Archive for अनुभवांचे बोल !

पिवळा दिवा-

नुकतीच घडलेली घटना-
नेहमीच्या घाई गडबडीत दुचाकीवरून कामे साधत भटकंती सुरू होती….
दादरला सेना भवनचा वाहतूक नियंत्रक दिवा ओलांडून पोर्तुगीज चर्च कडे आगेकुच करीत होतो…. जुन्या कंपनीत नोकरी करताना हा रोजचा रस्ता असायचा… ह्या आठवणी मनात आणत पुढे सरकत होतो इतक्यात सुश्रुषा हॉस्पिटलच्या चौका जवळचा दिवा हिरव्याचा पिवळा होताना बघीतला….
पटकन पुढे निघून जावू ह्या मनात आलेल्या चोरट्या भावनेने विचारांना जिंकले व मी तो दिवा पिवळ्याचा लाल होण्या आधीच चौक पार केला….
तसे बघायला गेल्यास हे असे मी कधी कधी केलेही असेन – व ही काही पहिलीच वेळ नव्हती….
झाडाखाली फटफटीवर ठाण मांडून बसलेल्या साहेबांनी आपल्या सहकाऱ्यामार्फत थांबण्याचा इशारा केला….. मनोमन साहेबांच्या सात पिढ्यांचा उद्धार करीत मी दुचाकी बाजूला घेतली… नशीब डोक्यावर शिरस्त्राण (लोखंडी टक्कल) होतेच.
सविनय पणाचा आव आणत दुचाकी बरोबर एका कोपऱ्यात साईड स्टॅंडला लावली व चालत साहेबांकडे येत असतानाच परवाना काढण्यासाठी मागच्या खिशातले पाकीट काढले…
रस्त्यात ५०० रुपयाची नोट सापडल्यासारखे हसू चेहऱ्यावर आणत साहेबांना खास आवाजात व एक हात उंचावून मराठमोळा नमस्कार केला.
साहेब चांगलेच खत्रुट वाटत होते – नमस्काराचे प्रत्युत्तर तर सोडाच साधे लक्षही देण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. जेव्हा खात्याचे सौजन्य सप्ताह कसा पाळावा ह्यावरचे प्रशिक्षण दिले जात होते तेव्हा बहूदा ते त्या वर्गाला गैरहजर राहिले असावेत अशी शंका डोक्यात आली.

भारीतला रे~बॅन चा सोनेरी दांड्यांचा काळा चष्मा, फटफटीवर विसावलेल्या हाताच्या बोटांतल्या चमकत्या अंगठ्या साहेबांच्या सुखवास्तू पणाची साक्ष देत होत्या.
“नंबर प्लेट बदलून घ्यावा – मऱ्हाटीत न्हाय चालायची” साहेब लोकं सगळं बदलतील पण आपली गावरान भाषा नाही बदलायचे !
“बरं साहेब” इतकेच बोलून मी हातातले परवाना पत्र न मागता त्यांच्या समोर धरले.
“ह्या वेळी वॉर्नींगवर सोडा साहेब, लगेच बदलून घेईन नंबर” मी काकूळतीला येऊन बोललो…
“त्यासाठी न्हाई थांबवले, तुमी सिग्नल जम्प केलाय” साहेब गुरगुरले.
मी अवाक झाल्याचा आविर्भाव चेहऱ्यावर आणला व म्हणालो ” पण तो तर पिवळा होता तेव्हा”
“मग काय झालं ? पिवळा होता म्हंजी स्पीड कमी करायचा हा रुल हाय हे माहित हाय का तुमाला ?” साहेबाने आता कायद्यावर बोट ठेवले.

मी गप्प बसून १०० रुपयांची पावती फाडून परवाना बटव्यात टाकून निघायला वळलो…
“ह्या पुढे लाइफ मध्ये लक्षात ठेवा- पिवळा दिवा दिसला की स्पीडवर कन्ट्रोल करायचा” सल्ला देण्याच्या आवाजात साहेब गुरगुरला.
“हो आठवण करून दिल्याबद्दल व सरकारी तिजोरीत १०० रुपये जमा करवून घेतल्याबद्दल आभारी आहे” असा तिरकस टोमणा साहेबाला मारून मी कामावर जायला परत निघालो.
**************************************

