Archive for शैक्षणीक

संवाद साधण्याच्या कला-

(विवेकानंद व्याख्यान मालांना मी पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघात ८९-९० साली हजेरी लावायचो. मांजरासारखी अनेक ठिकाणे बदलत असताना ह्या नोंदींची गायब झालेली वही गावी कचरा साफ करताना सापडली. ९० सालातले व्याख्यात्यांचे विचार आजच्या मॅनेजमेंट विषयाशी मेळ खात आहेत का ह्याचाच विचार करतोय ! जितके शक्य आहे ते सर्वच मुद्दे नोंदवहीतून विस्तृतपणे येथे देण्याचा प्रयत्न करेन. आपणही आपले विचार मांडल्यास इथल्या तरूण वर्गाला अधिक मार्गदर्शन होईल)  

काही व्यक्तींचे मुद्दे अचूक असतात फक्त ते मांडताना त्यांना इतकी घाई होते… किंवा ते उत्तेजित होतात की, त्यांच्या चांगल्या बाजूकडे दुर्लक्ष होऊन त्यांची वाईट बाजू समोर येते. काही काळ गेल्यावर त्यांच्या भोवतीच्या मंडळींना ते काय म्हणाले होते ते आठवते व त्यावेळी त्यांचे मुद्दे बरोबर असूनही ते मांडण्याची रीत चुकल्याने त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. परंतू तोवर वेळ निघून गेलेली असते.

नुकतेच घडलेले उदाहरण द्यायचेच झाल्यास-
“संजय दत्त हा अतिरेकी नाही, शस्त्रास्त्रे बाळगण्याचा मूर्खपणा त्याने केला असेल परंतू त्यासाठी त्याला सरसकट देशद्रोही ठरवण्याची गरज नाही-” इति बा.ठा. ही गोष्ट असेल १९९३ च्या बॉम्ब स्फोट खटल्यानंतरची. सुनील दत्तने अतोनात प्रयत्न करूनही तुरुंगातून सोडवू न शकलेल्या त्याच्या पुत्राला काँग्रेसने नव्हे तर ठाकरेंनी साथ दिली होती.
न्या. कोदे ह्यांचा कालचा निर्णय तेच दर्शवतो. फक्त साहेबांची सांगण्याची पद्धत वेगळी होती म्हणून राईचा पहाड केला गेला होता.
तीच गोष्ट पाकिस्तानाशी क्रीडा संबंध ठेवावेत की नाही ह्या बाबत !

ह्याच संदर्भात काही उदाहरणे अजून देता येतील. 
अभ्यासाच्या वेळी एक विद्यार्थी बागेत इकडे-तिकडे हिंडत होता. त्याला दुसऱ्या विद्यार्थ्याने विचारले, “तुला अभ्यासाच्या वेळेत इकडे-तिकडे हिंडण्याची परवानगी मिळाली ?” “हो” पहिला बोलला.
“पण मी विचारले असता, शिक्षक ‘नाही’ म्हणाले”.
“तू विचारले असशील, ‘अभ्यास करताना मी इकडे-तिकडे हिंडू का ?’ मी विचारले, ‘ इकडे-तिकडे हिंडत असताना मी अभ्यास करू शकतो का !”   

आपण काय बोलतो त्यापेक्षा ते कसे बोलतो हेही महत्त्वाचे असते.

एक मुलगा प्रथमच आपल्या मैत्रिणीला नृत्यासाठी घेऊन जाणार होता. त्याने आपल्या दुसऱ्या अनुभवी मित्राला सल्ला विचारला.
“तुम्हा दोघांना सुरुवातीला जरा अवघडल्यासारखे होईल, अस्वस्थता दूर करण्यासाठी मैत्रिणीची कोणत्या तरी चांगल्या गोष्टीबद्दल स्तुती कर !”
नृत्य करताना त्याला आपल्या अनुभवी मित्राचा सल्ला आठवला…..
“प्रिये, तुझ्यासारख्या लठ्ठ मुलीला नृत्य जमणार नाही असे मला वाटले होते परंतू तू फारच छान नाचतेस !”
पुढे काय झाले असेल त्याची कल्पनाच न केलेली बरी !

