.
शाळेतला एक होतकरू विद्यार्थी तसेच आज्ञाधारक म्हणून शिक्षकांचा त्याच्यावर लोभ होता त्यातच वडील हयात नसल्या कारणाने शाळेतल्या शिपाया पासून मुख्याध्यापकांपर्यंत सर्वांनाच त्याच्याबद्दल ममत्व होते. परंतू कधीही विवेकने ह्या भावनांचा सवलती म्हणून फायदा उचलला नव्हता.
आपल्या आई प्रमाणेच स्वाभिमानी असणारा विवेक कधी शिक्षकांच्या घरी अडचणी विचारायला गेला तरी तेथे देऊ केलेला चहा किंवा फराळ विनम्रपणे काहीतरी कारणे सांगून टाळायचा.
प्रामाणिक असल्या कारणाने विवेकच्या आईला- सिंधूताईंना- कुबलांकडे चांगला मान मिळायचा. त्या तेथे पोळ्यांची कामे करींत. कुबल शहरांतले एक नावाजलेले उद्योगपती होते. एका मोठ्या इंजिनियरींग फर्म चे मालक असूनही अत्यंत देवभोळा, पापभीरू व साधा माणूस म्हणून कुबलांची ख्याती होती.
सौ. कुबल पण एक मध्यमवर्गीय कुटुंबातून ह्या घरी आल्या होत्या त्यामुळे गरीब घरच्या परिस्थितीची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांनी नेहमीच सिंधुताईंना घरच्या सदस्या प्रमाणेच वागवले. कुबलसाहेबांच्या आईच्या आजारपणात केलेली सिंधुताईंची मदत त्या कधीही विसरू शकत नव्हत्या.

कुबलांचा कामाचा व्याप जसं जसा वाढु लागला तसं तसा त्यांचे सकाळच्या देवपूजेकडे नियमित दुर्लक्ष होवू लागले. त्यावर तोडगा व थोडी स्वाभिमानी सिंधुताईंना मदत म्हणून सौ. कुबलांनी विवेकला देवपूजेला येण्यास सांगीतले. विवेकचे सकाळचे देवपूजेचे एक काम सुटल्याने त्यालाही आवश्यकत: होतीच. विवेकचा कुबलांच्या बंगल्यातला प्रवेश अश्या रितीने झाला.
कुबलांना एक मुलगा व एक मुलगी होती. मुलगा- उमंग- विवेकच्या वयाचाच म्हणजे ६वीत होता तर मुलगी -स्नेहा- ३री त होती. उमंग अत्यंत चाणाक्ष व हुशार विद्यार्थी होता व शाळेत नेहमीच वरच्या वर्गांत उत्तीर्ण व्हायचा. स्नेहा अभ्यासात यथा-तथाच होती. विवेक व उमंगची समवयस्क असल्याने चांगली गट्टी जमली.
विवेकचा नांवाप्रमाणेच विवेकी स्वभाव कुबल दाम्पत्याला अतिशय आवडायचा. लहान वयातही त्याला आलेला समज व स्वाभिमानाचे दोघांनाही कौतुक वाटायचे. एकदा सौ. कुबल उमंगचे काही जुने कपडे विवेकला द्यायला निघणार एव्हढ्यात कुबलांनी त्यांना रोखले….
“तो मुलगा व त्याची आई स्वाभिमानी आहेत, आपण त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा” साहेबांचे म्हणणे पटल्याने सौ. कुबलांनीही नंतर तसा प्रयत्न केला नाही. कुबल साहेबांनी विवेकच्या स्वाभिमानाचाच नव्हे तर प्रामाणिक पणाचाही प्रत्यय अनेकदा घेतला होता.