ह्या घटनेला चांगला महिना उलटला असेल…
एका क्लायंट कडे ब्रेकडाउन दुरूस्ती करताना एका रुग्णाशी चाललेले त्यांचे संभाषण कानावर पडले.
विषय होता तेलकट तिखट खाण्याचा व आतड्यांवर त्याच्या झालेल्या परिणामांचा.
हे साहेब हिंदीत सांगत होते – ” याद रखीये इसके आगे आप जितना तिखा, तला हुआ खाएंगे वो आपके लिये जहर के समान होगा. यह समजीये की सिग्नल की लाल बत्ती आपको दिखी है और आपकी गाडी अभी उधरही खडी करनी है आपको”
रुग्ण गेल्यावर मला म्हणतात “अरे हा रिक्षावाला होता. जेवणाच्या वेळा पाळत नाहीत, बाहेरचे अरबट चरबट खातात, मग बहूतेकदा पोटाच्या तक्रारी घेऊन येतात”

पण तोवर मला माझ्याकडून सिग्नलला १०० रुपये वसूल करणारे रे~बॅन वाले साहेब आठवले होते.

खरचं जिवनांतल्या एखाद्या क्षणी पिवळा दिवा बघून;  योग्य तो इशारा आपण त्यापासून घेतल्यास लाल दिव्याची भिती कधी आपणांस वाटणारच नाही…..

टिप्पणी करे

नोकरी – एक प्रवास

अभियांत्रिकी विद्यालयाची शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्या झाल्या जळगांवला ओळखीने एका छोट्या इंजिनियरिंग फर्म मध्ये सर्व्हिस इंजि. ची तात्पुरती नोकरी मिळाली. बरोबरीचे बरेचसे मित्र मुंबईचे होते. त्यांनी परीक्षा झाल्या झाल्याच घरच्या वाटा धरलेल्या होत्या. भुसावळसारख्या गावात ‘टाईम्स’ दुपारच्या गाडीने येई. संध्याकाळी घरी जाताना रेल्वेच्या वाचनालयात जाऊन नोकरीच्या संधी चाळत बसायचा उद्योग मागे लागला! – एका महिन्यातच १०/१२ ठिकाणी दगड टाकले होते (खडे लहान वाटतात) त्यातले काही भिरभिरत लागले मुंबईतच व एका मुहूर्तावर, ४ दिवसांत येतो असा निरोप जळगांवला कळवून सटकलो !

जूनच्या २० ला एक मुलाखत होती…. ती यथातथाच गेली. जुलैच्या ५ ला दुसरी होती – मुंबई सेंट्रलला मराठा मंदिरच्या मागेच वाय.एम. सी.ए.च्या प्रशस्त कॉन्फ़रन्स हॉल मध्ये मुलाखतीला बोलावले होते. एक प्रेमळ आजोबां सारखा दिसणारा,मराठी बोलणारा पण मद्रासी माणूस; त्याच्या बाजूला एक जपानी माणूस व शेवटी त्या जपान्या इतकाच बुटका पण हिटलर टाइपच्या मिशा व चेहरा असलेला एक मानव म्हणण्यासारखा प्राणी बसलेला होता. माझी मुलाखत सुरू होण्या आधी एका टिपटाप दिसणाऱ्या तरूण व हसतमुख चेहऱ्याच्या मुलाने (मुलीने नाही…. दुर्दैव!) मुलाखतीला आलेल्यांचे स्वागत केले.

– मला एक समजत नाही; इंजिनियर्स चे व मुलींचे जन्मता वाकडे असते का ? महाविद्यालयात सगळीकडे रखरखीत वाळवंट… खाजगी महाविद्यालयांना परवानगी मिळाल्यानंतर आमची प्रथम बॅच – आमच्या बॅचमधील ३ कोर्सना मिळून १९८ मुलांमागे फक्त ४ मूली – त्यातल्या दोघी अगदी बाळबोध वळणाच्या व लता मंगेशकर टाइप दोन वेण्या घालणाऱ्या. उरलेल्या दोघींपैकी एक बोदवड गावाहून, वेळ मिळाला की यायची…. ती तशी दिसायला बरी होती पण ड्फ्फर असावी…. पहिल्या वर्षी तिला मिळाला डच्चू; तो तीच्या वाडवडिलांना पचनी न पडल्याने तिचे नांवच काढून टाकले कॉलेजमधून – आम्हीही म्हटले जाऊ द्या – नाहीतरी आठवड्यातले दोन दिवस येणार त्यासाठी उरलेले ४ दिवस कोण डोकं पिकवेल ? चौथी होती केरळची -दिवसां दिसली असती उजेडात; मावळतीला कठीण परिस्थिती झाली असती- हे सर्व बघून महाविद्यालय म्हणजे हिरवळ व त्यावर बागडणारी फुलपाखरे हे समीकरण माझ्या गांवी कधीच नव्हते…… कॉलेजच्या एका बाजूला झेड.टी.एस. म्हणजे रेल्वेचे प्रशिक्षण केंद्र- दुसरीकडे आर.पी. डी. म्हणजे मिल्ट्रीवाल्यांचा कसलातरी डेपो. मागे विस्तीर्ण शेते व रेल्वे यार्ड तर चौथ्या बाजूला रेल्वेची खांडव्याला जाणारी रेल्वेलाइन-लाइन मारायची ती कोणावर हा एक प्रश्नच होता…असो..