पुण्यातल्या पाट्या जगप्रसिद्ध आहेत. एका चहाच्या दुकानात पाटी होती…..
“जे गिऱ्हाईक आपला उष्टा ग्लास फळीवर ठेवतील व सिगारेट ची रक्षा रक्षापात्रातच टाकतील त्यांच्याकडे मालक सुट्टे पैसे मागणार नाहीत”
अशीच युक्ती एका उंच इमारतीत केलेली होती. तेथे दोनच लिफ्ट्स होत्या व गर्दी फार होई. सतत तक्रार आल्यावर तिकडच्या सचिवाने लिफ्ट्स च्या भोवती पूर्ण उंचीचे आरसे लावले. स्वतःला आरशात न्याहाळताना लिफ्ट यायला वेळ  लागतो हे तक्रारदार विसरूनच गेलेत. मी स्वतः आमच्या इमारतीतला सूचना फलक लिफ्ट जवळ हालवला जेणेकरून “आम्हाला माहीतच नव्हते” चा सूर आपोआप कमी झाला.

काही वेळा नेमके काय सांगायचे आहे ते पानभर लेखनानेही वाचकाला कळणार नाही…..
काही वेळा मुलाकडे टाकलेला वडिलांचा फक्त एकच कटाक्ष बरेच काही सांगून जातो.

संवाद साधणे ही कला आहे असे म्हटले जाते.
माझ्या मते फक्त कलाच नाही तर ती एक मोठी प्रक्रिया आहे…. तो एक अनुभव पण आहे.
संवादात आशयाबरोबर उच्चार, भाषेची शुद्धता, लेखनाची सवय, वाचन करून आलेली प्रगल्भता व ग्रहण शक्ती, नेमक्या वेळी नेमके शब्द आठवण्या इतपत स्मरणशक्ती. वक्ता असल्यास नेमका हजरजवाबी पणा, समोरच्यावर झालेला परिणाम ग्रहण करण्याची कला (फिडबॅक ग्रास्पींग पॉवर) ह्या क्वॉलीटीज् (मराठी शब्द ?) यायला पाहिजेत.
छोटीसी जांभई किंवा (विलासराव देशमुख झोपले होते तशी) एखादी ‘नॅप’ श्रोत्याला बरेच काही सुचवते.
मनोहर जोशींना माझ्या मुलींच्या शाळेत भाषण देताना ऐकले होते. त्यांचे भाषण इतके खुसखुशीत होते की हसून हसून मुरकुंड्या वळल्या. विषय राजकारणाचा नव्हता व फक्त शिक्षणाचा होता हे सर्वात महत्त्वाचे.

संवादासाठी समोर असलेले माध्यम काय ते संवाद साधण्यापूर्वी समजावून घेणे नेहमीच चांगले. नोकरीच्या मुलाखतीला जाताना सिनेमाला जायचे ते कपडे घालून जाणे किंवा एखाद्या मित्राशी बोलावे तसे… “या मॅन आ कॅन डू दॅ” सारखी भाषा वापरल्यास कल्याणच होणार !
स्वतःचा पूर्वानुभव हे मोठे परिणामकारक हत्यार आहे; ते संवाद साधताना नेहमी वापरावे. लिंग, बौद्धिक/शैक्षणिक क्षमता, सामाजिक दर्जा व राहणीमान हे काही महत्त्वाचे घटक नक्कीच लक्षात ठेवावेत.  
काही महत्त्वाच्या मुलाखतींना जाताना तोंडात कुठलीही वस्तू चघळणे टाळावे. शक्य असल्यास परफ्यूम किंवा सौम्य अत्तराचा यथायोग्य वापर करावा. बोलण्याची पद्धत विनम्र व आवाज स्वतःच्या ताब्यात असावा. संवादात भावनिक आव्हानांपेक्षा वस्तुनिष्ठता असावी. संवाद आटोपशीर (पाल्हाळ न लावणारा) असावा पण म्हणून त्रोटक किंवा उडवाउडवीची उत्तरे देऊ नयेत.
समोरची व्यक्ती विचारत असलेले प्रश्न किंवा सांगत असलेली गोष्ट माहीत असली तरी पूर्ण ऐकून घ्यावी. लक्ष देणे ही देखील एक कला आहे. आपली मते वेगळी असल्यास सकारण व सादोहरण पटवून द्यायला कचरू नये परंतू वाद विवाद टाळावेत. गीव्ह & गेट हे तत्त्व लक्षात ठेवावे.
लक्ष दिल्यास मिळेल…..
मित्रता दिल्यास मिळेल..
मान दिल्यास मिळेल…..   
*******************************
राजू परुळेकरांचा “इ” टिव्ही वरील “संवाद” हा मी अधून मधून बघत असलेला एक दाद देण्यायोग्य कार्यक्रम आहे.
एकतर मी दूरदर्शन वरचे कार्यक्रम फारच मोजके बघतो त्यात जो एकदा बघतो; तो फिरून बघीनच ह्याची शाश्वती कधीच नसते !
ह्या गृहस्थाचे व्यक्तित्व मला अत्यंत आवडले. त्याचे एक कारण म्हणजे ओढून ताणून न साधलेला संवाद ! सहजरित्या व मनापासून/ हृदयातून जो खरा “संवाद” घडतो तो दर्शकांपर्यंत पोहचवण्याचे अनोखे कार्य हा गृहस्थ कित्येक भागांपासून चोख निभावतो आहे.
विषयावरील ज्ञानाच्या स्वत:च्या व समोरच्या व्यक्तीच्या मर्यादा उत्तम रितीने जाणून त्यावर सहजगत्या संवाद साधणारी त्याची कला बघून मी नेहमीच अचंबीत होतो. वयाच्या मर्यादा, व्यक्तिमत्वाच्या मर्यादा, लिंग-जात-भाव-जाण ह्यावरील कुठल्याही मर्यादा परुळेकरांच्या आसपासही फिरकत नसाव्यात. अस्खलीत बोललेले मराठी, व्यवस्थित कळणारे शब्दोच्चार, समोरील व्यक्ती ज्या विषयांत तज्ञ आहे त्यावरच विचारलेले समर्पक प्रश्न, समोरील व्यक्ती काय सांगते आहे ते थंड चित्ताने आपल्यात समावून घेण्याची कला, त्याच थंड डोक्याने दिलेले त्यावरील प्रतिसाद व हावभावात्मक प्रोत्साहन हे सर्वच टिप कागदाने टिपून घेण्यालायक आहे.

आपण असंख्य व्यक्तिमत्वे आपल्या रोजच्या दैनंदिनीपासून ते दुरदर्शनच्या कित्येक कार्यक्रमांतून नेहमीच बघत असतो. मराठीतला सा रे ग म प हा कार्यक्रम बघताना आपल्यापैकी कोणास पल्लवीचा अवखळपणा; किंवा अवधूतचा उस्फुर्तपणा किंवा देवकींचा धिरगंभीर सल्ला आवडत असेल…. कोणास मिलींद गुणाजीचे भटकंतीवर केलेले समालोचन आवडत असेल….. सुनिल गावस्करचे शब्दोच्चार व परखडपणा कोणास भावत असेल, तर के बि सी तला अमिताभचा मिश्कील “लॉक किया जाय ?” कोणास आवर्जून सांगावासा वाटेल….. परंतू ह्या सर्वच संवाद साधण्यांच्या कलेतून एकच गोष्ट प्रकर्शाने जाणवते व ती म्हणजे जर आपण आपल्या हावभावांमधून व आपल्या देहबोलीतून सहजसाध्यपणे समोरच्या व्यक्तीशी संवाद साधू शकलात तर तो फक्त एक संवादच न उरता नक्कीच सुसंवाद होईल.

राजू परुळेकरांची अजून एक खास नोंद घेण्यालायक गोष्ट म्हणजे विषयावर केलेला त्यांचा अभ्यास…. आपण जी मुलाखत घेणार आहोत किंवा आपण जी मुलाखत देणार आहोत ती देताना/घेताना आपल्या समोरील व्यक्तीचे त्या विषयात कितपत ज्ञान आहे त्याची उत्कृष्ठ जाण परूळेकरांना आहे. ह्यासोबतच स्वत:च्या मर्यादा जाणून केलेले विषयावरील वक्तव्य हे नोंद घेण्यालायक असते. माणसाने अज्ञान प्रकट करू नये परंतू नसलेले ज्ञान प्रकट करण्याचा प्रयत्नही करू नये.

आपण विचारत असलेले प्रश्न समोरच्या व्यक्तीला कितपत आवडतील ह्यांची जाण त्यांच्या प्रश्नांतून लगेच कळते. आजवरच्या कार्यक्रमांत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना एकाही मुलाखतकाराने उद्धट किंवा विषयाला सोडून उत्तर दिलेले मी बघीतलेले नाही. फक्त इतकेच नाही तर त्यांचा पोषाख हा मुलाखत देणाऱ्याच्या विषयाशी निगडीत असतो हे माझे अवलोकन आहे. गायकाची/कलाकाराची मुलाखत घेताना किंवा वैद्यकिय पेशातल्या व्यक्तीची मुलाखत घेताना घारण केलेला पोषाख हा वातावरण निर्मीतीत अधिकच भर घालतो. त्यांनी निवड केलेले प्रश्नही मुलाखतकाराच्या आवडीचे असेच असतात. त्या प्रश्नांच्या उत्तरांतून नेमका आशय ‘काढून’ घेण्याची हातोटी वाखाणण्यालायक आहे.

