बुंदेले हर बोलो के मुह – हमने सुनी कहानी थी ।
खुब लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी !

राणी लक्ष्मीबाईंच्या स्वातंत्र्य समरातील आहुतीला १८ जुन रोजी जवळपास दिडशे वर्ष पूर्ण होतील त्यानिमीत्ताने त्या समरातील विरांना एक श्रद्धांजली.”१८५७ चा स्वातंत्र्य समर” ह्या स्वा.वीर सावरकर ह्यांच्या पुस्तकातील काही भाग घेउन त्याची इतिहासाशी जोडणी केली आहे.
गंगाधर रावांची पत्नी झाल्यावर लगेच विधवा होण्याचे दुर्भाग्य नशिबी आलेल्या-जळगांव जिल्ह्यातील पारोळ्याच्या मोरोपंत तांब्यांची कन्या झांशीची राणी झाली. गंगाधररावांनी मागे सोडलेले झांसीचे वैभव व दामोदर हा दत्तक मुलगा सांभाळण्याचे परम कर्तव्य लक्ष्मीवर दुर्दैवाने आले होते. दुर्भाग्य व संकट एकटी येत नाहीत – डलहौसीने १८५४ मध्ये दत्तक मुलांना वारसाहक्क देण्याचे नाकारून झांशीचे राज्य इंग्रज सत्तेत खालसा करण्याचा कुटील डाव आरंभला.”मेरी झांसी नही दुंगी” ची गर्जना करीत लक्ष्मीने त्यांचे अधिपत्य स्विकारण्यास नकार दिला व “मेरी झांसी नही दुंगा” ची आरोळी प्रांतात दुमदुमली. ३/४ वर्ष प्रजा संगोपनाचे कार्य लक्ष्मीबाई करित असतां संस्थान घशात घालायचा डाव इंग्रज खेळत होते. “झांसी नही दुंगी” ही काय गडबड आहे हे पाहण्यासाठी सर ह्यु रोज ब्रिगेडियर जन.व्हिटलॉक व चार हजार शस्त्रसज्ज सैन्य व भयंकर तोफांसह बुंदेल खंडाकडे चालून गेला.मद्रहून निघून सर ह्यु रोजने काल्पीपर्यंत १८५७च्या समरविरांच्या ताब्यातला प्रदेश जिंकत जावे, तर जबलपुराहून निघून सर व्हिटलॉकने बिना, कर्की वगैरे मुलूख घेत घेत सर ह्यु रोजला मिळावे व अशा रितीने ह्या दोन फौजांनी गंगा-यमुनेच्या दक्षीणेकडील प्रदेशात सत्ता संपादित करावी असा कार्यक्रम ठरला होता. सर ह्यु रोजने २० मार्च.१८५८ ला झांसी पासून १४ मैलांवर तळ ठोकला. २३च्या रात्री उशीराने आंग्लसेनेशी झुंज सुरू झाली. इंग्रजांचा रणपंडीत सर ह्यु रोज व झांसीची कोवळ्या वयाची अबला राणी लक्ष्मी ! कोण अपूर्व झुंझ ! ता. २५ पासून लढाईला खरे तोंड फुटले. अत्यंत शौर्याने राणीने बुंदेलखंडांच्या कडव्या शिपायांसह किल्ला लढला. इंग्रजांजवळ इतकी साधन सामुग्री असतांनाही झांशीचा वेढा फोढायला त्यांना तब्बल ३१ ता. पर्यंत लढावे लागले. सर ह्यु रोज च्या अवाढव्य सैन्याला झांशी पुरून उरली. तोफखान्याच्या अग्निवर्षावामुळे कोसळलेली भिंतही रातोरात गवंडी बोलावून आणून दिवस उजाडण्याच्या आत पूर्ववत भिंत बांधणारे शत्रू चे विर सर ह्यु रोजने आयुष्यात प्रथमच पाहिले होते.तात्या टोपे विन्डहेमचा पराभव करून काल्पी मार्गे येत असता राणीची चिठ्ठी त्यांना मिळाली पण महीनो लढलेल्या त्यांच्या सेनेने इंग्रजांपुढून पळ काढला. बेटवा नदिवर झालेल्या त्या घनघोर युद्धांत इंग्रजांनी तात्या टोपेंच्या सेनेचा पराभव केला. येथे राणीने किल्ला लढवून ठेवला होता पण दक्षिण तट पडल्यावर मोजक्या सैन्य व प्रमुख माणसांसह राणीने मध्य रात्री किल्ला सोडला. तेहरी संस्थानाचा देशद्रोही पहारा फोडून काल्पीच्या दिशेने नानासाहेब पेशवे व तात्या टोपेंना सामिल होण्यासाठी पसार झाली. बौकर व त्याचे साथी तिच्या पाठलागावर लागले पण त्याला युद्धात जखमी करून दामोदरास पाठीशी बांधलेली राणी तेथून निसटली….. १०२ मैलांचे अंतर घोड्यावरून दिवस भर कापत ती काल्पीला पोहचली. काल्पीला पोहचताच तिच्या त्या कर्तव्य तत्पर घोड्याने प्राण सोडला !
रावसाहेब पेशव्यांनी व लक्ष्मीबाईने स्वराज्यासाठी रक्तांचा शेवटचा थेंब शरिरात असेपर्यंत शत्रुशी अखंड युद्ध चालू ठेवण्याचा निश्चय केला ! येथे झांशीत ब्रिगे.जन. व्हिटलॉकने मोरोपंत तांब्यांना पकडून फाशी दिले. झांशीत अमानुष कत्तली व नादिरशाही लूट केल्यावर ब्रिगे. शांत झाला. मधल्या काळात राणी पेशव्यांबरोबर पुढील संघर्षाची तयारी करिंत होती. काल्पी पासून ४२ मैलांवरिल कुंच गावी सर्व स्वराज्याचे विर एकत्र जमा झाले परंतू अपुर्व सावळा गोंधळ झाला. अनेक सेनापतींखाली हुकुमांनी लढलेल्या ह्या सेनेचा आपापसांत ताळमेळ नसल्याने एका हुकुमशाही इंग्रज सेनापतीच्या अधिपत्याखालिल सेनेने त्यांचा धुव्वा उडवला. तेथे तात्या टोपेंनी पराभवाची लक्षणे दिसतांच ग्वाल्हेर कडे कुच केले – काल्पी तर हातातून जात होती – ग्वाल्हेरला जावून तेथल्या मंडळींना फोडायचे कर्तव्य शिरावर घेऊन ते काल्पीहून निघाले. इंग्रजी इतिहासात ह्या महत्वपूर्ण चालीची ‘पळपुटेपणा’ म्हणून नोंद करून निर्भत्सना केली गेली.
तात्या टोपे इंग्रजी सेना काल्पी सर करेल ह्या अंदाजाने ग्वाल्हेर कडे फोडाफोड करायला कुच करित असतांनाच अचानक विरश्री संचारल्या गत स्वातंत्र्यविरांनी काल्पीला उचल खाल्ली. सर ह्यु रोजची २५वी नेटिव्ह इन्फंर्ट्री मेजर आर च्या कुशल नेतृत्वा खाली सामोरी आली पण राणी लक्ष्मी ह्या रणचंडीके च्या झंझावातासमोर साफ निष्प्रभ ठरली. त्या विशी बाविशीच्या तरूण रणलक्ष्मीचा आवेग, आवेश, तिचा बेफाम सुटलेला घोडा, तिची रपासप चालणारी समशेर, पाहून मेजर आर च्या अधिपत्याखालील सेनेची दाणादाण उडाली. तिचा तो भयंकर चमचमाट पाहून दिपलेला सर ह्यु भानावर येउन आपले राखलेले उंटावरचे सैन्य घेऊन पुढे घुसला. त्या नविन जोमाच्या सैन्याच्या बळावर कसेबसे मेजर आर ची वाघीणीच्या जबड्यातून सुटका झाली. त्या काळातील एका इंग्रज अधिकायाने लिहून ठेवले आहे…. ” सर ह्यु ला पंधरा मिनीटे उशिर होता तर तीने आमची कत्तल उडवली असती. त्या उंटावरच्या सैन्याने आम्हाला वाचविले – त्या दिवसापासून माझे प्रेम उंटावर जडलेले आहे.”
