गगन भरारी – (५-शेवट!)

                                                               su-30c1.jpg

मेजरला रडार जॅमरचा क्रमांक बंगळूरहून आलेल्या यादीतून शोधून काढायला फारसे श्रम पडलेच नाहीत. गगनचे निकामी झालेले पार्ट्स योग्य ती कागदपत्रे तयार करून झाल्यावर सुरक्षितपणे बंगळूरला पाठवली जात. हा जॅमर निकामी झालेला होता, परंतू बंगळूरला पाठवण्याच्या आतच त्याला पंख फुटले होते……  मेजरने सर्वच अधिकाऱ्यांचे फ्लाइंग रेकॉर्ड्स मागवून घेतले होते. तेच तो वाचत होता.

बॅलेस्टिक रिपोर्ट अपेक्षेप्रमाणेच आलेला होता.- एव्हिएम भोसल्यांवर व विजयसिंह वर गोळ्या एकाच पिस्तुलातून झाडलेल्या होत्या. ३ मीमी बोअरचे हे पिस्तूल चिनी बनावटीचे असून भारतात अधिकृतरीत्या फक्त २० जणांकडे असल्याचे त्या खात्याने कळवले होते. सगळेच मालक पूर्वेकडील होते व संरक्षण खात्याच्या बाहेरचे होते.
गेस्टरूम मध्ये बसून शांतपणे तो सर्व कागदपत्रे विचारपूर्वक तपासत होता.   
पिस्तुलाच्या बनावटी वरून शेजारच्या कुठल्या देशाला भारताच्या डिआरडिओ संशोधनात रस होता हे मेजरच्या लक्षांत आले होते. फोरेन्सिक अहवालाची फारशी आवश्यकता मेजरला आता वाटत नव्हती. ते रक्त अमरच्याच रक्तगटाशी मिळते जुळते असणार हे त्याला पूर्वीच्या अनुभवांवरून ताडता येत होते.

विजयसिंह वर अगदी जवळून गोळी झाडण्यात आली होती. जखमेतल्या कार्बन जमा झालेल्या जागेवरून कळत होते की, ओळखीच्या माणसाबरोबर तो एकांतात गेला असावा. व तेंव्हाच सायलेन्सर लावलेल्या त्याच पिस्तुलातून गोळी झाडलेली असावी. विजयसिंह च्या पत्नीने तो कोणा “साहब” बरोबर कामासाठी जात असल्याचे बोलला होता इतकेच स्थानिक पोलिसांना सांगितले होते. विजयसिंह चा फोटो अमरने ओळखला होता. रेकॉर्डरूम मध्ये बेशुद्धावस्थेत एकदा पाहिल्याचे आठवलेला विजयसिंहच होता. फक्त “साहब” ची ओळख पटायची बाकी होती.

                                                                                                   20060825134819chiefboarding1.jpg

त्याने परत एकदा रडार जॅमरची यादी नीट तपासली. सर्व अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल घेऊन तो वाचत बसला…… खास करून एका अधिकाऱ्याची माहिती त्याने जास्त खोलात जाऊन वाचली. हळूहळू तो एका निष्कर्षावर येत होता. फक्त त्याला कबुली जवाब हवा होता. पुरावे गोळा करण्याचे काम नंतर करता आले असते. गोळा केलेली सर्वच माहिती त्याने एकत्र करायला सुरुवात केली. ध्यानमग्न होत, डोळे मिटून तो स्वतःचे निष्कर्ष पडताळू लागला….बुद्धिबळातल्या उंटासारखी चाल खेळण्यास मेजर तयार झालेला होता !

“सर, आपको भोसले साहब बूला रहे है ।” अचानक तंद्रीतून तो जागा झाला, गेस्ट रूमवरच्या शिपाई तो झोपला होता की काय ह्याचा विचार करीत उभाच होता.
“चलो, मै आ रहां हूं ।” इतके बोलून आजूबाजूला पडलेला पसारा व विखुरलेले कागद त्याने गोळा करायला सुरुवात केली.
दमदार पावले टाकत व आत्मविश्वासाने भरलेला मेजर साहेबांच्या कॅबीन मध्ये पोहचला.
“हे काय मेजर, केस न सोडवताच परत जाणार ?” भोसले साहेबांनी सरळ विचारले !
“कोण म्हणतं सर ? केस तर सॉल्व्ह झालेलीच आहे. फक्त पुरावे हवेत….. ते मी तुम्हाला देणार आहेच थोड्याच वेळात.” असे म्हणतं त्याने अमरला मोबाईल वर फोन लावला…… भोसले साहेबांपासून थोडे दूरवर सरकत तो अमरशी तोंडातल्या तोंडात पुटपुटल्यासारखं काही तरी बोलला. 
एव्हिएम भोसले त्याच्या कडे अजूनही गोंधळल्यासारखे बघत होते. इतक्यात पुरी साहेबांनी खोलीत प्रवेश केला. “मेजर, मला बोलावणे धाडले ?”
” हो सर, कल्प्रीट कोण ते कळले आहेच, म्हटलं तुम्हीही येथे असायला हवे !”
“हू इज दॅट, मेजर ?” ” दोन मिनिटे धीर धरा सर !”
मेजर शांतपणे भोसले साहेबांच्या समोरील खुर्चीत बसून होता. भोसले अस्वस्थपणे फेऱ्या मारीत होते. ग्रुप लीडर पुरींची मेजरच्या बाजूच्या खुर्चीत चुळबूळ सुरू होती………

थोड्याच कालावधीत एक एक करीत सगळे स्क्वाड्रन लीडर्स जमा होत गेले.
“बॉइज…..पूर्णं भारताला ज्या गोष्टीचा अभिमान वाटणार आहे त्यात आपण सर्वच सामील आहात परंतू आपल्यातला एक अधिकारी असा आहे ज्याचा आपण सर्वच तिरस्कार करू व तो अधिकारी त्याच लायकीचा आहे” मेजरने धीरगंभीर आवाजात सुरुवात केली.”निकामी झालेले रडार जॅमर

 69-8a1.jpg

कोणाच्या फ्लाइंग टाइम मध्ये जामनगर जवळ टाकण्यात आले व कोणी भोसले साहेबांच्या ग्लासवर गोळी झाडली ह्याचा तपास लागलेलाच आहे…..”
“बडा साहब नावाने त्याला फार थोडे लोक ओळखतात ! त्याच्या वॉर्डरोबमध्ये मला तेच पिस्तूल सापडले. त्याच्याकडील एका ब्रिफकेस मध्ये अत्यंत शक्तिमान ट्रांन्समीटर व रिसीव्हर सापडला आहे.” टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता खोलीत पसरली “त्याच कपाटात मला गुन्हेगाराची काही कागदपत्रेही मिळालेली आहेत-” खरा गुन्हेगार कोण ते सापडल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. 

मेजर सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवीत बोलला. सगळेच गोंधळात पडलेले होते.
भोसले साहेबांचा चेहरा लाल बूंद झालेला होता.
पुरी हाताच्या मूठा आवळून उभे होते.
कुमार थंडपणे मेजरकडे बघत होता.
अमर दरवाज्याजवळ अटेन्शन पोझ घेऊन उभा होता.

“अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भारताचे हे महत्त्वपूर्ण संशोधन चिनी गुप्तहेरांच्या हाती जाण्यापासून केवळ सुदैवानेच वाचले. अजून थोड्या अंतरापार रडार जॅमर पाडले असते तर, कराची जवळील कोण्या एजंटने ते उचलून इप्सित स्थळी पोहचवले असते. नशिबाने बीएसएफ वाले वेळेवर पोहचले व त्यांच्या हाती ते जॅमर लागले.”
सर्वच एक चीत्ताने मेजर दिपक भोसले काय बोलतो ते ऐकत होते.

“रडार जॅमर बीएसएफ च्या हाती लागलेले पाहून बडा साहब घाबरला, जॅमरच्या सेरीयल नंबरवरून ते कोणाच्या ताब्यातले होते ते कळले असते. जॅमर जर सापडले नसते तर एक जॅमर पाठवताना गहाळ झाले असा प्रचार सर्वदूर झाला असता.”
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता उफाळून येत होती. मेजर खोलीत फेऱ्या मारीत पुढे बोलू लागला….
“एक गुन्हा दडवण्यासाठी त्याने दुसरा गुन्हा केला ! एअर व्हाईस मार्शल भोसल्यांवर प्राणघातक हल्ला ! परंतू तेथेही स्क्वाड्रन लीडर अमर गुप्ते आडवा आल्याने त्याचा गोंधळ उडाला. साथीदाराच्या मदतीने त्याने अमरला बेशुद्ध करवून रेकॉर्ड रूम मध्ये ठेवले. अमरने जर त्याला अंधारात ओळखले असते तर अमर आज येथे जिवंत उभा राहू शकला नसता व जे त्याच्या साथीदाराचे- विजयसिंह चे झाले तेच अमरचे झाले असते.”
मेजर अत्यंत नाट्यपूर्ण रितीने ही सगळी कहाणी ऐकवत होता. मध्येच थांबत भोसले साहेबांच्या टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून तो पाणी प्यायला.

“भजनसिंहला माहीत नव्हते बडा साहब कोण म्हणून भजनसिंह वाचला. परंतू विजयसिंहला त्याने एकांतात नेऊन त्याच पिस्तुलाने उडवले.”……”मित्रांनो, इथपर्यंत सर्व पुरावे व परिस्थिती त्याने व्यवस्थित हाताळली होती. परंतू त्याच्या दुर्दैवाने बीएसएफ कडून आलेली माहिती सीक्रेट सर्व्हिसेसला सर्वप्रथम मिळाली व दिल्लीतच मी गुन्हेगार कोण असावा ह्याचा तपास सुरू केला. प्रत्येक अधिकाऱ्याची फाइल शनिवारी सायंकाळीच मी तपासलेली होती.”
मेजर हे सांगत असताना भोसले साहेब अविश्वासाने त्याच्या तोंडाकडेच पाहतं राहिले. पुरींची प्रतिक्रिया गोंधळ उडाल्याची होती. कुमार पूर्वीपेक्षाही थंडगार पडला होता. अमर दरवाजा अडवून उभा राहिला.
“येथे पोहचल्यावर मी सर्वांच्या वाहनांचे नंबर तपासले. कोणत्या वेळी कुठले वाहन बाहेर किंवा आत आलेले आहे त्याची बारकाईने तपासणी केली. सर्व तपास पूर्णं केल्यानंतर मी आपणां सर्वांस खात्रीलायक पणे सांगू शकतो……..”

मेजर दिपक भावेने एक मोठा सुस्कारा सोडला, सर्वांच्या चेहऱ्यावरून एक नजर फिरवली……
बुद्धिबळांतला उंट त्याची निर्णायक खेळी खेळायला व “बडा साहब” ला मात द्यायला तयार होत होता.

“…… मित्रांनो “बडा साहब” दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः भोसले आहेत.”
मेजरच्या तोंडून हे वाक्य ऐकताच उभे असलेले एव्हिएम भोसले खुर्चीत कोसळले.आपले डोके दोन्ही हातात गच्च धरून खांदे पाडलेल्या भोसले साहेबांकडून प्रतिकार होणार नसल्याची खात्री मेजरला पटली.
*********************************************************
पुरी साहेबांच्या घरी मेजर दिपक भावे, स्क्वाड्रन लीडर अमर गुप्ते, स्क्वाड्रन लीडर कुमार सुब्रमण्यम व स्वत: पुरी इतकीच मंडळी त्या रात्री जेवणासाठी एकत्र आली होती.
“सर, आपण तर खरोखरच कमाल केलीत !” कुमार मेजरला बोलते करायच्या प्रयत्नांत होता. अमर सोडल्यास तिघेही ड्रिंक्स चे ग्लासेस घेऊन बसले होते.
“मेजर, तुम्हाला काही शंका होती ह्या बाबत आधी ?” पुरींनी मेजरला विचारले.

मेजर बोलायला लागला…….
“सर्वप्रथम गोळी झाडण्याची पोझिशन बघूनच मला कळले की, भोसलेंना मारण्यासाठी ही गोळी झाडलेली नसावी…. कारण ग्लास वर गोळी झाडण्यासाठी ज्या उंचीवरून गोळी झाडावी लागेल त्याच उंचीवरून त्यांच्या डोक्यात गोळी झाडावी लागेल… मग गोळी नेमकी ग्लास वर झाडण्याचे कारण काय असावे…?”
“मग भोसल्यांवर गोळी कोणी झाडली ?” पुरींनी गुगली टाकली.
“ते भोसले साहेबांचे नाट्य होते. टेबलावर ग्लास ठेवून खिडकीतून सायलेन्सर लावलेल्या पिस्तुलाने त्यांनी गोळी झाडली असावी व मागच्या दरवाज्याने रेकॉर्ड रूम मध्ये यायचा प्रयत्न करीत असतानाच अमर तेथे येऊन थडकला असावा.” सर्वांच्या चेहऱ्यावर मेजर बद्दल कौतुक स्पष्ट दिसत होते.
“दुसरी शंका आली ती अलार्म वाजण्याची वेळ व अमरची आत येण्याची वेळ ह्यांच्यात बरीच तफावत होती. अमर ९.१० ला आत आलेला होता. अलार्म वाजायला ९.३० ला सुरुवात झाली.अमरने ९.१२ ला गोळी झाडणाऱ्याला पाहिले असावे मग ९.१२ ते ९.३० पर्यंत काय घडत होते ह्या विचारानेच मला भोसल्यांचा संशय जास्त आला !”

“ह्याच मधल्या आठ दहा मिनिटांच्या काळात त्यांनी बेशुद्ध अमरला विजयसिंहच्या मदतीने रेकॉर्ड रूम मध्ये हालवले ! विजयसिंहला हल्ल्यानंतर कोणी पाहू नये म्हणून त्याच्यासाठी रेकॉर्ड रूमचा मागचा दरवाजा आधीच उघडा ठेवलेला होता व म्हणूनच शुद्धीवर येत असताना अमरने विजयसिंहला एकदा बघितले होते”
“मग विजयसिंह कधी बाहेर पडला असावा ?” कुमारने शंका काढली.
“कुमार, जेंव्हा रविवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक संपली त्यानंतर भोसल्यांनी त्याला स्वतःच्या ऍम्बेसेडरने बाहेर सोडले असावे कारण त्यांच्या गाडीची तशी नोंद रविवारी दुपारी मी यायच्या आधी केलेली मला आढळली.”
मध्ये थोडे थांबत मेजर पुढे बोलू लागला…. “कुमारच्या सांगण्यानुसार व इतर कागदपत्रे तपासल्यावर मला कळून चुकले की, महत्त्वाच्या संदेशांचे डिकोडर्स फक्त दोघांनाच माहीत होऊ शकतात….. तसेच, रेकॉर्ड रूमचा विषय काढताच त्यांनी अमर तेथे जास्त जातो असे सुचवण्याचा केलेला प्रयत्न मला जरा विचित्र वाटलेला होता. विजयसिंहचा खून झाल्याची बातमी त्यांनी मला दिली. ती त्यांना कुठून मिळाली ह्याची माहिती काढण्याचा मी प्रयत्न केला होता. विजयसिंहच्या पत्नीने फोन केला असता तर तो भजनसिंह साठी पुरी साहेबांना केला असता…. स्थानिक पोलिसांनी केला म्हणावा तर त्यांना कुठे माहीत होते की विजय व भजन दोघे भाऊ आहेत व जरी केला असता तर पुरी साहेबांना आधी कळायला हवे होते…. इथेच माझा संशय दाट झाला.”