आपण एखद्या विषयावर / नोकरीसाठी मुलाखत देताना आपल्या देहबोलीतून किंवा चेहऱ्यावर कोणते सहाजीक भाव आणल्यास मुलाखत कर्ता आपल्या बाजूने निकाल देईल ह्याचे बारकाईने निरीक्षण करावयाचे झाल्यास तरूण मंडळींनी हा कार्यक्रम एकदा तरी बघावा.
ज्यांना व्यवसायाच्या निमीत्ताने इतर व्यावसायीकांशी भेटी गाठी घ्याव्या लागतात किंवा तरूण मंडळींच्या मुलाखती घ्याव्या लागतात त्यांनी तर हा कार्यक्रम आवर्जून बघावा.
आजच्या युवकांनी मुलाखत देताना व मुलाखत कर्त्यांनी मुलाखती घेतांना कसा सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा ह्याचे श्री. राजू परूळेकर हे उत्तम उदाहरण आहे.

एकणे किंवा लक्ष देणे ही अत्यंत महत्त्वाची कला आहे. लक्ष कसे द्यावे ह्याचे योग्य शिक्षण आपण कधीच घेत नाही. वर्गात प्राध्यापक शिकवत असता लक्ष द्यावे की नोट्स (नोंदी) घ्याव्यात ह्या कात्रीत आपले विद्यार्थी अडकतात असे वाटते. नोंदी घ्याव्यात तर विषय नीट समजलेला नसतो व विषयाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केल्यास नोट्स काढण्याचे महत्त्वाचे कार्य राहून जाते…..
लक्ष देणे ही एक प्रतिक्षिप्त क्रिये सारखी क्रिया असून प्रयत्नांनी व वेळ पडल्यास प्रशिक्षणाने त्याची खोली वाढवता येते. त्यासाठी काय करावे ते थोडे “लक्ष” देऊन बघा-
एकणे- कित्येकदा आपण काही गोष्टी जुन्या / त्याच त्याच व्किंवा निरूपयोगी आहेत असे समजून आपण कानाआड करतो, त्यामुळे “न ऐकण्याची” सवय जडून जाते. मग माझ्यासारखा एखादा संगणकावर गप्पा मारण्यात गुंतला की, सौ. पटकन नविन ड्रेस किंवा साडीचे प्रॉमीस कधी घेऊन निघून जाते तेही कळत नाही…… ह्यातला गंमतीचा भाग सोडल्यास आपण प्रत्येक कथना कडे किंवा जे आपण ऐकत आहोत त्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवल्यास फारतर आपला थोडासा वेळ वाया जाईल परंतू दुर्लक्ष करण्याची सवय जडणार नाही व त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी योग्य जागी पोहचून त्यावर लगेच उपाययोजना करता येईल.  

आशय – एखाद्या वक्त्याचे किंवा व्यक्तिचे मुद्दे काही वेळा चांगले असतात परंतू त्याला ते व्यक्त करता येत नसतात किंवा ते व्यक्त करण्याची त्याची पद्धत आपणांस आवडती नसावी परंतू चांगले लक्ष देणारा विद्यार्थि त्याच्या आशयाकडे लक्ष देतो व अभिव्यक्तिकडे दुर्लक्ष ! मागच्या भागात मी बाळासाहेबांबद्दलचे – पाकिस्तानाशी संबंध ठेवण्याबाबतचे (तो वेगळा चर्चेचा मुद्दा असावा)उदाहरण दिले होते ते आठवल्यास मला नेमके काय म्हणायचे आहे ते आपणांस कळेल. एखाद्या विषयाची मध्यवर्ती कल्पना (आशय) हा समजल्यास त्यातल्या घटने कडे केवळ घटना ह्या दृष्टीने न बघता त्याच्यातली जोडणी शोधण्याचा प्रयत्न करावा. ह्यामुळे आपल्या विचारकल्पनेस वेग येऊन जास्तीत जास्त गोष्टी आपण स्वत:त समावून घेऊ शकतो.  