उंटावरल्या शाहण्या सर ह्यु ने स्वत:ची अब्रू वाचवण्यात यश मिळवले. आणखी एक दोन दिवस छोट्या मोठ्या चकमकींनंतर इंग्रज काल्पीत प्रवेशले. नानासाहेब पेशव्यांनी व तात्या टोपे ह्या मर्द मराठी गड्याने अथक परिश्रमाने वाढवलेले काल्पीचे साम्राज्य आंग्लांच्या गळ्याखाली उतरले(२४ मे).
सापडले नाहीत ते फक्त स्वांतंत्र्य विर ! काल्पीहून युक्तीने त्यांनी ग्वाल्हेर कडे पळ काढला होता. त्यात राणीही सामील होती.

प्रकृती अस्वास्थ्याने सर ह्यु रोजने आपला चार्ज सोडला व बंडखोरांचा बिमोड करण्यात यश मिळवल्याच्या आनंदात इंग्रज सेना विसावा घेण्यासाठी बसू लागली. तेव्हढ्यात एक जयघोष गर्जना झाली….
“आही रावसाहेब पेशवे आहोत, आम्ही स्वराज्यासाठी व स्वधर्मासाठी लढत आहोत” गोपाळपुराहून रावसाहेबांनी ही घोषणा करताच इंग्रजांच्या पायाखालील जमीन परत हादरली……..
*****************************
होय ! तीच ही गर्जना…. जीने इंग्रज साम्राज्याला ललकारलेले होते. काल्पीच्या किल्याचा आश्रय सुटतांच ती प्रथम गोपाळपूर च्या वातावरणात गुंजली…पण ह्यावेळेस आशेचे चिन्ह राहिलेले नव्हते. नर्मदे पासून यमुने पर्यंत व पुढे हिमालयापर्यंत इंग्रजांनी सर्व प्रदेश जिंकून घेतला होता. जवळ सैन्य उरले नाहे, एका किल्ल्याचाही आधार नाही. पराजयाने व द्रव्य संपल्याने नवीन सैन्य मिळण्याची आशा नाही.
एक काय तो तात्या टोपे उरलेला ! गोपाळपूरला तात्या परत आले होते. कानपूर पडतांच काल्पी व काल्पी पडतांच कुठला तरी प्रदेश बगलेत मारणे आवश्यक होतेच. वडिलांच्या भेटीचे निमीत्तमात्र करून ग्वाल्हेरला भेट देण्यास गेलेला हा क्रांतीविर ग्वाल्हेर फोडूनच परत गोपाळपूराला रावसाहेबांना भेटण्यास आला. ग्वाल्हेरात गुप्त रुपाने वावरीत त्यांनी सैन्याच्या मुख्य अधिकाऱ्यांची वचने घेतली. दरबारी व सरदारी पुढाऱ्यांकडून लागेल ते सहाय्य मिळवण्यात त्यांना यश आले होते. ग्वाल्हेरची खडान खडा माहिती काढून व तिथले सिंहासन भुंग्या प्रमाणे पोखरून परत रावसाहेबांना जावून गोपाळपूरास मिळाला.