“भजनसिंहच्या माहितीचा तसा फारसा उपयोग झालाच नव्हता…. कारण एकतर त्याला फारसे काही माहीतच नव्हते. त्यात विजयसिंहने त्याला बरेचसे अंधारात ठेवले होते. काय घडणार ह्याच टेन्शन मध्ये तो जास्त होता व सारखा पुरी साहेबांची वाट पाहतं होता…. परंतू मी गोष्ट ऑबसर्व्ह केलेली होती; भोसले साहेबांच्या ऑर्डर्लीने, आम्ही जेवत असताना, एकदा मध्येच त्यांना ‘बडे साहब’ अशी हाक मारताच मी जरा चपापलो. हे सगळे मुद्दे मी नीट लक्षांत घेऊन त्यांचे फ्लाइंग टाइम चेक केले. विंगमन म्हणून ते कुमार बरोबर गेले होते…. फक्त मला इतकेच नाही कळले की त्यांनी रडार जॅमर खाली कसे टाकले असावे ?”  

                                                              20060513125643munthoc1.jpg
“ओह…. त्यात फारसे कठीण काही नाही. गगनमध्ये विंगमन पुढच्या चाकांच्या एक्सॅक्टली मागे असतो व जर थोडा प्रयत्न केला तर वाकून त्याच्या वेस्ट बॉक्स पोकळीत ती डबी सरकवता येईल व हवी त्या ठिकाणी रिलीज करता येईल, मी पण ह्यावर इस्पितळात असताना विचार केला होता.” अमर बोलला…….
“म्हणूनच ज्या दिवशी ते विंगमन म्हणून माझ्या सोबत आले तेंव्हा ते आधीच पोझिशन घेऊन बसले होते” कुमारची ट्यूब पेटली. 

“सापडलेले रडार जॅमर येथे आल्यानंतरही त्याच्या परीक्षणाच्या वेळी त्यांनी मला चुकीची माहिती पुरवण्याचा केलेला जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे माझी खात्री पटत चालली होती. परंतू सेंट्रल स्टोअर ला न विचारता डिआरडिओ कडे चौकशी करा असे मी व पुरींनी सुचवल्याने त्यांचा नाईलाज झाला असावा.” मेजरने थोडा पॉज घेत बोलायला सुरुवात केली, “माझी खात्री पटल्याने मी काल कुमार झोपल्यानंतर भोसल्यांच्या बंगल्यात रात्री प्रवेश केला. त्यांच्या बेडरूममधल्या वॉर्डरोबमधील पिस्तूल बघून माझा संशय खरा असल्याचे मला दिसले…… अजून शोध घेता, पलंगाखाली ठेवलेल्या ब्रिफकेस मध्ये चिनी गुप्तहेरांशी संपर्क करण्यासाठी तयार ठेवलेली यंत्रणा मिळाली……”

“मग सर… आपण त्यांना लगेच अटक का नाही करवली ?”
“मला सर्व काही कळले आहे ते त्यांना माहीत नसल्याने ते पळून जाण्याचा धोका नव्हताच. त्यांचे फ्लाइंग टाइम व त्यांच्या गाडीच्या बाहेर जाण्याच्या व आत येण्याच्या वेळा ह्यांवरून एक नजर फिरवणे आवश्यक होते, अमर. मी एकदम वरच्या हुद्द्यांवरील व्यक्तीला सरळ हात लावू शकत नाही !” 
“त्यांनी फाइलमधील संशोधनाचे कागदपत्रे चीनला पाठवले तर नसतील ?” पुरी साहेबांनी शंका काढली.
“त्यात संशोधन विषयक माहिती काहीच नव्हती सर, फक्त रडार जॅमरच्या परफॉर्मन्स चे अहवाल होते. खरे महत्त्वाचे होते ते रडार जॅमर खुद्द….. पण तेच देशाबाहेर पडू न शकल्याने आज हे संशोधन वाचले !”

मेजर वगळता सर्वांनी एकदमच समाधानाचा एक सुस्कारा सोडला……. ‘गगन’ ला भरारी घेण्यास आता कोणीच थोपवू शकणार नव्हते !

                                                                iafcrest-2001.gif

टिप्पणी करे

विळखा १

                                                                goa1_p1010317thumb1.jpg

“विसू…; ए विसू ….” “कुठे जातो हा मुलगा देव जाणे”- विश्वासची आई कावलेली होती.
घरभर शोधत ती अंगणात येऊन पाहते तर छोटा विश्वास वडाच्या झाडाखाली बुंध्याला टेकून बसलेला.
“अरे, शाळेची वेळ होतेय, चल जेवायला पटकन. आणी हे काय ? अजून कपडे नाही बदललेस तू ?”
“काय झालं सूनबाई ?” “बघा नं, काय खुळं भरलंय ह्याच्या डोक्यात…. सारखा त्या झाडाखाली बसलेला असतो.”
“असू दे गं, त्याला बरं वाटत असेल झाडाखाली बसायला !” “अहो पण काळ वेळ काही आहे की नाही ?”
आजीने आपली बाजू घेतली की आई जास्तच तणतणते हे विश्वासला माहीत होते. अनिच्छेनेच तो उठला व कपडे बदलायला खोलीत गेला. दप्तर भरून जेमतेम चार घास तोंडात कोंबत त्याने घर सोडले. शाळेला उशीर झाला असता तर मारकुट्या मास्तरांनी परत फोडून काढले असते. कधी गृहपाठ नाही केला तर कधी एखादे पुस्तक वा वही विसरला म्हणून मास्तर विश्वासला रोज प्रसाद देत असत. त्याच्या नशिबाने आज राघू चे बाबा सायकलवर राघूला घेऊन जाताना दिसले मग त्यांनी विसूलाही बसवून शाळेत पोहचवले.
आज विसूची पेन्सिल घरी राहिलेली व मास्तरांच्या छड्यांची पुनरावृत्ती झाली. मास्तर वडाच्या पारंबीची छडी घेऊन येत. बहुदा रोज वरची साल काढल्याने ओली असे व चांगली सणसणीत लागे. आज त्यांचे सर्व काही सुरळीत असावे म्हणून विश्वासची ढुंगणावरच्या दोन फटक्यातच सुटका झाली. पण नंतर दात ओठ खाणारा विसू त्र्यंबक मास्तरांच्या नजरेतून सुटला हे त्याचे नशीब. “तुझी बहीण बघ किती व्यवस्थित आहे… नाही तर तू घोड्या, गाढवासारखा चरतो तरी अक्कल येत नाही.” मास्तरांचे बोल पारंबीच्या फटक्यापेक्षा विसूला जास्त झोंबले. पोरं फिदी फिदी करून हसत होती हे त्याला रुचत नसे… पण त्यालाही त्यांच्यावर तसे हसायचा मोका मिळायचा. त्र्यंबक मास्तरांचा वर्गात कोणीच लाडका नव्हता !
राघू मात्र कमी बोलणी ऐकी व मारही कमी खायचा, म्हणून मास्तरांकडे त्याचा भाव जरा जास्तच वधारलेला असे. फळ्यावर गणीत सोडवायला किंवा आकृती काढायला मास्तर त्यालाच पुढे बोलवत. मग राघू पूर्ण वर्गाकडे तुच्छतेने बघत जागेवर जाऊन बसे. विश्वासला त्याच्या हुशारीचे वाईट वाटत नसे पण तो ज्या रितीने सर्वांकडे बघे ते त्याला आवडत नव्हते, म्हणून राघू त्याच्या कंपूतून कटाप होता.
************************************
                                                                                                                 bhopal1.jpg
राजाभाऊ वैद्यांचा मुलगा सुभाष मितभाषी होता- शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला रेल्वे खात्यात नोकरी लागली. राजाभाऊ आडनावाने व पेश्यानेही वैद्यच होते. सुभाषनेही वैद्यकी पेशा पुढे चालू ठेवावा असे त्यांना वाटे परंतू पत्नीचा – सुभाषच्या आईचा त्याला विरोध होता. “तुम्ही जन्म वेचला लोकांसाठी, धड दोन वेळचे अन्न तरी पोटात गेले का ?”  हा तिचा आवडता प्रश्न असे…. सुभाषलाही त्या जडीबुटीशी सुरुवातीपासूनच आत्मीयता वाटत नसे. तो नोकरीला लागल्यावर जरा बरे दिवस त्या कुटुंबाने पाहिले. थोडे स्थिरस्थावर झाल्यानंतर राजाभाऊंनी गरीब घरातल्या  पण सोज्वळ मुलीशी सुभाषचे लग्न लावून दिले. वसुधा गरीब घरातली असल्याने मेहनती व काटकसरी होती. नव्या लक्ष्मीची पावले घरात येताच सुभाषला बढती व रेल्वेचे निवास मिळावे हा योगायोग खचीतच नव्हता. वसुधाने दोन मुलांना जन्म दिल्यावर कुटुंब पूर्णत्वाकडे होते न होते तोच राजाभाऊंना देवाज्ञा झाली. आशा शाळेत जायला लागलेली होती तर विश्वास रांगण्याच्या तयारीत होता. वैद्य कुटुंबाचा कर्ता पुरूष व गावातला एक भला माणूस हरपला होता…..
************************************************
“आजी हा बघ ना माझी वही खेचतोय….” आशाने विसूची तक्रार मांडली “आशू तू दुसऱ्या खोलीत जाऊन बस !” वसुधा स्वयंपाक खोलीतूनच ओरडली.”मीच सारखं का ऐकायचं ….” असं काहीस अस्पष्टसं बडबडत आशू तेथून उठली. “विसू बाबा आल्यावर त्यांनाच नाव सांगते थांब तुझे” ” बाबांना माझे नांव माहीत आहे-” तो वाकुल्या दाखवत तिला म्हणाला.  “अरे बाळ असे मोठ्या बहिणीला म्हणू नये !” आजी सारवा सारव करीत होती……

“विस्या, नालायका तुझे अक्षर आहे की कोंबड्या चरल्यात उकीरड्यावर ?” त्र्यंबक मास्तरांनी वही भिरकावली ती थेट विश्वासने अलगद झेलली….. पोर खो खो हसत होती. मास्तरांना वाटले ते आपल्यावर हसतात मग विसूची दाणादाण उडवली मास्तरांनी…. “चालता हो शाळेतून आणी बापाला सांग तुझ्या, घरीच शिकव म्हणावं” विसू पडत्या फळाची आज्ञा घेऊन दफ़्तर भरू लागला… “घोड्या चाललास कुठे ? भिंती कडे तोंड करून शाळा सुटे पर्यंत उभा राहा- आशू चे अक्षर बघ मोत्याच्या दाण्यांसारखे आहे नाही तर तू गाढवा – रत्न आहेस रत्न !”   टचकन पाण्याचे थेंब विसूच्या गालावर ओघळले. त्याने मान फिरवली अन धूसर नजरेत राघूचा चेहरा त्याला दिसला, राघू छद्मीपणे हसत होता…..

“काय रे पोरा खेळायला नाही गेलास आज ? आणी ह्या झाडाखाली काय करतोय ?” आजी एक हात कंबरेवर तर दुसरा कपाळावर दोन डोळ्यांच्या वर हात ठेवत बोलली ! ” काही नाही आज मास्तर रागावले ते सांगतोय ह्याला !” “कोणाला रे राजा ? मला तर कोणीच दिसत नाही इथे !” “विसू चल बिस्किटे खाऊन घे आणी खेळायला जा !” आईची आरोळी ऐकून तो धावतच क्वार्टरच्या पडवीत शिरला… आजी गोंधळल्यासारखी वडाकडे पाहतंच राहिली……

“बाबा, आज विसूला नं भिंतीकडे तोंड करून उभे केले होते मास्तरांनी” आशाने चुगली केलीच !
“तुला कसे कळले ?” आजीने बातमीचा शहानिशा करायचे ठरवले !
“राघू भेटला होता बागेत त्याने सांगितले !” आशू टेचांत बोलली- 
“थांब त्याला येऊ तर दे… आज फोडूनच काढतो” सुभाष कार्यालयातून आल्यावर रोजचेच वाक्य बोलला.
“त्याला हात तर लाव मग बघ मी जेवणच सोडते !” आजीनेही रोजचीच धमकी दिली…..

“विसू तिला जेवू दे धडपणे…. ” वसुधाने विसूच्या हातावर फटका दिला. “पण ती लोणाचंच खातेय केव्हाची, मी फक्त कोशिंबीर घेतली तीच्या ताटातली !”
“पण इथे आहे ना अजून ह्या भांड्यात कोशिंबीर, मग कशाला तीच्या ताटात हात घालतोस” सुभाषचा पारा चढला.
“राहू दे रे, त्या भावा बहिणींचे सतत काहींना काही चालत असते तू का लक्ष घालतोस त्यांच्यात ?” आजी भक्कमपणे विसूच्या बाजूची होती.

“ऐकलंत का, विसूला कसे समजवावे मला कळतंच नाही !” “का काय झालं ?” सुभाष अंथरुणात पडताच वसुधाने विषयाला वाचा फोडली.
“रोज तो शाळेत ह्या ना त्या कारणाने मार खात असतो, त्र्यंबक रावांना भेटून याल का जरा ?” 
“वसू, मास्तरांना मी चांगला ओळखतो, ते विनाकारण मारत नसावे !”
“तरी माझ्या समाधाना करिता एकदा भेटूनच या, माझे आईचे काळीज आहे; तो इतका मार खातो ते मला ऐकवत नाही !”
“बघतो काय करायचे ते !” सुभाषला सकाळी लवकर जायचे असायचे म्हणून तो कूस बदलून झोपेच्या अधीन झाला…
वसुधा मात्र विसूच्या काळजीत बराच काळ जागी होती……
**********************************************
141862022.jpg
‘बघ ना तो मास्तर मलाच मारतो सारखा, पारंबी कशाला देतोस तू त्याला रोज ?’
‘मी काय करणार ? रोज तो येऊन एक पारंबी तोडून जातो.’
‘काही करू नकोस, तुझा मित्र रोज मार खातो ते बघत बस’
‘थोडे दिवस थांब माझ्या पारंब्या मोठ्या होऊ दे मग बघ गंमत’
‘तुझ्या आणी आजी शिवाय माझे कोणीच नाही रे !’ विसूच्या डोळ्यांत पाणी तरारले होते !
“कोणाशी बोलतो आहेस विसू ?” आईच्या अचानक आलेल्या आवाजाने विसू दचकला-
“काही नाही, कोणी नाही…” असं अस्पष्टसं बोलत अपराधी नजरेने विसू झाडाखालून उठला !

