अंतर्दर्शन (एंडोस्कोपी)
(शरीरातील अंतर्भागाची दूर्बीणी ने तपासणी.)
शरीरातील अंतर्भागाची पूर्ण तपासणी करण्या साठी व आवश्यकता पडल्यास उपचार करण्यासाठी अंतर्दर्शक (एंडोस्कोप) या यंत्राचा उपयोग केला जातो.
ह्यात मुख्यत्वे दोन प्रकार असतात = कडक व लवचिक
कडक हया प्रकारची यंत्रे साधरणतः शल्य चिकित्सक हर्णिया, ऍपैंडीक्स यां सारख्या किंवा स्त्रियांच्या गर्भ संबंधीत रोग निदानात वापरतात. तर लवचिक ह्या प्रकारच्या यंत्रांचा वापर पोटाचे,लहान किंवा मोठ्या आतड्यांचे विकार,जठराचे विकार वगैरे,गुद्-द्वार व त्या मार्गांचे विकार यासाठी वापरले जातात.
ह्या भागात आपण एंडोस्कोपी ह्या विषया संदर्भात थोडी तांत्रिक माहिती घेऊया.
दुर्बिणी सारखी संरचना असणाऱ्या या यंत्रातून प्रकाशवाहक काचतंतूंचा (काचें पासून बनवलेले रज्जू) वापर केल्याने पलीकडील प्रतिमा सुस्पष्ट बघता येते. ही शरीराचा आतील भागातील प्रतिमा बघून शरीराच्या पोकळीत असणाऱ्या अवयवांचे रोग निदान करते.
रोग निदान करण्यात येणाऱ्या पोकळीत अंधार असल्याकारणाने ती प्रतिमा दिसण्यास अडथळा येऊ शकतो म्हणून हॅलोजन प्रकाशाच्या माध्यमाचा प्रखर किरणझोत ह्या यंत्रातून सोडण्याची व्यवस्था केली आहे. ही व्यवस्था प्रकाश स्रोत (लाइट सोर्स) नावाच्या अतिरिक्त जोडणी मार्फत केली जाते. रोग निदानासाठी पोकळीत हवा भरून पोकळीचा आकार मोठा केला जातो. ज्यामुळे अंतर्दर्शकाची शरीराचा पोकळीच्या आतील हालचाल सुलभ रितीने होऊ शकते.(रोग निदान झाल्यानंतर, ही हवा खेचून काढण्यात येते.)
पोकळीच्या आतील भागाचे निरीक्षण सुलभ रितीने होण्यास मदत व्हावी व नको असलेल्या द्रव पदार्थामुळे तपासणीत अडथळा येऊ नये म्हणून एंडोस्कोपला असणाऱ्या शोषण वाहिनीमार्गे (सक्शन चॅनल) हा नको असणारा द्रव पदार्थ बाहेर खेचून काढण्यात येतो. ह्यासाठी शोषक पंप (सक्शन पंप) हे यंत्र वापरण्यात येते.
अडकलेली किंवा लहान मुलांनी गिळलेली पिन,क्लिप,बटण वगैरे किंवा प्रयोगशाळेत पाठवावा लागणारा आतड्याच्या आतील छोटासा तुकडा (बायोप्सी) शोषण वाहिनीच्या मार्गिकेतूनच एका छोट्या चिमट्याने काढता येतो.
एंडोस्कोपी ही अत्यंत सोपी उपचार निदान पद्धत आहे.
शरीराच्या वेगवेगळ्या पोकळीत जाऊन पोहचणाऱ्या व शरीराच्या लवचिक (अन्ननलिका,पोट/आतडी)भागांत लीलया प्रवेश करणाऱ्या ह्या यंत्रणेचे वैद्यकीय महत्त्व फार मोठे आहे. विविध भागांतील रोग निदान करून त्या अनुसार औषधोपचार करण्यासाठी या उपकरणाची अद्यावत आवृत्ती म्हणजे “व्हिडिओ इमेज एंडोस्कोप” साधारणतः १९८५ च्या सुमारास भारतात अवतरली.