तात्या टोपे गोपाळपूरास येताच सर्व मिळून निघाले ग्वाल्हेर सर करायला. २८ मे ला सर्व येउन थडकले आमेन महालात. शिंद्याला पत्रही पाठवलेले होतेच.”आम्ही तुमच्याकडे स्नेह भावाने येत आहोत. पुर्वीचा संबंध ध्यान्यात ठेऊन साह्य करावे म्हणजे आम्हांस दक्षिणेकडे जाता येइल.” ह्या पत्राचे प्रत्युत्तर म्हणून शिंद्यांनी १ जुनला आपली खास बालेघाटी फलटण व सर्व सैन्य सज्ज करून श्रीमंतांवर चालून आला. आपल्या स्वदेशध्वजाला मिळण्यासाठी जयाजी शिंदे येतो आहे असे वाटत असतांनाच राणीच्या लक्षात त्याचा कावा आला. “वंदन नव्हे तो ध्वज भंजन करण्यास येत आहे” म्हणत राणी आपल्या ३०० स्वारांसह पुढे घुसली व समशेर उपसून शिंद्यांच्या तोफांवर तुटून पडली. तेव्हढ्यात तीला जयाजी शिंदे दिसला. क्रोधाने भडकलेली ही धावती वीज मस्तकावर तडाडकन आदळताच शिंदेंची दाणादाण उडाली. त्याच्या बालेघाटी सैन्याचा असा बोजवारा उडत असता, तिकडे त्याच्या इतर सैन्याने तात्या टोपेंना पाहताच लढण्याचे नाकारले व सर्व सैन्य तात्यांस जावून मिळाले. तेव्हा जयाजी उर्फ भागोजीराव शिंदे व त्याचे दिवाण दिनकरराव ह्यांनी ग्वाल्हेरचे रणच नव्हे तर सिंहासन सोडून आग्र्याकडे धुम ठोकली.

ग्वाल्हेर शहराने रावसाहेबांचे स्वागत मंगलवाद्यांचा कडकडाट करून केले. ग्वाल्हेरचा द्रव्यभांडार अमरचंद भाटियाने श्रीमंतांना अर्पण केला. ग्वाल्हेरांत स्वातंत्र्यविरांना सहानुभूती दाखवणारे कैदेत होते त्यांची मुक्तता झाली. स्वदेश व स्वधर्माला ग्वाल्हेर जागले…
राजा स्वदेशास मिळत नाही पण ग्वाल्हेर स्वदेशास साथ देते असे चित्र तयार झाले. मग स्वदेश शिंद्यांना कुठून मिळणार ? तोफा स्वदेशाकडे, पायदळ स्वदेशाकडे, घोडदळ स्वदेशाकडे……सर्व सरदार व मानकरी स्वदेशासाठी, सर्व देव व देवालये स्वदेशासाठी , सर्व ग्वाल्हेर स्वदेशासाठी.
पण शिंदे ? …… ते मात्र इंग्रजांकडे व इंग्रजांसाठी…. मग ग्वाल्हेर कुठून त्यांना साथ देणार ?
३ जुन १८५८ ला ग्वाल्हेरने स्वराज्यभिषेक केला तो श्रीमंतांचा…. !
सर्व अपापल्या एतमामाप्रमाणे आसनांवर विराजमान होते…… सरदार, मुत्सद्दि, शिलेदार, सेनाधिकारी, अरब, रोहिल, पठाण, रजपूत, रांगडे, परदेशी, आणि इतर वीरश्रेष्ठ आपापल्या सैनिकी पोषखात सशस्त्र श्रीमतांना दाखल झाले. श्रीमंतांनी सर्वांची योग्य दखल घेतली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले….
रामराव गोविंदांना मुख्य प्रधानकी तर तात्या टोपेंची सरसेनापती पदी निवड झाली……
तात्या टोपे….. कुठलेही राज्य नव्हते त्यांच्या जवळ ….. कुठल्याही संस्थानाचे ते संस्थानिक नव्हते…… तरीही … बिऱ्हाड पाठीवर बांधून हा विर देशभर शिर तळहातावर घेवून वणवण फिरला….. कुणासाठी ? कशासाठी ?? फक्त स्वातंत्र्यासाठी !!! मग तो सरसेनापती होणार नाही तर कोण होणार ?
सर्व हिंदू संस्थानिक लढले…. मेले…. अमर झाले….. पण जेव्हा त्यांच्या स्वतःवर बालंट आले तेव्हा ….. लढले … फक्त स्वत:चे संस्थान वाचवण्याच्या हिशेबाने… तात्या एकटे देशाच्या स्वातंत्र्याच्या हिशेबाने लढले होते म्हणून त्यांची निवड केली गेली ती सर सेनापती म्हणून !