    ‘विश्वनाथ’ नांव कळले त्या हसतमुख चेहऱ्याच्या मुलाचे – बघता क्षणी आवडेल असे व्यक्तिमत्त्व – त्याला बघून मुलाखतीचे दडपण जरा कमी झालेले. माझा स्वाक्षरी केलेला फॉर्म हातात पडल्यावर त्याने मराठीत काहीतरी विचारले – मग उरला सूरलेला फॉर्मलपणा नाहीसा झाला…. खाजगीत विचारावे अश्या सुरात ‘किती जण येऊन गेले’ हा प्रश्न भीत भीत (त्याला नाही – संख्येला) मी विचारला – ‘अजून चालू झाले नाहीत इंटरव्ह्यूज्’ ….. मी खूश ! आजूबाजूला काही हुशार काही ड्फ्फर चेहरे….एक-दोघे बोलबच्चन – ते सगळी कडून पिटून आलेले मोहरे असावेत-बोलण्यावरून दोनचार ठिकाणच्या नोकऱ्या त्यांनी नाकारल्याचे जाणवत होते. माझे टेन्शन परत वर जायला लागले – एकतर मराठी मीडियमचा पोऱ्या, त्यात भुसावळ सारख्या गांवातला ! नशीब ‘विश्वनाथ’ च्या जागी फाकडू पोरगी नव्हती नाही तर तिला इम्प्रेस करून करून त्यांनी माझ्यासारख्यांची फ्या..फ्या च उडवली असती.

विचारांच्या तंद्रीत असताना खांद्याला हलकासा स्पर्श जाणवला… तो मुलगा मला आंत जायला खुणावत होता…. धीरगंभीर चेहऱ्याने मी धीर न सोडता मध्ये गेलो. – ‘बस !’ आजोबा चक्क मराठीत बोलले ! पुढे एक एक करीत ‘हिटलर’ प्रश्न विचारत होता…… एकाही प्रश्नावर गाडी अडकली नव्हती व ‘कळीचा’ प्रश्न धाडकन समोर आला – ज्या प्रॉडक्ट्स मध्ये ती कंपनी काम करीत होती तिच्यावर आधारीत उत्पादने मी जळगांवला हाताळलेली होती. त्या प्रश्नाचे विचारपूर्वक उत्तर दिल्यावर ‘हिटलर’ जरा मवाळला…. “व्हेन वुड यू लाइक टू जॉईन ?” “टुडे ?” माझ्या उत्तरावर जपानी खळखळून हसला- “रहोगे कहाँ ?” हिट्लर ! “मामा है मेरा-वो पार्लामे रेहता है ।” बहुदा हिटलराला भारतातल्या पोरांच्या बेकारीचे प्रदर्शन जपान्यापुढे करायचे नसावे….. “ठीक है; बाहर जाकर बैठो !”……. मी बाहेर !

दोन चार पोरं मध्ये जाऊन फटाफट परत आली.. एक बोलबच्चन मध्ये गेला तो बराच वेळ अडकलेला होता…. दुसरा ‘विश्वनाथ’ वर फणफणायला लागला. मी ‘विश्वनाथ’ला ‘जरा जाऊन येतो’ म्हटलं व जिन्याकडे सरकलो “मी.कुळकर्णी; ह्या बाजूला-” करीत त्याने बाथरुमची वाट दाखवायचा प्रयत्न केला – पण माझ्या हातातले सिगारेटचे पाकीट त्याला दाखवत मी आलोच चा इशारा करीत सटकलो व दोन मिनिटांतच परतलो – दुसरा बोलबच्चन मध्ये होता. 