आकलन व मूल्यमापन-  ज्याला चांगले लक्षपुर्वक ऐकता येत नाही, तो सर्व नीट ऐकण्याच्या आतच त्याचे मूल्यमापनास सुरूवात करतो. वक्त्याला काय व कुठे प्रश्न विचारावयाचे आहेत त्याची तयारी तो आकलन होण्याच्या आधीच करतो.
सुप्रसिद्ध वकिल श्री. उज्ज्वल निकम ह्यांना पत्रकारांना उत्तरे देताना बघून जाणवते की, हा गृहस्थ जर पत्रकारांच्या प्रश्नांचे इतके व्यवस्थित आकलन करत असेल तर बचाव पक्षाच्या वकिलांचे संभाषण किती खोलात जाऊन व लक्षपूर्वक ऐकत असेल….

एकाग्रता- अर्थातच एकाग्रता असल्याखेरीज ऐकलेली गोष्ट आचरणांत आणण्यास जड जाईल. मन चंचलतेने इतरत्र भटकत असल्यास मनाचा, व इतर इंद्रियांचा (महत्त्वाचे म्हणजे स्मरणशक्तीचा) ताळमेळ साधता येणारच नाही. मन एकाग्रतेने एकाच जागेवर स्थिर ठेवल्यास कुठलीही गोष्ट सहजसाध्य असते.
सुनिल गावस्कर किंवा हल्ली तेंडूलकर ह्यांची फलंदाजी हे ह्याबाबतचे उदाहरण नोंद करण्यालायक आहे. जेव्हा गोलंदाजा मागच्या साइटस्क्रिन (पार्श्वपडद्या)समोर काही हालचाली घडत असल्यास त्यांची एकाग्रता भंग झाल्याने पुढच्याच चेंडूवर त्यांना बाद होताना बऱ्याच वेळा बघीतलेले आहे.

विचार व उच्चार – उच्चारांचा वेग विचाराच्या वेगांच्या एक चतुर्थांश असतो. एका मिनीटांत आपण जीतके शब्द उच्चारू शकतो त्याच्या चौपटीने त्यावर विचार करतो. ह्या वेगाच्या फरकात वक्ता पुढे काय बोलणार आहे ह्याबद्दल अंदाज किंवा अटकळ बांधण्याचा प्रयत्न करावा. आपले अंदाज बरोबर असल्यास आपला विचार बरोबर आहे असे समजावे व अंदाज चुकल्यास विरोध व साम्य ह्याची तुलना करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा.
उत्तम रितीने लक्ष देताना दुसऱ्याच्या जागी स्वत:ला कल्पून लक्ष देणे (एम्पॅथी) हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. आपल्याला वक्त्याचे म्हणणे मान्य करावेच लागेल ह्या भीतीने सांगणाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यातले महत्त्वाचे आशय कानाआड जातील.

नीट लक्ष देण्यामुळे आपले वैयक्तिक संबध सुधारतात. दुसऱ्याला/समोरच्याला आपण समजावून घेऊ शकतो. जसे वाचणे म्हणजे नुसते डोळे फिरवणे नव्हे तसेच लक्ष देणे म्हणजे नुसते कान उघडे ठेवणे नाही….. “नळी फुंकली सोनारे; इकडून तिकडून गेले वारे” अशी म्हण ह्यामुळेच पडली असावी. पूर्ण क्रियाशील मनच व्यवस्थित लक्षपूर्वक एकू शकते.
केवळ शब्दांना महत्त्व नसते- आवाजातले चढ-ऊतार, स्वरांची तीव्रता, भावना, चेहऱ्यावरचे हावभाव, अंग/देहबोली ह्या सर्वांचे नीट काळजी पूर्वक अवलोकन करणे म्हणजे लक्ष देणे. श्रवण करणे म्हणजे केवळ ऐकणे नव्हे तर त्यात नियोजन, कृतीशिलता, एकाग्रता, हेतू, ग्रहणक्षमता इत्यादी अनेक बाबी एकत्रीत असतात.

जे आद्न्या पाळतात त्यांच्याच आद्न्या व्यवस्थित पाळल्या जातात….
जो उत्तम लक्ष देतो तोच आपले म्हणणे दुसऱ्याला समजावून देऊ शकतो….
ज्या तऱ्हेने आपण लोकांशी बोलतो त्याच तऱ्हेने लोक त्याचे उत्तरे देतात……

मित्रहो, चांगले लक्षपूर्वक एकण्याच्या कलेने आपल्यात बरेच गुण एकत्रीत नांदू शकतात व अनेक अवगुणांवर मात करता येते हेच सांगण्याचा येथे प्रयत्न केला आहे.

टिप्पणी करे