त्या पूर्वी एंडोस्कोपी यंत्राच्या नेत्रकाला (निरीक्षण दर्शक भागाला आय-पीसला) व्हिडिओ कॅमेरा लावून त्याचे चित्रण बघता यायचे.कॅमेऱ्याची व्हिडिओ चिप अंतर्दशी यंत्रणेतच बसवण्यात आली त्यामुळे अत्यंत सुस्पष्ट चित्रीकरण मिळविण्यास मदत झाली. रोग निदान करतानाचे अगदी बारीक तपशील मिळाल्याने चिकित्सकाला त्यावर संशोधन करता येऊ लागले. सर्वात महत्वाचे म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयां मध्ये हे चित्रीकरण पुनर्प्रक्षेपित करून तेथील विद्यार्थ्यांना त्याचा शिक्षणासाठी उपयोग झाला.
केलेले चित्रीकरण आवश्यकता पडल्यास दुसऱ्या चिकित्सकाला दाखवून त्यावर दुसरे मत (second opinion)मिळवता येऊ शकले. आता तर चिकित्सक अंतर्दर्शक संगणकाला जोडून त्यावर केलेल्या चित्रीकरणाचे सीडी स्वरूपांत किंवा प्रिंटरला जोडून फोटो /छाया स्वरूपांत रूग्णांना अहवाल देऊ शकतात.
त्यापुढील झेप म्हणजे अद्ययावत दूरसंचार व इंटरनेट क्षेत्राच्या मदतीने केलेली प्रगती ~ बाहेरील देशांत होत असलेल्या शस्त्रक्रिया थेट प्रक्षेपणामार्फत भारतात सुरू असलेल्या वैद्यकीय बैठकांमध्ये (conference)दाखवून एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण सोयीची झाली. वैद्यकीय चिकित्सा पारदर्शकतेने होऊन रूग्णाला समाधान कारक तसेच खात्रीलायक सेवा मिळण्यास मदत झाली.
अंतर्दशकयंत्रा द्वारे करण्यात येणाऱ्या अनेक उपचार पद्धतींची साधारण माहिती येथे घेऊ.
१. बायोप्सी ~ अन्न-नलिका,पोट किंवा ल./मो. आतड्याचा कर्करोग असण्याचा संशय असल्यास तेथील तुकडा काढून प्रयोग शाळेत तपासणी साठी पाठवतात व ह्यासाठी चिमट्याचा उपयोग केला जातो त्याला बायोप्सी फोर्सेप म्हणतात.
पडदे टांगण्यासाठी पूर्वी धातूची स्प्रिंग वापरायचे त्या प्रकारची परंतू अत्यंत उच्च दर्जाच्या विशिष्ट पोलादा(३०४)पासून बनवण्यात आलेल्या स्प्रिंगचे हे चिमटे क्लिष्ट रचनात्मक असतात. साध्या चमच्याच्या आकारांपासून ते सुसरीच्या दातांसारखी रचना असणारे हे चिमटे, कितीही जाड/कठीण तुकडे खेचून काढू शकतात. शोषक मार्गिकेतून प्रवेश करणारे हे चिमटे भले मोठे वाटत असणार परंतू ते फक्त २.५ मिमी व्यासाचे असतात.ह्या चिमट्याच्या दुसऱ्या टोकाकडे असणाऱ्या पकडी(हँडल)च्या साहाय्याने त्यांची उघड/झाप करता येते. अंतर्दर्शकामधून बघत इच्छित स्थळी चिमटा पोहचल्यावर तेथे तो स्थिर राहावा म्हणून त्याच्या पकडीच्या मधोमध त्याला खिळ्यासारखा स्पाईक असतो.
२. sclero इंजेक्शन सुई- पोटाच्या आतील भागांत जखम (अल्सर) झाली असेल व तेथून रक्तस्राव होत असेल किंवा रक्ताची ओकारी होत असेल तर त्या विशिष्ट भागांत इंजेक्शन देण्यासाठी, ह्या सुईचा वापर करतात. टॅफलॉन पासून बनवलेल्या नळ्यांना पुढे सुई लावलेली असते व मागे हँडल. शोषक मार्गिकेतुनच जाणाऱ्या ह्या (दोन) नळ्या एकात एक असतात. बाहेरील नळीला(outer)सिरींज लावून त्याद्वारे आवश्यक तो द्राव आतील नळीतील(inner)सुई मार्फत जखमी भागावर टोचून सोडतात. काही द्रावणे ही तत्काळ परिणाम साधणारी असतात व लगेच रक्तस्राव थांबवण्यास मदत करतात. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी रबरी धाग्यांचा (रबर बँड) उपयोगही करता येतो. ह्यात क्लिष्ट असणाऱ्या यंत्रणे मार्फत जखमी भागावर रबरी धागा बांधता येतो. जसे आपण दोऱ्याने आपले बोट बांधले की रक्त साकळते त्या प्रमाणे ज्या भागातून रक्तस्त्राव होत असेल तेथे हा रबरी धागा बांधला की त्वरित रक्तस्त्राव थांबतो. अनेकदा उलटी वाटे रक्त होत असलेले रूग्ण ह्या उपचाराने स्वतःच्या पायाने घरी जाताना मी पाहिले आहेत.
हे सर्व उपचार कोणतीही शस्त्रक्रिया न करता फक्त तोंडावाटे अन्न-नलिकेत नळी म्हणजेच अंतर्दर्शक सोडून केली जाते. ह्यात भूल द्यावी लागत नाही तसेच शस्त्रक्रिये पूर्वी किंवा नंतर होऊ शकणाऱ्या समस्या टाळता येतात. रूग्ण २ तासांत स्वतःच्या पायाने घरी जाऊ शकतात. अत्यंत सोपी व सोयीस्कर अशी ही रोग निदान पद्धती ही आजकाल लहानातल्या लहान गांवातूनही उपलब्ध आहे.
चिमटे, सुया वगैरे उपयोगी साहित्ये बनवण्याची मक्तेदारी आधी बाहेरील देशांतच होती. पण आमच्या सारख्या काही महाभागांनी हा उद्योग सुरू केल्या मुळे आता ह्या वस्तू स्वस्त भावात भारतातही तयार होऊ लागल्या आहेत.
एंडोस्कोप द्वारे कर्करोगावर केलेल्या उपचार पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या उपकरणां बद्दल काही सांगायचा विचार आहे. आपल्या रोगविषयक सल्ल्यांसाठी मात्र कृपया विशेषज्ञालाच भेटा. वाचकांना सर्वसाधारण वैद्यकीय उपकरणां बद्दल माहिती व्हावी म्हणून मी येथे देत आहे.
डायलेटेशन – अन्ननलिकेचा आकुंचित पावलेला भाग मोठा करण्याचे तंत्र.
काही विशिष्ट कर्क रोगांमुळे किंवा आत्महत्येसाठी वा स्वस्त दारू पिण्याच्या नांदात गिळलेल्या आम्लाने काही रूग्णांमध्ये अन्ननलिकेचा भाग आकुंचित पावतो. त्यामुळे अन्न गिळण्यास त्रास होणे किंवा जेवल्यानंतर उलटी होणे ह्या तक्रारींवर डॉक्टर एंडोस्कोपी केल्यानंतर कोणत्या प्रकारची पद्धती अवलंबायची ते ठरवितात.
ह्यांत कापडी वा रबरी फुग्याद्वारे, रबरी नळी द्वारे, धातूच्या लंबगोल केलेल्या भागांद्वारे अन्ननलिकेचा आकुंचित पावलेला भाग मोठा करता येतो.रूग्णाच्या तोंडातून दुर्बिण (एंडोस्कोप) घातली जाते.
अन्ननलिकेच्या ज्या भागाला विकार झाला आहे त्या भागातून दुर्बिण पुढे गेली की शोषण मार्गिकेतून मार्गदर्शक तार (गाईड वायर)घालतात. ही तार बरीच आंत-पोटापर्यंत घालतात व क्ष-किरणांच्या चल यंत्राद्वारे (एक्सरे/सी आर्म)तीची स्थिती जाणून घेतात. पाहिजे त्या स्थितींत तार पोहचली की तार मध्ये ठेवून दुर्बिण काढून घेतली जाते. तोंडातून पोटापर्यंत गेलेल्या तारेवरून कापडी वा रबरी फुगा ओवला जातो.