दिवसांमागून दिवस जात होते. कुबलांकडील विवेकचा वावर सहाजिकच वाढला होता. त्यातच दहावीच्या अभ्यासासाठी सौ. कुबलांनी विवेक व उमंगने एकत्र अभ्यास करावा असे सुचवले. शांतपणे अभ्यास करायला मिळेल म्हणून विवेकने लगेच होकार दिला.
विवेक व उमंगचा दहावीचा अभ्यास उमंगच्या खोलीत सुरू झाला. दहावीत दोघेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर दोघांचे रस्ते वेगळे झाले. उमंगला जीवशास्त्रात जास्त गोडी होती तर विवेकला अभियांत्रिकी विषयांत रस होता.
उमंग डॉक्टर व्हायची स्वप्ने बघायचा. विवेकला डॉक्टर होणे परवडणारे नव्हते. उमंगने बारावी नंतर वैद्यक शास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले होते तर प्रथम पदविका व नोकरी करून पदवी करायचा निर्णय विवेकला घेणे भाग पडले. दोघा मित्रांच्या वाटा वेगवेगळ्या असल्या तरी उद्दीष्ठ्य एकच – उच्च शिक्षणाचे !
इतकी वर्षे काटकसरीने जमा केलेला पैसा सिंधुताईंनी मुलाच्या कामी आणण्याचे ठरवले होते. नादारी साठी अर्ज विनंत्या करून सिंधुताईंनी सरकार कडून विवेकच्या अभियांत्रिकी पदविके च्या अभ्यासक्रमाचा खर्च कमी तर करवून घेतला होता परंतू कॉलेजचा इतर खर्च व पुस्तकांचा खर्च त्यांना व विवेकलाच उचलावा लागणार होता.
स्वत:च्या मुलाला शिक्षणात काहीही कमी पडू नये म्हणून दोन तीन घरची जास्तीची कामे करायला त्यांनी सुरुवात केली. येथे विवेकनेही कुबल साहेबांना विनंती करून त्यांच्या फॅक्टरीत अर्धवेळ काम मागून घेतले.
सकाळी कॉलेज, दुपारी अभ्यास व सायं ६ ते १० काम असा दिनक्रम झाल्याने त्याची पूजेची कामे सहाजिकच बंद पडली. परंतू कुबल साहेबांच्या कृपेने त्याला त्याचा स्वत:चा हातखर्च वगैरे काढता आला.

विवेक व उमंग ह्यांच्यातली मैत्री जरी टिकून होती, तरी बालसुलभ भावनांतला निखळपणा हळूहळू कमी होत होता. अभ्यासांचे विषय वेगळे, कॉलेजचे वातावरण वेगळे व महत्वाची गोष्ट म्हणजे कॉलेज मधील मित्र मंडळी वेगळी !
दोघांनाही दिवसभराच्या रगाड्यातून फक्त रविवार मिळायचा – उमंग कधी कॉलेज च्या टिमकडून क्रिकेट तर कधी मित्रांबरोबर सहल, सिनेमा वगैरे मध्ये व्यस्त झाला. तर अर्धवेळ कामात रगडला गेलेला विवेक घरी आराम, वाचन किंवा राहिलेला अभ्यास भरून काढण्यात सुट्टी घालवायचा.
दोन वर्ष भराभर निघून गेली. बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या उमंगला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला…. आणी उरली सुरलेली दोघांची मैत्री जवळपास तुटली. भांडण वगैरे नाही झाले पण दोघे एकत्र आले की त्यांच्या जवळ आपापसात बोलायला विषयच नसायचा !
दहावीत असलेली स्नेहा “पास झाली तर शाळेचे नशीब !” असं गमतीने सौ. कुबल म्हणायच्या – उमंग तर बहिणीच्या अभ्यासाकडे सरळ दुर्लक्ष करायचा. कुबल साहेबांना सकाळी फक्त नाश्त्याला तर रात्री फक्त जेवायला घरी वेळ मिळायचा.

आणी एक दिवस स्नेहाच्या शाळेतून पालकांपैकी एकाला बोलावणे आले – मनाशी अस्वस्थ होत कुबल साहेब शाळेत पोहचले. वर्ग शिक्षकांना भेटल्यावर ते कुबलांना प्राचार्यांकडे घेऊन गेले. तेथे कुबलांसारखी काही पालक मंडळी बसलेली होती.
प्राचार्यांच्या बोलण्यावरून कळले की जी मुले अभ्यासात यथा तथा आहेत त्यांना आवश्यकता पडल्यास दहावीच्या परीक्षेला बसू दिले जाणार नाही. अत्यंत उद्विग्न अवस्थेत कुबल फॅक्टरी ऐवजी घरी जायला निघाले…….

एक उत्तर दें

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s

%d bloggers like this: