मराठी गीत व संगीतकार श्री.यशवंत देव ह्यांच्या ८०व्या वाढदिवसा निमित्त हृदयेश आर्ट्स तर्फे त्यांचा हृद्य सत्कार समारंभ शनिवार-१९नोव्हे. रोजी पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात संपन्न झाला – त्याचा हा वृत्तांत.
श्री. प्रदीप भिडे ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन ठीक ८ वा. सुरू करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
तनुजा वैद्य-जोग ह्या श्री.देवांच्याच शिष्येने ‘तुळशीच्या बनी’ ह्या देवांनी संगीतबद्ध केलेल्या भक्तिगीताने सुरुवात करीत ‘तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट’ हे भावगीत पाठोपाठ सादर केले. मंगेश पाडगावकरांच्या नव्या कोऱ्या येऊ घातलेल्या काही भावगीतांपैकी ‘सांग कुठे भुलला ग राधे तुझा श्याम’ ह्या गीताने तनुजा वैद्य जोगांनी ह्या कार्यक्रमातील स्वतःच्या सहभागाची सांगता केली.
तत्पुर्वी श्री. भिडे ह्यांनी श्री.यशवंत देवांनी प्रचलित केलेल्या “समस्वरी” ह्या गीत प्रकाराबद्दल गमतीदार माहिती सांगितली. ‘सांग कुठे भुलला’ च्या आधी तनुजा ह्यांनी “समस्वरी” प्रकारातले एक गीत सादर केले. हिंदीतल्या “जवाँ है मुहोब्बत-” च्या चालीवर मराठीत “मी जाते माहेरी, गुंडाळून गाशा. नको ती भांडणे, नको तो तमाशा” हे गीत सादर करताच सभागृहात हास्याचा धबधबा कोसळला.
मी इयत्ता ७वीत असताना गिरगांवच्या देशस्थ यजुर्वेदी माध्यांदीन ब्राह्मण सभेच्या सभागृहात श्री. यशवंत देवांनी सादर केलेल्या मराठी “समस्वरी” ची आठवण प्रकर्षाने आली.
“स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” वरील समस्वरी त्यांनी “चौपाटीच्या बाकावरती वचन दिले तू मला” असे केल्याचे मला अजूनही आठवते.
जवळपास १५०० गीतांना चाली देऊन संगीतबद्ध करणाऱ्या श्री.यशवंत देवांबद्दल बोलताना भिडे कौतुकाने (नारदाची गोष्ट संगत) म्हणाले की, मुंबईतल्या शिवाजी पार्कचे हे देव यशवंतही आहेत व आनंदही आहेत.
पाठोपाठ माधुरी करमरकर ह्यांनी रसिक मनाचा ताबा घेतला तो देवांनीच संगीतबद्ध केलेल्या ‘जीवनांतली घडी अशीच राहू दे’ ह्या आजवरच्या लोकप्रिय गीताने. ‘विसरशील खास मला’ ह्या त्यांच्याचं गीताला मिळालेला श्रोत्यांचा प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त होता. माधुरी ह्यांनीही “समस्वरी” ह्या प्रकारातले देवांचे “ओह सजना, बरखा बहार आयी” वरील “ही बघ ना नटून थटून सांज आली” हे गीतही रसिक वर्गाची वाहवा घेऊन गेले.
माझे आवडते कवी श्री. मंगेश पाडगावकर ह्यांची खास उपस्थिती मनाला सुखावून गेली. त्यांनी श्री.देवांच्या गौरवापर छोटेखानी भाषण केले.श्री. यशवंत देवांनी त्यांच्या कित्येक गीतांना चाली दिल्या व ती गीते अजरामर झाली ह्याची आठवण करीत देवांच्या १००व्या वाढदिवसाचा कार्यक्रम येथेच पार पडो व मी व आपण रसिक वर्ग त्या कार्यक्रमाला उपस्थित राहो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. फक्त “आनंद यशवंत” हे नाव असलेल्या ह्या कार्यक्रमातला “देव” हरवू देऊ नका- असेही त्यांनी यशवंत देवांना सुचविले.निर्व्यसनी देवांचे कौतुक करताना ” हा असा संगीतकार आहे जो दारू पीत नाही, सिगरेट ओढत नाही व तंबाखू खात नाही” हे आवर्जून सांगितले.
“प्रेम करणाऱ्याने प्रेम कधी तराजूत तोलू नये व गायनाच्या कार्यक्रमात भाषण देणाऱ्याने जास्त बोलू नये.” असे सांगत त्यांनी भाषणाची पूर्तता तर केली पण जाण्यापूर्वी त्यांनी-
“मी आज ७५ वर्षांचा, देव आज ८० वर्षांचे तर श्री.गजानन वाटवे (उपस्थित होते) आज ९० वर्षांचे आहोत. आमचे सत्कार समारंभ होत असताना आम्ही थरथर कापत कोणाच्या तरी हातांचा आधार घेत मंचावर येतो त्याचा अर्थ आमची प्रतिभा, आमची गायकी वा आमची मराठी कोणाच्या आधाराने चालणार किंवा पुढे सरकणार असा घेऊ नये” हे सुनावताच श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. ” ही मराठी आपल्या स्वत:च्या पायावर उभी राहणारी आहे व तिला कुठल्याही हाताची गरज नाही” हे टाळ्यांच्या गजर संपल्यावरचे वाक्य अधिक टाळ्या घेऊन गेले.
श्रोतवृंद श्री. पाडगावकरांच्या बोलांत मंत्रमुग्ध असतानाच श्री.श्रीधर फडके ह्यांनी मंचाचा ताबा घेतला – स्पष्ट व साध्या मराठीत “नमस्कार” असे रसिकांना वंदन करीत त्यांनी “देव काकांना मी घरातल्या समोरच्या खिडकीत बसून वहीत काहीतरी लिहिताना बघत असे”.”त्यांची मला खूप भीती वाटे” “त्यांनीच मला सर्वप्रथम गाण्याची संधी दिली व तू सुधिर फडकेंचा मुलगा आहेस हे लक्षात ठेवून गाणे गा असेही बजावले” ह्या व अशा कित्येक आठवणी श्री.देवांबद्दल सांगितल्या.
कै. सुधीर फडके (बाबूजी) ह्या माझ्या आवडत्या गायकाचे गाणे प्रत्यक्ष बघण्याचे सौभाग्य मला कधी लाभलेच नाही परंतू श्रीधर फडकेंनी हुबेहूब त्यांच्याचं आवाजात जी गाणी सादर केली त्यांतूनच माझी दुधाची तहान मी ताकावर निभावून नेली.
मग सुरू झाली खऱ्याखुऱ्या आवडत्या भावगीतांची पर्वणीच श्री. देवांनी संगीतबद्ध केलेले व बाबूजींच्या स्वरातले “तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे” श्री.दिलीप पांढरपट्टे ह्यांच्या ‘घन बरसे’ मधील “आई असते शांत…..”कधी बहर- कधी शिशिर-” मागोमाग अजून एक छान गाणे- “काही बोलायचे आहे पण बोलणार नाही” ह्या गीताने श्रीधरने स्वत:च्या सहभागाचा समारोप केला.
श्रीधर फडके नंतर उत्तरा केळकरांनी अष्टपैलू गीतांचा गालिचाच रसिकांसमोर उलगडला. बहिणाबाईंच्या – यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेल्या – “जाय आता पंढरीले” ही ओवी व “खोप्या मंधी खोपा सुगरणीचा चांगला…..” ही ओवी सादर केली. विं दा करंदीकरांचे ४ वेगवेगळ्या चाली एकत्र असलेले “सर्वस्व तुजला वाहिले” ह्या कठीण भावगीतानंतर आली मऱ्हाट् मोळी लावणी….. “माघाची थंडी माघाची…..” ह्या लावणीला संयमीत पार्लेकरांनी शिट्ट्या व टाळ्यांनी सभागृह डोक्यावर उचलून घेतले व आपणही खरे ‘मऱ्हाटी’ असल्याचेच दाखवून दिले.
ज्या गीतांसाठी मी तासभर तर सोडाच,…. दिवसभर रांगेत उभे राहून प्रवेशिका मिळवण्यास तयार होतो त्या गायकाची मी उत्सुकतेने वाट पाहतं होतो. श्री.अरुण दाते ह्यांचे मंचावरील आगमन सर्वांनीच टाळ्यांच्या गजरांत केले. “मी पाहिले वाहिले व त्यानंतरही सर्वाधिक गाणी श्री. यशवंत देवांचीच म्हटली आहेत” असे संगत श्रीनिवास खळे ह्यांचे १९६३ मधले “शुक्रतारा मंदवारा” हे गीत यशवंत देवांनीच संगीतबद्ध केल्याची आठवण करून दिली. “कविता चांगली नसेल तर गीत कधीच अजरामर होत नाही व टिकून राहणार नाही” असे संगत त्यांनी श्री.यशवंत देवांची व समोर बसलेल्या आशा भोसलेंची स्तुती केली. आशा भोसलेला “फिट्ट” बसणारे गीत – “दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे” हे सादर केले. त्या पाठोपाठ सुरू केलेल्या “अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी- लाख चुका असतील केल्या; केली पण प्रीती” ह्या गीताला सुरुवातीलाच टाळ्यांचा कडकडाट झाला. “जीवनाच्या सोहळ्याला जायचे आहे, आपले आनंद गाणे गायचे आहे” ह्या देव व दाते ह्यांच्या येऊ घातलेल्या नव्याकोऱ्या भावगीता पाठोपाठ दोघांचे सर्वोत्कृष्ट व सुप्रसिद्ध “भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी” हे सादर झाले.