त्यानंतर श्रीमंतांनी अष्ट प्रधान नेमले, वीस लाख रुपयांची सैन्यात वाटणी केली, सर्वांना योग्य तो मान मरतब मिळाल्याचे सुख श्रीमंतांनी पाहीले…
आंग्ल सेनेला या नवीन प्रकट झालेल्या सिंहासनाच्या स्थापनेने पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला होता. आणी हेच उद्देश तात्यांचे व रावसाहेबांचे होते कारण ह्याची वार्ता मिळताच सर ह्यु रोज विश्रांतीची व प्रकृती अस्वास्थाची कल्पना पाठीस घालून रणांगणात येण्यास सिद्ध झाला. सर ह्यु रोज ने कुणालाही कानोकान खबर न लावता मोठे सैन्य व तोफखाना जमवायला सुरूवात केली. इंग्रजांची कुटील रणनीती मर्द मराठ्या तात्याच्या नितीच्या वेगळी होती. इंग्रज निकालाला महत्व देत…. तात्या नितीमत्तेला…! विजय कुणाचा होणार हे काळ ठरविणार होता….
अचानक इंग्रजी फौजा मुरार ला दाखल झाल्याची वार्ता पोहचली अन तात्यांच्या मर्जी विरूद्ध त्यांना इंग्रजांचा बिमोड करण्यासाठी मुरार पर्यंत धाव घ्यावी लागली… चुकलेल्या ठोकताळ्यांचे हिशेब वर्षोनूवर्ष देशाच्या जनतेला मोजावे लागतात…..
सर ह्यु रोज आपल्या उत्कृष्ठ सेनेच्या बरोबर ग्वाल्हेर वर चालून आला. तो पर्यंत तात्या टोपेंनी जोरदार लढाई केली पण मुरार वाचवण्यात त्यांना यश आले नाही(१६ जून १८५७) इंग्रजांनी मुरारची छावणी जिंकून घेतली. सर ह्यु रोज बरोबर पळून गेलेला शिंद्याही आलेला होता. त्याने ग्वाल्हेरच्या भोळ्या लोकांना स्वामिनिष्ठेच्या आवरणाखाली फुटवण्याचा प्रयत्नही केला. मुरारची छावणी जाताच समरसेनेला पुन्हा अवसान भरले पण अपयशाची चिन्हे दिसू लागताच फाटाफूट होत चालली.
*****************************

परंतू असल्या बिकट प्रसंगीही रणलक्ष्मी लक्ष्मीराणी अचंचल निश्चयाने तलवार घेऊन तयार आहे. तिला आता धास्ती कसली ? आशा आणी निराशा ह्यांना तिने पायाखाली तुडविले आहे. ऐहिक वैभवाची तिला किळस आलेली आहे. आता एकच महत्वाकांक्षा उरली आहे – लढत लढत रणांत मरेपर्यंत हा स्वातंत्र्यध्वज माझ्या तलवारीने ताठ तोललेला असो! ती किंवा तो धुळीत न पडता रणांत पडावा ! तिने त्या बेबंद सैन्याची शक्य तितकी व्यवस्था केली व आपण पूर्व बाजूचे संरक्षण करण्याचे काम अंगावर घेतले.
तिने नेहमीचा लष्करी पोषाख अंगावर चढविला, उमद्या घोड्यावर ती स्वार झाली, तिने म्यानातून आपली रत्नजडीत समशेर बाहेर काढली व आपल्या सैन्याची कडक कवाईत घेऊ लागली ! तिने कोटाकी सराईच्या बाजूने आपले मोर्चे उत्कृष्ठ तहेने सज्ज केले. अश्या ह्या युद्धदेवीच्या सैनापत्याखाली तिच्याच तेजाचे अनुरूप असे अतुल सैन्य असते तर ? अतुल नसलेले ते सैन्यदेखील तिच्या या रणोत्साहाने वीरावून गेले – कारण इंग्रजी सैन्य दिसतांच जिकडे तिकडे कर्ण, तंबूर, रणभेरी वाजू लागून आकाशमंडळ दणाणले. व राणी तिच्या निवडक स्वारांसह रणात समशेर चमकावीत तळपू लागली. तिच्या बरोबर ‘मंदर’ व ‘काशी’ ह्या तिच्या जिवलग दासीही तळपत आहेत.