वडाच्या झाडाकडे एक टक बघत वसुधा मागे वळून चालू लागली व अचानक तिच्या अंगावर अनामिक भितीने शहारा उठला…….

टिप्पणी करे

विळखा २

                                                                goa2_1010321thumb1.jpg

“इतिहासाच्या वह्या काढा, गृहपाठ कोणी केला नाही, उभे राहा !” त्र्यंबक मास्तरांची आरोळी वर्गभर घुमली….
वर्गातला एकच मुलगा उभा राहिला….. तो होता राघू !
“बस खाली, मला माहीत आहे, तुझी पाठांतर परीक्षा होती ते !” मास्तरांनी राघूला खाली बसवले.
“धडा पाचवा – शाहिस्तेखानाची पुण्यावर स्वारी- विश्वासराव वैद्य वाचायला सुरुवात करा”
…….
“विश्वासराव वैद्य वाचायला सुरुवात करा”
……….
“अरे, विस्या… गाढवा; वाचतोस का मार खातोस”
“हो गुरुजी…. ” विसूने धडा पाचवा कसाबसा वाचून संपवला-
मास्तर काही न बोलले तर नवल होते -“लेकाच्या, विस्या बोलल्या खेरीज कळतं नाही का ? बस खाली !”

‘मास्तर आज मला विश्वासराव वैद्य बोलले’
‘तुझे बाबा भेटायला गेले होते त्याला आज’
‘हो? ताई बोलली नाही काही !’
‘तिला माहीतच नाही !’
‘तुझ्या पारंब्या मोठ्या कधी होणार ?’
‘लवकरच, तुझी आजी आली…..’

विसू गप्प बसला- ” चल पोरा, खेळायला जा !”आजीने आल्या आल्या फर्मान सोडले !
विसू खेळायला गेला-
“देवा माझ्या ह्या पोरावर लक्ष ठेव रे !” आजी वडाकडे बघून बोलली………
वडाच्या पारंब्याची जराशी सळसळ झालेली तीच्या नजरेतून सुटली.

“मुलींमध्ये मुलगा लांबोडा- भाजून खातो कोंबडा”
“ए ताई मला चिडवू नकोस हं !”
“माझा कोंबडा कोणी मारियेला !”
“ताई… सांगतोय मला चिडवू नकोस”
“कु कु कूच कू – कोंबडा आरवतो”
“ताये, बस झालं आता ”
“काय करशील ? आजीला सांगशील ?”
“नाही, वडाला सांगेन- तो बांधून ठेवेल तुला”
आशू बरोबरच्या सगळ्या मुली फिदीफिदी करून हसू लागल्या.

आज वडाशी बोलत बसल्याने विसूला शाळेत जायला उशीर झाला.
fingersong1.jpg
रस्त्यात राघूचे बाबाही दिसले नाहीत…. पण त्र्यंबक मास्तरांची पारंबीची छडी आज ते घरीच विसरले असावेत. त्र्यंबक मास्तर मुलांना हाताने कधी मारीत नसत. वडाची पारंबी हेच त्यांचे आवडते हत्यार होते.
‘आज मार वाचला ना ?’
‘हो ! कसे झाले हे ?’
‘माझी पारंबी आज कापलीच गेली नाही’
‘रोज कर नं काही तरी असेच’
‘बरं……’
‘आज शाळेत मी माझा मित्र वर निबंध लिहिला.’
‘कोण आहे तुझा मित्र ? राघू ?’
‘च्छ्या तो शेंबड्या राघू नाही आवडत मला, रुबाब तर करतो पण नाक गळत असते सारखे त्याचे’
‘मग कोण आहे तुझा मित्र’
‘तूच तर आहेस……..’
‘…….’
‘मला खूप आवडते तुझ्याशी बोलायला’
‘……….’
‘तू गप्प का बसलास ?ऐकतोयस ना ?’
‘हो… पण आता तू जा इथून’
‘का ?’
‘रात्र पडायला लागलीय म्हणून !’
‘बरं -अच्छा उद्या येईनच !’
*****************
‘राघू फार शेफारलाय’
‘काय करणार तो अभ्यास खूप करतो ना म्हणून काहीच करता येत नाही’
‘काही तरी कर ना !’
‘बरं….. बघतो !’
**********************
“आजचा गृहपाठ कोणी केलेला नाही ?”
राघू उभा राहिला !
“काय रे लेका ? तुझी पाठांतराची परीक्षा संपली ना ? मग गृहपाठ कोण करील ? माझा बा ?”
पोरे फिदी फिदी करून हसू लागली…… आयुष्यात प्रथमच विसूचे मास्तरांवर प्रेम जडले !
राघू खात असलेला मार पाहून विसूच्या डोळ्यांचे पारणे फिटले !
****************************
‘मार खाल्ला ना आज त्याने ?”
‘हो ! हे कसे झाले ?’
‘पारंब्या मोठ्या झाल्यात माझ्या’
‘मला देशील थोड्या काढून ?’
‘काय करायच्यात ?’
‘काही नाही सहज !’
‘घे काढून हव्या तितक्या, माझ्या काय कामाच्या – उगीच ओझे विनाकारण’
‘नको…..!’
‘का रे ?’
‘कोणी माझे हात पाय कापले तर मला कसे वाटेल ?’
‘अरे आम्हा झाडांचे तसे नसते, पण मला आवडले तू बोललास ते, मलाही खूप दुखते रे माझ्या फांद्या तुटल्या की.’
‘तू शाळेत येशील एकदा ?’
‘नको रे बा ! त्र्यंबक मास्तर ओरडेल मला…. आणी येऊ कसा ? मला पाय आहेत  का ?’
‘हम्म…..’
“विसू कोणाशी बोलतोय तू ? मला सांग खरं खरं……” अचानक आईचा आवाज आल्याने विश्वास दचकला.
‘……’
“थांब, पळू नकोस, तुला माझी शप्पथ आहे बघ !”
“झाडाशी….. ह्या वडाच्या, तो माझा मित्र आहे !”
“वेडा कुठला…. झाड कधी बोलते का ? चल हात पाय धुऊन घे, दिवे लागणीची वेळ झाली आहे.”
marathi_films1.jpg
“शुभंकरोती कल्याणम, आरोग्यं…….” आजीचे खडे बोल वातावरणात घुमत होते. तिच्या मागोमाग वसुधा, आशा व विश्वास स्तोत्र म्हणत होते. परंतू वसुधाचे लक्ष स्तोत्र म्हणण्यात लागतच नव्हते.
रात्री जेवणे आटोपल्यावर वसुधा व आजी क्वॉर्टरच्या पायऱ्यांवर जाऊन बसले. सुभाष ऑफिस च्या कामानिमित्त बाहेर गांवी गेला होता.
“सूनबाई, आज लक्ष लागत नाही ते तुझे कशांत ?”
“अं…. काही नाही, असेच”
“मघाशी जेवताना पाण्याचा तांब्या घेतला असूनही दोन वेळा तू पाणी आणायला गेलीस….. स्तोत्र पण अडखळतच म्हटलेस… सुभाष ची काळजी वाटतेय का?”
“नाही हो आई, विसू जरा चमत्कारिक वागतो ना, त्याचीच काळजी करीत होते.”
“आता काय केले त्या गरीब पोराने माझ्या ?”
“सारखा झाडाशी बोलत बसलेला असतो ! काय खुळं भरलंय डोक्यात देव जाणे….. परवा आशूला बोलला, झाडाला नांव सांगीन म्हणे !”
“अगं, मला पण म्हणे एकदा- झाड बोलते म्हणे माझ्याशी ! लहान मुलांचे कल्पनांचे खेळ सगळे अजून काय ?”
“मला तर आता भिती वाटायला लागलेली आहे त्या झाडाचीच !”
“तुझे आपले मनाचे खेळ आहेत सगळे सूनबाई, झोप आता जाऊन !”

रात्री कसल्यातरी आवाजाने वसुधाची झोप उडाली. कूस वळून बघते तर विसू बिछान्यात नव्हता. आजीकडे झोपायला गेला असेल असा विचार करत ती झोपायचा प्रयत्न करू लागली. अचानक एका अनामिक भितीने तीच्या अंगावर काटा उठला व ती तशीच ताडकन उठून खिडकी जवळ गेली. किलकिल्या खिडकीतून चंद्रप्रकाशातल्या वडाच्या झाडाकडे बघत असताना वडाच्या झाडाखाली कोणीतरी झोपल्याचा भास तिला झाला. निरखून पाहिल्यावर विसू झोपला असल्याचे तिच्या लक्षात आले.
‘……’
‘…………’
आपल्या तोंडातून आवाज का येत नाही हेच तिला कळत नव्हते…………… तशीच ती पलंगावर कोसळली.

“वसुधा काय झालं गं?” सासूबाईंचा स्वर फार लांबून येत असल्याचा भास तिला झाला.
जऱ्या वेळाने जरा शुद्धीवर आल्यावर तिने विसूला पलंगाशेजारी पाहिले.
“रात्री झाडाखाली का झोपलास विसू ?”
“मी तर आजी जवळ झोपलो होतो”
“खोट बोलू नकोस…… मी बघितले तुला रात्री त्या झाडाखाली झोपलेला”
“काहीतरीच काय सूनबाई, हा रात्रभर माझ्या जवळच झोपलेला होता” आजीने ठामपणे सांगितले.
“तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करताय, पण तो खोटं बोलतोय हे मला माहीत आहे आई,”
‘………’
*****************************************************
‘आईने तुझ्या जवळ यायला मनाई केली आहे मला !’
‘तिने रात्री तुला बघितला माझ्या जवळ झोपलेला’
‘मग आजी का ‘नाही’ म्हणाली ?’
‘तिला माहीतच नाही, तू दाराची कडी काढून कधी बाहेर आलास ते !’
‘मी जातो, आईने पाहिले तर रागावेल !’

टिप्पणी करे

विळखा ३

                                                             goa0_pb280256thumb1.jpg

“काय सांगतेस काय ?” सुभाषच्या स्वरात आश्चर्याचे भाव होते.
“खरंच हो, मला सुरुवातीला वाटले तो अजून स्वतःच्याच भावविश्वात मग्न आहे, पण कालचा प्रकार अंगावर शहारे आणणारा होता” वसुधाने सर्व हकीकत सुभाषला कथन केलेली होती.
दुपारी सुभाष बाहेर गांवाहून परतल्यावर वसुधाने त्याला घाबरत घाबरतच सगळी कहाणी सांगितली.
‘…….’
“आईंशी बोलण्यात काही अर्थच नाही ! त्या काही ऐकूनच घेणार नाहीत.”
“त्यालाच विचारतो !”
“नको, त्यापेक्षा आपण दुसरे कोणाला तरी विचारू” वसुधाला मुलाच्या मन:स्थितीची काळजी होती.
“मामांना विचारून बघावे लागेल, उद्या सुटीच आहे तर त्याच्यावर लक्षही ठेवता येईल.”
प्रकरण साधे सरळ असते तर गोष्ट वेगळी होती…. पण रात्री कडी उघडून विश्वास झाडाखाली झोपल्याने सुभाषला काळजी वाटू लागली.

विसू शाळेतून परतल्यावर सुभाषने त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले होते. मध्येच तो ‘त्या’ खिडकीकडे जाऊन येत असल्याचे सुभाषच्या लक्षांत आलेले होते.  विसू बाहेर पडायला लागताच, सुभाष पडवीत जाऊन उभा राहिला. थोडा वेळ अंगणातच खेळून शेवटी कंटाळून विसू आजीजवळ जाऊन बसला.

“बाबा, झाडांना पाय का नसतात ?”
“कारण तुला डोक्यावर फांद्या नसतात !” आशू त्याला चिडवण्याच्या स्वरांत बोलली.
“बाबा, सांगा ना ” विसू तिच्याकडे दुर्लक्ष करीत बोलला.
“तू लहान आहेस अजून मोठा झाल्यावर कळेल” सुभाष ने विषयाला फाटा दिला.
“पण त्यांना हात तर असतात नां !”
“ह्या… बुद्धूराम डोक्यात भुसा भरलाय तुझ्या ” आशूने त्याला परत चिडवले.
“विसू जेव आता मुकाट्याने” इतकेच बोलत सुभाष गप्प झाला.
नंतर मात्र खरोखरच विश्वासने स्वतःचा तंद्रीतच जेवण संपवले.

वसुधाचे जेवण व कामे आटोपल्यावर नेहमीप्रमाणे दोघे फेरफटका मारायला निघाले. 
  mahalaxmi-horse-race1.jpg
तोवर आशू झोपली होती. विसूची आजीच्या मागे ‘गोष्ट सांग’ ची भुणभूण चालू होती.
“आई आम्ही येतो जरा फिरून ” वसुधा बोलली.
“मी येऊ ?” पटकन विसूने विचारले.  वसुधाने सुभाष कडे प्रश्नार्थक नजरेने बघितले….”नको, आजी गोष्ट सांगतेय ती ऐक” सुभाषने त्याला कटवला.
“घ्यायचा होतात की त्याला बरोबर” आजीला नातवाच्या हौसेची काळजी होती.
“…..” वसुधा चप्पल पायांत सरकवून बाहेर पडली.
“मग मला झाडाचीच गोष्ट सांग” विसूचे वाक्य जाता जाता तिच्या कानांवर पडताच तिच्या काळजांत चर्र झाले.

“मामांकडे जाऊन येऊ या का आताच ?” वसुधाने सुभाषला चालता चालता म्हटले.
“झोपले असतील तर ?” “काही नाही, बाहेरूनच बघू, दिवे बंद असतील तर दार वाजवायचेच नाही” 
“बरं, चल जाऊन तर बघू !” दोघे रोजच्या वाटे ऐवजी सुभाषचे मामा राहतं त्या भागाकडच्या रस्त्याकडे जायला वळले.
नशिबाने मामा व मामी जागे होते. “काय रे सुभाष, आज अचानक ह्या वेळी ?” मामीच्या चौकश्या करायच्या स्वभावाला चालना मिळाली. “काही नाही सहज पाय मोकळे करायला पडलो होतो!” सुभाषला मामीचा बोचक स्वभाव आवडत नसे-
“सुभाष, आईची तब्येत काय म्हणते ?” मामांनी विचारले.
“आई ठीक आहे, विसूला जरा बरं वाटत नाही !” सुभाष मोघम बोलला.
“चल जरा कोपऱ्यावर जाऊन येऊ तोवर ही बसेल वसुधांशी गप्पा मारीत” मामा बायकोकडे बघत बोलले.
“हो, तुम्हाला सिगारेट फुंकायची असेल ना !” मामांचे सिगरेटपान प्रकरण सुभाषच्या पत्थ्यावर पडले.
                                                                                                                        
“काय रे, काही गंभीर मामला” मामांनी चालतानाच विचारले.
“मलाही नक्की सांगता येणार नाही…..पण…” सुभाषने हळूहळू घडलेले प्रकरण मामांना सांगायला सुरुवात केली.
“अरे मुलांच्या काही विचित्र कल्पना असतात त्याने इतके बावचळून जायचे कारण नाही!” मामांनी
सुभाषला धीर दिला. “तरी मी बघतो कोणी मांत्रिक असला तर”.मामा सहजपणे बोलले.
सुभाषला मांत्रिकाला भेटण्याची कल्पना पसंत नसली तरी लगेच प्रतिक्रिया दिली नाही.
“झाल्या प्रकाराची कुठेच वाच्यता करू नकोस सुभाष, अगदी अक्कालाही व आमच्या हिलाही सांगू नकोस, उगीच दहा तोंडातून चार वेगवेगळ्या गोष्टी बाहेर पडतात.” त्यांचे हे वाक्य मात्र सुभाषला दिलासा देऊन गेले.मामांशी बोलून व मामीने केलेले आग्रहाचे पन्हे पिऊन घरी पोहचे पर्यंत बराच उशीर झालेला.

रस्त्यात चालताना मामा काय म्हणाले ते सुभाषने वसुधाला सांगितले. घरी पोहचल्यावर फाटकातून आत शिरताना त्यांनी विसूला पडवीत शिरताना पाहिले.
“काय रे, काय करीत होतास बाहेर ?” सुभाषने विसूला थोडे मोठ्या आवाजात विचारले.
“काही नाही, तुमची वाट बघत होतो.”
विसू खोटे बोलतोय हे वसुधाच्या लक्षात येत होते पण ही वेळ त्याला रागावण्याची नाही ते तिला ठाऊक होते. “आजी झोपली ?” “हो, केव्हाचीच. मला गोष्ट सांगता सांगताच ती झोपली” त्याच्या ह्या वाक्याने वसुधा आणखीनच काळजीत पडली. आजी व आशू मध्ये झोपल्या असताना विसू एकटा पडवीत जागा राहणे (किंवा झाडाशी बोलत बसणे) हे तिला कसेसेच वाटत होते. 
“चल जा आता झोपायला” सुभाषने विसूला बजावले. “बरं” करीत तो आजीजवळच्या पांघरुणात शिरला. “विसू आज बाबांबरोबर झोपायचे का ?” वसुधाने त्याची कळी खुलवायला त्याला विचारले “हो, चालेल !” विसू टुणकन उडी मारीत बोलला. “नको, तो झोपेत लाथा खूप मारतो.” सुभाष सहज बोलला खरा पण विसूच्या हिरमुसल्या चेहऱ्याकडे त्याचे दुर्लक्ष होते. शेवटी विसू आजीच्या पांघरुणात शिरला.

बराच वेळ गप्पा मारता मारता झोप केंव्हा लागली ते सुभाषला कळलेच नाही. पहाटे आईच्या हाकांनी दोघे दचकून जागे झाले. दार उघडून बघितले तर आई घामाघूम झालेली होती. “सुभाष विसू कुठे दिसत नाही. मी संडासात, पडवीत सगळीकडे बघितले”
वसुधाने पटकन खिडकीकडे धाव घेतली. काही बोलायची तिला आवश्यकताच नव्हती. सुभाषने झाडाखाली गाढ झोपलेल्या विसूला उचलून स्वतः:च्या बिछान्यावर आणून ठेवले. “रात्री आपल्याकडेच झोपवले असते तर बरे झाले असते” ह्या वसुधाच्या वाक्याने त्याला स्वतः:ची चूक उमगली.
******************************
सकाळी उठून बघतात तर विसू तापाने फणफणलेला होता. तसा तो कधी आजारी पडला नव्हता. आजीने त्याला बरीचशी चाटणे चाटवली पण ताप उतरण्याचे नांवच नव्हते. पूर्णं दिवस तो तापात बडबड करीत होता. मध्येच त्र्यंबक मास्तरांना “नका मारू, नका मारू” म्हणून सांगायचा मध्येच आजीला “ते बघ झाडाला पाय फुटलेत आता ते शाळेत येणार” असे म्हणायचा. “बाबा, ताई मला चिडवते” तर आईकडे वर्गातल्या मुलांच्या तक्रारी……. 
                                                                                                               movgal13371.jpg
पूर्ण दुपार त्याची तापात बडबड चालू होती. शेवटी संध्याकाळच्या सुमारास त्याचा ताप उतरल्यावर सुभाषने त्याला डॉक्टर पानसेंकडे नेले. 
डॉक्टरांचे भाऊसाहेबांशी व त्यांच्या कुटुंबीयाशी चांगले संबंध होते. आयुर्वेदाचार्य राजाभाऊ वैद्यांचे नांव ह्या क्षेत्रात सन्मानाने घेतले जाई. त्यांनी विसूला तपासले व बाटलीत एक औषधी मिश्रण बनवून दिले.”तासाभरात ताप उतरेल पण विषमज्वर असल्यास परत पहाटे चढेल तेंव्हा ह्या बाटलीतले औषध दोन मात्रा दे.” झाला प्रसंग सुभाषने त्यांना फारच मोघमपणे सांगितला होता व मामांची ह्या प्रकाराची वाच्यता न करण्याच्या सूचनेची आठवण ठेवत तोंड बंदच ठेवणे पसंत केले.
रात्री मामा व मामी फेरफटका मारत घरी आले तेंव्हा त्यांना विसूच्या तापाबद्दल कळले.
“गुरुवर्य निरंजन स्वामींच्या  पट्ट शिष्याला मी भेटलो सुभाष, त्याला प्रकाराची पूर्ण कल्पना दिलेली आहे. विसूला घेऊन गुरूवारी त्यांच्याकडे जाऊन येऊ” सुभाषला थोडे बाजूला घेत ते बोलले.
“मांत्रिकाकडे जाण्याने काही फरक पडेल का मामा ?” सुभाषने घाबरत घाबरतच विचारले.
“सुभाष निरंजन स्वामी मांत्रिक नाहीत, तुला सहज सोप्या शब्दांत कळावे म्हणून मी तो शब्दप्रयोग केला होता. अघोरी विद्या ह्या विषयांत त्यांना रस आहे व म्हणूनच त्यांनी त्यावर अभ्यास केला आहे.”
“हो चालेल जाऊ गुरूवारी” सुभाष ह्या युगातला असल्याने त्याला साहजिकच हा प्रयोग करण्यापेक्षा डॉक्टरवर जास्त विश्वास होता.

मध्यरात्री विसूला परत ताप चढला पण डॉक्टर पानस्यांनी दिलेल्या औषधाने व कपाळावर थंड पाण्याच्या ठेवलेल्या पट्ट्यांनी तासाभरात तो परत गाढ झोपला. वसुधाला मात्र रात्रभर जागे राहावे लागले होते.
दोन दिवसांच्या शाळेच्या बुट्टीने विसूला ताजे तवाने बनवले होते. त्याला लागून आलेल्या रविवारच्या सुटीमुळे त्याला अभ्यासाचा चांगलाच विसर पडला होता. ताप उतरताच शाळेत जाण्याच्या कल्पनेने तो हिरमुसला. पण वसुधाने समजूत घालितं त्याला तयार केला.

मधल्या काळांत सुभाष मामांबरोबर निरंजन स्वामींकडे जाऊन आला.
                                                                 s11.jpg
निरंजन स्वामींनी त्याला विसूला घेऊन या इतकेच सांगितले.
*******************
“काय रे कशी आहे विसूची तब्येत ?” सुभाष चे वरिष्ठ व तिथल्या रेल्वेच्या स्थानकाचे प्रमुख मास्तर अंकोलीकरांनी विचारले. “बरी आहे, आजपासून शाळेत जायला लागला.” पण बरीच वर्षे बरोबर काम केलेल्या अंकोलीकरांच्या नजरेतून सुभाषची घालमेल लपली नाही.
“तुला काही तरी सांगायचे आहे का मला ?” अंकोलीकरांनी सुभाषला विचारले. “हो सर, तुमचे थोडे मार्गदर्शन हवे होते” सुभाष चाचरतच बोलला.”पण येथे नको, घरी जाताना बरोबर जाऊ मग सांगतो” त्याने हळूच सांगितले.
संध्याकाळी परतताना त्याने अंकोलीकरांना सर्व हकीकत सांगितली. अंकोलीकरही त्याच्याबरोबर विसूची तब्येत बघायला म्हणून घरी आले होते. त्यांना क्वॉर्टरच्या फाटकापर्यंत सोडायला सुभाष गेला तेंव्हा त्याला समजावण्याच्या स्वरांत ते बोलले,”सुभाष हे स्वामी वगैरे सर्व ठीक आहे परंतू माझ्या मते तू एखाद्या बालमानोसपचार तज्ज्ञाला भेटावे असे मला वाटते.”
                                                                                              press_photo21.jpg
“आपल्या माहितीतले आहे कोणी सर ?” “माझ्या नाही पण हिच्या माहेरच्या नात्यातला एका मुलाने ह्या क्षेत्रात चांगली पदवी घेतलेली आहे, तिला विचारून सांगतो उद्या तुला”. अंकोलीकरांनी त्याला आशेचा एक किरण दाखवला होता….. विसूला घेऊन मानसोपचार तज्ज्ञ कडे जाणे म्हणजे त्याला वेडा ठरवणे तर नाही ना ? अशी एक शंका सुभाषच्या मनांत येऊन गेली तरीही मांत्रिका कडे जाण्यापेक्षा मानसोपचार तज्ज्ञ बरा असाच विचार त्याने केला.

“बाबा, झाडांनाही ताप येतो का ?” विसूच्या वाक्याने तो भानावर आला.
***********************

टिप्पणी करे

विळखा – शेवट !

                                                    p8290566thumb1.jpg

निरंजन स्वामींच्या मठांत गुरूवारी ठरल्या प्रमाणे जायचे आहे हे खास सांगायला मामा घरी आल्याने सुभाष ने विरोध न करता ‘जाऊन तर बघू’ असा पवित्रा घेतला. मग आईलाही सांगणे सुभाषला भाग पडलेच होते. “जाऊन या, सर्वांच्याच मनाचे समाधान !” इतकीच प्रतिक्रिया आईने दिली.
त्याच दिवशी अंकोलीकरांनी त्यांच्या सौ.च्या दूरच्या भाच्याची, एका बालमानसोपचार तज्ञाची वेळ विसूसाठी राखून ठेवलेली होती. नशीब की तेथे सायंकाळी जायचे होते.
“अंकोलीकरांना सांगायला जड जाणार आहे” सुभाषने वसुधाला म्हटले !
“काय ?” वसुधा गोंधळली “हेच की निरंजन स्वामींकडेही विसूला घेऊन जातोय ते !”
“उद्या सुटी घ्या” वसुधाने सुचवले “आयत्या वेळी ? बघू … निरोप तरी पाठवावा लागेल”

सकाळी सुभाषने सुटीवर असल्याचा निरोप रेल्वेच्या गॅंगमन बरोबर साहेबांना धाडला. मामा येताच ते विसूला घेऊन निरंजन स्वामींकडे जायला निघाले.

मठातले वातावरण धीरगंभीर होते. “या, स्वामी ध्यानांत आहेत, थोड्याच काळात बोलावतील ” एका शिष्याने त्यांना बसायला आसन दिले. दहा पंधरा मिनिटातच स्वामी बोलवत असल्याची सूचना घेऊन तोच शिष्य परत आला. आतल्या कुटीत जाताच एकदम वेगळेच वातावरण सुभाषला अनुभवायला मिळाले. धीरगंभीर व कमी उजेड असलेल्या वातावरणात तंबोऱ्याचे नादमधुर स्वर पार्श्वभागातून येत होते. धुपाचा मंद सुगंध व हलकासा धूर सर्व खोलीत पसरलेला होता. आत प्रवेश करताच सुभाष एक क्षण थबकला त्यापाठोपाठ विसू व मामांनाही थांबणे भाग पडले. बाहेरच्या उजेडातून आत आल्यावर डोळे अंधाराला सरावल्यावर त्याने उजवीकडे बघताच त्याला निरंजन स्वामी एका चौथऱ्यावर पद्मासनांत बसलेले दिसले. छाती पर्यंत रुळणारी पांढरी शुभ्र दाढी, उभट धीरगंभीर चेहरा, चेहऱ्यावर तपस्येचे अद्वैत तेज व प्रेमळ नजर ह्यांनी एका क्षणांत सुभाषच्या अंतर्मनाचा पगडा घेतला.

“बसा” स्वामींच्या पट्टशिष्याने स्वामींसमोर जमीनीवर अंथरलेल्या चटई कडे निर्देश केला.
तिघेही आसनस्थ होताच सुभाषने मानेनेच वंदन करून स्वामींना अभिवादन केले. “काय म्हणतो मुलगा तुमचा ? ताप उतरला का ?” सुभाष बुचकळ्यांत पडलेला बघून हसून ते पुढे म्हणाले,
“जादू टोणा काही नाही, गजानन रावांनी माझ्या शिष्याला सर्व हकीकत सांगितली म्हणून कळली,”  मामांकडे बघत ते बोलले.
“आपल्या वडिलांबद्दल मी ऐकले होते, आयुर्वेदाचार्य राजाभाऊ वैद्यांचे कार्य म्हणजे ह्या मानव जातीवर अनंत उपकार आहेत.” सुभाषला आपल्या वडिलांबद्दल अभिमान वाटला.  
थोडक्यात सुभाषने त्यांना घडत असलेला प्रकार सांगितला.
“ये बाळ, असा माझ्या जवळ येऊन बस !” चौथऱ्यावर हात दर्शवत त्यांनी विसूला जवळ बोलावले. विसू थोडा अडखळत व बाबांच्याकडे बघत संकोचाने स्वामींच्या शेजारी जाऊन बसला.
“गजानन राव, सुभाष वाईट वाटू देऊ नका, परंतू मला फक्त ह्याच्याशीच बोलायचे आहे !”
सुभाष अनिच्छेने उठला. दारापर्यंत जाऊन तो मागे फिरताच स्वामी बोलले, “काळजी करू नको सुभाष, ह्या मुलाचे मी भले नाही करू शकलो तरी नुकसान नाही होऊ देणार !” त्यांनी मारलेली एकेरी हाक व त्यांच्या शब्दांतला विश्वास सुभाषला धीर देऊन गेला व एका क्षणांत वळून सुभाष खोलीबाहेर पडला.
************************************
                                                       g_thumb101.jpg
बयाच वेळाने म्हणजे जवळपास दिडतासा नंतर स्वामींच्या पट्टशीष्याने दोघांना स्वामी बोलवत असल्याचे सांगितले. अधीरतेने सुभाषने आत प्रवेश केला. विसूला शेजारी बसवून स्वामी त्याच्या खांद्यावर हात ठेवत असलेले बघून सुभाषचा जीव भांड्यात पडला. जरासे स्मित हास्य करीत स्वामींनी दोघांना बसायची खूण केली.
प्रश्नार्थक नजरेने बघणाऱ्या सुभाषला स्वामी हसत म्हणाले, “काय हे सुभाष, ह्या मुलाला कसलाही त्रास नसून बिचाऱ्याला तुम्ही आजारी ठरवलात….. ह्याला काहीही झालेले नाही, जा बाळ ह्या काकांबरोबर जाऊन आमच्या मठातले ससे बघून ये !” पटकन विसू चौथऱ्यावर उठून स्वामींच्या शिष्याबरोबर गेला.
“सुभाष खरोखर ह्याला काहीही झालेले नाही. हवे तर हे एक लहान मुलांचे स्वप्नरंजन समज…. हा जसं जसा मोठा होत जाईल त्याची ही व्याधी कमी होईल…. मात्र मला ह्याच्या आजीला भेटण्याची आवश्यकता वाटते. त्यांना मठांत येता येण्यासारखे असल्यास कोणाच्या तरी सोबतीने पाठवून दे मला जरा त्यांच्याशीही काही बोलावयाचे आहे.”
“पण स्वामी; दोन वेळा रात्री तो झाडाजवळ झोपायला गेला !”
“सुभाष, लहान मुलांच्या मनांचे खेळ आहेत ते सर्व तू काळजी करू नकोस” स्वामींनी आश्वासक शब्दांत त्याला सांगितले.
सुभाष व गजाननराव जागेवरून उठले. नकळत सुभाषने स्वामींच्या चरणांना स्पर्श करून त्यांना वंदन केले. “शतायुषी भव!” स्वामींचा आशीर्वाद घेत ते परत जाण्यास निघाले.
“विसू, काय विचारले बाळ त्यांनी ?” मामांनी विसूला प्रश्न केला.
“ते माझ्या मित्राचे मित्र आहेत… म्हणजे जे वडाचे झाड आपल्या क्वॉर्टरच्या बाहेर आहे ना; तसेच एक झाड त्यांच्या मठाजवळही आहे व ते झाडही स्वामींशी बोलते”. विसूने भाबडे पणाने सांगितले ! “बाबा, ते आपले झाड आहे ना, तेही स्वामींशी बोलू शकेल असे स्वामी बोलले !”
“अजून काय विचारले ?” सुभाषने अधीरतेने विचारले…..
“मला नाही आठवत; मला हळूहळू आवाजात ते काहीतरी विचारत होते व मला झोप आली”

घरी येताच वसुधाने उत्सुकतेने काय घडले ते विचारले. “काहीच समस्या नाही असे स्वामी म्हणतात,  पण त्यांना आईला एकदा भेटण्याची इच्छा आहे.” 
“तसे का ?” ” त्यांनाच ठाऊक !…  असं कर, तुम्ही दोघी उद्या सकाळी जाऊन या”
“माझ्या ऐवजी मामी गेल्या तर ?” वसुधाने चाचरत विचारले “तर….. अख्ख्या गावाला कळेल !” सुभाष हसत बोलला.””…..आणी तुलाही काही प्रश्न असल्यास त्याही शंकांचे निरसन करूनच ये !”
***************************
सायंकाळी मात्र वसुधाने सुभाष व विसूबरोबर अंकोलीकरांनी सुचवलेल्या बालमानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याचे ठरवले. अंकोलीकर साहेब स्वतः बरोबर आले होते. सुभाषला त्यांनी लहान भावा प्रमाणे वागवीत.
movgal13301.jpg
डॉ. पवित्र बाहेकर एक तरूण व होतकरू बालमानसोपचार तज्ज्ञ म्हणून ह्या गांवात आला तेंव्हा बयाच जणांना त्याचे कार्य व छोट्या गांवात अशी सेवा देण्याचे कारण कळलेच नव्हते. शाळांमधून शिक्षक वर्गाला मार्गदर्शन करणारा हा तरूण तसे पाहता गांवात कुतूहलाचा विषय होता. सुभाषला त्याबद्दल ऐकीव माहिती होती परंतू तो अंकोलीकर वहिनींचा भाचा असल्याचे प्रथमच माहीत झाले.
त्या जागेला दवाखाना म्हणावे का ह्या विचारांतच सुभाषने अंकोलीकरांच्या मागोमाग त्या खोलीत प्रवेश केला. घरातल्या दिवाणखान्याच्या बाजूच्या अभ्यासिकेत नीटनेटक्या खुर्च्या, दिवाण मांडून बैठक केली होती. टेबल किंवा रूग्णाला झोपवायला जागा वगैरे गोष्टींना तेथे स्थान देण्यात न आल्याने अनौपचारिक वातावरण निर्मिती होती.

एका कोपऱ्यात लहान मुलांसाठी वेगवेगळी खेळणी ठेवण्यात आलेली होती. डॉ. पवित्र साध्या व घरच्याच कपड्यांमध्ये ह्या मंडळींसाठी थांबलेला होता. सुहास्य वदनाने त्याने सर्वांचे स्वागत करीत त्यांना बसायला सांगितले. विसूचे लक्ष सारखे कोपऱ्यात ठेवलेल्या विविध खेळांकडे जात असल्याचे पाहून त्याने विसूला हवी तितकी खेळणी खेळायला काढून घ्यायला सांगितले. विसू खेळण्याशी खेळत असताना औपचारिक चौकश्या पूर्ण करीत त्याने सुभाष व वसुधाची छोटीसी मुलाखतच घेतली.
विसूला नेमके काय होत आहे हे न कळल्याने भांबावलेल्या त्या पालकांची विस्कळित कहाणी… अधून मधून छोटे पण महत्त्वाचे प्रश्न विचारत… त्याने पूर्ण ऐकली.
स्वामींकडे जाऊन आल्याची गोष्ट वगळता सुभाष व वसुधाने सर्वच गोष्टींचा त्यात समावेश केलेला होता. त्यांच्या कडून प्राथमिक माहिती मिळालेली असल्याची खात्री पटताच बोलत बोलत डॉ. पवित्र जागेवरून उठला. खिडक्यांवरील पडदे खेचत त्याने बाहेरचा प्रकाश आत येणार नाही ह्याची काळजी घेतली. जागेवर बसण्यापूर्वी कोपऱ्यातला टेपरेकॉर्डरवर मंद स्वर असलेल्या विणा वादनाची ध्वनिफीत त्याने लावली. “आपणांस आता माझी रजा घ्यावी लागेल. मी विश्वासला काही प्रश्न तो एकटा असताना विचारणार आहे !” बोलत असताना त्याने काडेपेटीने चार पाच सुगंधी उदबत्त्यांचा जुडगा पेटवला. “साधारण तास दीड तास लागेल तोवर आपण कुठे फिरून आलात तरी चालेल”.
अंकोलीकर साहेब व वसुधा उठण्याच्या आधीच सुभाष शांतपणे जागेवरून उठून दाराकडे चालू लागला. त्याच्या पाठोपाठ बुचकळ्यांत पडलेली वसुधा कोपऱ्यात बसून खेळण्याशी खेळणाऱ्या विसूकडे बघत बाहेर पडली.

“अहो, विसूला एकटे सोडायचे ?” “वसू, ते विसूचे भले नाही करू शकले तरी नुकसान नाही होऊ देणार !” ह्या वाक्यावर ती आश्चर्याने सुभाषच्या तोंडाकडेच बघत राहिली.
*********************************
                                                           s51.jpg
विश्वास वैद्य हा आपला विद्यार्थी अचानक बदलला कसा ह्याचे नवल त्र्यंबक मास्तरांना वाटायला लागले. तो आपल्याला राघू पेक्षा जास्त आवडायला का लागला ह्याचे कारण त्यांना शोधून सापडले नव्हते. राघूच्याही तल्लख बालबुद्धीला विसूचा हेवा वाटायला लागला होता.

आजी हल्ली विसूला केलेल्या चुकांबद्दल शिक्षाही करायला लागलेली होती !

विसूशी खेळायला वडाच्या झाडाखाली बरीच बाळगोपाळ मंडळी जमत होती !

सुभाष त्याच्या शाळेचा अभ्यास घ्यायला लागलेला बघून वसुधाला नवल वाटे !

आशूला प्रयत्न करूनही विसूच्या चुगल्या करता येत नव्हत्या !

आशू व विसू कडे घरात बसून खेळायचे बरेच खेळ जमा होत होते !

विसूच्या भोवतालचा वडाचा विळखा सैल झालेला होता !
********************************
क्रिकेट खेळता खेळता राघूने मारलेला चेंडू आणायला विसू वडाच्या झाडापाशी गेला….. वडाला प्रदिक्षणा घालत त्याने चेंडू हुडकून काढला…… चेंडू फेकल्यावर वडाकडे बघत तो म्हणाला…

“बघ, तू उगीचच माझी काळजी करायचास !”

                                                                           समाप्त !!!

***************************************************************************
                                                                  लेखकाचे विचार :
ह्या कथेत लहान मुलांच्या मानसिकतेचा शोध घेण्याचा एक प्रयत्न केला आहे.
मुलांना खेळायला कोणीतरी हवे असते. सवंगडी न मिळाल्यास ते स्वत:शी किंवा बाहुलीशी
अथवा कुठल्याही वस्तुंशी खेळतात / बोलतात / गप्पा मारतात.
विसूचे नेमके हेच झाले…. त्याच्याबरोबर खेळणारे कोणीच नव्हते म्हणून तो झाडाशी गप्पा मारी….
सन्मोहनाच्या सहाय्याने स्वामींना व डॉक्टर पवित्रला त्याच्या कडून खरे काय ते कळले असावे.
त्यांच्या दोघांच्या उपचार पद्धतीत असलेले साम्य हे एक प्रकारचे विलक्षण सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
हीच कथा मी “मनोगत”वर सर्वप्रथम लिहीली – वाचकांच्या शंकांना तेथे उत्तरे दिली होती पण ब्लॉग साठी हा खुलासा करीत आहे.
धन्यवाद.

टिप्पणी करे

माझा न्युनगंड !

प्रसाद नागेश घाडी – १८ वर्षे वयाचा – इरिव्हर्सीबल मस्कुलर ऍट्रोफी / डायस्ट्रोफी (मराठीतले नांव सोडा – मला उच्चारही माहीत नाही !) ह्या दुर्धर आजाराने व्यस्त झालेल्या एका अश्राप जीवाची कथा आज रात्री ११ ते ११.३० च्या मध्ये सह्याद्री वाहिनीवर बघीतली व त्याच्या बद्दल आपणांस चार शब्द कळवल्या खेरीज राहवले नाही.

p1904200151.jpgह्याला मी सर्वप्रथम बघीतला तो “आता खेळा नाचा ” ह्या नक्षत्रांचे देणे ह्या कार्यक्रमात मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात. त्या वेळी त्याचे वय असावे १४/१५- परंतू आज त्याला परत बघताना ह्या मुलाने माझ्यातला ‘मी’ पणाचा नक्षा साफ उतरवून टाकला.
दहावीच्या परिक्षेत (आपल्या विरूद्ध असलेल्या सर्वच परिस्थितींत) ८६% गुण मिळवणे हे मलाही माझ्या वेळी शक्य झाले नव्हते.

“दहावीचे वर्ष मला फार कठीण गेले, पुस्तक सारखे हातातून गळून पडायचे. मी खुप आजारी पडलो, तरी त्याही परिस्थितींत मी मन लावून अभ्यास केला” हे वाक्य वाचून मला ज्या सुविधा मिळाल्या व ज्या परिस्थितींत मी दहावी पास केली त्याची आठवण झाली.

२००० चा नेहरू राष्ट्रीय बालश्री पुरस्कार, राजीव गांधी ऍवार्ड, चैतन्य आर्टचा पुरस्कार, केव्हीन केअर ऍबीलीटी पुरस्कार हे व असे अनेक पुरस्कार प्राप्त हा मुलगा काय करू शकत नाही ते विचारा.
प्रसादचे गाणे मी प्रत्यक्ष ऐकलेच होते, संपूर्ण शरिरातली शक्ती हातात एकवटून तो चित्रेही काढतो, बुद्धीबळ खेळतो व कविता करतो. त्याच्या चित्रांचे भेटकार्ड बाजारात आल्याचे पाहून समाधान वाटले. कृणाल कॅसेट्स च्या श्री. विरा ह्यांनी त्याच्या गाण्यांची कॅसेटही काढली आहे.
प्रसादचे वडिल श्री. नागेश घाडी हे एका म.न.पा.च्या इस्पितळात सुरक्षा रक्षक असल्याचे वाचनांत आले होते. आई सौ. शरयु घाडी ह्या पण नोकरी करतात.
“आम्हीच त्याचा उत्कृष्ठ सांभाळ करू ह्याची खात्री असल्यानेच देवाने त्याला माझ्या पोटी जन्म घातला असावा. मी त्याची आई आहे ह्याचा मला अभिमान वाटतो” ह्या शब्दांत त्यांनी स्वतःचे मनोगत सांगीतले.

“माझ्या यशातला १०% वाटा माझा तर ९०% वाटा माझ्या आई-वडिलांचा आहे” हे तो इतक्या विनम्रपणे सांगतो की आपला उर भरून येईल.
प्रसाद बद्दल श्री. परेश मोकाशींनी एक सुरेख उदाहरण दिले – अदिती ह्या देवतेच्या आठ पुत्रांपैकी प्रथम सात पुत्र धडधाकट होते परंतू आठवा पूत्र कमकुवत होता, परंतू तोच सुर्य झाला.
“माझ्या सारख्या इतर मुलांच्या आई-वडिलांना माझा हाच संदेश आहे की, मी कठीण परिस्थिंशी सामना करून जे करू शकतो ते काही अपंग मुले कदाचीत करणार नाही परंतू त्यांना त्याचा प्रयत्न केल्याचा खरा आनंद लाभु द्यावा” असा संदेश त्याने दिला.
कुमार केतकर म्हणतात ते खरे आहे, “आपल्या सारख्याला न्युनगंड वाटावा असे प्रसादचे चरित्र आहे” 

धिरोदत्त प्रसाद घाडीला त्याच्या भावी जीवनांत सर्व परिस्थितींशी धडधाकट मनोवृत्तीने तोंड देण्यासाठी अनेक शुभेच्छा !
  

टिप्पणी करे

बालगीत-चिमणी

गरीब बिचाऱ्या चिमणीला,                                             
सगळे टपले छळण्याला,                                        
चिमणीला मग राघू बोले,                                                   
का गं तुझे डोळे ओले ?         

eurasian_tree_sparrow1.jpg                                             

काऽऽय सांगू बाबा तुला,
एकटे पणा छळतो मला !
राघू होता हुशार फार,
त्याने दिले सल्ले चार !

