गरीब बिचाऱ्या चिमणीला,
सगळे टपले छळण्याला,
चिमणीला मग राघू बोले,
का गं तुझे डोळे ओले ?
काऽऽय सांगू बाबा तुला,
एकटे पणा छळतो मला !
राघू होता हुशार फार,
त्याने दिले सल्ले चार !
“झाडां वरती फिरून यावे,
गाणे गोड गावून यावे.
बाजूला मग जाऊन यावे,
गप्पा टप्पा मारून यावे,”
राघूच्या सल्ल्याने चिऊताई खूश झाली- खालच्या साळूबाईंशी गप्पा मारायला गेली.
साळू बाई, साळू बाई;
कसली तुमची नेहमीच घाई ?
शेजारी जरा बसाहो ताई,
तक्रार माझी फार नाही.
नाही गं बाई, चिऊताई,
बसायला मला वेळच नाही,
शाळेची तयारी करायची घाई,
त्यातच छोटूचा गणवेश नाही,
वह्या पुस्तके आणायची बाकी
कव्हर्स त्यांना घालायची खाकी
होतील आता पिल्ले गोळा,
करते हं मी त्यांच्या पोळ्या.
चिमणी ती मग हिरमुसली
झाडा वर जाऊन बसली
तिकडून आला चिमणा छान
होता तो खूप गोरा पान.
येते का गं फिरायला,
गोड गाणी म्हणायला.
झाडांवरती फिरून येऊ
गोड गाणी गाऊन येऊ.
चिमणी आमची खुशीत आली
गाणे गोड गाऊ लागली
झाडां वरती फिरू लागली,
चिमण्या संगे भुर्र उडाली.