“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे” ह्या माझ्या आयुष्यातल्या सर्वांत आवडत्या गीताने श्री. दाते ह्यांनी ह्या संगीत समारंभाची सांगता केली हे माझे सुदैव !
त्यानंतर मध्यांतर झाले.
मध्यांतरानंतर श्री.यशवंत देव, सौ.करुणा देव, श्री.गजाननराव वाटवे व श्री.गजाननराव सुखटणकर ह्यांचा आशा भोसले ह्यांच्या हातून सत्कार करण्यात आला. मऱ्हाटमोळी पगडी देऊन श्री.यशवंत देवांवर छतातून पुष्पवृष्टी करण्यात आली.
नंतर सुरू झाली आशा भोसलेंशी अनौपचारिक गप्पांची मैफील त्याचा सारांश –
आशा- मराठी बोलण्याची मला सवय थोडी कमी आहे कुठे चुकले तर मोठ्या मनाने क्षमा करा
आशा- खरे ब्राह्मण हे असे असतात (देवांकडे हात दाखवून) पगडी त्यांना अगदी शोभून दिसते- इतरांनी पगडी घातली तर ती चांगली दिसत नाही.
आशा- मला पगडी घालण्याची खूप इच्छा आहे पण कोणी घालतच नाही आता मी विश्वासला (हृदयेश आर्ट्स चे) सांगणार आहे तू नेहमी मला टोपी घालतोस पुढच्या कार्यक्रमाला मला पगडी हवी.
आशा-ग्रॅज्युएशनची टोपी घालण्याची मला खूप इच्छा होती पण मी फक्त ४थी ५वी शिकलेली – पण ही इच्छा एका गीताने पूरी केली व मला ग्रॅज्युएशनची टोपी घालायला मिळाली. ती टोपी घालूनच मी स्टेजवर गाणे म्हटले कारण भीती वाटत होती, त्यांनी ती परत दिलीच नाही तर ?
देव- वाटव्यांवरील कविता वाचून दाखवत- वाटवे हे मराठी भावगीतांचे गेटवे आहेत.
आशा- वाटव्यांच्या भावगीत म्हटल्याने मी माईंच्या हातचा मार खाल्ला आहे (राधे कसा गं सैल झाला तुझा अंबाडा ह्या गीताचे ध्रुपद ऐकवून)
आशा- (टीव्ही वरील मुलाखतकार बायकांच्या हुबेहूब नकला करून खूप हसवले.) ह्या मुलाखती घेणाऱ्यांनी त्या व्यक्तीचा फोटो ठेवून मुलाखत घेतली तरी चालेल अशा मुलाखती घेतात.
आशा- आपण सर्वप्रथम केंव्हा भेटलो ह्याची आठवण करून दिली – परत एकदा “विसरशील खास मला दृष्टीआड होता” ह्या गीताचे एक कडवे दोघांनी सादर केले
आशा- फडके व देव हे दोघेही सारख्या ताकदीचे संगीतकार- ह्यांच्या बरोबर काम करायचे म्हणजे माझी मधल्या मध्ये पंचाईत व्हायची. फडके दाबून गाणारे तर देवांना मनमोकळे व आवाज न चोरता गाणे आवडायचे.
आशा-(बाबूजींची हुबेहूब नक्कल करीत) फडके असे गात – ह्या नंतर बाबूजींच्या आठवणी आशाने व्यक्त केल्या.
देवांनी ढगाला लागली कळ वर एक विडंबन(राजकारणावर)काव्य सादर केले “राजकारणात साचलाय मळ – त्याची भोगतोय फळ ”
ई-टीव्ही वर शिघ्रकाव्य बसल्या बसल्या केल्याची आठवण देवांनी सांगितली आम्ही मुलींशी बोलण्यासाठी महिनो न महिने घ्यायचो तर आजकालची मुले सरळ ‘आती क्या खंडाला’ असे म्हणतात हे साम्य रिमिक्स चे व जुन्या गीतांचे असल्याचे देवांनी सांगितले.