राणी लक्ष्मीबाई आज शौर्यस्फूर्तीच्या शिखरास पोहचली. आकाश धूराने,धुळीने, रक्ताने,निनादाने व गर्जनेने जरी खच्चून भरलेले होते तरी तितक्यातूनही ती विजेसारखी चमका मारून निराळी पडत होती! तिच्या फळीवर स्मिथचा वारंवार मारा झाला. पण तिने तिच्या सैन्याची फळी फुटू दिली नाही. दिवसभर ती लढत होती. तिचे सैन्य जोषास चढून तिच्या समशेरीबरोबर शत्रुंना सपासप कापत होते. अखेर स्मिथ हटला. त्याने तिची फळी फोडण्याचा नाद सोडून दिला, व त्या काळसर्पीणीच्या बिळाची दिशा सोडून दुसया बाजूला तो वळू लागला.

जूनची १८ ता. उजाडली. इंग्रजी सेनेचा दिवस अमोघ होता. निरनिराळ्या दिशांनी ग्वाल्हेरवर चढाई करीत आज ग्वाल्हेर घेण्यासाठी त्यांनी शिकस्त चालविली. इतर दिशांकडे खुद्द सर ह्यू रोज गेलेला होता व झाशीराणीच्या दिशेला तो कालचा परतवलेला परंतु आज हट्टास पेटलेला व नव्या कुमकीने सबळ झालेला योद्धा ‘स्मिथ’च चालून आला. राणी आपल्या दळासह सिद्धच होती.
आज डोक्यास भरजरीची चंदेरी बत्ती, तमामी अंगरखा, पायात पायजमा आणि गळ्यात मोत्यांचा कंठा रुळत होता.
भात्यातून बाण ~ मेघांतून विज ~ गुहेतून सिंहीण ~ तशी घोड्यावर तळपणारी लक्ष्मीबाई ~ हातातली समशेर उपसून शत्रूवर सरळ चालून गेली. इंग्रजी योद्धे मी मी म्हणणारे पण तिच्यासमोर बेजार झाले.
“तिने आपल्या सैन्यासह तत्काल, अखंडीत व भयंकर हल्ले चालू केले आणि जरी तिचे सैन्य पुन:पुन्हा धारातीर्थात बुडून एकसारखे कमी कमी होत चालले, तरी राणी सर्वांच्या पुढे तळपत चाललेली दिसे. तिच्या भंगलेल्या सैन्यास पुन्हा गोळा करीत व शौर्याचे उत्कर्ष गाजवीत रणावलेली दिसे !” असे इंग्रज इतिहासात लिहीले आहे.
तिची बाजू अशी अतुल शौर्याने झुंजत असता, इतर बाजूंनी समरविरांना भंगवून इंग्रजी सैन्य तिच्या पिछाडी वर गर्जत आलेले तिला दिसले. तोफा बंद झालेल्या, सैन्य उधळून गेलेले, जवळ १५-२० घोडेस्वार काय ते शिल्लक, चोहोबाजुंनी इंग्रजी विजयी लगट ! राणी लक्ष्मीने आपल्या दासीसह तो शत्रुचा कोट फोडून समरविरांच्या मुख्य भागास मिळण्यासाठी घोड्यास टाच दिली – मागोमाग हुर्सास फलटणीचे आंग्ल स्वार चित्त्याप्रमाणे गोळ्या सोडीत मागे पडले. तरी ती झांशीची राणी समशेरीने सपासप मार्ग काढीत पुढे जात होती. मागे तिच्या दासीला फिरंग्यांनी घेरले व यमसदनास धाडले – राणीच्या हे लक्ष्यात येताच तीच्या दासीच्या मदतीसाठी ती मागे फिरली – चवताळून त्या फिरंग्यांवर धावली, तिच्या एकेका वारात एकेक शिर धडावेगळे होत होते ! दासीच्या वधाचा बदला घेउन ती परत समरविरांच्या मुख्य प्रवाहाला मिळण्यासाठी घोडदौड करू लागली.