“झाडां वरती फिरून यावे,
गाणे गोड गावून यावे.
बाजूला मग जाऊन यावे,
गप्पा टप्पा मारून यावे,”

राघूच्या सल्ल्याने चिऊताई खूश झाली- खालच्या साळूबाईंशी गप्पा मारायला गेली.

साळू बाई, साळू बाई;
कसली तुमची नेहमीच घाई ?
शेजारी जरा बसाहो ताई,
तक्रार माझी फार नाही.

नाही गं बाई, चिऊताई,
बसायला मला वेळच नाही,
शाळेची तयारी करायची घाई,
त्यातच छोटूचा गणवेश नाही,

वह्या पुस्तके आणायची बाकी
कव्हर्स त्यांना घालायची खाकी
होतील आता पिल्ले गोळा,
करते हं मी त्यांच्या पोळ्या.

चिमणी ती मग हिरमुसली
झाडा वर जाऊन बसली
तिकडून आला चिमणा छान
होता तो खूप गोरा पान.

 housesparrow1.jpg

येते का गं फिरायला,
गोड गाणी म्हणायला.
झाडांवरती फिरून येऊ
गोड गाणी गाऊन येऊ.

चिमणी आमची खुशीत आली                                  
गाणे गोड गाऊ लागली
झाडां वरती फिरू लागली,
चिमण्या संगे भुर्र उडाली.

टिप्पणी करे

चला होड्या बनवूया का ?

पावसाळा सुरू झाला आहे ….. धो धो…. धुवाँधार पा‌ऊस कोसळायला लागलाय….
आमच्या मुंब‌ईत हातभर अंतरावरचे दीसत नाही इतका पा‌ऊस जोरात येतो….
अगदी बॉक्सींग केल्यासारखे दणादण बडवतो….
linkroad71.jpg
पुण्यातला घाटावरचा पा‌ऊस आळशी…. ये‌ईल तो शंका काढीत काढीत आला की व्हि.आय.पी. पाहुण्यासारखा उगीचच जायची वेळ घड्याळात बघत राहील !

सुरूवातीला काय अप्रूप असायचे ह्या पावसाळ्याचे ! बालपणी शाळा नुकत्याच सुरू झाल्यावर येणारा पा‌ऊस म्हणजे देवदूतच वाटायचामे महिन्याची सुट्टी नुकतीच संपलेली असताना शरिरावर बुद्धीवर सुट्टीचा कैफ बाकी असतानाच हा तुफान गर्जना करीत यायचा….
पहिल्या पावसांत घामोळ्या जातातह्या समजुतीने मग उघडे नागडे तोकड्या चड्डीवरहेऽऽऽहेऽऽऽऽहेऽऽऽऽकरीत कार्टी रस्त्यावर धावायची…. ओली चिंब व्हायची पोरं !
पण घरून पूर्ण सूट असायची त्या गम्माडी जमतीला ! छोटी छोटी तळी साचायची रस्त्यात मग छप्प छप्प करीत दोन्ही पाय एकावेळी ढुंगणावर आपटत त्या तळ्यांत उड्या मारून आजूबाजूला पाणी उडवायचो आम्ही….
ती जाहिरात आठवते का टिव्ही वरची
एक छोट्टासा बालक असाच उड्या मारत असतांना एक धोती घातलेला जरासा रागीट पणउत्पल दत्तसारखा खोडसाळ म्हातारा रस्त्यावरून जाताना त्याच्या अंगावर पाणी उडते तो भडकण्याच्या बेतातच असतो पण……….. त्यालाही स्वतःचे बालपण आठवतेअगदी समर्पक जाहिरात होती ती……
लहान मुले पावसांत हुंदडणारे असे प्रसंग पाहिले की, बालपण उन्मळून आठवते डोळ्यांच्या कडा ओलसर होतात…. त्या आठवांनी !
ह्या पावसात मग ओढा बनला की कागदी होड्या फटाफट तयार व्हायच्या. माझी मोठी बहिण कागदी नांवा बनवण्यात पटाईत !
साधी होडी , बंब होडी , नांगर वाली होडी, चार खणी होडी वगैरे पटापट बनवून द्यायची….
मग मागच्या वर्षीची वह्यांची रद्दी फार उपयोगी पडायची…..
                                                                                                               image221.jpg
तिर्थरूप रेल्वेत होतेत्यांची ऑफिसच्या जुन्या पुराण्या रजिस्टर्स वर पटकन हक्क सांगितला जायचा……
एकदा ते घरी नसताना नेमका पाऊस आला…..टराटर दोन चार पाने फाटली…… फटाफट होड्या तयार झाल्या. मी पळालो पण होड्या पाण्यात सोडायलावेळेचे भान कसले उरते ?तिर्थरूप घरी आल्यानंतर आमचे आगमन उशिराने झाले त्यातही चिखलात लोळून, कपड्यांचा चपलांचा बोऱ्या वाजवून – पाहण्यालायक अवतारात घरी दर्शनार्थ पोहचलो….
घरी जाऊन पाहतो तर काय…. सिन एकदम सिरीयस !!!
दोघी बहिणी पुस्तकांत डोकी खुपसून बसलेल्या…..
मोठी फुसफुस् करीत नांक ओढीत होती…….
मलाम्हणजे ताकभातपापडलोचणे लगेच कळायचे पण आज नेमके काय चुकले ह्याचा अंदाज येत नव्हता
म्हटले काढली असेल एकीने दुसरीची खोडी खाल्ला असेल मार मोठीने…..
म्हणून चुपचाप स्लिपर्स हातात उचलून मागच्या अंगणात सूबाल्या करायची पोझ घेतलीच…. तेव्हढ्यात साहेबांचा पंजा पडला मानगुटीवर….. सटासट आवाज सुरू झाले
माझी नेहमी ट्रिक असायची ती जोर-जोरांत रडण्याची म्हणजे खालून-तळघरांतून आजोबांची हाक यायला पाहिजे  “दाऽऽऽदाऽऽऽऽऽकरून
कसले काय…. आज आवाज फक्त सटासटचाच मोठा होता.
त्या दिवशी पूर्ण गल्लीने माझ्या तोंडच्या आवाजापेक्षा अंगाचा आवाज मोठा आलेला ऐकला……
मी रात्री जेवताच रडत रडत झोपलोमहान आश्चर्यकाका, आत्या, आई, आजोबा, आजी पैकी कुणीच जवळ घेतले नाही त्या दिवशी……
नंतर हळूहळू उलगडा होत गेला
तिर्थरूपांचे ऑफिसच्या कामाचे रजिस्टर गटारात होड्या बनून फिरतं होते…..
त्याला कारणीभूत मी मला होड्या बनवून देणारी माझी ताई
आम्ही दोघांनी मुंबईतल्या पावसाच्याच लयीतच मार खाल्लेला होता…..
आत्या आई मध्ये पडली म्हणून त्यांना ओरडा ऐकावा लागलेला होता….
आजी साळसुदासारखी हळूच भजनाला जाते करून सटकलेली होती (इथे माझे टाळ कुटले गेले होते) आजोबाही तळ घरात गप्पवर आलेच नाहीत कारण त्यांना माहित होते की गुन्हा काय घडला ते !
रात्री उशीराने जरा स्वप्न आल्यासारखे वाटले…… दादा उश्यांशी बसून डोक्यावरून हात फिरवीत आहेत असे काहीसे पण डोळे उघडून खात्री करायचा त्राणही शिल्लक नव्हता अंगात…..  
                                                       101.jpg
कॉलेजला जायला लागल्यावर एकदा पावसाळ्यात काकांचा किरण आला….
“भाई
होडी बनवून दे ना !” मी सुन्न;  कागदाकडे नेलेला हात चटका लागतो तसा मागे घेतलाशेजारी दादा कसलेसे वाचन करीत होते…. चष्म्यांच्या आडून त्यांनी हळूच पाहिल्याचा भास झाला मला…..
मी गप्प पाहून दादाच बोलले. “आण मी देतो बनवून”  थोड्याश्या अनिच्छेने किरण त्यांच्याकडे वळला.
कागद कामाचे नाही ना ?” ह्या वाक्यावर मी का कुणास ठाऊक सिन मधून एक्सीट घेतली.

हंम्म्, त्याला होडी बनवून देत आहेत !” मी आई कडे स्वयंपाक खोलीत जाऊन धूसफूसलो
मला होडीवरून लहानपणी दिलेला मार विसरले !”
मला
वाटले आई आता आपल्या बाजूने काहीतरी खूसपूसेल….
पण तीने एक सेकंद हातातले काम थांबवून माझ्याकडे तिऱ्हाईत नजरेने पाहिले  व म्हणाली….
तुला मार आठवतो…. मला ते रात्रभर तुझ्या विजुच्या उशाशी बसलेले आठवतात !!! ” –

Comments (1)

“आनंद~यशवंत”- वृत्तांत

मराठी गीत व संगीतकार श्री.यशवंत देव ह्यांच्या ८०व्या वाढदिवसा निमित्त हृदयेश आर्ट्स तर्फे त्यांचा हृद्य सत्कार समारंभ शनिवार-१९नोव्हे. रोजी पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात संपन्न झाला – त्याचा हा वृत्तांत.

श्री. प्रदीप भिडे ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचलन ठीक ८ वा. सुरू करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

तनुजा वैद्य-जोग ह्या श्री.देवांच्याच शिष्येने ‘तुळशीच्या बनी’ ह्या देवांनी संगीतबद्ध केलेल्या भक्तिगीताने सुरुवात करीत ‘तुझ्या एका हाकेसाठी किती बघावी रे वाट’ हे भावगीत पाठोपाठ सादर केले. मंगेश पाडगावकरांच्या नव्या कोऱ्या येऊ घातलेल्या काही भावगीतांपैकी ‘सांग कुठे भुलला ग राधे तुझा श्याम’ ह्या गीताने तनुजा वैद्य जोगांनी ह्या कार्यक्रमातील स्वतःच्या सहभागाची सांगता केली.

तत्पुर्वी श्री. भिडे ह्यांनी श्री.यशवंत देवांनी प्रचलित केलेल्या “समस्वरी” ह्या गीत प्रकाराबद्दल गमतीदार माहिती सांगितली. ‘सांग कुठे भुलला’ च्या आधी तनुजा ह्यांनी “समस्वरी” प्रकारातले एक गीत सादर केले. हिंदीतल्या “जवाँ है मुहोब्बत-” च्या चालीवर मराठीत “मी जाते माहेरी, गुंडाळून गाशा. नको ती भांडणे, नको तो तमाशा” हे गीत सादर करताच सभागृहात हास्याचा धबधबा कोसळला.

मी इयत्ता ७वीत असताना गिरगांवच्या देशस्थ यजुर्वेदी माध्यांदीन ब्राह्मण सभेच्या सभागृहात श्री. यशवंत देवांनी सादर केलेल्या मराठी “समस्वरी” ची आठवण प्रकर्षाने आली.
“स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” वरील समस्वरी त्यांनी “चौपाटीच्या बाकावरती वचन दिले तू मला” असे केल्याचे मला अजूनही आठवते. 

जवळपास १५०० गीतांना चाली देऊन संगीतबद्ध करणाऱ्या श्री.यशवंत देवांबद्दल बोलताना भिडे कौतुकाने (नारदाची गोष्ट संगत) म्हणाले की, मुंबईतल्या शिवाजी पार्कचे हे देव यशवंतही आहेत व आनंदही आहेत.

पाठोपाठ माधुरी करमरकर ह्यांनी रसिक मनाचा ताबा घेतला तो देवांनीच संगीतबद्ध केलेल्या ‘जीवनांतली घडी अशीच राहू दे’ ह्या आजवरच्या लोकप्रिय गीताने. ‘विसरशील खास मला’ ह्या त्यांच्याचं गीताला मिळालेला श्रोत्यांचा प्रतिसाद अत्यंत उत्स्फूर्त होता. माधुरी ह्यांनीही “समस्वरी” ह्या प्रकारातले देवांचे “ओह सजना, बरखा बहार आयी” वरील “ही बघ ना नटून थटून सांज आली” हे गीतही रसिक वर्गाची वाहवा घेऊन गेले.
माझे आवडते कवी श्री. मंगेश पाडगावकर ह्यांची खास उपस्थिती मनाला सुखावून गेली. त्यांनी श्री.देवांच्या गौरवापर छोटेखानी भाषण केले.श्री. यशवंत देवांनी त्यांच्या कित्येक गीतांना चाली दिल्या व ती गीते अजरामर झाली ह्याची आठवण करीत देवांच्या १००व्या वाढदिवसाचा कार्यक्रम येथेच पार पडो व मी व आपण रसिक वर्ग त्या कार्यक्रमाला उपस्थित राहो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. फक्त “आनंद यशवंत” हे नाव असलेल्या ह्या कार्यक्रमातला “देव” हरवू देऊ नका- असेही त्यांनी यशवंत देवांना सुचविले.निर्व्यसनी देवांचे कौतुक करताना ” हा असा संगीतकार आहे जो दारू पीत नाही, सिगरेट ओढत नाही व तंबाखू खात नाही” हे आवर्जून सांगितले.

“प्रेम करणाऱ्याने प्रेम कधी तराजूत तोलू नये व गायनाच्या कार्यक्रमात भाषण देणाऱ्याने जास्त बोलू नये.” असे सांगत त्यांनी भाषणाची पूर्तता तर केली पण जाण्यापूर्वी त्यांनी-

“मी आज ७५ वर्षांचा, देव आज ८० वर्षांचे तर श्री.गजानन वाटवे (उपस्थित होते) आज ९० वर्षांचे आहोत. आमचे सत्कार समारंभ होत असताना आम्ही थरथर कापत कोणाच्या तरी हातांचा आधार घेत मंचावर येतो त्याचा अर्थ आमची प्रतिभा, आमची गायकी वा आमची मराठी कोणाच्या आधाराने चालणार किंवा पुढे सरकणार असा घेऊ नये” हे सुनावताच श्रोत्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. ” ही मराठी आपल्या स्वत:च्या पायावर उभी राहणारी आहे व तिला कुठल्याही हाताची गरज नाही” हे टाळ्यांच्या गजर संपल्यावरचे वाक्य अधिक टाळ्या घेऊन गेले.
श्रोतवृंद श्री. पाडगावकरांच्या बोलांत मंत्रमुग्ध असतानाच श्री.श्रीधर फडके ह्यांनी मंचाचा ताबा घेतला – स्पष्ट व साध्या मराठीत “नमस्कार” असे रसिकांना वंदन करीत त्यांनी “देव काकांना मी घरातल्या समोरच्या खिडकीत बसून वहीत काहीतरी लिहिताना बघत असे”.”त्यांची मला खूप भीती वाटे” “त्यांनीच मला सर्वप्रथम गाण्याची संधी दिली व तू सुधिर फडकेंचा मुलगा आहेस हे लक्षात ठेवून गाणे गा असेही बजावले” ह्या व अशा कित्येक आठवणी श्री.देवांबद्दल सांगितल्या.