……थोड्या वेळाने विश्वनाथ मध्ये जाऊन आला… आल्यावर त्याच्या हातात एक व्हिजीटींग कार्ड होते. माझ्या हातात ते कार्ड कोंबून त्याने “उद्या ह्या पत्त्यावर सकाळी ९.३० ला या” असे मोघम सांगितले – कार्ड घेऊन मी रेंगाळतच खाली जायला निघालो….

नोकरी मिळाली की नाही हे कळलेलेच नव्हते! कार्डावर निळ्या अक्षरांत “जे. मित्रा & ब्र. प्रा.लि.”हा मुलाखत पत्रावरचाच ठसा व पी. सुब्रमण्यम – मॅनेजर ऍडमिनीसीस्ट्रेशन – हे नांव!! नांव, चेहरा व हुद्द्यावरून आजोबांचे हे कार्ड असावे असे ताडले. कवळी बिल्डिंग, एस.के.बोले रोड- दादर प.- बॉम्बे २८ असा पत्ता !!! संभ्रमातच मामीला काय उत्तर द्यायचे ह्याचा विचार करीत मी मुंबई सेंट्रल स्टेशन ची वाट धरली –
**********************************

गाडीत बसल्यावर अचानक ट्यूब पेटली – रिटर्न तिकीट आहेच तर दादरला उतरून जागा बघून घेऊ म्हणजे सकाळी गडबडीत उशीर झाला तरी शोधण्यात वेळ जाऊ नये. कबूतर खाना ते पोर्तुगीज चर्च च्या रस्त्यावर मधोमध ही बिल्डिंग असल्याचे विश्वनाथ बोलल्याचे आठवत होतं. चालतच शोध घेता घेता शेवटी एकदाची दुमजली इमारत सापडली – शुद्ध चाळं !….- आधी विश्वासच बसेना – आपण नोकरीची स्वप्न पाहतो तेंव्हा आपले कार्यालय, तेथील वातावरण, आजू बाजूचे वातावरण हे सगळे कसे चित्रासारखे डोळ्यासमोर उभे राहते- जो बँकेत नोकरीस लागतो त्याच्या नजरेसमोर बँकेचे चित्र, जो इस्पितळात नोकरी धरतो त्याच्या नजरेसमोर ते चित्र….. मी एखाद्या बऱ्यापैकी सर्व्हिस इंडस्ट्रीचे स्वप्न मनांत बाळगलेले होते. – पहिल्या मजल्यावर जाणारा जिना चढत – मनांत म्हटले, ‘अजून कुठे आपल्याला नक्की माहित आहे की, ह्याच कार्यालयात आपल्याला नोकरी करायचीय ?’ परत फिरलो….. घरी मामींनी विचारले ‘काय झाले ?”उद्या  2nd Interview घेतील बहुतेक.’ मी उगीचच भाव खाल्ला ! ‘दोनदोन-तीनतीन वेळा बोलावतात मेले, एकदा काय ते विचारून आटोपून टाकायचे !’ मामींचा सात्त्विक संताप उफाळून आला.

दुसऱ्या दिवशी कालचेच कपडे न घालता वेगळा ड्रेस चढवून मी निघालो. जागा पाहून ठेवलेली त्यामुळे प्रॉब्लेम झालाच नाही. गेल्यावर अजून एक धक्का….. जागेला टाळे ! मी कपाळावर हात मारला! शेजारची लहान मुले उघडी नागडी फिरत होती…. बायका मंडळींचा टिपीकल चाळीतल्या सारखा आरडा ओरडा चालू होता… मध्येच एक माणूस गॅलरीत येऊन पचकन खाली थुंकून परत घरात जायचा…. ज्या गाळ्यात हे ऑफिस (?) होते तो गाळा जिन्याला लागूनच होता; जिन्यावरून अर्ध्या चड्डीत वर-खाली करणारी काही पुरूष मंडळी अगदी नमुनेदार बेवडी दिसत होती…. तेव्हढ्यात ‘आजोबा’ आले. त्यांच्या तुरुतुरु चालीवरून त्यांना यायला उशीर झाला असावा हे कळतच होते. वर आल्या आल्या अगदी जुन्या ओळखीचे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पसरले. चाव्यांचा एक जुडगा माझ्याकडे देत- व बंद दाराच्या शटर कडे बोट दाखवत त्यांनी मला कुलूप उघडण्याची खूण केली……. व माझ्या पहिल्या नोकरीचा प्रथम दिवस – दुकानासारखे दिसणारे ऑफिसचे शटर वर उघडून झाला !

तसे म्हटल्यास मी जळगांवला नोकरी वजा काम करीत होतोच; पण जेथे जायचो त्या गृहस्थांनी पगार वगैरे अश्या फॉर्मल गोष्टी कधी केल्याच नाहीत. रेल्वेचा पास काढून द्यायचे – अधून मधून खर्चाला पैसे द्यायचे; मन लावून काम शिकवायचे (हेच माझ्यासाठी महत्त्वाचे होते) व आपुलकीने वागायचे. ‘इंस्टकॉन इंजिनियर्स’ हे काही जळगावातले मोठं खटलं नव्हतं, पण माझ्या सारख्या कित्येक गरजूंना व्यवस्थित मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे पुण्य त्यांनी पदरांत सामावून घेतलेले होते. ह्या दुकान वजा ऑफिसचे शटर वर करताना मला माहितही नव्हते की, जळगावात त्यांच्या कडे दुरुस्त केलेली काही इक्वीपमेंट्स माझ्या व्यावसायिक जीवनाची कवाडे सताड उघडी करतील.

सुब्रमण्यम साहेबांचे वय वाटत होते त्याहून बरेच कमी होते. हार्डली ४५चे ते गृहस्थ जरा पोक्त वाटत म्हणून मी मनांतल्या मनांत त्यांना आजोबा ठरवून मोकळा झालो होतो. गप्पा सुरू झाल्या…. श्री. सुब्रमण्यम साहेब दिल्लीला असत. माटुंग्यात त्यांचे आतापर्यंतचे आयुष्य गेलेले. विश्वनाथन हा त्यांच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा ! काही कामासाठी बाहेर गेलेला होता तो तासाभरात येणार होता. आधीचे ऑफिस वरळीला होते ते मित्रा साहेबांच्या जावयाने लाटले – म्हणून ही व्यवस्था तातडीने व तात्पुरती करावी लागलेली होती. हिटलरचे खरे नांव ‘पवन’ आहे व तोच माझा डायरेक्ट बॉस असणार होता – सर्व्हिस मॅनेजर ! मी मोठा आवंढा गिळला….. मनात म्हटले ह्या तुफानाचे नांव पवन कोणी ठेवले असावे ? माझ्या बरोबर अजून एकाची नियुक्ती झालेली होती – त्याचे नांव प्रसाद कुळकर्णी होते – तो येण्यातच होता….. विश्वनाथन वर तणफण करणारा दुसरा बोलबच्चन अवतरला- माहित नाही का….. पण ज्याच्याशी पहिल्या भेटीत माझे सुर जुळत नाहीत त्याच्याशी जन्मभर ते तसेच राहतात. आमच्या दोघांच्या नशिबाने त्याने दीड महिन्यातच कंपनी सोडली ! माझा पगार रुपये ९००/- ठरवण्यात आलेला होता – व ८ जुलैला मला प्रशिक्षणासाठी दिल्लीला प्रस्थान करायचे होते…… ह्या सगळ्या गप्पा मारीत सुब्रमण्यम साहेबांनी तीनदा चहा मागून प्यायले. चहाची गंमत तर न्यारीच होती… टेबलावरचा फोन उचलून ते चहावाल्याला फोन करीत – दहा मिनिटे झाल्यावर परत रिमाइंडर देत – तेंव्हा कुठे चहा येई. तोही स्टीलच्या वाटीत उपड्या ग्लास मध्ये – एकुलता एक. मला गंमत वाटली…. एक चहा – पिणारे सुरुवातीला आम्ही दोघे – नंतर २ चहा – तिघे ! मग ३ मध्ये विश्वनाथ आल्यावर चौघे…. ! पण फोन मात्र ७/८ गेले असतील….

मी व प्रसादने सुब्रमण्यम साहेबांकडूनच पैसे घेऊन मुंबई सेंट्रलला जाऊन राजधानीचे चेअर कारचे तिकीट काढले – तेथेच प्रसादने मला सांगून टाकले- ‘इथला सीन काही ठीक नाही;  मला नाही वाटत मी जास्त दिवस येथे टिकेन’ ‘मग तू त्यांना सांगत का नाहीस ?’ ‘अरे, मला दोन महिन्यांनी जरा बऱ्यापैकी जॉब मिळणार आहे. तोवर टाइम पास होईल’….. जेथे दात आहे तेथे चणे नाही व जेथे चणे आहेत तेथे दात नाहीत !

दिल्लीला प्रथमच जात होतो. पटकन भुसावळला जाऊन उरलेले कपडे घेऊन यावे लागणार होते. विचार करायलाही उसंत मिळत नव्हती. दिल्लीला जायच्या आधी श्री. सुब्रमण्यम कडून प्रॉडक्ट्स ची काही माहिती मिळवली – थोडा अभ्यास केला व प्रशिक्षणासाठी दिल्लीला रवाना झालो….. रात्रभर चेअर कार मध्ये डोळ्याला डोळा लागलेला नव्हता….. एक जीवन – एक प्रवास सुरू केल्याची जाणीव मनात होती, हा प्रवास पूर्ण होईल की नाही त्याची धास्ती मनांत होती !

*************************************

आज जवळपास २० वर्षे झाली. हा अभ्यास, हा प्रवास अजूनही चालूच आहे…. मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या – नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला – नोकरीत काही गमतीदार घटना घडल्या, काही काळजाला घरे पाडणाऱ्या घटना !- कुठे अंगावर शहारे आणणारे अपघात झाले तर दर्शनासारखी पत्नी मिळाली….. नोकरीत सुरू केलेले हे व्यस्त जीवन कुठे जाऊन थांबेल, देव जाणे- पण नोकरीतला तो प्रवास मात्र मनांत कायम घर करून राहिलाय !

श्री. सुब्रमण्यम, श्री.पवन, मॅथ्यु, विशू, अब्राहम (माझा व्यवसाय भागीदार) मिलिंद जोशी इ. माझे जुने सहकारी आजही माझ्या ह्या प्रवासातले सहप्रवासी आहेत हे गेल्या जन्माचे ऋणानुबंध तर नव्हेत ?

टिप्पणी करे

आम्ही नवरे !

दसरा गेला एका भल्या सकाळी मी सौ. ला म्हटलेअग….आता छान पैकी थंडी पडायला सुरुवात होईल तर आपण दोघे सकाळचा फेरफटका मारायला जायचे काय?”
हो, मुलींनाही घेऊन जात जाऊ !” मी कपाळावर हात मारला (मनांतल्या मनात).
मुलींना पण ?” आश्चर्याने माझ्या जबड्याचा आकार माझ्या पोटाइतका वाढला.
त्या उठल्या शोधत बसल्या तर ?”
आपण त्यांना रात्री झोपायच्या आधीच समजावून सांगू की, आम्ही सकाळी फिरायला जाणार आहोत!” मी माझ्या पोटाने धरलेल्या बाळसाची काळजी करीत होतो.
हळूहळू विषयाने वळण घ्यायला सुरुवात केली….माझ्या रात्री उशीरा झोपण्याच्या सवयीवर गोष्ट येऊन ठेपण्यापूर्वीच मला विषयाला वेगळे वळण द्यावे लागणार होते. मी ठेवणीतला बाण भात्यातून बाहेर काढला. “जरा आरशांत बघ किती जाडी होत चालली आहेस ते
छानसं हसून वाकडी मान करून म्हणते कशीतूच तर म्हणतोस ना नवरा खायला घालतोय ते माहेरी कळायला हवे म्हणून ?”
आणी काय रे ? हे सर्व माझ्यासाठी चाललंय की स्वतः:साठी ?”
अग असं कसं म्हणतेस ? आपण दोघेही काय वेगळे आहोत का?” मी भावुक झाल्याचा अभिनय केला.
राहू दे आताथोडा अधिक सेंटी झालास तर रडायला बिडायला लागशील !”