रिमिक्स मुळे बेरोजगारी कमी झाल्याचे श्री. देव उपहासाने म्हणाले- जेथे फक्त तबला पेटी व तंबोरा ह्या निवडक वाद्यांवर आम्ही गाणे ऐकवले आहे तेच गाणे आज १२/१५ पोरं वेगवेगळी वाद्ये वाजवत,कॅमेरा सोबत सादर करतात. संगीत श्रवणीय वरून प्रेक्षणीय झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
असतील नसतील (जास्त करून नसतील) तेव्हढे तोकडे कपडे घालून आजचे संगीत सादर केले जाते ह्याविषयी श्री. देवांनी खंत व्यक्त केली.
आशाच्या गायकीचे अमाप कौतुक श्री.देवांनी ह्यावेळी केले. स्वतःची एक शैली त्यांनी कायम ठेवल्याचे आवर्जून सांगितले. अनुकरण व अनुसरणं ह्यावर त्यांनी ह्या निमीत्ताने उदाहरण दिले. “जेवताना समोरचा काटा चमच्याने जेवतो म्हणून मी त्याचे बघून काट्या चमच्याने जेवलो ते अनुकरण पण मी माझ्याच ताटातले जेवलो ते अनुसरणं.”
देवांनी आशावर सुंदर कविता सादर केली.
आशा- “एका गाढवाच्या मालकाने पैज लावली होती की, ह्या गाढवाला मी नाही ह्या अर्थीचे काहीच शिकवले नाही तो प्रत्येक गोष्टीला होकारच देतो- मी ती पैज जिंकली… फक्त गाढवाच्या कानांत जाऊन विचारले की पॉप रिमिक्स गाऊ का व पैज जिंकली.”
आशा-देवांनाः खर सांगा; दिदी व मी ह्यांत तुम्हाला कोणाचे गाणे जास्त आवडते ?
देव- लताची गाणे म्हणण्यामागची आत्मीयता व ती स्वतःला वाटेल तेच गाते पण वाट्टेल ते गात नाही हे सांगितले
आशा- मला जे मिळेल ते गाणे मला म्हणावे लागले कारण माझी परिस्थिती तशी होती. मला मुले होती व त्यांच्या संगोपनाची व ग्रॅज्युएटच्या टोपीची जबाबदारी माझ्यावर होती म्हणून जे समोर येईल ते गाणे मला घ्यावे व गावे लागले.
आशा- आजही गाण्याची मला गरज आहे कारण आज गाणे हा माझा श्वास आहे व मी स्वयंपाक करीत असतानाही गाणे गाते. गायल्या शिवाय मी जिवंत राहूच शकत नाही.
श्री. देवांनी पाडगांवकरांची एक गमतीदार कविता सादर केली. “कोंबडीच्या अंड्यातून बाहेर आले पिल्लू….”
त्यानंतर “संथ वाहते कृष्णामाई” वर एक विडंबन गीत त्यांनी सादर केले- “संथ गातसे कृष्णाबाई,गीतांमधल्या सुर तालांची जाणीव तीजला नाही”
“मरण येणार म्हणून कोणी जगायचे थांबेल का ” हे पाडगांवकरांचे बोलगीत श्री. देवांनी सादर केले.
आशा- मी आपल्या ८५,९०,९५,१०० ह्या वाढदिवसांना येत जाईन
देव- पंचवार्षीक योजना दिसतेय तुझी ! (हशां व टाळ्या) पण तोवर मी जगलो तर.
आशा- माझे नांव आशा आहे हे विसरू नका !
ह्या संवादाबरोबर टाळ्यांच्या कडकडाटात ह्या कार्यक्रमाची सांगता झाली.
अत्यंत घरगुती वातावरणांत पार पडलेल्या ह्या कार्यक्रमाच्या प्रवेश पत्रिका विनामुल्य सकाळी ८.३० ते ११.३० पर्यंत उपलब्ध असल्याची जाहिरात वाचून मी ८ वाजता पोहचलो. जेमतेम दोन पत्रिका मीळाल्या, त्याही रांगेत तासभर वाट पाहिल्यावर !
पण असे कार्यक्रम बघायला मिळाल्यास दिवसभर रांगेत उभे राहण्याची तयारी आहे-