पावसाळा सुरू झाला आहे ….. धो धो…. धुवाँधार पाऊस कोसळायला लागलाय….
आमच्या मुंबईत हातभर अंतरावरचे दीसत नाही इतका पाऊस जोरात येतो….
अगदी बॉक्सींग केल्यासारखे दणादण बडवतो….
पुण्यातला व घाटावरचा पाऊस आळशी…. येईल तो शंका काढीत काढीत व आला की व्हि.आय.पी. पाहुण्यासारखा उगीचच जायची वेळ घड्याळात बघत राहील !
सुरूवातीला काय अप्रूप असायचे ह्या पावसाळ्याचे ! बालपणी शाळा नुकत्याच सुरू झाल्यावर येणारा पाऊस म्हणजे देवदूतच वाटायचा… मे महिन्याची सुट्टी नुकतीच संपलेली असताना व शरिरावर व बुद्धीवर सुट्टीचा कैफ बाकी असतानाच हा तुफान गर्जना करीत यायचा…. ‘
पहिल्या पावसांत घामोळ्या जातात‘ ह्या समजुतीने मग उघडे नागडे तोकड्या चड्डीवर “हेऽऽऽहेऽऽऽऽहेऽऽऽऽ” करीत कार्टी रस्त्यावर धावायची…. ओली चिंब व्हायची पोरं !
पण घरून पूर्ण सूट असायची त्या गम्माडी जमतीला ! छोटी छोटी तळी साचायची रस्त्यात मग छप्प छप्प करीत दोन्ही पाय एकावेळी ढुंगणावर आपटत त्या तळ्यांत उड्या मारून आजूबाजूला पाणी उडवायचो आम्ही….
ती जाहिरात आठवते का टिव्ही वरची…
एक छोट्टासा बालक असाच उड्या मारत असतांना एक धोती घातलेला जरासा रागीट पण ‘उत्पल दत्त‘ सारखा खोडसाळ म्हातारा रस्त्यावरून जाताना त्याच्या अंगावर पाणी उडते व तो भडकण्याच्या बेतातच असतो पण……….. त्यालाही स्वतःचे बालपण आठवते – अगदी समर्पक जाहिरात होती ती……
लहान मुले पावसांत हुंदडणारे असे प्रसंग पाहिले की, बालपण उन्मळून आठवते व डोळ्यांच्या कडा ओलसर होतात…. त्या आठवांनी ! ह्या पावसात मग ओढा बनला की कागदी होड्या फटाफट तयार व्हायच्या. माझी मोठी बहिण कागदी नांवा बनवण्यात पटाईत !
साधी होडी , बंब होडी , नांगर वाली होडी, चार खणी होडी वगैरे पटापट बनवून द्यायची….
मग मागच्या वर्षीची वह्यांची रद्दी फार उपयोगी पडायची…..
तिर्थरूप रेल्वेत होते – त्यांची ऑफिसच्या जुन्या पुराण्या रजिस्टर्स वर पटकन हक्क सांगितला जायचा…… एकदा ते घरी नसताना नेमका पाऊस आला…..टराटर दोन चार पाने फाटली…… फटाफट होड्या तयार झाल्या. मी पळालो पण होड्या पाण्यात सोडायला… वेळेचे भान कसले उरते ?– तिर्थरूप घरी आल्यानंतर आमचे आगमन उशिराने झाले व त्यातही चिखलात लोळून, कपड्यांचा व चपलांचा बोऱ्या वाजवून – पाहण्यालायक अवतारात घरी दर्शनार्थ पोहचलो….
घरी जाऊन पाहतो तर काय…. सिन एकदम सिरीयस !!!
दोघी बहिणी पुस्तकांत डोकी खुपसून बसलेल्या…..
मोठी फुसफुस् करीत नांक ओढीत होती…….
मला “त” म्हणजे ताकभात–पापडलोचणे लगेच कळायचे पण आज नेमके काय चुकले ह्याचा अंदाज येत नव्हता –
म्हटले काढली असेल एकीने दुसरीची खोडी व खाल्ला असेल मार मोठीने…..
म्हणून चुपचाप स्लिपर्स हातात उचलून मागच्या अंगणात सू –बाल्या करायची पोझ घेतलीच…. तेव्हढ्यात साहेबांचा पंजा पडला मानगुटीवर….. सटासट आवाज सुरू झाले…
माझी नेहमी ट्रिक असायची ती जोर-जोरांत रडण्याची म्हणजे खालून-तळघरांतून आजोबांची हाक यायला पाहिजे “दाऽऽऽदाऽऽऽऽऽ” करून –
कसले काय…. आज आवाज फक्त सटासटचाच मोठा होता.
त्या दिवशी पूर्ण गल्लीने माझ्या तोंडच्या आवाजापेक्षा अंगाचा आवाज मोठा आलेला ऐकला……मी रात्री न जेवताच रडत रडत झोपलो – महान आश्चर्य – काका, आत्या, आई, आजोबा, आजी पैकी कुणीच जवळ घेतले नाही त्या दिवशी……
नंतर हळूहळू उलगडा होत गेला…
तिर्थरूपांचे ऑफिसच्या कामाचे रजिस्टर गटारात होड्या बनून फिरतं होते…..
त्याला कारणीभूत मी व मला होड्या बनवून देणारी माझी ताई –
आम्ही दोघांनी मुंबईतल्या पावसाच्याच लयीतच मार खाल्लेला होता…..
आत्या व आई मध्ये पडली म्हणून त्यांना ओरडा ऐकावा लागलेला होता….
आजी साळसुदासारखी हळूच भजनाला जाते करून सटकलेली होती (इथे माझे टाळ कुटले गेले होते) आजोबाही तळ घरात गप्प – वर आलेच नाहीत कारण त्यांना माहित होते की गुन्हा काय घडला ते ! रात्री उशीराने जरा स्वप्न आल्यासारखे वाटले…… दादा उश्यांशी बसून डोक्यावरून हात फिरवीत आहेत असे काहीसे पण डोळे उघडून खात्री करायचा त्राणही शिल्लक नव्हता अंगात…..
कॉलेजला जायला लागल्यावर एकदा पावसाळ्यात काकांचा किरण आला….
“भाई होडी बनवून दे ना !” मी सुन्न; कागदाकडे नेलेला हात चटका लागतो तसा मागे घेतला – शेजारी दादा कसलेसे वाचन करीत होते…. चष्म्यांच्या आडून त्यांनी हळूच पाहिल्याचा भास झाला मला…..
मी गप्प पाहून दादाच बोलले. “आण मी देतो बनवून” थोड्याश्या अनिच्छेने किरण त्यांच्याकडे वळला.
“कागद कामाचे नाही ना ?” ह्या वाक्यावर मी का कुणास ठाऊक सिन मधून एक्सीट घेतली.
“हंम्म्, त्याला होडी बनवून देत आहेत !” मी आई कडे स्वयंपाक खोलीत जाऊन धूसफूसलो…
“मला होडीवरून लहानपणी दिलेला मार विसरले !”
मला वाटले आई आता आपल्या बाजूने काहीतरी खूसपूसेल….
पण तीने एक सेकंद हातातले काम थांबवून माझ्याकडे तिऱ्हाईत नजरेने पाहिले व म्हणाली….” तुला मार आठवतो…. मला ते रात्रभर तुझ्या व विजुच्या उशाशी बसलेले आठवतात !!! ” –