एक दिवस विषय सुरू होता टीव्ही वरच्या वृत्त निवेदिकेचामृदुला जोशी माझी अगदी खास आवडती निवेदिकाती असली की, सर्वच बातम्या मी डोळ्याची पापणी हालवता बघत असतो.
कधी स्वयंपाक खोलीत काम करीत असताना तीच्या कानावर माझेअहाहापडले की ती समजते मृदुला जोशीच बातम्या वाचत असेल.
एकदा चुकून मी भलत्याच्या वेळीअहाहाकेले तर म्हणेडोके ठिकाणावर आहे ना आज ?”
तर विषय होता वृत्त निवेदिकांचा….. मी म्हटलं, “बघ ती कशी टिपटॉप राहते ?”
तिला पैसे मिळतात त्याचेमला द्यावे लागतील !” माझ्या मते ही अगदीच अरसिक होती.
ह्यात पैशांचा काय प्रश्न ?” पण पुढे उत्तर देण्याच्या मन:स्थितीत ती नव्हतीच.
मीही झोपलेल्या वाघिणीला जागे करून वाघ मुझे खा’ म्हणायला तयार नव्हतो.
माझे म्हणणे अगदी मनांवर वगैरे घेऊन (की माझ्याशी वितंडवाद नकोत म्हणून) तिने सामंजस्य करार केला. “आपण दोघेही बारीक होऊया, बस्स ?”
त्या दिवशी देवाचे सोडून तिचे पाय धरायची मला इच्छा झाली…. मी दिवसभर तिला माधुरी, मृदुला, मृणाल (कुळकर्णीच बरं का !) ह्याच्या बाराखडी वाल्या माझ्या आवडीच्या सर्वच्या सर्व नायिकांच्या जागी ठेवून स्वप्ने बघू लागलो.
दिवस कसाबसा गेला, रात्री जरा त्या मानाने जेवणं लवकर आटपून मी संगणक वगैरे कार्यक्रम बाजूला सारून लवकरच झोपायची तयारी करू लागलो. काही आठवणच नसल्याचा अभिनय करीत ती मला म्हणालीसकाळी कुठे ब्रेकडाउन कॉलवर लवकर जायचे आहे का
माझ्या अंगाचा अगदी तीळ तीळ पापडासारखा झाला…. 
दिवसभर कामाच्या रगाड्यात बिचारी विसरून गेली असेल असा सोज्वळ विचार करून मी तिला आठवण करून दिली-
अगं सकाळी आपण लवकर उठायचे ना, फिरायला जायला?”
ओह ! तुझे शूज काढावे लागतील वरूनत्यांची लेस तू आणणार होतास ती आणली का ?”
शाबास ! तू हे मला आता सांगतेस !”
म्हणजे आठवण करून दिली ती चूक माझीच !”
मी आपला जळफळत स्टुल घेऊन बाथरुमवरच्या माळ्यावर डब्बे शोधायला लागलो. एका खोक्यात धुरकट मळकट झालेले काळेपॉवरएकदाचे सापडले…. ‘
हुश्शकरीत खाली काढले, बघतो तर काय एकही नाडी धड नाही. मग ऑफिस शूजची नाडी काढून जेमतेम काम निभावून नेले. जरा नीट धड दिसावेत म्हणून त्यावर ब्रश वगैरे फिरवून बारीक व्हायच्या तयारीला लागलो.
सकाळी कितीचा गजर लावायचा ?” “साडे पाचाचामी निर्विकार पणे बोललो.
उठणार आहेस ना?” तिला विषयाचे माझ्या उत्साहाचे गांभीर्य माहीत नसावे !
म्हणजे काय ?”
म्हणजे उठणार आहेस ना गजर वाजल्यावर ? तर मलाही उठव
माझ्या बरोबर दहा वर्ष काढून आता ती माझ्या तालमीत चांगलीच तयार झालेली दिसत होती. मी कूस वळवून झोपण्याचे नाटक केले.
************
                                                  25-05-20051.gif
माधव, ऊठ…. उठतोयस ना? डॉ. शंकरनचा फोन आहे !”
हम्मगुड मॉर्निंग सर !” “अरे गुड मॉर्निंग काय ? ते येथे नाही आलेत, त्यांचा फोन आहेलवकर उठून घे !”
मी धडपडत उठलो. फोनवर कामापुरते बोलून भेटीची वेळ ठरवून आळोखे पिळोखे देत देव्हाऱ्या समोर येऊन उभा राहिलो खाडकन डोळे उघडलेबापरे चांगलेच उजाडलेय की, आपल्या फिरायला जाण्याचा बट्ट्या बोळ झाला.
हॉल मधलेपॉवरमला वाकुल्या दाखवत कोपऱ्यांत पहुडलेले होते. त्यांना उद्या सकाळपर्यंत उठवणारे कोणी नव्हते.तू मला उठवले का नाहीस सकाळी ?”