कै. सुधीर फडके (बाबूजी) ह्या माझ्या आवडत्या गायकाचे गाणे प्रत्यक्ष बघण्याचे सौभाग्य मला कधी लाभलेच नाही परंतू श्रीधर फडकेंनी हुबेहूब त्यांच्याचं आवाजात जी गाणी सादर केली त्यांतूनच माझी दुधाची तहान मी ताकावर निभावून नेली.

मग सुरू झाली खऱ्याखुऱ्या आवडत्या भावगीतांची पर्वणीच श्री. देवांनी संगीतबद्ध केलेले व बाबूजींच्या स्वरातले “तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे” श्री.दिलीप पांढरपट्टे ह्यांच्या ‘घन बरसे’ मधील “आई असते शांत…..”कधी बहर- कधी शिशिर-” मागोमाग अजून एक छान गाणे- “काही बोलायचे आहे पण बोलणार नाही” ह्या गीताने श्रीधरने स्वत:च्या सहभागाचा समारोप केला.

श्रीधर फडके नंतर उत्तरा केळकरांनी अष्टपैलू गीतांचा गालिचाच रसिकांसमोर उलगडला. बहिणाबाईंच्या – यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेल्या – “जाय आता पंढरीले” ही ओवी व “खोप्या मंधी खोपा सुगरणीचा चांगला…..” ही ओवी सादर केली. विं दा करंदीकरांचे ४ वेगवेगळ्या चाली एकत्र असलेले “सर्वस्व तुजला वाहिले” ह्या कठीण भावगीतानंतर आली मऱ्हाट् मोळी लावणी….. “माघाची थंडी माघाची…..” ह्या लावणीला संयमीत पार्लेकरांनी शिट्ट्या व टाळ्यांनी सभागृह डोक्यावर उचलून घेतले व आपणही खरे ‘मऱ्हाटी’ असल्याचेच दाखवून दिले.
ज्या गीतांसाठी मी तासभर तर सोडाच,…. दिवसभर रांगेत उभे राहून प्रवेशिका मिळवण्यास तयार होतो त्या गायकाची मी उत्सुकतेने वाट पाहतं होतो. श्री.अरुण दाते ह्यांचे मंचावरील आगमन सर्वांनीच टाळ्यांच्या गजरांत केले. “मी पाहिले वाहिले व त्यानंतरही सर्वाधिक गाणी श्री. यशवंत देवांचीच म्हटली आहेत” असे संगत श्रीनिवास खळे ह्यांचे १९६३ मधले “शुक्रतारा मंदवारा” हे गीत यशवंत देवांनीच संगीतबद्ध केल्याची आठवण करून दिली. “कविता चांगली नसेल तर गीत कधीच अजरामर होत नाही व टिकून राहणार नाही” असे संगत त्यांनी श्री.यशवंत देवांची व समोर बसलेल्या आशा भोसलेंची स्तुती केली. आशा भोसलेला “फिट्ट” बसणारे गीत – “दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे” हे सादर केले. त्या पाठोपाठ सुरू केलेल्या “अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी- लाख चुका असतील केल्या; केली पण प्रीती” ह्या गीताला सुरुवातीलाच टाळ्यांचा कडकडाट झाला. “जीवनाच्या सोहळ्याला जायचे आहे, आपले आनंद गाणे गायचे आहे” ह्या देव व दाते ह्यांच्या येऊ घातलेल्या नव्याकोऱ्या भावगीता पाठोपाठ दोघांचे सर्वोत्कृष्ट व सुप्रसिद्ध “भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी” हे सादर झाले.
“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे” ह्या माझ्या आयुष्यातल्या सर्वांत आवडत्या गीताने श्री. दाते ह्यांनी ह्या संगीत समारंभाची सांगता केली हे माझे सुदैव !
त्यानंतर मध्यांतर झाले.

मध्यांतरानंतर श्री.यशवंत देव, सौ.करुणा देव, श्री.गजाननराव वाटवे व श्री.गजाननराव सुखटणकर ह्यांचा आशा भोसले ह्यांच्या हातून सत्कार करण्यात आला. मऱ्हाटमोळी पगडी देऊन श्री.यशवंत देवांवर छतातून पुष्पवृष्टी करण्यात आली.

नंतर सुरू झाली आशा भोसलेंशी अनौपचारिक गप्पांची मैफील त्याचा सारांश –

आशा- मराठी बोलण्याची मला सवय थोडी कमी आहे कुठे चुकले तर मोठ्या मनाने क्षमा करा
आशा- खरे ब्राह्मण हे असे असतात (देवांकडे हात दाखवून) पगडी त्यांना अगदी शोभून दिसते- इतरांनी पगडी घातली तर ती चांगली दिसत नाही.
आशा- मला पगडी घालण्याची खूप इच्छा आहे पण कोणी घालतच नाही आता मी विश्वासला (हृदयेश आर्ट्स चे) सांगणार आहे तू नेहमी मला टोपी घालतोस पुढच्या कार्यक्रमाला मला पगडी हवी.
आशा-ग्रॅज्युएशनची टोपी घालण्याची मला खूप इच्छा होती पण मी फक्त ४थी ५वी शिकलेली – पण ही इच्छा एका गीताने पूरी केली व मला ग्रॅज्युएशनची टोपी घालायला मिळाली. ती टोपी घालूनच मी स्टेजवर गाणे म्हटले कारण भीती वाटत होती, त्यांनी ती परत दिलीच नाही तर ? 
देव- वाटव्यांवरील कविता वाचून दाखवत- वाटवे हे मराठी भावगीतांचे गेटवे आहेत.
आशा- वाटव्यांच्या भावगीत म्हटल्याने मी माईंच्या हातचा मार खाल्ला आहे (राधे कसा गं सैल झाला तुझा अंबाडा ह्या गीताचे ध्रुपद ऐकवून)
 आशा- (टीव्ही वरील मुलाखतकार बायकांच्या हुबेहूब नकला करून खूप हसवले.) ह्या मुलाखती घेणाऱ्यांनी त्या व्यक्तीचा फोटो ठेवून मुलाखत घेतली तरी चालेल अशा मुलाखती घेतात. 
आशा- आपण सर्वप्रथम केंव्हा भेटलो ह्याची आठवण करून दिली – परत एकदा “विसरशील खास मला दृष्टीआड होता” ह्या गीताचे एक कडवे दोघांनी सादर केले
आशा- फडके व देव हे दोघेही सारख्या ताकदीचे संगीतकार- ह्यांच्या बरोबर काम करायचे म्हणजे माझी मधल्या मध्ये पंचाईत व्हायची. फडके दाबून गाणारे तर देवांना मनमोकळे व आवाज न चोरता गाणे आवडायचे.
आशा-(बाबूजींची हुबेहूब नक्कल करीत) फडके असे गात – ह्या नंतर बाबूजींच्या आठवणी आशाने व्यक्त केल्या.
देवांनी ढगाला लागली कळ वर एक विडंबन(राजकारणावर)काव्य सादर केले “राजकारणात साचलाय मळ – त्याची भोगतोय फळ ”
ई-टीव्ही वर शिघ्रकाव्य बसल्या बसल्या केल्याची आठवण देवांनी सांगितली आम्ही मुलींशी बोलण्यासाठी महिनो न महिने घ्यायचो तर आजकालची मुले सरळ ‘आती क्या खंडाला’ असे म्हणतात हे साम्य रिमिक्स चे व जुन्या गीतांचे असल्याचे देवांनी सांगितले.
रिमिक्स मुळे बेरोजगारी कमी झाल्याचे श्री. देव उपहासाने म्हणाले- जेथे फक्त तबला पेटी व तंबोरा ह्या निवडक वाद्यांवर आम्ही गाणे ऐकवले आहे तेच गाणे आज १२/१५ पोरं वेगवेगळी वाद्ये वाजवत,कॅमेरा सोबत सादर करतात. संगीत श्रवणीय वरून प्रेक्षणीय झाले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
असतील नसतील (जास्त करून नसतील) तेव्हढे तोकडे कपडे घालून आजचे संगीत सादर केले जाते ह्याविषयी श्री. देवांनी खंत व्यक्त केली.
आशाच्या गायकीचे अमाप कौतुक श्री.देवांनी ह्यावेळी केले. स्वतःची एक शैली त्यांनी कायम ठेवल्याचे आवर्जून सांगितले. अनुकरण व अनुसरणं ह्यावर त्यांनी ह्या निमीत्ताने उदाहरण दिले. “जेवताना समोरचा काटा चमच्याने जेवतो म्हणून मी त्याचे बघून काट्या चमच्याने जेवलो ते अनुकरण पण मी माझ्याच ताटातले जेवलो ते अनुसरणं.”
देवांनी आशावर सुंदर कविता सादर केली.
आशा- “एका गाढवाच्या मालकाने पैज लावली होती की, ह्या गाढवाला मी नाही ह्या अर्थीचे काहीच शिकवले नाही तो प्रत्येक गोष्टीला होकारच देतो- मी ती पैज जिंकली… फक्त गाढवाच्या कानांत जाऊन विचारले की पॉप रिमिक्स गाऊ का व पैज जिंकली.”      
आशा-देवांनाः खर सांगा; दिदी व मी ह्यांत तुम्हाला कोणाचे गाणे जास्त आवडते ? 
देव- लताची गाणे म्हणण्यामागची आत्मीयता व ती स्वतःला वाटेल तेच गाते पण वाट्टेल ते गात नाही हे सांगितले
आशा- मला जे मिळेल ते गाणे मला म्हणावे लागले कारण माझी परिस्थिती तशी होती. मला मुले होती व त्यांच्या संगोपनाची व ग्रॅज्युएटच्या टोपीची जबाबदारी माझ्यावर होती म्हणून जे समोर येईल ते गाणे मला घ्यावे व गावे लागले.
आशा- आजही गाण्याची मला गरज आहे कारण आज गाणे हा माझा श्वास आहे व मी स्वयंपाक करीत असतानाही गाणे गाते. गायल्या शिवाय मी जिवंत राहूच शकत नाही.  
श्री. देवांनी पाडगांवकरांची एक गमतीदार कविता सादर केली. “कोंबडीच्या अंड्यातून बाहेर आले पिल्लू….”
त्यानंतर “संथ वाहते कृष्णामाई” वर एक विडंबन गीत त्यांनी सादर केले- “संथ गातसे कृष्णाबाई,गीतांमधल्या सुर तालांची जाणीव तीजला नाही” 
“मरण येणार म्हणून कोणी जगायचे थांबेल का ” हे पाडगांवकरांचे बोलगीत श्री. देवांनी सादर केले.
आशा- मी आपल्या ८५,९०,९५,१०० ह्या वाढदिवसांना येत जाईन 
देव- पंचवार्षीक योजना दिसतेय तुझी ! (हशां व टाळ्या) पण तोवर मी जगलो तर. 
आशा- माझे नांव आशा आहे हे विसरू नका !
ह्या संवादाबरोबर टाळ्यांच्या कडकडाटात ह्या कार्यक्रमाची सांगता झाली.

अत्यंत घरगुती वातावरणांत पार पडलेल्या ह्या कार्यक्रमाच्या प्रवेश पत्रिका विनामुल्य सकाळी ८.३० ते ११.३० पर्यंत उपलब्ध असल्याची जाहिरात वाचून मी ८ वाजता पोहचलो. जेमतेम दोन पत्रिका मीळाल्या, त्याही रांगेत तासभर वाट पाहिल्यावर !
पण असे कार्यक्रम बघायला मिळाल्यास दिवसभर रांगेत उभे राहण्याची तयारी आहे-

टिप्पणी करे

नोकरी – एक प्रवास

अभियांत्रिकी विद्यालयाची शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्या झाल्या जळगांवला ओळखीने एका छोट्या इंजिनियरिंग फर्म मध्ये सर्व्हिस इंजि. ची तात्पुरती नोकरी मिळाली. बरोबरीचे बरेचसे मित्र मुंबईचे होते. त्यांनी परीक्षा झाल्या झाल्याच घरच्या वाटा धरलेल्या होत्या. भुसावळसारख्या गावात ‘टाईम्स’ दुपारच्या गाडीने येई. संध्याकाळी घरी जाताना रेल्वेच्या वाचनालयात जाऊन नोकरीच्या संधी चाळत बसायचा उद्योग मागे लागला! – एका महिन्यातच १०/१२ ठिकाणी दगड टाकले होते (खडे लहान वाटतात) त्यातले काही भिरभिरत लागले मुंबईतच व एका मुहूर्तावर, ४ दिवसांत येतो असा निरोप जळगांवला कळवून सटकलो !

जूनच्या २० ला एक मुलाखत होती…. ती यथातथाच गेली. जुलैच्या ५ ला दुसरी होती – मुंबई सेंट्रलला मराठा मंदिरच्या मागेच वाय.एम. सी.ए.च्या प्रशस्त कॉन्फ़रन्स हॉल मध्ये मुलाखतीला बोलावले होते. एक प्रेमळ आजोबां सारखा दिसणारा,मराठी बोलणारा पण मद्रासी माणूस; त्याच्या बाजूला एक जपानी माणूस व शेवटी त्या जपान्या इतकाच बुटका पण हिटलर टाइपच्या मिशा व चेहरा असलेला एक मानव म्हणण्यासारखा प्राणी बसलेला होता. माझी मुलाखत सुरू होण्या आधी एका टिपटाप दिसणाऱ्या तरूण व हसतमुख चेहऱ्याच्या मुलाने (मुलीने नाही…. दुर्दैव!) मुलाखतीला आलेल्यांचे स्वागत केले.

– मला एक समजत नाही; इंजिनियर्स चे व मुलींचे जन्मता वाकडे असते का ? महाविद्यालयात सगळीकडे रखरखीत वाळवंट… खाजगी महाविद्यालयांना परवानगी मिळाल्यानंतर आमची प्रथम बॅच – आमच्या बॅचमधील ३ कोर्सना मिळून १९८ मुलांमागे फक्त ४ मूली – त्यातल्या दोघी अगदी बाळबोध वळणाच्या व लता मंगेशकर टाइप दोन वेण्या घालणाऱ्या. उरलेल्या दोघींपैकी एक बोदवड गावाहून, वेळ मिळाला की यायची…. ती तशी दिसायला बरी होती पण ड्फ्फर असावी…. पहिल्या वर्षी तिला मिळाला डच्चू; तो तीच्या वाडवडिलांना पचनी न पडल्याने तिचे नांवच काढून टाकले कॉलेजमधून – आम्हीही म्हटले जाऊ द्या – नाहीतरी आठवड्यातले दोन दिवस येणार त्यासाठी उरलेले ४ दिवस कोण डोकं पिकवेल ? चौथी होती केरळची -दिवसां दिसली असती उजेडात; मावळतीला कठीण परिस्थिती झाली असती- हे सर्व बघून महाविद्यालय म्हणजे हिरवळ व त्यावर बागडणारी फुलपाखरे हे समीकरण माझ्या गांवी कधीच नव्हते…… कॉलेजच्या एका बाजूला झेड.टी.एस. म्हणजे रेल्वेचे प्रशिक्षण केंद्र- दुसरीकडे आर.पी. डी. म्हणजे मिल्ट्रीवाल्यांचा कसलातरी डेपो. मागे विस्तीर्ण शेते व रेल्वे यार्ड तर चौथ्या बाजूला रेल्वेची खांडव्याला जाणारी रेल्वेलाइन-लाइन मारायची ती कोणावर हा एक प्रश्नच होता…असो..