हा रबरी / कापडी फुगा एका नळीवर पुढे १० सेंमी अंतर सोडून बसवलेला असतो. ह्या नळीला पुढे (रबरी फुग्याच्या पुढे) दोन छिद्रें असतात. अर्थातच एक छिद्र मार्गदर्शक तार ओवण्यासाठी वापरले जाते तर दुसऱ्या छिद्रांतून क्ष किरण यंत्रातून दिसणारा द्राव (डाय)सोडतात. ह्या व्यतिरिक्त तिसरे छिद्र फुग्याला हवा भरून फुलवण्या साठी ठेवलेले असते व ते फुग्याच्या आतील भागांत असते जेणेकरून हवा भरत असतांना ती दुसरीकडे कुठे न जाता फक्त फुग्यातच भरली जाईल. नळीच्या दुसऱ्या टोकाकडून सिरींजने फुग्यात हवा भरतात व तो फुगवला जातो.अन्ननलिकेचा आकुंचित झालेल्या भागाजवळ फुगा नेऊन आवश्यकते प्रमाणे फुगवला जातो. फुगा फुलवून तो थोडा वेळ तसाच राहू दिला जातो. आवश्यकतेप्रमाणे फुगा पुढे मागे करून आकुंचित झालेला भाग मोठा करण्यात येतो. परत एकदा दुर्बिण टाकून केलेल्या कामाची खात्री केली जाते.
ह्याच पद्धतीने कापडी फुगा फुगवतात परंतू तो तारेतून ओवण्या ऐवजी सरळ दुर्बिणीलाच पुढील टोकाला बांधतात व थेट आत सरकवून फुलवतात.रबरी नळ्यांनी किंवा धातूंच्या डायलेटर्स ने करण्यात आलेली पद्धत मात्र वेगळी आहे. तारे वरून एक बारीक ५ मिमी ची नळी (जीला पुढे तार ओवण्यासाठी छिद्र असते)आधी ओवतात. तीला दोन-तीन वेळा मागे पुढे करून मार्ग बनवला / मोठा केला जातो. ती काढून ६ मिमी ची नळी ह्याच पद्धतीने आंत सरकवतात. नंतर ७/८/९ वगैरे. अशा १६/१८ मिमी पर्यंतच्या नळ्या उपलब्ध आहेत.
अर्थात हे एका दिवसांत न करतां अनेक भेटी देऊन(मल्टीपल सिटिंग्स) टप्प्या-टप्प्यात परिणाम साधला जातो. रबरी नळी तर काही वेळां सरळ रूग्णालाच विकत घ्यायला सांगून- घरच्या घरी स्वतः ही पद्धत करावयास शिकवतात. त्यामुळे रूग्णांचा ये-जा करण्याचा त्रास व बरांच पैसा वाचतो – अर्थात हे रोगाच्या गंभीरतेवर अवलंबून असते.
काही कर्करोगांच्या रूग्णांना-सेल्फ एक्स्पांडेबल मेटॅलीक स्टेंट (आपोआप प्रसारित होणारे धातूचे नळकांडे) लावून अन्ननलिकेची रुंदी वाढवली जाते. फार महाग असे हे नळकांडे बाहेरून आयात करावे लागते. ह्या पद्धतीत दुर्बिणी द्वारे जागा सुनिश्चित केली की प्रसरण पावणारे जाळीचे नळकांडे फिरवून व सरकवून बसवतात. ही पद्धत अगदी सोपी आहे व बंदुकीच्या चापाने जशी गोळी सुटते तसे हे नळकांडे इच्छितं जागेवर बसवता येते परंतू हे नळकांडे बनवण्याची प्रक्रिया मात्र अतिशय क्लिष्ट आहे व कॉपीराईट्स कायद्यामुळे माहिती देणे कठीण आहे.अत्यंत दुर्धर अशा कर्करोगांवर खात्री लायक उपचार पद्धती वरील काही यंत्रांद्वारे उपलब्ध झाली.