मी किती प्रयत्न केला तुला उठवायचा; तू ढिम्म हालतंच नव्हतास !”
दिनचर्या रोज प्रमाणे सुरू झाली. दुपारी एका क्लायंट कडे बसलो असता एक पेशंट आला….. “डॉक्टर साहेब पोट गच्च झाल्यासारखे वाटतेयतपासणीचे सर्व सोपस्कार पार पडल्यावरसकाळी जरा फिरायला जात जा !” डॉक्टर उत्तरले-
मला स्वतः:चा निश्चय आठवला….. बाहेर पडल्यावर मी तडक बुटाच्या नाड्यांचे चांगले चार जोड विकत घेतले.
बरं झालं, मुलींनाही कामाला येतीलनाहीतरी शाळेत लेस हरवूनच येतातगृहिणीची प्रतिक्रिया !
हो अर्ध्या अर्ध्या करून दिल्यास तर वर्ष भर पुरतीलम्हणूनच आणल्या आहेत.” मला कपाळावर हात नव्हे हातोडा मारावेसे वाटत होते.
सकाळी कितीला उठवायचे ?” रात्री बिछान्यावर पडल्या पडल्या तिचा प्रश्न !
साडे पाचालामाझे तेच उत्तर !
नक्की ना ? “…….
म्हणजे काय (हे मनांतल्या मनात होते). मी परत कूस वळवून झोपण्याचे नाटक केले.
***********
डिंग डॉंगच्या गजराने मी डोळे किलकिले केले. आज मोबाईलचा गजर असा का वाजतोय हेच कळेना ! शेवटी कसाबसा धडपडत उठलो तेंव्हा कळले दरवाज्याची बेल वाजवतंय कोणीतरी. मी उठून देव्हाऱ्यावर नजर टाकून गडबडीत दार उघडले. दूधवाला वैतागून दारात उभा होता मी बाजूच्या डेस्कवर ठेवलेले भांडे पुढे करून दूध घेतले.
दूध स्वयंपाक खोलीतल्या कट्ट्यावर ठेवून खोलीत येऊन परत बिछान्यांत आडवा झालो. मुलींच्या खोलीत मुली गाढ झोपेत होत्या. दर्शना बहुतेक बाथरुम मध्ये असावी….. मला केंव्हा परत डोळा लागला कळलेच नाही.
उन्हे वर आली होती…. “चहा….” करीत मी उठलो. सरळ बाथरुम मध्ये जाऊन ब्रश करू लागलो.
हिचा चेहरा आज इतका टवटवीत कसा दिसतोय ?’ मी उगीचच बायकोच्या दिसण्यावर घसरलो. असो
चहा पीत पेपर वाचन करीत असताना मध्येच नजर रात्री काढून ठेवलेल्यापॉवरवर गेली. नव्या लेस छान दिसत होत्या. आजही ती जोडी मला वाकुल्या दाखवत होती.
सकाळी दूधवाला किती जोर जोरात बेल वाजवतोनाही?” …..हिने फक्त हुंकारानेच उत्तर दिले.
दिनक्रम सुरू झालापरत कुठेतरी एका क्षणी फिरायला जाण्याची आठवण झाली.
सकाळी उठवू का ?”
हो उद्या नक्की !” आज कूस वळवण्याची मला गरज वाटली नाही.
ती सकाळ काही उजाडलीच नाही.
माझ्या मोबाईलचा गजर बिचारा थकून गेला असावा असा विचार करून मी फिरायला जाण्याचा विषय बंद केला.
****************
मध्ये दहा बारा दिवस असेच गेले…..
एका सकाळी चक्क साडे सहाला मला जाग आली…..शेजारी सौ. दिसत नव्हती म्हणजे उठली असणारच.
चहा…..” करीत मी बाथरुम मध्ये घुसलो. दात घासून आल्यावर बाहेर येऊन बघतो तर सौ. चा पत्ताच नव्हता !
दार उघडले व बघतो तर काय, दूधवाल्याने आज (?) दूध प्लॅ.पि.मध्ये बाहेर ठेवलेले होते. पेपर उचलला व वाचन सुरु केले.
कुठे गेली होतीस ?” ती आल्यावर तिला विचारले.
फिरायला !”
म्हणजे ?”
म्हणजे रोजच्या सारखी फिरायला गेले होते !”
माझा माझ्या पोटाहून मोठा असल्याचा भास मला उगीचच झाला……
आज वाकुल्या दाखवायलापॉवरच्या जागी तिचे जोडे होते !
मित्रहो….. उद्यापासून मीही तिच्याबरोबर फिरायला नक्की जाणार आहे.
(
सकाळी उठलो तर !)                                cin1.jpg             

Comments (2)