एका लहानशा ओढ्याला येऊन ती भिडली. एक उडी व शत्रूच्या टप्प्यातून निसटलीच ! परंतू घोडा उडी घेईना- मांत्रीकाच्या विस्तवाचे वर्तुळ जणू त्याच्या भोवती पसरलेले होते- तो घोडा त्या ओढ्याच्या भोवती भोवती फिरे पण उडी घेईना ! तिचा तो रणांगणात प्रथीत झालेला जुना घोडा जर आज असतां ! तोवर द्ष्टीक्षेपात इंग्रजी सैन्य आले ! अन क्षणार्धात तिच्यावर कोसळले !! पण तिच्या तोंडून शरणाचा शब्द नाही !!! त्यांच्या अनेक तलवारींशी तिच्या समशेरीचे एकुलते एक पाते भिडले !
समोरच्या अघाताशी तिने खडाखड खटका उडविला, पण एका फिरंग्याने तिच्या मस्तकावर मागून वार केला ! त्या वारासरशी तिच्या मस्तकाचा दक्षिण भाग विच्छीन्न होऊन तो नेत्रही बाहेर आला !! – तितक्यात तिच्या छातीवर समोरून वार झाला अन मग चारही बाजूंनी !!! लक्ष्मीच्या शरिरातला शेवटचा रक्तबिंदू गळू लागला-“समर देवते, हा घे तूला शेवटचा बळी” असेच जणू सुचवित असावा! तसल्या आसन्नमरण स्थितीतही त्या मानिनीने आपल्यावर वार करणाया त्या गोया सार्जंटचा चुराडा केला… धन्य ती राणी आणी धन्य तीला जन्म देणारी ती भारतभूमी !
ती शेवटचे श्वासोश्वास करू लागली. इमानी सेवक रामचंद्रराव देशमुख जवळ पोहचले-त्यांनी त्या स्थानावरून त्या जखमी वाघीणीला दुर नेण्यात यश मिळवले-रक्ताने लाल झालेली ती रणलक्ष्मी रणशय्येवर पहुडली- गंगादास बाबांनी तिला शितजल दिले व तीचा प्राण-तो दिव्य आत्मा-तिच्या मृण्मय पिंजयातून उडून अंतर्धान पावला. तिचे निधन होताच रामचंद्ररावांनी जवळच्या गंजीतल्या गवताने तिची चिता रचली-गादिवर नव्हे… चितेवर-ती स्वतंत्र्य राणी सारखीच लढता लढता अमरत्वाच्या मंदिरात विराजमान झाली ! सत्तावन्न च्या स्वातंत्र्य समरातील अग्नीकल्लोळाची ही शेवटची ज्वाला स्वर्गाकडे गेली !
अशी ही रणलक्ष्मी लक्ष्मीराणी – कृतकिर्ती – कृतकृत्य विभुती राष्ट्राच्या अस्मितेला सफलता देते. अत्युत्तम सद गुणांची ही मंजूषा होती.
जातीने स्त्री ……
वयाने पंचविशीच्या आत…….
रुपाने खुबसूरत…………
वर्तनाने मनमोहक………
प्रजेची प्रिती…..
आचरणाने सच्छील…..
स्वदेश भक्तीची ज्वाला….
स्वातंत्र्याची स्वतंत्र्यता……
मानाची माननियता…..
रणाची रणलक्ष्मी……..
भारतभूमीची सुकन्या……
झांशीची राणी लक्ष्मीबाई……

“लक्ष्मीराणी आमची आहे” हे म्हणण्याचा मान मिळणे परम वैभव… इंग्लंडच्या इतिहासालाही तसला मान अजून मिळालेला नाही!
भारतभुमीचे सौभाग्य की राणी लक्ष्मीवर गर्वोक्ती करण्याचे भाग्य ह्या भुमीला मिळाले !
~~~0x0~~~