    ‘विश्वनाथ’ नांव कळले त्या हसतमुख चेहऱ्याच्या मुलाचे – बघता क्षणी आवडेल असे व्यक्तिमत्त्व – त्याला बघून मुलाखतीचे दडपण जरा कमी झालेले. माझा स्वाक्षरी केलेला फॉर्म हातात पडल्यावर त्याने मराठीत काहीतरी विचारले – मग उरला सूरलेला फॉर्मलपणा नाहीसा झाला…. खाजगीत विचारावे अश्या सुरात ‘किती जण येऊन गेले’ हा प्रश्न भीत भीत (त्याला नाही – संख्येला) मी विचारला – ‘अजून चालू झाले नाहीत इंटरव्ह्यूज्’ ….. मी खूश ! आजूबाजूला काही हुशार काही ड्फ्फर चेहरे….एक-दोघे बोलबच्चन – ते सगळी कडून पिटून आलेले मोहरे असावेत-बोलण्यावरून दोनचार ठिकाणच्या नोकऱ्या त्यांनी नाकारल्याचे जाणवत होते. माझे टेन्शन परत वर जायला लागले – एकतर मराठी मीडियमचा पोऱ्या, त्यात भुसावळ सारख्या गांवातला ! नशीब ‘विश्वनाथ’ च्या जागी फाकडू पोरगी नव्हती नाही तर तिला इम्प्रेस करून करून त्यांनी माझ्यासारख्यांची फ्या..फ्या च उडवली असती.

विचारांच्या तंद्रीत असताना खांद्याला हलकासा स्पर्श जाणवला… तो मुलगा मला आंत जायला खुणावत होता…. धीरगंभीर चेहऱ्याने मी धीर न सोडता मध्ये गेलो. – ‘बस !’ आजोबा चक्क मराठीत बोलले ! पुढे एक एक करीत ‘हिटलर’ प्रश्न विचारत होता…… एकाही प्रश्नावर गाडी अडकली नव्हती व ‘कळीचा’ प्रश्न धाडकन समोर आला – ज्या प्रॉडक्ट्स मध्ये ती कंपनी काम करीत होती तिच्यावर आधारीत उत्पादने मी जळगांवला हाताळलेली होती. त्या प्रश्नाचे विचारपूर्वक उत्तर दिल्यावर ‘हिटलर’ जरा मवाळला…. “व्हेन वुड यू लाइक टू जॉईन ?” “टुडे ?” माझ्या उत्तरावर जपानी खळखळून हसला- “रहोगे कहाँ ?” हिट्लर ! “मामा है मेरा-वो पार्लामे रेहता है ।” बहुदा हिटलराला भारतातल्या पोरांच्या बेकारीचे प्रदर्शन जपान्यापुढे करायचे नसावे….. “ठीक है; बाहर जाकर बैठो !”……. मी बाहेर !

दोन चार पोरं मध्ये जाऊन फटाफट परत आली.. एक बोलबच्चन मध्ये गेला तो बराच वेळ अडकलेला होता…. दुसरा ‘विश्वनाथ’ वर फणफणायला लागला. मी ‘विश्वनाथ’ला ‘जरा जाऊन येतो’ म्हटलं व जिन्याकडे सरकलो “मी.कुळकर्णी; ह्या बाजूला-” करीत त्याने बाथरुमची वाट दाखवायचा प्रयत्न केला – पण माझ्या हातातले सिगारेटचे पाकीट त्याला दाखवत मी आलोच चा इशारा करीत सटकलो व दोन मिनिटांतच परतलो – दुसरा बोलबच्चन मध्ये होता. 

……थोड्या वेळाने विश्वनाथ मध्ये जाऊन आला… आल्यावर त्याच्या हातात एक व्हिजीटींग कार्ड होते. माझ्या हातात ते कार्ड कोंबून त्याने “उद्या ह्या पत्त्यावर सकाळी ९.३० ला या” असे मोघम सांगितले – कार्ड घेऊन मी रेंगाळतच खाली जायला निघालो….

नोकरी मिळाली की नाही हे कळलेलेच नव्हते! कार्डावर निळ्या अक्षरांत “जे. मित्रा & ब्र. प्रा.लि.”हा मुलाखत पत्रावरचाच ठसा व पी. सुब्रमण्यम – मॅनेजर ऍडमिनीसीस्ट्रेशन – हे नांव!! नांव, चेहरा व हुद्द्यावरून आजोबांचे हे कार्ड असावे असे ताडले. कवळी बिल्डिंग, एस.के.बोले रोड- दादर प.- बॉम्बे २८ असा पत्ता !!! संभ्रमातच मामीला काय उत्तर द्यायचे ह्याचा विचार करीत मी मुंबई सेंट्रल स्टेशन ची वाट धरली –
**********************************

गाडीत बसल्यावर अचानक ट्यूब पेटली – रिटर्न तिकीट आहेच तर दादरला उतरून जागा बघून घेऊ म्हणजे सकाळी गडबडीत उशीर झाला तरी शोधण्यात वेळ जाऊ नये. कबूतर खाना ते पोर्तुगीज चर्च च्या रस्त्यावर मधोमध ही बिल्डिंग असल्याचे विश्वनाथ बोलल्याचे आठवत होतं. चालतच शोध घेता घेता शेवटी एकदाची दुमजली इमारत सापडली – शुद्ध चाळं !….- आधी विश्वासच बसेना – आपण नोकरीची स्वप्न पाहतो तेंव्हा आपले कार्यालय, तेथील वातावरण, आजू बाजूचे वातावरण हे सगळे कसे चित्रासारखे डोळ्यासमोर उभे राहते- जो बँकेत नोकरीस लागतो त्याच्या नजरेसमोर बँकेचे चित्र, जो इस्पितळात नोकरी धरतो त्याच्या नजरेसमोर ते चित्र….. मी एखाद्या बऱ्यापैकी सर्व्हिस इंडस्ट्रीचे स्वप्न मनांत बाळगलेले होते. – पहिल्या मजल्यावर जाणारा जिना चढत – मनांत म्हटले, ‘अजून कुठे आपल्याला नक्की माहित आहे की, ह्याच कार्यालयात आपल्याला नोकरी करायचीय ?’ परत फिरलो….. घरी मामींनी विचारले ‘काय झाले ?”उद्या  2nd Interview घेतील बहुतेक.’ मी उगीचच भाव खाल्ला ! ‘दोनदोन-तीनतीन वेळा बोलावतात मेले, एकदा काय ते विचारून आटोपून टाकायचे !’ मामींचा सात्त्विक संताप उफाळून आला.

दुसऱ्या दिवशी कालचेच कपडे न घालता वेगळा ड्रेस चढवून मी निघालो. जागा पाहून ठेवलेली त्यामुळे प्रॉब्लेम झालाच नाही. गेल्यावर अजून एक धक्का….. जागेला टाळे ! मी कपाळावर हात मारला! शेजारची लहान मुले उघडी नागडी फिरत होती…. बायका मंडळींचा टिपीकल चाळीतल्या सारखा आरडा ओरडा चालू होता… मध्येच एक माणूस गॅलरीत येऊन पचकन खाली थुंकून परत घरात जायचा…. ज्या गाळ्यात हे ऑफिस (?) होते तो गाळा जिन्याला लागूनच होता; जिन्यावरून अर्ध्या चड्डीत वर-खाली करणारी काही पुरूष मंडळी अगदी नमुनेदार बेवडी दिसत होती…. तेव्हढ्यात ‘आजोबा’ आले. त्यांच्या तुरुतुरु चालीवरून त्यांना यायला उशीर झाला असावा हे कळतच होते. वर आल्या आल्या अगदी जुन्या ओळखीचे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर पसरले. चाव्यांचा एक जुडगा माझ्याकडे देत- व बंद दाराच्या शटर कडे बोट दाखवत त्यांनी मला कुलूप उघडण्याची खूण केली……. व माझ्या पहिल्या नोकरीचा प्रथम दिवस – दुकानासारखे दिसणारे ऑफिसचे शटर वर उघडून झाला !

तसे म्हटल्यास मी जळगांवला नोकरी वजा काम करीत होतोच; पण जेथे जायचो त्या गृहस्थांनी पगार वगैरे अश्या फॉर्मल गोष्टी कधी केल्याच नाहीत. रेल्वेचा पास काढून द्यायचे – अधून मधून खर्चाला पैसे द्यायचे; मन लावून काम शिकवायचे (हेच माझ्यासाठी महत्त्वाचे होते) व आपुलकीने वागायचे. ‘इंस्टकॉन इंजिनियर्स’ हे काही जळगावातले मोठं खटलं नव्हतं, पण माझ्या सारख्या कित्येक गरजूंना व्यवस्थित मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे पुण्य त्यांनी पदरांत सामावून घेतलेले होते. ह्या दुकान वजा ऑफिसचे शटर वर करताना मला माहितही नव्हते की, जळगावात त्यांच्या कडे दुरुस्त केलेली काही इक्वीपमेंट्स माझ्या व्यावसायिक जीवनाची कवाडे सताड उघडी करतील.

सुब्रमण्यम साहेबांचे वय वाटत होते त्याहून बरेच कमी होते. हार्डली ४५चे ते गृहस्थ जरा पोक्त वाटत म्हणून मी मनांतल्या मनांत त्यांना आजोबा ठरवून मोकळा झालो होतो. गप्पा सुरू झाल्या…. श्री. सुब्रमण्यम साहेब दिल्लीला असत. माटुंग्यात त्यांचे आतापर्यंतचे आयुष्य गेलेले. विश्वनाथन हा त्यांच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा ! काही कामासाठी बाहेर गेलेला होता तो तासाभरात येणार होता. आधीचे ऑफिस वरळीला होते ते मित्रा साहेबांच्या जावयाने लाटले – म्हणून ही व्यवस्था तातडीने व तात्पुरती करावी लागलेली होती. हिटलरचे खरे नांव ‘पवन’ आहे व तोच माझा डायरेक्ट बॉस असणार होता – सर्व्हिस मॅनेजर ! मी मोठा आवंढा गिळला….. मनात म्हटले ह्या तुफानाचे नांव पवन कोणी ठेवले असावे ? माझ्या बरोबर अजून एकाची नियुक्ती झालेली होती – त्याचे नांव प्रसाद कुळकर्णी होते – तो येण्यातच होता….. विश्वनाथन वर तणफण करणारा दुसरा बोलबच्चन अवतरला- माहित नाही का….. पण ज्याच्याशी पहिल्या भेटीत माझे सुर जुळत नाहीत त्याच्याशी जन्मभर ते तसेच राहतात. आमच्या दोघांच्या नशिबाने त्याने दीड महिन्यातच कंपनी सोडली ! माझा पगार रुपये ९००/- ठरवण्यात आलेला होता – व ८ जुलैला मला प्रशिक्षणासाठी दिल्लीला प्रस्थान करायचे होते…… ह्या सगळ्या गप्पा मारीत सुब्रमण्यम साहेबांनी तीनदा चहा मागून प्यायले. चहाची गंमत तर न्यारीच होती… टेबलावरचा फोन उचलून ते चहावाल्याला फोन करीत – दहा मिनिटे झाल्यावर परत रिमाइंडर देत – तेंव्हा कुठे चहा येई. तोही स्टीलच्या वाटीत उपड्या ग्लास मध्ये – एकुलता एक. मला गंमत वाटली…. एक चहा – पिणारे सुरुवातीला आम्ही दोघे – नंतर २ चहा – तिघे ! मग ३ मध्ये विश्वनाथ आल्यावर चौघे…. ! पण फोन मात्र ७/८ गेले असतील….

मी व प्रसादने सुब्रमण्यम साहेबांकडूनच पैसे घेऊन मुंबई सेंट्रलला जाऊन राजधानीचे चेअर कारचे तिकीट काढले – तेथेच प्रसादने मला सांगून टाकले- ‘इथला सीन काही ठीक नाही;  मला नाही वाटत मी जास्त दिवस येथे टिकेन’ ‘मग तू त्यांना सांगत का नाहीस ?’ ‘अरे, मला दोन महिन्यांनी जरा बऱ्यापैकी जॉब मिळणार आहे. तोवर टाइम पास होईल’….. जेथे दात आहे तेथे चणे नाही व जेथे चणे आहेत तेथे दात नाहीत !

दिल्लीला प्रथमच जात होतो. पटकन भुसावळला जाऊन उरलेले कपडे घेऊन यावे लागणार होते. विचार करायलाही उसंत मिळत नव्हती. दिल्लीला जायच्या आधी श्री. सुब्रमण्यम कडून प्रॉडक्ट्स ची काही माहिती मिळवली – थोडा अभ्यास केला व प्रशिक्षणासाठी दिल्लीला रवाना झालो….. रात्रभर चेअर कार मध्ये डोळ्याला डोळा लागलेला नव्हता….. एक जीवन – एक प्रवास सुरू केल्याची जाणीव मनात होती, हा प्रवास पूर्ण होईल की नाही त्याची धास्ती मनांत होती !

*************************************

आज जवळपास २० वर्षे झाली. हा अभ्यास, हा प्रवास अजूनही चालूच आहे…. मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या – नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला – नोकरीत काही गमतीदार घटना घडल्या, काही काळजाला घरे पाडणाऱ्या घटना !- कुठे अंगावर शहारे आणणारे अपघात झाले तर दर्शनासारखी पत्नी मिळाली….. नोकरीत सुरू केलेले हे व्यस्त जीवन कुठे जाऊन थांबेल, देव जाणे- पण नोकरीतला तो प्रवास मात्र मनांत कायम घर करून राहिलाय !

श्री. सुब्रमण्यम, श्री.पवन, मॅथ्यु, विशू, अब्राहम (माझा व्यवसाय भागीदार) मिलिंद जोशी इ. माझे जुने सहकारी आजही माझ्या ह्या प्रवासातले सहप्रवासी आहेत हे गेल्या जन्माचे ऋणानुबंध तर नव्हेत ?

टिप्पणी करे

« Newer Posts · Older Posts »